फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजचाळीस वर्ष त्याने लिंग धुतलेच नव्हते!

चाळीस वर्ष त्याने लिंग धुतलेच नव्हते!

Advertisements

सेक्सोलॉजिस्ट डॉ.संजय देशपांडे यांनी उलगडले लैंगिकतेचे अनेक पदर

रुबरुच्या ह्यूमन बुकचा उपक्रम

सेक्स एज्युकेशन हेच स्वसथ समाजासाठी प्रभावी वॅक्सीन

इंटरेस्टेड पार्टनर उत्तेजना आणतात औषधे नाही

PLISSIT मॉडेलची केली उकल

‘योनीच्या मनाच्या गोष्टी’नाटकाने आणला प्रेक्षकांमध्ये खुलेपणा

स्त्रियांपेक्षा पुरुषांना लैंगिकता शिकवण्याची जास्त गरज

कौटूंबिक हिंसाचाराशी लैंगिगतेचा सरळ संबंध:स्त्री नकार देणारच

विवाहबाह्दय संबधांतील समुपदेशनासाठी येणारी जोडपी मूल्यांचा प्रश्‍न नसून वैद्यकीय विषय

भारतात व्हरचुर्अल सेक्सची संकल्पना अद्याप बाल्यावस्थेत

फार जास्त स्त्रीवाद आल्यास पुरुषांची गरज फक्त वीर्या पुरती

प्रोक्रिएशनपेक्षा रिक्रीएशन जास्त महत्वाचे

नपुंसकता हा शब्दच चुकीचा:पुरुषाचे अस्तित्व फक्त सेक्सपुरते नाही

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लैंगिकता अधिक खुली

प्रत्येक लैंगिक समस्या ही मेंदूशी निगडीत

समाजाने समलैंगिकांना स्वीकारल्यानंतरच त्यांचे लग्न व दत्तक मूलांचा स्वीकार शक्य

नागपूर,ता.२५ फेब्रुवारी २०२४: लैंगिकविषयतज्ज्ञ(सेक्सोलॉजिस्ट)म्हणून माझ्याकडे एक पन्नाशीच्या जवळपास वय असणारा रुग्ण आला.त्याला लिंगाच्या ठिकाणी फार वेदना जाणवायला लागल्या होत्या.त्याच्या लिंगाचे निरीक्षण केल्यानंतर लिंगाच्या समोरील मांसाच्या आत टणक गाठ असल्याची शंका आल्याने झाशी राणी चौकातील सुप्रसिद्ध तत्ज्ञ वाय.एस.देशपांडे यांच्याकडे तपासणीसाठी त्या रुग्णाला पाठवले असता कर्करोगाच्या गाठीची शंका निराधार निघाली. त्याच्या लिंगाच्या समोरील मांसाच्या आत पांढरा मळ जमून तो टणक झाला होता!कारण त्याने चाळीस वर्षांपासून स्वत:चे लिंगच धुतले नव्हते!त्याला ही जाणीवच नव्हती की आंघोळ करताना आपले लैंगिक अवयव हे सुद्धा स्वच्छ करायला हवे.आपण शालेय जीवनापासूनच मुलांना हॅण्ड वॉश करण्याची शिकवण देतो मात्र,लैंगिक अवयवांची स्वच्छता ही देखील तितकीच महत्वाची असते,हे शासन,प्रशासन किवा कुटूंबात शिकविल्या जात नाही,कौटूंबिकस्तरावर देखील याचे प्रमाण नगण्य असल्याची खंत सुप्रसिद्ध लैंगिकरोगतज्ज्ञ डॉ.संजय देशपांडे यांनी व्यक्त केली.ते रुबरु ह्यूमन लायब्ररीच्या कार्यक्रमात ‘ह्यूमन बुक’म्हणून बोलत होते.

