फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजछोटी सी उमर में लग गया रोग...चांदनी कांबळेचा वेदनामयी ‘सूर’प्रवास

छोटी सी उमर में लग गया रोग…चांदनी कांबळेचा वेदनामयी ‘सूर’प्रवास

Advertisements

जागतिक संगीत दिवस विशेष

नागपूर,ता.२१ जून २०२२: एक शायर म्हणतो ‘जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलतं’,खरं आहे संगीत विश्‍वाला आत्मा,मनाला पंख,कल्पनाशक्तीला उड्डाण आणि प्रत्येक गोष्टीला जीवन देत असतं.नागपूरातील सुरेल गायिका चांदनी कांबळेहिच्या दररोजच्या जगण्यावर यातील प्रत्येक शब्द चपखळ बसतो.ती…..कमरेपासून कायमची पंगू झाली आहे…रामदासपेठेतील एका (निष्णात!) डॉक्टरच्या चुकीमुळे मात्र…… तिच्या गळ्यातील सूर..तिचं गाणं तिच्या दररोजचं जगणं सुसह्य करतं,तिच्या एकमेव भावाचा अपघाती मृत्यू झाला,तिच्या जन्मदात्रीलाही गेल्या वर्षी कराेना नावाच्या विषाणूने गिळंकृत केले,दिघोरी येथे आपल्या काकांच्या घरी ती दुस-यांवर निर्भर असे दररोजचे जिणे जगत आहे,फक्त संगीत आणि सूर कायम तिच्या सोबतीला असतात,तिच्या मनाला पंख देतात,तिच्या कल्पनाशक्तीला उड्डाण देतात,तिचं जगणं सुसह्य करतात.

चांदनी….वयाच्या २५ वर्षांपर्यंत अल्लड तरुणाईचा खळखळता झराच होती.चालती,बोलती,अभ्यास करणारी,स्टेजवर परफॉर्म करणारी,‘छोटी सी उमर में लग गया रोग’गाण्यावर वन्स मोर घेणारी पण?२०१२ मध्ये तिच्या नशीबाला ग्रहण लागलं.इतर मुलींसारखीच ती सामान्य होती फक्त तिचं माकड हाड हे थोडं बाहेर निघालेलं होतं.लहानपणापासून तिला ‘कुबड ’ निघाल्यासारखं वाटत होतं.तिची उंची जसजशी वाढत होती,ते माकड हाडही वाढू लागलं होतं.चांदणीला त्यामुळे ते झाकण्यासाठी कायम आपले लांबसडक केस मोकळेच सोडावे लागत होते.
या वाढत जाणा-या माकड हाडामुळे तिला अंतर्गत समस्या सुरु झाल्या.हायपर ॲसिडीटी,थंडीच्या दिवसात नसांमध्ये पाणी भरुन वेदना होणे,कमरेतून नस लागायची,पाय उचलने जड जाणे यामुळे खूप औषधींचा मारा शरिरावर पडत होता.दहावीपर्यंत तिने शहरातील अनेक हॉस्पीटल्सची वारी केली मात्र निष्णात अस्थिरोगतज्ज्ञांनी चांदणीला कोणतीही शस्त्रक्रिया न करण्याचाच सल्ला दिला होता.यात फार मोठी जोखिम असून शस्त्रक्रिया करु नकोस,आहे तसंच जग,असे डॉक्टर्स तिला सांगत होते.

