नागपूर,ता.११ जुलै २०२४: महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी,त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी,कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका बळकट करण्यासाठी राज्यात ’मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना‘सुरु करण्यात आली आहे मात्र,काँग्रेस पक्ष या योजनेची थट्टा करीत असून ,राज्यावर पडणारा कर्जाचा बोजा याकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत.महाराष्ट्राला जीएसटीतून जो ७० हजार कोटींचा महसूल मिळतो,त्यातून राज्यातील लाडक्या बहीणींच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी याची काळजी करु नये,असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व प्रवक्ते प्रशांत पवार यांनी आज बजाज नगर येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हाणला.
याप्रसंगी बोलताना,ते म्हणाले की या योजनेचा नागपूर,वर्धा,यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रसार-प्रचार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे.महाराष्ट्रात सर्वदूर व्यापक स्वरुपात या योजनेची लोकप्रियता पोहोचली असल्यानेच काँग्रेसच्या पोटात पोटशूल उठले आहे.अंबानी यांचे लाखो कोटींचे कर्ज माफ केले व लाडक्या बहीणींना मात्र कर्ज घेऊन लाड दाखवला जात असल्याचा काँग्रेसचा आरोप हा हास्यासपद असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.ही याेजना म्हणजे बहीणींची फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेस करतेय मात्र,राज्यातील गरजू बहीणींना या योजनेला लाभ मिळत असेल तर याला विरोध करण्यासाठी काँग्रेसला लाज वाटायला हवी,या योजनेची थट्टा करणारे काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते या योजनेच्या लाभासाठी रांगा लाऊन उभे असल्याचे उपरोधिक टोला प्रशांत पवार यांनी हाणला.
या योजनेसाठी ऑन लाईन आणि ऑफ लाईन अर्ज स्वीकारले जात असून,येत्या दोन-तीन दिवसात गाड्या लाऊन प्रत्येक भागात योजनेच्या लाभासाठी अर्ज भरुन घेण्यासाठी फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.या योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचे ३ हजार तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ३ हजार रुपये लाडक्या बहणींच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या योजनेला काँग्रेसने खरे तर प्रोत्साहन द्यायाल हवे.देशातील ५ राज्यात ही योजना राबविली जात असून सर्वात पहीले राज्य हे तमिलनाडू आहे ज्यांनी ही योजना यशस्वीरित्या राबवली.महाराष्ट्रात या योजनेचे लाडक्या बहीणींने मनापासून स्वागत केले असल्याचे ते म्हणाले.
महायुतीचे यासाठी मी आभार मानतो.मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी खूप चांगली योजना राज्यात लागू केली आहे.या योजनेचा लाभ फक्त निवडणूकीपुरतीच असून यामुळेच अर्थसंकल्पात फक्त १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली.विरोधकांनी एवढ्या तरतूदीतून फक्त तीनच महिने लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा होतील,असा गदारोळ केल्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी २५ हजार कोटींचे बजेट ठेवले,विरोधकांच्या या आरोपाविषयी छेडले असता,ही योजना बंद होणार नाही,दादा म्हणतात ते पूर्ण करतात,ते शब्दांचे पक्के आहेत.त्यामुळे विधान सभा निवडणूकीनंतर देखील ही योजना बंद होणार नाही,असा दावा यावेळी प्रशांत पवार यांनी केला.या योजनेचा, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी तब्बल १५ दिवस सखोल अभ्यास अजित पवारांनी केला असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना,काँग्रेसचे नेते या योजनेची थट्टा करतात जे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिवराज(बाबा)गुजर म्हणाले.
पत्रकार परिषदेत पश्चिम नागपूरचे अध्यक्ष योगेश ठाकरे,उत्तर नागपूरचे अध्यक्ष राकेश बोरीकर,दक्षीण-पश्चिमचे अध्यक्ष संदिप सावरकर, मध्य नागपूरचे अध्यक्ष रवि पराते,जिल्हा उपाध्यक्ष विलास मामुलकर,युवक ग्रामीण अध्यक्ष सचिन चव्हाण,तालुकाध्यक्ष बिरु सिंग,महासचिव निलिकेश कोल्हे उपस्थित होते.