

नातेवाईकांचा टाहो
फक्त स्टॉकिजची यादी प्रसिद्ध करुन जिल्हाधिकारी यांची इतिकर्तव्यता!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ११ मार्च: आज रविवार दि. ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी रेमडिसिव्हिरची औषधे उपलब्ध होतील अश्या काही स्टॉकिजचे नंबर त्यांनी सार्वजनिक केले. मात्र आजतरी दिवसभरात एकाही रुग्णाच्या नातेवाईकाला एक ही रेमडिसिव्हिर मिळाले नाही!हे जमिनी धरातलावरील भयाण वास्तव असून धंतोली येथील एका सर्वात मोठ्या स्टॉकिजकडे किमान चारशे नातेवाईकांची रांग लागली होती मात्र दूकानाचे शटर हे बंद होते.बाहेर दूकानातील एक इसम बसला होता.ज्यांच्यासोबत सेटिंग आहे त्यांनाच आडमार्गाने रेमडिसिव्हिर उपलब्ध झाले!आतून शटर बंद..बाहेरुन सेटिंग…ज्यांची परिरस्थिती चांगली त्यांनाच आतमध्ये इतर मार्गातून एंट्री…!
इतर नातेवाईक ढसाढसा रडत इतर स्टॉकीज धावत सुटले.मात्र हीच परिस्थिती गांधीबाग,बर्डीतील दोन स्टॉकिज, सदरमधील एक,जरीपटकामधील एक अश्या सर्वच ठिकाणी होती! शहरातील सर्वच स्टॉकिजकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी सकाळपासून भटकंती केली.एक रुग्णाचा नातेवाईक तर कामठीहून आला होता.रुग्णालयात त्याच्या रुग्णांची तब्ब्येत फारच गंभीर होती,आपल्या रुग्णाला रुग्णालयाच्या भरवश्यावर सोडून तो नागपूरात रेमडिसिव्हिरसाठी भटकंती करीत होता!
अनेक नातेवाईकांनी जिल्हाधिकारी यांच्या नावावर बोटे मोडली.एक तर सरळ सरळ सांगा ना दोन दिवसांपासून स्टॉक नाही आहे?मूर्ख का बनवता?फोन क्रमांक सार्वजनिक करुन कशाला आधीच संकटात सापडलेल्या नागरिकांचा मनस्ताप वाढवता?दूसरीकडे शहरातील खासगी रुग्णालये हे सरळ चिठ्ठी लिहून देऊन टाकतात रेमडिसिव्हिर घेऊन या!महत्वाचे म्हणजे या सर्व खासगी रुग्णालयांकडे रेमडिसिव्हिरचा ५० टक्के स्टॉक उपलब्ध असतो.
बाहेर कुठेच रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडिसिव्हिर मिळणार नाही हे खासगी रुग्णालयांना देखील चांगल्याने माहिती आहे मात्र कसे ही करुन नातेवाईकांचा अंत पाहायचा आहे,स्टॉक असून ही जास्त पैशांसाठी ही माणूसकी हरवलेली….नफेखाेर रुग्णालये रेमडिसिव्हिरचा स्टॉक ‘राखीव’ठेवीत आहे…..!
कोराडी येथील एका पत्रकाराची आई कामठी येथील सिटी हॉस्पीटलमध्ये करोना संसर्गामुळे भरती होत्या.परवा मध्यरात्री त्यांना फोन आला,आईला ४० हजारांचे एक इंजेक्शन लावायचे आहे त्यांची तब्ब्येत गंभीर आहे.हे इंजेक्शन द्यायचे आहे की नाही?नातेवाईकाच्या परवानगीशिवाय रुग्णालयाला हे इंजेक्शन देण्याची परवानगी नाही. सकाळी येऊन आधी परवानगीच्या अर्जावर स्वाक्ष्र री करा,त्याशिवाय आम्ही ते इंजेक्शन देऊ शकत नाही,पहाटेच हे पत्रकार मित्र धावत पळत सिटी हॉस्पीटलमध्ये पाहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले,तुमच्या आईची तब्ब्येत जास्त खराब झाली होती त्यामुळे आम्ही ते इंजेक्शन देऊन टाकले!