याप्रसंगी त्यांनी लैंगिकतेसंबंधी अनेक गोष्टींचा सखोल उहापोह केला.ते म्हणाले आपल्या भारतीय समाजात लैंगिकतेसंबंधीचे शिक्षण म्हणजे समागमाचे(इंटरकोर्स)चे शिक्षण देणे अशी भ्रामक आणि भंपक संकल्पना आहे.आपल्या शारिरीक अवयवांसंबंधी योग्य वयात योग्य शिक्षण शालेयस्तरावरच देणे गरजेचे असल्याचे सांगून,स्वस्थ समाजासाठी सेक्स एज्यूकेशन ही प्रभावी ’वॅक्सीन’ असल्याचे मत त्यांनी मांडले.आज मुलींच्या लग्नाचे वय हे २८ पल्ल्याड गेले आहे.वयाच्या १२ व्या वर्षी त्यांना मासिक पाळी सुरु होते.एवढ्या प्रदीर्घ काळासाठी अतिशय नैसर्गिक असणा-या लैंगिक भावना दडपून टाकणे प्रत्येकाला शक्य नसतं,उलट मुलीच प्रश्‍न करतात ३० वर्ष वयापर्यंत आम्ही लैंगिक सुखाशिवाय का म्हणून राहायचं?

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लैंगिकता हा विषय जास्त खुला,मोकळा असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्याकडे आज ही अनेकदा स्वत:चे प्रॉब्लेम हे मित्राचे प्रॉब्लेम सांगून,सल्ला किवा औषधोपचार घेण्याचा कल असल्याचं दिसून पडतं.कर्करोगापेक्षाही जणू लैंगिक समस्या ही भयंकर वाटत असते.जितके जास्त शिक्षण तितके जास्त बुजरे-लाजरे व्यक्तीमत्वं.अनेक जण तर सुरवरातीला रामदासपेठेतील माझ्या क्लिनिकचा फलक बघून निघून जायचे,मग हळूच आत डोकवायला शिकले.विश्‍वास पटला की मग समस्या सांगतात.आपल्यापेक्षा मध्यप्रदेश तसेच हिंदी भाषिक रुग्ण हे जास्त बोल्ड असल्याचं डॉ.देशपांडे यांनी सांगितले.

स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये लैंगिक समस्या या जास्त प्रमाणात दिसून पडतात याचे कारण पुरुषांना ‘परफॉर्मन्स प्रेशर’ असतं.स्त्रियांमध्ये संकोच असतो त्यामुळे जिवनातील एवढ्या महत्वाच्या विषयावर मोकळा संवाद पती-पत्नीमध्ये फार गरजेचा असतो. अनेकदा त्यांच्यात लैंगिकतेविषयी समस्या नसते,वेगळी बेडरुम,रिलॅक्स मूड असल्यास त्यांची समस्या सुटणारी असते.हेच त्यांना समजावून सांगावं लागतं.लैंगिकतेवरील जगप्रसिद्ध ‘मास्टर्स ॲण्ड जॉन्सन’हे पुस्तक भारतीय परिवेषात चालणारं नाही,असे सांगत त्या पुस्तकात अनेक गोष्टी असल्या तरी आपल्या भारतीय मानसिकतेतील पहीली पायरीच ’डाॅक्टरांना कशासाठी फी द्यायची?आपण फक्त बोललो,औषधे कुठे दिली?असा मिश्‍किल अनुभव त्यांनी सांगितला.
परिस्थिती हाताबाहेर गेल्याने व मित्राच्या सल्ल्याने आता मात्र मी फी आधी घेतो नंतर सल्ला व औषधे देतो,असे वास्तव त्यांनी सांगितले.मुंबईतील अपोलो रुग्णालयातील डॉ.रेड्डी यांच्याकडूनही बरेच मोलाचे मार्गदर्शन मिळाले मात्र,ते मेट्रोसिटीमध्ये राहत असतात,मी नागपूरसारख्या शहरात राहत असल्याने फार फरक पडत होता.

