
राजू धकाते यांच्यावर विशेष रोष:वो चुनकर नही आना चाहीये!
मोक्याच्या जागेवर आहे का मंत्री,बिल्डर्स लॉबीचा डोळा?वारांगणांनाही पडला प्रश्न
क्यो जायेंगे अपने गांव?भाई-बहन घर में रखेंगे क्या?
ज्वाला धोटे जेल जायेगी तो हम भी जायेंगे: ज्वाला धोटे एकमेव आस
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १३ ऑगस्ट:नेहमी गजबजणा-या शहरातील गंगा जमुना वस्तीसाठी बुधवार दि.११ आॅगस्टची रात्र ही कहर म्हणून बरपली,पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावर ही वस्ती चारही बाजूने सील करण्यात आली व २४ तास तिथे आता पोलिसांचा खडा पहारा असतो.२०० सशस्त्र पोलिसांनी या भागाला गेल्या ३ दिवसांपासून वेढा घातला आहे.या भागात जमावबंदीही लागू झाली आहे मात्र गेल्या ३ दिवसांपासून वस्तीच्या आत राहणा-या वारांगणांना अद्याप हे सर्व अचानकच का व कशासाठी घडले,यामागचे कारणच समजत नसून नेहमीच छापा टाकणारे,पकडून घेऊन जाणा-या पोलिसांनी अचानक वस्तीच का सील केली!नेमके असे काय घडले ज्यामुळे त्यांचा पोटापाण्याचा धंदाच पोलिसांनी बंद केला?या विषयी विविध चर्चेला वारांगणांच्या कट्ट्यावर उधाण आले आहे तर भाजपचे नगरसेवक राजू धकाते यांच्यावर त्यांचा विशेष रोष ही दिसून पडला,पोलिस आयुक्तांच्या बैठकीत राजू धकाते यांनी वस्ती व वारांगणांविषयी केलेल्या अतिशय चुकीच्या तक्रारीबाबत येथील वारांगणा या संतापलेल्या असून ’कुछ भी हो वो चूनके नही आना चाहीये’अश्या शब्दात त्यांनी आपाला रोष खास ’सत्ताधीश’कडे व्यक्त केला.आज ‘सत्ताधीश’ने वस्तीतील वारांगणांसाेबत मनमोकळा संवाद साधला त्यावेळी वस्तीच्या आत खदखदणारे भयाण वास्तव त्यांच्या शब्दांतून आणि अश्रूतून फूटून बाहेर पडलेत!

राजू धकाते यांनी गंगा जमुना वस्ती समोरील बालाजी मंदिराच्या मागच्या गल्लीत सकाळी ६ वाजता पासूनच अल्पवयीन मुली या वेश्या व्यवसायासाठी उभ्या राहत असल्याचा व त्यांचा वस्तीतील ‘सभ्य’नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर मांडली.परिणामी, अमितेश कुमार यांनी तडकाफडकी बुधवारी संपूर्ण वस्तीच सील करण्याचे आदेश दिलेत.
गेल्या ३ दिवसांपासून या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे.पोलिस विभागाची सर्व प्रकारच्या दूर्बिणींनी लेंस असणारी अजस्त्र अशी सर्विलेंस पोलिस व्हॅन तिथे अहोरात्र पहारा देत उभी आहे.जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या मागोवासाठी ज्या प्रकारे भारतीय सैन्य अश्या व्हॅन्सचा उपयोग करते त्याप्रकारची वागणूक आम्ही देह विकून उदरनिर्वाह करणा-यांना अमितेश कुमार का देत आहेत?मूळात ते कोणाच्या सांगण्यावरुन असे करीत आहेत?हा प्रश्न येथील वारांगणांना छळतोय!

