Advertisements

– उदित नारायण यांच्या देखण्या, प्रसन्न व्यक्तिमत्वाची नागपूरकरांना भूरळ
– ६९ व्या वर्षीदेखील रसिकांमध्ये ‘क्रेझ’ कायम
– खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा हाऊसफुल्ल गर्दीचा नववा दिवस
नागपूर, २१ डिसेंबर : फिक्कट आकाशी रंगाचा सुट परिधान करून ‘पापा कहते है’ या आपल्या अत्यंत लोकप्रिय गाण्यांच्या सुरावटीसह मंचावर अवतरलेल्या पद्मभूषण उदित नारायण यांच्या देखण्या, प्रसन्न व्यक्तिमत्वाने नागपूरकरांना भूरळ घातली. ‘कसं काय नागपूर’ असे मराठीत म्हणत उदितने रसिकांची मने जिंकली. ६९ व्या वर्षीही उदित नारायण यांची ‘क्रेझ’ कायम असल्याचे पटांगणावर झालेल्या प्रचंड गर्दीने दाखवून दिले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या दिवशी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ पार पडली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी, मनोज सुर्यवंशी, वैभव माहेश्वरी, सुरेश शर्मा यांनी दीप प्रज्वलन करून तसेच, पटांगणावर उपस्थित असलेल्या हाऊसफुल्ल गर्दीने मोबाईलचे दिवे उजळून कार्यक्रमाला सुरुवात केली.
‘रुक जा ओ दिल दिवाने’, ‘जादू तेरी नजर’ ‘ऐ मेरे हमसफर’, ‘अकेले है तो क्या गम है’, ‘पहिला नशा’, ‘नशा ए पहला नशा’, ‘ऐ अजनबी तु भी कभी’ तसेच, अशा एकाहून एक एकल व तर दीपा झा यांच्यासोबत ‘तू मेरे सामने’ सारखी युगल गीते सादर करून उदित नारायण यांनी नागपूरकरांचे प्रेम मिळवले. भारतरत्न लता दिदींनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यांच्यासोबत सर्वाधिक गाणी गाण्याची संधी मिळाली असे सांगत त्यांनी ‘शंभर करोड’ या मराठी चित्रपटतील ‘अबोली प्रित तुझी अबोल का बोल ना’ हे गीत सादर केले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. तत्पूर्वी, गायिका सना हिने सुरुवातीला काही गीते सादर केली.
मृण्मयी डगवार व संस्कृती डगवार या भगिनींनी ‘मेरे ढोलना सुन’ कथक नृत्य सादर केले. ओवी पुराणिक, कार्तिकी लोहकरे, वैदेही श्रीवास्तव, कनक राऊत, सुरभी क्षीरसागर यांनी बालिकांनी उत्तम नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी आणि रेणुका देशकर यांनी केले.
********
आता पद्मविभूषण मिळावे
उदित नारायण यांनी सुरुवातीलाच नितीन गडकरी यांचे खासदार सांस्कृतिक महोत्सवात आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले. ‘४५ वर्षांपासून मी महाराष्ट्रात राहून संगीताची सेवा करीत असून आता पूर्ण मराठी माणूस झालो आहे. गडकरी साहेबांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवात आमंत्रित केले आता ‘पद्मविभूषण’ची अपेक्षा करायला हरकत नाही’ असे मिश्किल उद्गार त्यांनी काढले.
……..
उद्या महोत्सवात ….
सकाळी ७ वाजता ‘जागर भक्तीचा’ मध्ये श्रीसुक्त पठण व सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक कलावंतांचे ढोलताशा वादन व गायक, संगीतकार विशाल मिश्रा यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट.
Advertisements

Advertisements

Advertisements