अनेकदा रुग्ण ज्या समस्या सांगत असत त्या समस्या त्यांना होत्याच नाही,खूप खोलात जाऊन त्यांचा इतिहास तपासला असता वेगळीच समस्या निघत असे.लैंगिक सुखाची ईच्छा ही शरिरात किवा अवयवात नसून सर्वात आधी ती माणसाच्या मेंदूमध्ये निर्माण होत असते त्यामुळे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे पाच प्रश्‍न विचारुन समस्या जाणून घेणे शक्य होत नाही तर पंधरा प्रश्‍न विचारल्यानंतरच कळतं की आलेल्या रुग्णाची समस्या ही व्यक्तीगत आहे की सामाजिक?जोडप्यांचे समुपदेशन करताना तर कळतच नसे कोण खरं बोलतोय कोण खोटं!असा अनुभव डॉक्टर देशपांडे यांनी सांगितला.२००३ मध्ये मी खासगी प्रॅक्टीस सुरु केली आज वीस वर्षांनंतर लैंगिकतेबाबतचा सिनॅरियाे पार बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांमध्ये हस्तमैथून,स्वप्नदोष इत्यादीचे प्रमाण वाढले आहे.खरे तर स्वप्नदोष हा शब्दच चुकीचा आहे. स्वप्नात वीर्य स्खलन होणे हे फार नैसर्गिक आहे ,त्याला दोष न म्हणता स्वप्नावस्था म्हणने संयुक्तीक आहे.लग्न झाल्यानंतर ही स्थिती राहत नाही.माझ्याकडे वयाची चाळीसी उलटलेले रुग्ण जास्त येतात.हाच तो काळ असतो जेव्हा सहजीवन महत्वाचं असतं.जागतिक आरोग्य संघटनेने वयाच्या ६५ वर्ष वयापर्यंत लैंगिक जीवन सामान्य मानलं आहे.माझ्याकडे ७० वर्ष वयातलेही रुग्ण हेच विचारायला येतात,आता या वयात लैंगिक भूक शमविणे अपराधीपणाचा भाव उत्पन्न करतो!वय वर्ष ८ पासून तर ८० वयापर्यंतचे रुग्ण आज सामान्यपणे सल्ला किवा औषधे घेण्यास येतात.वय वर्ष ८ मध्ये पालकच जास्त जागरुक असतात,मुलामध्ये एंजायटी खूप जास्त असल्याचे सांगतात तेव्हा त्यांना बालरोगतज्ज्ञांकडे जाण्याचा मी सल्ला देतो.

पूर्वी लैंगिक समस्येला घेऊन फक्त पुरुषच येत असले.जेव्हा जोडीदाराला सोबत आणण्यास सांगत असे तेव्हा ‘तिला कशाला आणायचे?तिला तर काही प्रॉब्लम नाहीच आहे’असे उरफाटे उत्तर ते देत असत.आता मानसिकतेत थोडा बदल झाला असल्याचे डॉ.देशापांडे यांनी सांगितले.नवीन लग्न झालेल्या मुलींचेही फोन आता येतात.लग्नाला फक्त दोन चार दिवस झाले असतात अश्‍यावेळी परफॉरमेन्सला घेऊन शंका उपस्थित करने सर्वथा चुकीचं आहे.‘Sex is a team Game,both the Partner should Involve’पुरुषाला स्वत:ला लैंगिक संबंधाच्यावेळी मानसिक दडपण येतं हे सुद्धा त्यांना कळत नसतं.त्या मानाने स्त्रिया या जास्त बुद्धिमान असतात,असे डॉक्टर देशपांडे सांगतात.‘मास्टर्स ॲण्ड जॉन्सन’मध्ये चार टप्पे सांगितले आहेत.सुखी,आनंदी लैंगिक जिवनासाठी त्यात सर्वात पहीला व महत्वाचा टप्पा आहे ईच्छा(डिझायर).उत्तेजना ही जरी महत्वाची असली तरी ईच्छा सर्वात महत्वाची आहे.पुरुषाला दिवसभर कोणताही ताणतनाव जाणवत नाही मात्र,समागमाच्या वेळी तनाव येत असेल तर मेंटेंन होऊ शकत नाही,असे डॉ.देशपांडे यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांनी PLISSITहे मॉडेल उकलून सांगितले.P म्हणजे परमिशन गिव्हिंग.पुरुषांमध्ये ईगो असतो,मलाच का प्रॉब्लम?आधी स्वत:,स्वत:ला स्वीकारा की माझ्यात अमूक एक समस्या आहे.अनेकदा असे देखील रुग्ण येतात ज्यांनी कर्करोगावर उपचार घेतले असतात किवा हार्टसर्जरी झाली असते.उपचारानंतर सेक्स करु शकतो का?हे ते उपचार करणा-या डॉक्टरांना विचारत नाही कारण त्यांचा हा समज असतो त्यांच्या डॉक्टरांना वाटेल,मृत्यूच्या दाढेतून सूटून आलाय आणि याला सेक्स सूचतोय!LI म्हणजे लिमिटेड इन्फॉरमेशन.SS म्हणजे स्पेसिफिक सजेशन्स.IT म्हणजे इंटर्नशिप टेरर. IT पर्यंतची स्टेज येतच नाही,त्या आधीच्या टप्प्यापर्यंतच ९० टक्के रुग्ण बरे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी समलैंगिक रुग्णांबाबत देखील त्यांनी काही अनुभव शेअर केले.सर्वात आधीतर रुग्णाचे वडीलच येतात.त्यांच्या मुलाचे लग्न ठरले होते मात्र,त्याने आपल्या बहीणींना सांगितले तो हे लग्न करणार नाही कारण तो समलैंगिक आहे.हा बापच माझ्याकडे खूप रडला.त्यांच्या दु:खाची तीव्रता कमी करने गरजेचे होते.खरं तर हे काही दू:खंच नव्हतं मात्र,हे एका डॉक्टरला कळत होतं,बापाला कसं कळणार?त्यांना मुलाला पाठवायला सांगितलं.मुलाला सांगितलं,लग्न करणार नाही असे न सांगता,वडीलांना काही काळ विचार करायला मागून घे.काळाबरोबर वडीलांच्या दू:खाची तीव्रता कमी होईल आणि ते सारासार विचारबुद्धीने तुझ्या समस्येवर विचार करतील.खरंच असंच घडलं.चार-पाच महिन्यांचा काळ लोटल्यानंतर मुलाच्या समस्येकडे, समाज आणि बदनामीच्या समस्येपल्ल्याड बघायचे धैर्य त्यांच्यात आले.

