Advertisements

ओबीसी बहूजन परिषदेत उमटला नाराजीचा सूर

नागपूर,ता.६ जुलै २०२५: देश महासत्ता होण्याची व मंगळावर अंतराळस्थानक स्थापन करण्याची भाषा बोलतोय.मात्र,दुसरीकडे अद्याप डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कधीकाळी अनुभवलेले अस्पृश्यपण आजही समाजात दिसून येण्याची धक्कादायक घटना घडत आहेत.रामनवमीच्या दिवशी देवळीतील राम मंदिरात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रामदास तडस यांना तेथील प्रसिद्ध श्री राम मंदिराच्या गाभा-या प्रवेश नाकारण्यात आला कारण त्यांनी सोवळे नेसले नाही,असे कारण देण्यात आले.मूर्तिची पूजा सुरु असताना तडस हे गर्भ गृहात सपत्नीक शिरत होते, तेथील एका पुजा-याने,मूर्तिची पूजा करता येणार नाही,तुम्ही जरा लांबच रहा,असे बजावले.सोवळे न नेसल्यामुळे व गळ्यात जानवं नसल्याने त्यांना मूर्तिची पूजा करण्यापासून रोखण्यात आले,दूसरीकडे कर्नाटकच्या बंगलुरुमध्ये नीटच्या परिक्षेत तीन विद्यार्थ्यांना जानवं घातल्यामुळे प्रवेशापासून रोखण्यात आले.त्यातील दोन विद्यार्थ्यांनी माफी मागून जानवं काढले मात्र,एक विद्यार्थी न्यायालयात गेला.यानंतर परिक्षा केंद्रातील अधिका-याला निलंबित करण्यात आले.एकीकडे विद्यार्थ्याला न्याय मिळाला मात्र,दूसरीकडे तडस यांच्यावरील अन्यायावर कोणतीही कारवाई नाही,असा संताप आज ओबीसी महासंघ परिषदेत व्यक्त करण्यात आला.
ही परिषद आज रविवार दिनांक ६ जुलै रोजी सक्करदरा चौक,उमरेड रोड येथील सेवादल महिला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.अध्यक्षस्थानी अखिल तेली समाज महासंघाचे उपाध्यक्ष व ओबीसी क्रांतीदलाचे मुख्य संघटक डॉ.कृष्णा बेले हे होते.या प्रसंगी नियंत्रक म्हणून राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे मुख्य समन्वयक गोपाल भारती तसेच प्रमुख पाहूणे म्हणून मध्यप्रदेशचे माजी मंत्री छबीलाल रात्रे,ओबीसी आघाडीचे प्रमुख डॉ.ईश्वर दान आशिया,दारुबंदी चळवळीचे प्रणेते रजनीकांत आदी उपस्थित होते.
तडस हे माजी आमदार व खासदार आहेत,जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते,कुश्तीपटू आहेत,ते तेली समाजाचे एक आगळं वेगळं व लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे.जर कर्नाटकमधील परिक्षा नियंत्रकावर कारवाई होते तर देवळीमधील राममंदिराच्या गर्भगृहात तडस यांना उर्मट भाषेत रोखून धरणा-या त्या पुजा-यावर व मंदिराच्या विश्वस्तावार कारवाई का नाही?असा सवाल परिषदेत उपस्थित करण्यात आला.तडस यांनी वैयक्तिरित्या पुजा-याला माफ केले ही असेल मात्र,हा ओबीसींच्या अस्मिेचा व आत्मसन्मानाचा हा प्रश्न आहे,असा सूर परिषदेत उमटला.
अशीच घटना छत्तीसगडमध्ये यामिनी साहू यांच्यासोबत घडली.ओबीसी असल्यामुळे त्यांना कथावाचनापासून रोखण्यात आले.त्यांनी गाणी म्हणावी,नृत्य करावे,मुजरा करा पण भागवत कथा वाचायची नाही,कथा वाचन हा आमचा अधिकार आहे,असा दम त्यांना देण्यात आला.जर ओबीसी व अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांसोबत अशी कृती होत असेल ,तर अट्रासिटीचा कायद्या हा ओबीसींनाही अभिप्रेत आहे.आमची ही मागणी आहे अट्रासिटीचा कायद्या ओबीसींनाही लागू व्हावा,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात असा अन्याय ओबीसी समाजासोबत घडत आहे,याचा निषेध ओबीसी परिषदेत करण्यात आला.
