

कामठीतील सर्वाधिक २७ मतदान केंद्रांच्या स्थळांमध्ये बदल
नागपूर,ता. १९ : मतदारांची गर्दी व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातील ८५ मतदान केंद्रांच्या स्थळांमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्यात सर्वाधिक कामठीतील २७ मतदान केंद्राच्या इमारतीत बदल करण्यात आला आहे. त्यानंतर रामटेक, नागपूर उत्तर मधील प्रत्येकी १३, नागपूर पूर्वमधील १० नागपूर दक्षिण ९, नागपूर दक्षिण-पश्चिम ५, सावनेर ३ आणि उमरेडमधील २ मतदान केंद्राच्या इमारतीत बदल करण्यात आला आला आहे. यासंबंधीची माहिती त्या-त्या मतदान केंद्रातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. जुन्या इमारत स्थळी नवीन ठिकाणचे नावाची माहिती लावण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे लाउडस्पिकरच्या माध्यमातूनही संबंधित क्षेत्रातील मतदारांना बदलाची माहिती देण्यात येईल. व्होटर स्लीपद्वारेही माहिती पोहोचवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्र परिषदेत दिली.
इमारती व्यवस्थित नसल्याने किंवा मतदारांना मतदानासाठी अडचण येत असल्याने या केंद्राच्या इमारती बदलण्यात आल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकोश ओला, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते. 89 टक्के मतदारांना व्होटरस्लीपचे वितरण झाले असून विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार 21 तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले. निवडणुकीसाठी एकूण 17 हजारावर निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांचे दोन टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण झाले असून तिसरे प्रशिक्षण उद्या होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल 89 टक्के मतदारांपर्यंत व्होटर स्लिप पोहोचलेल्या आहेत. मतदान केंद्रांवर मतदारंसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंध, अपंग दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरसह विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
निवडणुकीच्या कामात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 17 143 कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसाठी अर्ज केले. यातील 538 कर्मचाऱ्यांची मतदानाच्या व्यवस्थेचा फायदा घेतला. तर उर्वरित 15046 कर्मचाऱ्यांचे बॅलेट पोस्टलच्या माध्यमातून घरी पाठविण्यात येणार आहे. आतापर्यंत 114 कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट प्राप्त झाले. असून अपूर्ण माहिती भरल्याने 1445 कर्मचाऱ्यांचे अर्ज रद्द झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