एकदा चांदणीचं हिमोग्लोबिनचं प्रमाण चक्क ४ पर्यंत घसरलं.सामान्य लोकांमध्ये ते ११ पर्यंत असतं.डॉ.विवेक गुप्ता यांच्याकडे तिने यावर उपचार घेतले.त्यांनीच तिचे वर आलेले माकड हाड बघितल्यावर रामदासपेठे येथील शांता स्पाईन हॉस्पीटलचे संचालक डॉ.मनोज सिंग रखिया यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.चांदणी हिचं मन नव्हतं कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याचं कारण,डॉक्टर मंडळी तिच्या माकड हाडाचे फोटो काढून त्यांच्या हॉस्पीटल्सच्या अग्रभागी लाऊन ठेवीत असत जे, चांदणीच्या आत्मसन्माला ठेस पोहोचवित असे.
अश्‍यातच एकदा याही डॉक्टरला दाखवून देते या विचाराने चांदणीने रामदासपेठेतील डॉ.रखिया यांचे हॉस्पीटल गाठले.डॉ.रखिया यांनी तिला तपासताच ‘नागपूर स्कॅन’मध्ये एमआरआय काढण्यास सांगितले.एमआरआयची रिपोर्ट चांदणीला दुस-या दिवशी मिळणार होती मात्र डॉ.रखिया इतके अधीर झाले होते की त्यांनी ती परस्पर मागवून घेतली व चांदणीला डॉ.रखियाच्या स्वीय सहायकाच्या फोन आला,तातडीने ये!

चांदणी आपल्या धाकट्या बहीणीसोबत ३० डिसेंबर २०१२ रोजी डॉ.रखिया यांच्या रुग्णालयात आली असता‘तू एकटी का आली?सगळ्यांना घेऊन ये,कमीत कमी १५-२० परिचितांना घेऊन ये, मला खूप महत्वाचं सांगायचं आहे’असे डॉक्टर तिला म्हणाले.चांदणी आपल्या आई,वडील,धाकटा भाऊ,बहीण,काका,काकू,काकांची मुले,नातेवाईक व काही ऑकेस्ट्रा जगतातील सहकारी यांना घेऊन आली.या सर्वांसमोर डॉ.रखिया यांनी चांदणीने आता शस्त्रक्रिया केली नाही तर पाच वर्षात ती कायमची जागेवरच बसेल,सर्व काही जागेवरच करावे लागेल,शस्त्रक्रिया केली तर किमान एक ते दीड वर्षात ती पूर्णपणे बरी होईल,असे आश्‍वासित केले.

त्यावेळी चांदणीचे वय होते फक्त २५ वर्ष.गाण्यांच्या कार्यक्रमात तिला तिच्या सुरेल आवाजामुळे सर्वाधिक मानधन मिळत असे.नाव आणि पैसा दोन्ही तिच्याजवळ होते.कलाकार म्हणून ती खूप व्यस्त झाली होती मात्र दीड वर्षानंतर ती ९९ टक्के बरी होईल अशी खात्रीच डॉ.रखिया यांनी तिला दिली होती.तुला चांगलं करुन देईल,तू नॉर्मल लाईफ जगशील,तू तरुण आहेस,पुढे लग्न होईल,मूल होईल त्यावेळी पाठीचा कणा हा सामान्य असायला हवा,डॉक्टरांनी दाखवलेली स्वप्ने,दिलेले आश्‍वासन,जागवलेला आत्मविश्‍वास यामुळे चांदणी, ही शस्त्रक्रिया डॉ.रखियांकडून करुन घेण्यास तयार झाली.

३० डिसेंबर २०१२ रोजी चांदणी पहील्यांदा या डॉक्टरकडे गेली होती व २२ जानेवरी २०१३ रोजी ती माकड हाडावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी सायंकाळी भर्ती झाली.फक्त माझ्या केससाठी डॉ.रखिया हे परदेशात जाऊन आले,अद्यावत ज्ञान घेऊन आले,असे चांदणीला सांगण्यात आले मात्र त्याचवेळी त्यांच्या रुग्णालयात माधूरी नावाच्या एका तरुणीची शस्त्रक्रिया झाली होती .शस्त्रक्रियेनंतर तिला तिचे पाय ६ तास हलवताच आले नाहीत,हे चांदणीला नंतर कळले.