ओबीसी परिषदेत ओबीसी बहूजन परिषदेत ओबीसी जातीनिहाय जनगणनेची योग्य अंमलबजावणी,ओबीसी समुहावरील अन्याय,अत्याचार यावर विचार विनिमय व उपाययोजनेवर चर्चा झाली.याप्रसंगी ओबीसी,अनुसूचित जाती-जमाती,अल्पसंख्यांक प्रवर्गाच्या संवैधानिक अधिकारांची पूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली तसेच सर्व प्रवर्गाना आर्थिक,शैक्षणिक,नोकरी,पदोन्नती,प्रशासन,राजकीय क्षेत्र,न्याय व्यवस्था या सर्व क्षेत्रांमध्ये जनसंख्येच्या प्रमाणात समान वाटा मिळावा,अशी मागणी करण्यात आली.
स्त्रियांवरील अन्याय,अत्याचारा विरोधात कठोर कारवाईची मागणी करीत, महाज्योती आणि सारथीमध्ये शासन करीत असलेल्या भेदभावा संदर्भात चर्चा व उपाययोजनेवर भर देण्यात आला.शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणांमधील उणिवा व त्यावरील उपाय यावर चर्चा झाली.ओबीसी विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्ती,न्याय व्यवस्थेतील उणिवा,वेगळ्या विदर्भाला समर्थन ,शेतकरी,शेतमजूर,असंघटित कामगार,आशा वर्कस,लहान व्यापारी यांचे हित व अधिकारांची अंमलबजावणी,जनसुरक्षा कायदा रद्द करने अश्या महत्वाच्या विषयांचा उहापोह करण्यात आला.
घटनेच्या ४७ व्या कलमामध्ये देश कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाऊ नये म्हणून शासनाची जबाबदारी संविधानाने निश्चित केली मात्र,महाराष्ट्रात मद्यावरील महसूलात वाढ करण्यात आली व मद्य परवाने देणे सुरु केले आहे,परिणामी महाराष्ट्रासह देशात दारुबंदी करण्याची मागणी या परिषदेत करण्यात आली.अनुसूचित जाती-जमातीचे उपवर्गीकरण तसेच रोहिणी आयोगा अंतर्गत ओबीसीचे उपवर्गीकरण यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे व ओबीसी वर्गाच्या समंतीनेच त्यात बदल करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली.ओबीसी समाजावर कोणताही बदल लादू नये,अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली.
शिक्षणाचे खासगीकरण बंद करुन, सर्वांना मोफत शिक्षण व एकसमान शिक्षणाची मागणी करण्यात आली तसेच,मृत भगिनी वसुंधरा अजय गुल्हाणे यांच्यावरील झालेल्या अन्याय,अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला व आराेपींवर योग्य कारवाईची मागणी करण्यात आली.तसेच येत्या ६ व ७ ऑगस्ट २०२५ रोजी गोवा येथे अखिल तेली समाज महासंघ,संताजी सृष्टी व राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाबाबत दिशा ठरविण्यात आली.याप्रसंगी ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी व आर्थिक नियोजन यावर चर्चा करण्यात आली.
परिषदेत विदर्भ तेली समाज महासंघ,अखिल तेली समाज महासंघ,संताजी सृष्टि या प्रमुख तेली समाज संस्थांसह राष्ट्रीय संयुक्त मोर्चा,ओबीसी जनमोर्चा,भारतीय पिछडा अोबीसी शोषित संघटना,महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटना,भारतीय मुस्लिम परिषद,संविधान परिवार,सत्यशोधक महिला महासंघ,ओबीसी महापरिवार,ओबीसी अधिकारमंच,समाज क्रांती परिवार,अखिल भारतीय आदिवासी फेडरेशन,अखिल भारतीय चर्मकार महासंघ,संताजी ब्रिगेड,नमो:नम: फाऊंडेशन,डॉ.मेघना साहा फाऊंडेशन तसेच इतर समविचारी संघटनेचा सहभाग होता.
याप्रसंगी अभियंता संजय शेंडे,डॉ.विलास काळे,ज्ञानेश्वर रायमल,वंदना वनकर,अरुण गाडे,राहुल मुन,सुरेश वंजारी,डॉ.कृष्णाजी बेले,संजय सोनटक्के, मिरा मदनकर,मिना भागवतकर,मदन नागपुरे,प्रा.जावेश पाशा आदी उपस्थित हाेते.
याप्रसंगी जवाहर विद्यार्थी गृह संस्थेच्या निवडणूकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यगण तसेच नागपूर जिल्हा तेली समाजाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचा संयुक्तरित्या सत्कार करण्यात आला.या दोन्ही संस्था या फार जुन्या असून जवाहर विद्यार्थी गृह याची निर्मिती १९५५ साली झाली असून संयुक्त महाराष्ट्राच्या पूर्वीपासून ही संस्था कार्यरत आहे.
सूत्र संचालन ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष डॉ.विलास काळे यांनी केले.प्रास्ताविक राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव प्रा.डॉ.रमेश पिसे यांनी केले तसेच आभार सुरेश वंजारी यांनी मानले.
(बातमीशी संबधित व्हिडीयो Sattadheesh.official या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध)
………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