आपल्या समाजात समलैंगिक हे अल्पसंख्याक आहेत.जोपर्यंत समाज त्यांना स्वीकार करणार नाही तोपर्यंत त्यांचे लग्न आणि दत्तक मूल कसे स्वीकारणार?असा मूलभूत प्रश्‍न डॉक्टरांनी केला.समाजाने समलैंगिकांना स्वीकारल्यानंतरच त्यांचे लग्न व दत्तक मूलांचा स्वीकार शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.आपलं ही बाळ असायला हवं.म्हातरपणी त्यांना ही आधाराची तितकीच गरज असते जेवढी इतरांना.ही फार स्वाभाविक ईच्छा आहे.मात्र,त्या बाळाचा स्वीकार समाजाने करण्यापूर्वी समलैंगिक जोडप्यांचा स्वीकार करण्याची मानसिकता रुजण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कौटूंबिक हिंसाचार आणि पती-पत्नीचे लैंगिक संबंध या विषयाल देखील त्यांनी स्पर्श केला.शहरातील विविध पोलिस ठाण्यातून अनेक फोन येतात.पती-पत्नीमध्ये सेक्सला घेऊन खूप प्रॉब्लेम आहेत,सतत मारहाण होते,भरोसा सेलमधून देखील अनेक जोडपी समुपदेशनासाठी पाठविली जातात.ज्या स्त्रीला मारहाण होते,तिची त्या पुरुषाबरोबर सेक्सची ईच्छा कशी होणार?ज्याच्यावर रक्षणाची जवाबदारी असते तोच जर भक्षक बनत असेल तर वैवाहिक जीवनात सेक्सला घेऊन खूप जास्त समस्या निर्माण होतात.विश्‍वासातल्या माणसाने दिलेले दु:खं याची तीव्रता ही जास्त असते.स्त्रियांची घुसमट होते,त्या बोलू ही शकत नाहीत.तरीही आपल्या देशात स्त्रियां या इतक्या चांगल्या आहेत की ९९ टक्के स्त्रिया अशी मारहाण आणि अपमान सहन करुनही आपला संसार टिकवून ठेवतात.

अनेक केसेसमध्ये मुलाचे आई-वडीलच समुपदेशकाकडे मुलाला पाठविण्यास मज्जाव करतात.हिंदी भाषिकांमध्ये तर लग्नाच्या दोनच दिवसांनंतर मुलगी माहेरी परतते. मग दिवाळी असते,श्रावण असतो,सुरवातीच्या एका वर्षाच्या आत नवरी मुलगी ९ महिने माहेरीच असते,अशा वेळी फक्त दोन दिवसांच्या अनुभवावरुन मुलात दोष आहे तो पत्नीचे समाधान करण्यास सक्षम नाही,असा गैरसमज अनेकांच्या जीवनाचे वाटोळे करतो.’तुम्हारा लडका तो मर्दो मे नहीं है‘असे बोल लावले जातात.एकदा माझ्या क्लिनिक समोर १५-२० चपलांचे जोड दिसल्याने आज इतके रुग्ण आल्याचा समज माझा झाला,आत गेल्यावर कळले रुग्ण फक्त एकच आहे,बाकी सर्व त्याचे नातेवाईक आहेत!असा अनुभव डॉ.देशपांडे यांनी सांगितला.त्याने सगळं गाव सोबत आणलं पण बायकोला सोबत आणले नाही.