वस्ती खाली करा आपापल्या शहरात निघून जा,असे पोलिस सांगत आहे मात्र गेल्या १५० वर्षांपासून आमच्या पूर्वीच्या किती तरी पिढ्यांनी देखील येथेच धंदा केला,तेव्हा नाही वस्तीवाल्यांना त्रास झाला का?येथील वारांगणा या ग्वाहलेर,राजस्थान,छत्तीसगढ,ओरिसासारख्या राज्यातून आल्या आहेत,विशेष म्हणजे अनेकांच्या घरी १० ते १२ जणांचे कुटुंब असून अतिशय गरीबीमुळे त्यांनी ‘स्वेछेने’हा धंदा स्वीकारला आहे.सभ्य समाजासाठी हा धंदा ‘गंदा’असेल मात्र आम्ही बाजारात बसलो आहोत त्यामुळे नागपूरातील सभ्य समाजाजील बाया या बलात्कार होण्यापासून सुरक्ष्ति असल्याचा दावा त्या करतात.ऑटो चालक,ट्रक चालक,बुटीबोरीतील विविध उद्योगांमध्ये काम करणारे कामगार जे वर्षानुवर्ष आपापल्या कुटुंबापासून दूर राहतात त्यांनी देहाची भूक भागवण्यासाठी कुठे जावं?शहरात बलात्कार करत सुटावं का?असा ’तार्कीक‘प्रश्न ही काही वारांगणांनी पोलिस यंत्रणेला विचारला!

मूळात बालाजी मंदिरा मागे जर अल्पवयीन लहान लहान मुली या सकाळी ६ वा.पासून धंद्यासाठी उभ्या राहत असतील तर मंदिरवाल्यांनी का तक्रार केली नाही,मंदिरवाले हे गप्प बसले असते का?धकाते राहतात कुठे,मंदिर कुठे,वस्ती कुठे आणि त्यांना कधी दिसल्या त्या मुली?नुकतेच धकाते हे भर दुपारी ४ वाजताच्या सुमारास आमच्या वस्तीत आले होते,या ठिकाणी ते उभे होते आणि अचानक आमच्या एका बोळीमधील दारासमोर धंद्यासाठी नटूनथटून उभ्या असणा-या वारांगणांचा त्यांनी मोबाईलवर फोटो काढला आणि लगेच पळ काढला!तोच फोटो कदाचित त्यांनी पोलिस आयुक्तांच्या बैठकीत पुरावा म्हणून मांडला असावा अशी त्यांची ठाम धारणा असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही त्रास होत असल्याचे खोटे बोलले जात असल्याचे त्या म्हणाल्या.
गेल्या १५० वर्षांपासून याच रहीवाश्यांच्या शेजारी आम्ही धंदा करतोय,आता मात्र पोलिस आयुक्तांना केलेल्या तक्रारीत येथील रहीवाश्यांनी आमचे ग्राहक त्यांच्या घरासमोरुन धावत जात असल्याचा उल्लेख केल्याचे आम्हाला कळले,पण जाण्या-येण्यासाठी दूसरा रस्ताच नसल्याने आमचे ग्राहक पोलिसांचा छापा पडला तर त्यांच्या घरासमोरुनच पळ काढणार ना?महत्वाचे म्हणजे ते नग्न पळतात का?कधी दिसले त्यांना नग्न ग्राहक पळताना?रस्ता त्यांच्या घरासमोरुन जातो यात आमचा काय दोष?अरे तो जाण्या-येण्याचा रस्ता आहे,त्या रस्त्यावरुन चांगले ही जातील वाईट ही जातील…आम्ही धंदेवाल्या तर नागरिकांच्या घरात जाऊन घूसत नाही ना?आधीच वस्तीवाले आमच्याशी कुत्ते,बिल्ली जैसा व्यवहार करते है,हम इंसान तो है नही उनके लिये,फिर हमसे क्या तकलीफ है यहा के बस्तीवालो को?आमची येथील रहीवाश्यांनी नेमकी काय तक्रार केली आहे?त्या तक्रारीची कॉपी अमितेश कुमार आम्हाला का देत नाही?आमच्या घरासमोर नोटीस चिपकवल्यात तशी आमच्या विरोधात ज्या तक्रारी करण्यात आल्या त्या का नाही चिपकवल्यात?ही सगळी बनवाबनवी आहे, आम्ही आमची राहती वस्ती,पूर्वजांचा धंदा सोडून निघून जावे म्हणून वस्ती सील करण्यात आली मात्र आम्ही आत्महत्या करु,मरुन जाऊ,जीव देऊ पण वस्ती सोडून कुठेही जाणार नाही,असा ठाम निर्धार येथील वारांगणांनी व्यक्त केला.

