

ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल
वरुन सूर्य कोपला,खाली कूलर कोरडे:टँकरने देखील पाणी पुरवठा नाही
टाकली सिम , जयंताला आणि त्रिमूर्ती नगर जलकुंभ परिसरातील पाणीपुरवठा शनिवार व रविवार सकाळपर्यंत बाधित
नागपूर,ता.९ एप्रिल २०२२: उपराजधानीच्या भाजून काढणा-या रणरणत्या उन्हात एखाद्या खासगी कंत्राटदाराच्या बेजबाबदार व निष्काळजीपूर्ण खोदकामामुळे एखादी मुख्य जलवाहिनी फूटून नागरिकांच्या हक्काचे हजारो लीटर पाणी वाया जाऊन पाण्या अभावी अंगाची लाहीलाही होत असेल तर अश्यावेळी नागरिकांनी नेमके काय करावे?कोणाच्या नावाने बोटे मोडावी?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरभर वेगवेगळ्या कंपन्यांच्या केबल वाहिन्या टाकणा-या खासगी कंत्राटदारांच्या बेजबाबदार खोदकामामुळे जलवाहिन्या नेहमीच फूटत असल्याचा घटना या ‘ऐतिहासिक’आहेत.यावर मनपाच्या सभागृहात देखील अनेकवेळा वादळी व तितक्याच ‘वांझोट्या’ चर्चा ही झडल्या.त्या त्या वेळी पदावर असणा-या महापौरांनी निर्देश-विर्देश दिले,त्या त्या वेळेसच्या मनपा आयुक्तांनी नंदी बैलासारख्या माना ही डोलावल्या,जनता मात्र तहानलेलीच!अश्या बेजबाबदार व शिरजोर कंत्राटदारांवर मनपा प्रशासन नोटीसा पाठविण्याशिवाय कोणतीही ठोस कारवाई करीत असल्याचे नागरिकांच्या तरी वाचनात नाही.अशीच एक मुख्य जलवाहिनी आज जियोच्या कंत्राटदारांने आज फोडली.लाखो लिटर पाणी वाहून गेले आता त्या भागातील नागरिकांना ऐन एप्रिलच्या उन्हात पाण्यावाचून तडफडण्याशिवाय दूसरा पर्याय उपलब्ध नाही.
७०० मी मी व्यासाच्या टाकळी सिम मुख्य जलवाहिनीवर, हिंगणा टी पॉईंट , बाबा सावजी जवळ जियो केबलच्या कंत्राटदाराने आज सकाळी मुख्य जलवाहिनीच फोडली. पाईपलाईनला मोठे भगदाड पडल्यामुळे टाकली सिम जलकुंभावरील परिसरात पाणी पुरवठा आज विस्कळीत तर झालाच पण बरेच पिण्याचे पाणी वाया देखील गेले. नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी या जलवाहिनी दुरुस्तीचे कार्य तातडीने हाती घेतले असले तरी हे काम अत्यंत कठीण ठिकाणी असल्यामुळे या दुरुस्तीला वेळ लागण्याची शक्यता आहे . त्यामुळे जयताला जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ आणि टाकळी सिम जलकुंभ ह्या भागातील पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत (रविवार सकाळपर्यंत) बाधित राहणार आहे .
नागरिकांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणा-या त्रासाबाबत, मनपाने खासगी कंत्राटदारांवर आता तरी जबाबदारी निश्चित करुन योग्य तो दंड वसूल करण्याची व कंत्राटदारांना कायदेशीर शिक्षा करण्याची मागणी पुढे आली आहे.अमूल्य असे हजारो लिटर वाहून गेलेल्या पाण्याची देखील भरपाई कंत्राटदारांकडून वसूल करण्यात यावी.मनपा प्रशाननाच्या काही अधिका-यांशी असणारे लागेबांधे यामुळे हे कंत्राटदार निर्धास्त असतात.मनपाच्या जलप्रदाय विभागाशी समन्वय नसल्यामुळे नेमकी कोणत्या ठिकाणी जलवाहिनी आहे याचा आधी अभ्यासच केला जात नसल्यामुळे अश्या घटना नागपूरकरांच्या पाचवीला पूजल्या आहेत.एका भागात वाहीनी दुरुस्त केली जाते तर लगेच शहरतील दुस-या कोणत्या तरी भागात ऐन उन्हाळ्यात कंत्राटदारांचे हतोडे चालत असतात.खासगी कंत्राटदारांचे काम हे ‘शासकीय’सदरात मोडत नाही मात्र मनपा प्रशासनाच्या मेहरबानीने नागपूरकर जनतेवर ‘खासगी व सरकारी’असा दुहेरी भुदर्डं बसत असल्याचे चित्र आहे.
जलवाहिनी दुरुस्ती होईपर्यंत ह्या ब्रेकडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा ओसीडब्ल्यूने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग-
टाकली सिम जलकुंभ (हिंगणा टी -पॉईंट)-
हिंगणा रोड, राजेंद्र नगर, कल्याण नगर, यशोधरा नगर, वासुदेव नगर, लुम्बिनी नगर, गाडगे नगर म्हाडा कॉलोनी, सुर्वे नगर, आदर्श नगर, प्रगती नगर, त्रिमूर्ती नगर, सुभाष नगर, अध्यापक ले आउट , नेल्को सोसायटी, मंगलधाम सोसायती , दाते ले आउट, जैताला वस्ती, शारदा नगर, साई ले आउट, झाडे ले आउट, जलविहार कॉलोनी आणि इतर परिसर..
जयताला जलकुंभ:-
संपूर्ण जयताला , रमाबाई आंबेडकर नगर, राधे श्याम नगर, ऑर्बिटल एम्पियर , दाते ले आउट, झाडे ले आउट, प्रज्ञा नगर, साई ले आउट, कबीर नगर, एकात्मता नगर आणि इतर भाग
त्रिमूर्ती नगर जलकुंभ: –
नासुप्र ले आउट, भामटी , प्रियदर्शनी नगर, साईनाथ नगर, लोकसेवा नगर, गुडधे ले आउट, इंगळे ले आउट, अमर-अशा ले आउट, नीता सोसाटी, इंद्रपृष्ठ नगर, फुलसुंगे ले आउट, परफेक्ट सोसायटी, वाघमारे ले आउट, भेंडे ले आउट, दुपारे ले आउट, पाटील ले आउट, पन्नास ले आउट, मनीष ले आउट, शहाणे ले आउट, प्रग्या सोसायटी, पॅराडाईस सोसायटी, ममता सोसाय टी, सोनेगाव, शिव विहार , इन्द्रप्रस्थ ले आउट, गजानन धाम, शिव नगर स्लम आणि सहकार नगर
अधिक माहिती करिता मनपा-OCW टोल फ्री नंबर १८००२६६९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात.




आमचे चॅनल subscribe करा