चांदणीच्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर सज्ज झाले,तत्पूर्वी एक जाडजूड फाईलच तिच्या आई-वडीलांकडून भरुन घेण्यात आली.मेजर शस्त्रक्रिया असल्यामुळे एवढी कागदपत्रे भरुन घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.माधूरी हिच्यावरील शस्त्रक्रियेनंतर डॉ.रखिया यांनी चांदणीच्या पूर्णपणे बरी होण्याची टक्केवारी ९९ वरुन ६० टक्क्यांवर आणली!तरीही चांदणीला आपल्या डॉक्टरांवर पूर्ण विश्‍वास होता,बिंदास करा ऑपरेशन,मला काहीही होणार नाही,असे ती डॉक्टरांना म्हणाली.

८ ते ९ तास ते ऑपरेशन चालले.ऑपरेशन करताना डॉक्टरांनी सतत आवाज दिल्यानंतर, पाय हलवत राहायला सांगितले होते.ते जेव्हा-जेव्हा आवाज देत होते,चांदणी आपला पाय हलवून दाखवत असे….!डॉक्टरांच्या लेखी ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती!चौथ्या-पाचव्या दिवशी तिला चालायला लावले.युरिन बॅग ही काढण्यात आली.शेवटी ते दूखणे हाडाचे आहे त्यामुळे दीड वर्ष तरी तुला ती वेदना सहन करावी लागेल,अशी मानसिक तयारीच चांदणीची डॉक्टरांनी करुन दिली.

ही शस्त्रक्रिया केली नसती तर येत्या पाच वर्षात मला माझं आयुष्य जागेवरच काढावं लागेल त्यापेक्षा दीड वर्ष वेदना सहन करने कधीही योग्य,असा विचार चांदणीने केला होता पण…नियतीच्या मनात वेगळा डाव होता.माझं माकड हाड वाकलेला होता,ते तोडून टाकून सरळ करण्यात आला,२ रॉड आणि १२ स्क्रू टाकून त्याला आधार देण्यात आला होता.३ महिने चांदणी अंथरुणावरच होती.६ महिन्यांनी ती थोड आधार घेऊन चालू लागली.एक वर्षात ती पूर्णपणे आत्मनिर्भर झाली.

चांदणी ही पहील्यापेक्षा जास्त आनंदी राहू लागली.हात जोडून ती डॉक्टरांना ‘देव’म्हणत असे.तिचा ॲसिडीटीचा त्रास बंद झाला,थंडीत तिला वेदना सहन कराव्या लागल्या नाही.तिचं आयुष्यच बदललं.आता तिला ते ‘बेढब कुबड’ झाकण्यासाठीचे ड्रेस घालण्याची गरज नव्हती,तिला हवे तसे ड्रेस तिने खरेदी केले.फिटिंगचे ड्रेस तिला आता घालता येत होते.केस ही मोकळे सोडण्याची गरज नव्हती.दर महिन्यात ती चेकअपला जात होती.

तुझी हाडे जुळली की आपण ते दोन्ही रॉड आणि स्क्रू काढून टाकू,असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते.पाठीच्या वेदना या बंद झाल्या नव्हत्या मात्र कमी नक्कीच झाल्या होत्या.ते रॉड काढल्यावर त्याही बंद होतील या आनंदात चांदणी त्या वेदना सहन करीत होती.हाडे जुळली आहेत तरी मला इतक्या वेदना का होतात डॉक्टर?असे ती डॉक्टरांना तरीही दबक्या आवाजात विचारत राहीली,वेदना पाठीच्या मणक्यात नाही,तुझ्या डोक्यात आहे,अश्‍या शब्दात डॉक्टर तिला झिडकारु लागलेत…!

मला माझ्या डॉक्टरांनी एक नवे आयुष्य दिले होते,मी शो करीत होते,वन्स मोर घेत होते,सोला बरस की बाली उमर को सलाम,दिल तो है दिल,छोटी सी उमर में लग गया रोग,हे तीन गाणे प्रत्येक शो मध्ये चांदणीची ओळख बनले होते.रसिकांनाही तिच्याकडून हीच गाणी ऐकून घ्यायची असे.मराठी चित्रपट ‘ओली माती‘साठी पार्श्वगायनाची तिला ऑफर आली.सुप्रसिद्ध ड्रम वादक संजय बारापात्रे यांनी तिला सिंगापूरला हॉटेलमध्ये गाण्यासाठी विचारणा केली.