(छायाचित्र-आपल्याच जगात मस्त एका वारांगणाची चिमुरडी)
भाजपच्या धकाते यांचा ‘बोलवता धनी’कोण आहे हे आम्ही अनाडी आणि अशिक्ष्ति असलो तरी आम्हाला कळतं!कोणत्या मंत्र्या-संत्र्यांचा,शहरातील बिल्डर लॉबीचा डोळा हा आमच्या वस्तीवर आहे एवढे न समजण्या इतपत आम्ही दूधखुळे नाहीत! अाधी पण आमची वस्ती खाली करण्यासाठी साम,दाम,दंड,भेदाची नीती अवलंबली गेली आहे,पण आम्ही बधलो नाही,ज्यांचा आमच्या वस्तीवर डोळा आहे त्यांनीच आमचे पुनर्वसन करावे,आम्हाला इतर कोणताही धंदा जमत नाही,नोकरी कोणीही देणार नाही,आमच्या गांव-शहरामध्ये आम्हाला थारा नाही मग आम्ही जाणार कुठे?

द्या ना राजकीय नेत्यांसारखे आम्हाला पेट्रोल पंप!मोठमोठे हॉटेल चालवायला!शिक्ष् ण संस्था!भरतो आम्ही पोट इमानदारीने!इमानदारी तर आमच्या या धंदात ही खूप आहे. आमच्या वस्तीत आम्हीच नाबालिक मुलींना धंद्याला बसू देत नाही,जी मालकीन असे कृत्य करते तिचा विरोध करतो,उगाच आम्हालाच पोलिसांची रेड नको असते,अल्पवयीन मुलींकडून धंदा करवून घेता म्हणून पोलिस वारंवार छापे टाकतात,काही मालकीन असे करत असेल तर त्यांना अटक करा ना?त्यांचे घर सील करा.आम्ही कुठे विरोध करतो?तुम्ही सरसकट सर्वांनाच का वेठीस धरता?
३५ वर्षांच्या वारांणांनांही पोलिस पकडून घेऊन जातात आणि त्यांची नोंद ‘अल्पवयीन’ करतात!मलाच १५ वर्षाचा मुलगा आहे मग मी अल्पवयीन कशी?आमच्या लहान लहान तान्हया मुलांबाळांसोबत आम्हाला लकडगंज पोलिस चौकीत घेऊन जातात,मागच्या शुक्रवारी छापा टाकला तेव्हा माझ्या २ वर्षाच्या मुलीला वारंवार संडास होत होती,तिच्या अंगात खूप ताप होता,लकडगंज पोलिस ठाण्यातील एका महिला कॉन्टेबललाच दया आली तिने वरिष्ठ पोलिसांना विनंती ही केली किमान या तान्ह्या मुलीच्या आईला सोडून द्या पण त्या वरिष्ठ पोलिसांनी १० दिवस मला सेंट्रल जेलमध्ये माझ्या तान्हुल्यांसाेबत डांबून ठेवले……!हाच का या देशाचा कायद्या?न्याय?

एका पीएसआयने तर आम्हाला सांगितले तुम्ही ग्वाहरेलचे आहेत ना मग महाराष्ट्रात काय करताय?चालते व्हा आपापल्या शहरात इथून!ग्वाहलेर हे भारता बाहेर आहे का?आम्ही भारताचे नागरिक नाहीत का?धंदा करतो म्हणून आम्हाला कोणतेच अधिकार नाहीत कुठेही राहण्याचा?कोणता कायदा असे सांगतो?मग का सरकारच आम्हाला रेशन कार्ड,आधार कार्ड,मतदार ओळख पत्र देते?
मागच्या शुक्रवारी आमच्या वस्तीत रेड पडली,येथील एका वारांगणेच्या घरी खायला अन्नाचा दाणा ही नव्हता,रेड क्राॅस सोसायटीच्या हेमलता लोहवे यांनी १० किलो धान्याची किट जमवून दिली,ते घेऊन खोलीत ठेवलीच होती की पोलिसांचा छापा पडला,ती तशीच धावली,आधीच उपाशी पोटी त्यामुळे भर रस्त्यातच खाली पडली……!आता पाय मोडून घरीच बसली आहे…..!तिला कोण देणार आता खायला?पोलिस?सरकार कि वस्तीवाले?गर्भवती वारांगणांनांही पोलिसवाले उचलून नेतात चौकीत!पोटूशी असताना ती काय ग्राहकासोबत धंदा करते का?१० डिसेंबर रोजीही पोलिसांनी हेच केले…पोटूशी असणा-या,लहान मुले असणा-या सर्वांना चौकीत नेले…..!एक गर्भवती तर पोलिसांची रेड पडली तर धावत सुटली आणि संडासाच्या गडरमध्ये पडली तिला पोलिसांनीच हात देऊन बाहेर काढले….!भल्लो नावाची वारांगणा तर पोलिसांची रेड पडली ऐकूनच धास्तीने जागच्या जागी मरण पावली…..!