या पत्रकार मित्राने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला चांगलेच फैलालवर घेतले.४० हजारांचा खर्च!न विचारता,परवानगी न घेता,भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नियमात बसत नसताना रुग्णाला इंजेक्शन लावलेच कसे?यावर रुग्णालय व्यवस्थापनाने पत्रकार मित्राला सांगितले,तुमचा रुग्ण आता बरा झाला आहे,त्यांना घेऊन जा,शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली मात्र परवा रुग्णालयातून बाहेर पडताना आईंना श्वास ही घेता येत नव्हता.या पत्रकार मित्राने सरळ त्यांना मेडीकल रुग्णालयात भर्ती केले,आज रविवार दि. ११ एप्रिल रोजी आईचे निधन झाले…..!सिटी हॉस्पीटलमध्ये रुग्णावरील औषधोपचाराचा खर्च निघाला…साढे चार लाख रुपये!
या पत्रकाराच्या आईला आज सर्वात जास्त रेमडिसिव्हिरची गरज होती,एवढी भटकंती करुनही हे औषध वेळेवर मिळाले असते तर?आज रविवारी ६५ करोना बाधित रुग्ण दगावले….७ हजारांच्या वर नवे संसर्गित….कुठे आहे यंत्रणा?जिल्हाधिका-यांचे ऑडीटर?रुग्णालयांवर करोना महामारीच्या काळात कोणाचीही बंधने नाहीतच…शासन,प्रशासन,नोकरशाही,मंत्री,संत्री व्यस्त आहे करोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी फक्त…बैठकीतच!
जिल्हाधिकारी यांचे काही स्टॉकिज नातेवाईकांना सांगतात..रात्र के १० बजे के बाद आके देखना…दिन मे आने की जरुरत नही है….!तोपर्यंत त्यांचा रुग्ण रुग्णालयात…तडफडत असतो…आणि त्यांच्या वेदनेने नातेवाईकांचा प्राण हा कंठाशी आलेला असतो…!
ऑक्सीजनचा भरपूर साठा ही सुद्धा धूळफेकच!
पालकमंत्री सांगतात ऑक्सीजनचा भरपूर साठा नागपूरात उपलब्ध आहे मात्र याचे ही जमिनी धरातलावरील वास्तव तितकेच भयाण आहे.गेल्या दोन दिवसांपासून नातेवाईकांची ऑक्सीजनसाठी देखील अशीच फरफट सुरु आहे.सिलेंडरवाला त्यांना सांगतो,मै रिफिल तो दे दूंगा,एक्ट्रा १०० रुपये लगेंग मगर…आपको खूद जाके रिफिल भरवाना पडेगा मै जहा का एड्रेस दूंगा!
मग हे नातेवाईक रिफिल भरायला जातात,तेव्हा तो सिलेंडरवाला त्यांना सांगतो,मेरे पास जंबो सिलेंडर आने का है…२-३ घटां बैठना पडेगा..तूम जाते होंगे तो जाओ….तुम्हारे आने तक अगर जंबो सिलेेंडर खाली हो गया तो मेरी जवाबदारी नही!
यालाच आपण ऑक्सीजनचा पुरवठा म्हणतोय का?रुग्णाचे नातेवाईक सांगातात…शहरभर आम्ही ‘कूत्र्यासारखे’फिरत आहोत…मी आपल्या रुग्णाकडे लक्ष् कधी देऊ?त्यांचा आर्त प्रश्न!ऑक्सीजनचा पुरवठा करण्याची जवाबदारी कोणाची?ऑक्सीजन पुरवठा करण्याची जवाबदरी कोणीची?जिल्हाधिका-यांची ना?खासगी रुग्णालयांमधील गंभीर रुग्णांना ऑक्सीजनचा पुरवठा करण्याची जवाबदारी जिल्हाधिकारी यांची नाही तर कोणाची?
जिल्हाधिकारी आज सकाळीच म्हणाले ना?रेमडिसिव्हिरची कुठेही कमी पडू देणार नाही!स्कॉकिज लोकांसोबत आमची बैठक झालेली आहे,आता लवकरच त्यांचा संपूर्ण साठा आपल्याला उपलब्ध होईल तो आपण इतर ठिकणी पाठवू!
महत्वाचे म्हणजे सकाळी ९ वा.बैठक झाली,१० वाजता माध्यमांना बाईट दिले,बाईट दिल्यानंतर उद्या सकाळी १० वाजेपर्यंत २४ तास याला उलटून जातील,उद्या रात्री १२ वाजेपर्यंत ४८ तास उलटणार,कधी होणार स्टॉकिज लोकांचा संपूर्ण साठा जिल्हाधिकारी यांना उपलब्ध?४८ तासात किती करोना बाधित रुग्ण हे मृत्यूच्या दारात ढकलले गेले असतील रेमडिसिव्हिरच्या अभावी?याला जवाबदार कोण असणार?
जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक केलेल्या क्रमांकावर रेमडिसिव्हिर मिळत नाही तर त्यांच्या दूकानांसमोर जो दलाल बसतो,त्याच्या जवळ नातेवाईकांना अक्ष् र श:हंबरडा फोडावा लागतो,तू कितीही पैसे घे पण मला हे औषध जमवून दे,तो सांगतो कितीही पैसे मोजा मिळू शकणार नाही खूपच शॉर्टेज आहे…नंतर मात्र सर्वात जास्त पैसे मोजणा-याला तो भेटतो,पेट्रोल पंपाच्या मागे,धंतोली बगिच्याच्या जवळ,एखाद्या रेस्टॉरंट समोर आणि…जमवून देतो…रेमडिसिव्हिर…जिल्हाकधारी साहेब…यालाच म्हणतात ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाणे’…..!आज..सर्वत्र हेच सुरु आहे….!
धंतोलीतील एका खासगी रुग्णालयाला रेमडिसिव्हिरचा कोटा सहज उपलब्ध!
मनपाचे बहूचर्चित वैद्यकीय अधिकारी व भाजप सत्ताधा-यांचे एक लाडके डॉक्टर यांचे एक ‘कू’ प्रसिद्ध खाजगी रुग्णालय धंतोलीतील या स्टॉकिजच्या अगदी जवळच आहे,त्यांच्या रुग्णालयात मात्र रेमडिसिव्हिरचा पुरवठा ‘अव्याह्तपणे’केला जात असल्याची माहिती ’सत्ताधीश’ला प्राप्त झाली.एवढंच नव्हे तर धंतोलीतील काही नामांकित रुग्णालये हे देखील रेमडिसिव्हिरचा पुरवठा आपल्या डॉक्टर वर्तुळात,ओळखीच्या लोकांमध्ये सहज करतात,मरण आहे ते फक्त….सामान्य रुग्णांचं!
धंतोलीतील या रुग्णालयात मनपातील भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकची भागीदारी आहे,त्यामुळेच या बहूचर्चित आणि बदनाम,खंडणीखाेर डॉक्टरवर मनपाच्या भाजप नेत्यांचाच कायम वरदहस्त असतो,याची चांगलीच चर्चा मनपात झडत असते.गेल्या ६ महिन्यांपासून हा डॉक्टर मनपाच्या आरोग्य विभागातील शासकीय सेवेत असतानाही चक्क रजेवर आहे!करोनाच्या या महामारीच्या काळात एक शासकीय नोकर भाजपच्या कोणकोणत्या सत्ताधा-यांच्या आर्शिवादाने चक्क रजेवर असून स्वत:च्या खासगी रुग्णालयात कोविडवर उपचार करतोय?सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या धंतोलीतील या खासगी रुग्णालयाला कोविडवर उपचारासाठी परवानगी तरी मिळाली आहे का?
भाजप सत्ताधा-यांच्या आशिर्वादामुळे ना या डॉक्टरचे निलंबन झाले ना कोणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करत,ना त्यांना मनपाच्या काेणत्याही विभागाच्या परवानगीची गरज भासते….शेवटी साथरोग प्रतिबंधक कायदा हा भ्रष्ट सत्ताधारी किवा मृतकांच्या टाळूवरचे लोणी ओरबडणारे यांनी पाळायचे नसतात ते फक्त सामान्य जनतेनेची पाळायचे असतात,असा संताप आता व्यक्त केला जात आहे.
देशाच्या पंतप्रधानांना ‘उशिरा आलेली जाग….’
देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांनी रेमडिसिव्हिरसंबंधी आज एक महत्वाची घोषणा केली….या पुढे रेमडिसिव्हिर औषधांवर निर्यातबंदी करण्यात आली आहे!गेल्या १४ महिन्यांपासून देशात करोनाने थैमान घातले असून हा निर्णय फार पूर्वीच घेण्यात आला असता तर साठेबाजीला उत आलाच नसता.हजारो लोकांचे जीव वाचले असते.महाराष्ट्रात रेमडिसिव्हिरचे उत्पादन होत नाही,इतर राज्यातून हे औषध मागवावे लागते.यात दलालांनी आणि साठेखोरांनी चांगलेच हात ओले केले असून देशात आपत्तीव्यवस्थापन आणि साथरोग कायद्याची बंधने फक्त…सामान्य नागरिकांनीच पाळायची असतात……!हे पुन्हा एका या महामारीने सिद्ध केले.




आमचे चॅनल subscribe करा