मणक्यातील रॉड काढून १५ दिवसात येते असे तिने आश्‍वासन ही दिले.डॉक्टर ही म्हणाले,अर्ध्या तासाचे ऑपरेशन आहे,सायंकाळी तू घरी जाऊ शकतेस….!१३ ऑगस्ट २०१४ रोजी चांदणी पुन्हा डॉक्टरांच्या रुग्णालयात भर्ती झाली.यावेळी मात्र तिने भरपूर शॉपिंग केली,धाकटा भाऊ सागरसोबत सेल्फी घेतल्या,सागर म्हणाला अगं ऑपरेशनसाठी जातेय की फॅशन शो साठी?हॉस्पीटलमध्येही तिने ओळखीच्या परिचारिकांसोबत सेल्फी घेतल्या..जणू…नियतीनेच तिला भास करवून दिला.. ती पुन्हा कधीही तिच्या पायावर उभी राहू शकणार नाही…आताच पूर्णपणे उभी असल्याचे सेल्फी आपल्या आठवणींमध्ये साठवून घे…कायमचे….!

याच दिवशी डॉक्टरांनी इतर रुग्णांवर चार शस्त्रक्रिया पार पाडल्या होत्या.चांदणीला लॉबिमध्ये बघताच हसून म्हणाले,आच चार शस्त्रक्रिया झाल्या,खरे तर तुझी शस्त्रक्रिया मी करणार नव्हतोच पण आता तू आलीच आहेस तर शस्त्रक्रिया करुन टाकू…..!कोणताही एक्सरे,एमआरआय काढण्यात आला नाही,तपासण्याही नाहीत,सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये चांदणीला नेण्यात आलं.दुपारी १ वाजता शस्त्रक्रियेसाठी सुरवात केली.त्याच सूचना…आम्ही आवाज देऊ तेव्हा पाय हलवत रहा….!

डॉक्टरांनी रॉडचा सर्पोर्ट काढताच…हाड एकावर एक असे जोरात आदळले..मधली नस दबल्या गेली किंबहूना..तुटली असावी….एका क्षणात कमेरच्या खालचे सेंशेशन गेले…..!चांदणी अर्धवट बेशुद्ध..डॉक्टर आेरडतात आहेत..चांदणी पाय हलव….!खूप प्रयत्न करुनही चांदणीचे पाय हललेच नाहीत….!हलके डोळे उघडले तेव्हा डॉ.रखिया डोक्यावर हात मारत होते…..!इतर सहकारी डोक्यावर हात ठेऊन बसले होते…!
शस्त्रक्रियेची जोखिम स्वीकारण्याचा आणि त्यानंतर रॉड काढून टाकण्याची भयंकर जोखिम डॉ.राखिया यांनी अवघ्या २५ वर्षीय तरुणीवर ‘स्वत:च्या अनुभवासाठी ’स्वीकारली होती.अनुभव,विद्वता आणि ज्ञान पणाला लावले होते पण?रुग्णालयात आपल्या पायाने चालत आलेली तरुणी मग कधीही त्यानंतर आपल्या पायावर उभी झालीच नाही…डॉक्टरांचा प्रयोग फसला होता...रॉड टाकल्यानंतरही ते तोडून सरळ केलेले हाड…जुळलेच नव्हते….!

चांदणी ऑपरेशन थिएटरमध्ये आक्रोश करीत होती,डॉक्टर मला माझे पाय हवे…तिला पुन्हा ॲन्सथेशिया देऊन सुन्न करण्यात आले.दोन वेळा तिला बधिर करण्यात आलं.अर्ध्या तासांचेच ऑपरेशन आहे असे सांगणा-या डॉक्टरांनी तिला दुपारी ४ वाजता ऑपरेशन थिएटरच्या बाहेर काढले आणि केबिनमध्ये न जाता त्या क्षणी तरी गायब झालेत…..!