आज कमावू तर खाऊ शकू असा आमचा धंदा आहे, तो चांगला की वाईट हे समाजाने ठरवावे मात्र समाज आम्हाला खायला देत नाहीत,गेल्या १६ महिन्यांपासून लॉकडाऊन लागले आहे,कोण आले आम्ही कसे जगतोय हे बघायला?आलेत का नागपूरकर?तथाकथित सभ्य समाज?का?आम्हाला मुले बाळे नाहीत का?कि पोटाची भूक आम्हाला जाळत नाही?
३ दिवस झाले शीळे अन्न खातोय,मुलांना दूध नाही,पैसेच नाही,ग्राहकीच नाही तर आणणार कुठून?पोलिस ३ दिवस झालेत दिवस रात्र पहारा देत आहे,वस्ती बाहेर कोणालाची जाण्याची परवानगी नाही,भाज्या तर आम्ही बनवल्याच नाही,भाज्यांशिवाय मुले जेवतच नाहीत,वस्ती बाहेर जाणा-यांची नावे,काम नोंदवल्या जात आहे,ग्राहक कसे येणार?दररोजची शे-दोनशेची कमाई बूडून राहीली आहे पण पोलिस तर ५ मिनिटे ही हटत नाही! मी ७० वर्षाची वारांगणा आहे मला देईल का ‘सभ्य’म्हणून घेणारा समाज कोणते काम? आजपर्यंत वस्तीचा रेकॉर्ड आहे चरस,गांजा,दारुची विक्री आमच्या वस्तीत आम्हीच होऊ दिली नाही,वस्तीतच पोलीस चौकी आहे,या अमली पदार्थांची विक्री होते असा आरोप होत असेल तर चौकीतील पोलिसवाले धृतराष्ट्र आहेत का?काहीही आरोप लावायचे का वस्ती खाली करण्यासाठी?आरोप काय आहेत ते सांगायचे नाही,दाखवायचे नाही फक्त वस्ती खाली करुन हवी आहे,जी मरु तरी खाली करुन देणार नाही….!

(छायाचित्र-धंदा असला तरी..देवाच्या साक्ष्ीनेच!)

घराघरांवर पोलिसांची नोटीस!
‘सत्ताधीश’ने या वस्तीत प्रवेश करताच काही पोलीसकर्मी हे वारांगणाच्या घरासमोर फौजदारी दंड प्रक्रिये अन्वये कलम १४४ ची नोटीस लावताना दिसले.वारांगणांना याबाबत ‘सत्ताधीश’ने प्रश्न विचारला असता ’नोटीस तो मराठी में है!और हम में सें कोई पाचवी भी पास नही,हमको कैसे समजेगा क्या लिखा है?हिंदी में होता तो हमारे पढे लिखे बच्चो सें पढवा भी लेते’असे त्यांचे उत्तर होते!

ज्वाला धोटे के साथ हम भी जेल जायेंगे!
कल ज्वाला जो बोली बहोत ही अच्छा बोली,वो ही हमारी समस्या छूडा पायेगी,वो ही हमारी रक्ष्ा करेंगी,हमे भरोसा है उनपर,अगर उनको पोलीसवालो ने जेल भेजा तो हम भी उनके साथ जेल जायेंगे,हम उन्हे अकेले जेल नही जाने देंगे…….!
राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्ष् ज्वाला धोटे यांनी काल गुरुवारी गंगा-जमुना वस्तीतील वारांगणांशी भेट घेत चर्चा केली,सभा घेतली व पोलिस कारवाईचा निषेध केला होता.काहीही झाले तरी वस्ती येथून उठणार नाही,पोलिसांना त्यांनी शनिवार १४ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत अल्टीमेटम दिला आहे,या वस्तीतील पहारा उठवा,रस्ते मोकळे करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ज्वाला धोटे यांनी पोलिसांना दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर वारांगणांना मिळणारे शासकीय अनुदान आणि पोलिसांच्या रेडचा ‘अचूक’टायमिंग!
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडीतांना तसेच वेश्या व्यवसाय करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक सहाय्य रोख स्वरुपात देण्यात येते.या आदेनान्वये गंगा जमुना वस्तीतील ७१० वारांगणांना ज्यांना मुले आहेत त्यांना २२ हजार तर ज्यांना मूलबाळ नाही त्यांना १५ हजार रुपयांचे सहाय्य राज्य सरकारकडून डिसेंबर महिन्यात मिळाले मात्र हे पैसे हातात पडताच डिसेंबरमध्येच या वस्तीवर पोलिसांची रेड पडली,अनेक वारांगणांना अटक झाली,जेलमधून सुटण्यासाठी शासनाचा हा पैसा शासनाच्याच खात्यावर खर्च करावा लागला असल्याने येथील वारांगणांचा अतिशय रोष पोलिसांवर आहे.एका वारांगणेतर हा पैसा मिळाल्यामुळे ५किलो बिर्याणीची पार्टी वस्तीतील वारांगणांना दिली होती एवढंच नव्हे तर काही रक्कम तिने पूजाअर्चावर ही खर्च केली होती.

वस्तीवाल्यांचे नाव पुढे करुन आता ही वस्ती खाली करण्याचे कटकारस्थान हाणून पाडू,तक्रारीत चिंतेश्वर शाळा,सुदर्शन शाळा,शरणस्थान तसेच अनुग्रह या दोन क्रिश्चिन मिशनरीं देखील तक्रार नोंदवल्याची माहिती या वारांगणांच्या कानी पडल्याने या चारही शाळेेत आमचीच मुले शिकतात,आमच्याच मुलांच्या शिक्ष् णासाठी या चारही शाळा ऐवढे चांगले काम करीत असताना त्या कशाला पोलिस आयुक्तांकडे वस्ती हटवा म्हणून तक्रार नोंदवणार आहेत?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आम्ही लोकं कमजोर आहोत,तक्रारी करणा-यांच्या मागे ‘बडे बडे लोगों का हात है,ये हमे भी मालून है,अब क्या हम फांसी लगाकर मर जाये क्या?‘असा उद्विग्न प्रश्न या वारांगणा पोलीस प्रशासनाला व मायबाप सरकारला विचारत आहेत.एका वारांगणाचे वय ६० वर्षाचे आहे तिला मोतीबिंदू आणि काचबिंदू दोन्ही आजार जडले,तिला उपचारासाठी पैसे लागणार आहेत,कोण देणार तिला पैसे?वस्तीवाले?सभ्य म्हणून घेणारा समाज की पोलीसवाले?जे धंदा करु देत नाहीत….!

[छायाचित्र-एकमेव दरगाह गल्ली सोडून वस्तीतील चारही बाजूने व आतील गल्ल्यांमध्ये पोलिसांनी अश्याप्रकारे बॅरिकेट्स लावले होते)
आमच्या मुलांना शिकून सवरुन आम्हाला बाहेर काढायची आहे,वस्तीच उठली तर मुलांच्या शिक्ष् णाचे काय होणार?मंत्री,पोलीस,राजकारणी किवा वस्तीवाले यांनी आमच्या मुलाबाळांचा विचार केला का?का ते या देशाचे भवितव्य नाहीत का?आमची मुले मोठी होऊन आईसाठी,बायकोसाठी दलाल होतात,आमच्यासाठी ग्राहक शोधून आणतात,सभ्य समाजाची ही चुकीची समजूत आहे,काही अपवाद असतील मात्र आमची मुले शिकून सवरुन वकील ही झाली आहेत.
आमच्या ही मुलांना का नाही देत सरकार आरक्ष् ण?आम्हाला तर ‘जात’म्हणजे काय समजतच नाही!पैदा झालो आणि धंद्यात आलो तेव्हापासून आम्हाला दोनच जाती समजतात,या जगात ‘भगवानने‘स्त्री आणि पुरुष या दोनच जाती निर्माण केल्या आहेत आणि आम्ही देखील या दोनच जातींना मानतो…..!