आई,काका,नातेवाईक असणारा दातांचा डॉक्टर सांरग हे मिडीया बोलवू,तक्रार करु,गुन्हा नोंदवू असा दम देऊ लागताच संपूर्ण हॉस्पीटलच रिकामे करण्यात अाले.नातेवाईकांना समजावण्यात आले.शांत करण्यात आले.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सगळ्या शस्त्रक्रिया रद्द करुन ते दोन रॉड आणि १२ स्क्रू पुन्हा पाठीच्या मणक्यात टाकण्यात आले…. ते…..आजही चांदणीच्या मणक्यातच आहे पण….आता ते चांदणीला पाय हलवण्यासाठी,मुक्त जगण्यासाठी,पायावर उभी राहून सेल्फी घेण्यासाठी कोणतीही मदत करीत नाही कारण….जी नस दबली,तुटली ती कायमचीच,मेंदूपर्यंचे सेंशेसन त्या रॉड परत टाकूनही परत आलेच नाही….!

आता चांदणी अस्थिरोगतज्ज्ञांची केस नसून न्यूरोसर्जनची केस झाली आहे.आज ही ती अंथरुणावरच आहे.तिला मूत्र विसर्जनासाठी कॅथेटर लागले आहे जे तिला दर दहा दिवसांनी स्वत:च बदलावे लागत आहे.मल विसर्जन आणि दैनदिन जिवनातील जुज्बी कामांसाठी ३ महिने तिने चेन्नईच्या संस्थेमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले,व्हील चेअरवर बसून स्वत:ची दिनचर्या पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण तिला उपयोगी पडत असतं….!

व्हील चेअर आणि कॅथेटरसोबत आयुष्य रुळावर येत असतानाच एकुलत्या एक भावाचा, सागरचा खिंडसीवरुन मित्रांसोबत सहलीवरुन येताना कारच्या अपघातात २०१७ मध्ये मृत्यू झाला.आई,जी चांदणीसाठी सर्वस्व होती तिला ही कराेना नावाच्या विषाणूने गेल्या वर्षी दुस-या लाटेत ऐन एप्रिलच्या १९ तारखेला गाठले आणि चांदणी ही आयुष्यात खूप-खूप एकाकी पडली.ऑटो चालक बाबांचा कोणताही ठाव ठिकाणा कधी असतो,कधी नसतो,धाकट्या बहीणीचे लग्न झाले,रामेश्‍वरीत राहणारी बहीण स्वत:च्या संसारात रममाण आहे.

चांदणीला दोन वेळा मूत्राशयाचा विकार जडला.यानंतर बेडसोर्स झाला…..तिच्या पाठीच्या मणकाच या बेडसोर्सने अर्धा आधिक खाऊन टाकला होता…तीन ते चार लाख रुपये बेड सोर्सच्या उपचारावर खर्च झाले मात्र मेडीकलमध्ये बेडसोर्सवरील शस्त्रक्रियेनंतरच तो बरा झाला.पूर्णत बधिर असणा-या पायाला कधी उंदिर रक्तबंबाळ करुन निघून जातात तर कधी मुंग्यांचा थर ही अचानक आढळतो…..!

डॉक्टर रखिया यांनी तर पायात सेंशेशन येण्यासाठी करंट दिला त्यामुळे पायाला ४-५ छिद्र झालेत,त्वचा भाजून निघाली,तू पूर्णपणे बरी होईपर्यंत तुझ्यावर मी उपचार करणार,जगातल्या चांगल्यात चांगल्या तज्ज्ञाचा पत्ता शोधून तुला तुझ्या पायावर पुन्हा उभा करणार,असे आश्‍वासन देणारे डॉ.रखिया यांनीच चांदणीला स्पेशल खोलीतून सामान्य खोली शिफ्ट केले!चार लोकांनी चादरीत आणून बेडवर टाकून दिले….!