(छायाचित्र-आपल्या भविष्याप्रति अज्ञात असणारी व क्रिकेट खेळामध्ये व्यग्र असणारी वारांगणांची निरागस मुले..उद्या वस्ती उठवली जाईल तर यांच्या शिक्ष् णाचे काय होणार?)
पोलिस रेड मारतात पकडून घेऊन जातात तर आम्हाला बिल्डींगचे नाव ही माहीती नसतं कारण लिहता-वाचता येत नाही त्यामुळे वस्तीतील ज्या बिल्डींगचे नाव कानावर सारखंसारखं येतं तेच नाव आम्ही मग पोलिसांना सांगतो,महत्वाचे म्हणजे पोलिस आम्ही भाडेकरु असून ही आम्हालाच जबरदस्ती घरमालक असल्याचे दाखवतात……!
पत्रकारांवरही नाराजी!
येथील वारांगणांनी शहरातील पत्रकारांवर देखील चांगलाच रोष व्यक्त केला.पत्रकार कधीही आमची बाजू ऐकून घ्यायला येत नाही ,समजून घेत नाही फक्त पोलीस जे सांगतात तेच छापतात,तेच दाखवतात त्यामुळेही आमची प्रतिमा समाजात खराब होते.पत्रकारांनी समाजाला दोन्ही बाजू सांगावी एवढीच आमची अपेक्ष्ा आहे….!