मुंबईच्या सुप्रसिद्ध कोकिला बेन अंबानी रुग्णालयात चांदणीला दाखवले असता ५० टक्के बरे करण्याची हमी देऊन ३ लाख रुपये महिन्याचा खर्च डॉ.रखियांना सांगण्यात आला अन्….माझी स्वत:ची जरी मुलगी असती तरी एवढा खर्च मी उचलला नसता…असे उत्तर डॉक्टरांनी दिले…!

लहानशी चांदणी…टी.व्ही वरुन गाणी ऐकून आपल्या वहीत लिहून पाठ करुन उस्फूर्तपणे गाणारी..ओळखीच्या…परिचितांच्या..परिसरातही कार्यक्रमात गाण्यात रमणारी चांदणी,तिचा आवात ऐकून कोणीही ‘खूप छान गातेस गं‘म्हणून तिला दाद देत असे.तिची संगीताची आवड बघून घराजवळील संगीत वर्गात आईने शिकण्यासाठी पाठवले.मध्यमा प्रथम ही शास्त्रीय संगीताची पदवी ही चांदणीने मिळवली..९ वी,१० वी पर्यंत येता-येता अनिता नावाची आत्या व पुष्पलता नावाची काकूंची बहीण यांच्यासोबत लहान-मोठे स्टेज शो करु लागली.
काकांना मात्र ते आवडायचं नाही,चांदणीने शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावे असा त्यांचा आग्रह होता.नरेंद्र पसीने यांच्यासोबत चांदणी दहावीत असताना मोहपा येथे एका तिकीट शो साठी गेली असता ‘छोटी सी उमर में लग गया रोग’हे गाणं सादर करताना खूप घाबरली.रसिकजण आपले शर्ट काढून नाचत होते,शिट्या वाजवत होते,तेव्हा चांदणी फक्त दहावीत होती,घाबरली असल्याने गाणे ही विसरली,त्या वेळी सोबत असणा-या दुस-या लेडीज सिंगरने गाणं पूर्ण केलं….!प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात लाईव्ह शोमध्ये असे टप्पे येतात आणि जातात पण?चांदणीच्या आयुष्यात गाण्यां ऐवजी आलेला टप्पा हा दूर्भाग्यपूर्ण आहे…फार-फार दुर्भाग्यपूर्ण…..!

चांदणी आज नुपूर संगीत क्लासमध्ये नियमित गाणे शिकतेय.गाण्यांवरील तिचा आत्मविश्‍वास पार कोलमडला होता.एका ओळीमध्येच ती सात स्केल बदलू लागली होती,इतकं तिला नैराश्‍य आलं होतं.आता मात्र तिने आपला गमावलेला आत्मविश्‍वास परत मिळवला आहे.तिला गरज आहे संगीत क्षेत्रातील संचालकांनी तिला मंच द्यावा,तिचे जगणे सुसह्य करावे,संगीत हा एकमेव असा आनंद आहे जो तिच्या एकाकी जगण्याला आधार देतो,आनंद देतो,जगण्यातील उर्मी देतो.

२०१६ मध्ये चांदणीला आर्थिक मदत देण्यासाठी सायंटिफिक सभागृहात सूरज शर्मा यांनी चॅरिटी शो टाकला होता.त्या शो मध्ये चांदणी हिच्या आयुष्यावरील लघुपट बघून संपूर्ण सभागृह हळहळले आणि बघता-बघता दोन लाख रुपये गोळा झाले होते……!चांदनीला आजही औषधोपचारावर ५ हजार रुपये महिनाकाठी खर्च करावा लागत आहे.केअर टेकर येऊन दररोज तिच्यासाठी जेवण बनवून तिच्या स्वच्छतेसाठी दीड तास सेवा देते मात्र त्याचाही तिला पगार द्यावा लागतो.

त्यामुळेच तिच्यासारख्या सुरेल गायिकेला थोडा फार आर्थिक भार उचलून मंच देण्यासाठी, नागपूर शहरातील संगीत संचालकांनी समोर यावे असे विनम्र आवाहन ‘सत्ताधीश’करीत आहे.

(संपर्क क्रमांक- ९९६०९२६३२८)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या