सेक्स वर्क इस वर्क-हेमलता लोहवे( समन्वयक-रेड क्रॉस सोसायटी)
नागपूरातील गंगा-जमुना वस्तीला १०० च्या वर वर्षे झाली असून ही भोसले काळातील जमीन आहे.आता येथील वारांगणांना नजूलची जमीन असल्याची भीती दाखवल्या जात आहे.या जागेवर पूर्वीपासूनच राजकीय पक्ष् ,शहरातील मोठ्या बिल्डर्सचा डोळा आहे!५ वर्षांपूर्वी देखील पोलिस आयुक्त अभिताष कुमार यांच्या कार्यकाळात वारांगणांच्या वस्तीला घेरा टाकण्यात आला होता.२५० ते ३०० पोलीसांनी धाडी टाकून संपूर्ण वस्तीलाच मुलांबाळांसहीत पोलिस ठाण्यात नेऊन बसवले होते.तुम्हाला मोलकरणीचे काम देतो हे काम सोडा असे सांगत पोलिस ठाण्यात पाणी भरणा-या बाईकडे बोट दाखवत या बाया नाही का सन्मानाचे काम करत?असा उरफाटा प्रश्न वारांगणांना केला होता!
या वस्तीतील वारांगणा या इतर राज्यांमधील असून कोणी प्रेमात धोका खाऊन तर कोणाच्या नव-यानेच धंद्याला बसवली आहे.कोणी गरीबीमुळे तर कोणी स्वमर्जीने धंदा करतात.येथील ७ वारांगणांनी स्वमर्जीने लग्न केले आज त्या आपल्या नवरा व मुलांसोबत ही भेटायला येतात.
वस्तीला गेल्या ३ दिवसांपासून पोलिसांनी जो घेराव टाकला आहे त्या विरोधात राष्ट्रीय पातळीवरील ‘नॅशनल नेटवर्क सेक्स वर्कस(एन.एन.एस.डब्ल्य)संघटनेच्या अध्यक्ष् किरण देशमुख,सचिव पी.देवी यांनी गंभीर दखल घेऊन लवकरच त्या नागपूरच्या दौ-यावर येत आहेत.नागपूरच्या सीमा शर्मा या त्या संघटनेच्या सदस्या असून त्यांनी ही माहिती या संघटनेला दिली.याशिवाय वेश्या अत्याचार मुक्ती,या सर्व संघटनांनी या वारांगणांच्या समस्यांची वेळोवेळी दखल घेतली आहे.करोना काळात डॉ.मनीषा कोठेकर यांच्या ‘भारतीय स्त्री शक्ती संघटना’,अहिल्या देवी स्मारक समिती धंतोली, ‘आश्रित महिला मंडळ,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,पालकमंत्री नितीन राऊत यांनी देखील वारांगणांना रेशन किटची मदत केली.का केली?कारण या देखील आपल्या समजाचाच एक घटक आहे म्हणूनच केली ना?
सर्वोच्च न्यायालयने का या वारांगणांना आर्थिक मदतीचे आदेश दिले?याचा अर्थ हे सर्व घटक वारांगणांच्या कामाला ‘सेक्स वर्क इस वर्क’या दृष्टिकोणातून बघतात.मग वस्तीतील नागरिकांना या वारांगणांना हूसकावून लावण्याचा काय अधिकार आहे?शहरात अनेक पॉश कॉलनीत देह व्यापार चालतो तिथे डोळे बंद का असतात?ज्यांनी पैसे दिले त्यांची बातमी होत नाही ज्यांनी चिरीमिरी नाही दिली त्यांची बातमी पेपरमध्ये छापून येते!स्वत: शहरातील एका सेक्स वर्करने मला ही माहिती दिली आहे….!
शासनाने तर २२ हजार व १५ हजार रोख रकमेची मदत या वारांगणांना केली आहे.हे जर नागरिक नसते तर यांचे राशन कार्ड १९९९ पासून का बनत आहेत?स्वत:शासन आधार कार्ड,मतदार ओळख पत्र का बनवते यांचे?अल्पवयीन मुलींकडून धंदा करवून घेऊ नका ही मागणी यांचीच असते मात्र काही दलाल यांना फसवतातही.या भागात ‘बाहेरचे दलाल‘सक्रिय आहेत त्यांच्यामुळेच येथील वारांगणांच्या अडचणी वाढल्या….!
सरकारला जर ही वस्ती येथून उठवायचीच असेल तर यांचे पेट्रोल पंप देऊन,शिक्ष् ण संस्था देऊन,हॉटेल्स देऊन पुर्नवसन करावे,कारण यांना नोकरीवर कोणीही ठेवणार नाही तश्याही या फार कमी शिकल्या आहेत तरच त्या ही वस्ती खाली करण्यास राजी होतील.
मोदी सरकारच्या उज्जवला गॅस योजनेसाठी गठ्ठा भरुन अर्ज नेण्यात आले पण फक्त ५ वारांगणांना गॅस सिलेंडर मिळाले,मग बाकीचे कुठे गेले?दोन्ही लाटेत या वस्तीत सतरंजीपूरा आणि मोमिनपुरा इतक्या जवळ असून देखील एक ही करोनाबाधित निघाला नाही,जे नंतर २ बाधित निघाले ते ही इतके जागरुक होते की लगेच स्वत:ला विलगीकरणात ठेवले.
यांच्या आर्थिक,सामाजिक,शैक्ष् णिक आणि भाविनक समस्या खूपच गुंतागुंतीच्या आहेत,एक घाव दोन तुकडे करुन या समस्या सुटणार नाहीत.ज्या सरकारला ही वस्ती या ठिकाणी नको आहे त्याच वस्तीत ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळात दर वर्षीच कश्या रेड पडतात?याचा ही विचार सभ्य समाजाने करावा,रेड पडल्यानंतर १५ दिवसांनी कश्या काय पकडल्या गेलेल्या वारांगणा सुटून येतात?अधिवेशनाच्या काळात कोणाचे फोन येतात मुली पुरवा म्हणून?
ही बदनाम वस्ती आहे म्हणून समाजासाठी सोपे टार्गेट आहे का?पांढरपेशी समाजाला सभ्य समाज काहीच नावेबोटे ठेवणार नाही?समाजाचा हा दुटप्पीपणा कधीपर्यंत चालणार आहे?




आमचे चॅनल subscribe करा