आपल्याकडे कौटूंबिक हिंसाचाराविरुद्धचा कायदा आहे.बायकोला मारहाण केल्यास पतीला जेल होते मात्र,पत्नीवर बलात्कार केल्यास कोणतीही शिक्षा त्याला होत नाही.सर्वोच्च न्यायालयात वैवाहिक बलात्काराबाबतची केस विचाराधीन आहे.केंद्र सरकारने असा कायदा करण्यास विरोध दर्शवला आहे.यामुळे भारतीय समाजात कूटूंब दूभंगतील असा केंद्राचा दावा आहे मात्र,वैवाहिक बलात्कार होत असतात,हे वास्तव नाकारता येत नसल्याचे डॉ.देशपांडे यांनी सांगितले.त्यामुळे,एकवेळा असे घडले तर दूर्लक्ष करता येईल मात्र, ज्या वैवाहिक जिवनात असं वारंवार घडत असेल तर त्या पुरुषाला शिक्षा होणे गरजेचे आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.आजच्या काळात जुने विचार ठेऊन चालणार नाही.जग फार बदलंलय,आपण ही बदललं पाहीजे.कठोर होऊ नका,आमच्या वेळेस असं नव्हतं,तसं नव्हतं,असे बोल लाऊ नका,असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

माझ्याकडे विवाहीत जोडप्यांशिवाय विवाहबार्ह्य संबधात असणारी जोडपी देखील येतात.अश्‍यावेळी मला पारंपारिक नीती मुल्यांचा विचार सोडून, वैद्यकीय विचार करने गरजेचं असतं,असे ते म्हणाले.सेक्स हा विषय खूप शास्त्रीय असल्याचे सांगून,इंटरेस्टेड पार्टनर उत्तेजना आणतात,औषधे नाही,असे ते म्हणाले.

तुमच्या मुलांनी वडीलांचं हे असं हे सर्वस्वी वेगळं प्रोफेशन कसं स्वीकारलं?असा प्रश्‍न केला असता,पुरुषांनाच खरं तर शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.स्त्रियांना ब-याच गोष्टी कळत असतात असे ते म्हणाले.कारण सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मी लैंगिक विषयाच्या जनजागृतीसाठी नागपूरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर सेशन्स केले.माझा मुलगा मात्र,बाबा तुम्ही कोणत्याही शाळेत जा पण माझ्या शाळेत येऊ नका,असा म्हणत असे.माझी मुलगी मात्र,बाबा माझ्या शाळेत कधी येणार?असा प्रश्‍न विचारत होती.आता माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली आहे पण,मुलीच्या तुलनेत मुलाला माझं प्रोफेशन समजून घ्यायाला थोडा वेळ लागला असल्याचा अनुभव डॉ.देशपांडे यांनी सांगितला.

त्यावेळी ‘कहानि घर घर की’हा सिरीयल खूप गाजत होता. त्या मालिकेत मुलगी लग्नाआधी गरोदर राहीली,मुलाला प्रश्‍न पडला,लग्न तर झालंच नाही मग मुलगी गरोदर कशी?जे लग्ना नंतर हाेतं ते आधी घडलं,एवढं सोपं आहे समजून घेणं,असे देशपांडे म्हणाले.कोणालाही लैंगिक समस्या असू शकतात,सर्वात आधी हे स्वीकारा.मुलांना आधी समजून घ्या पालक म्हणून,शिक्षक म्हणून.शाळेत १०-१२ शिक्षक मुलांना शिकवत असतात तरी देखील एखाद्याच शिक्षक मुलांना का आवडतो?याचं कारण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील तरल नात्यात असतं,त्या शिक्षकाने विद्यार्थ्याला समजून घेतलं असतं.

यावेळी त्यांनी आभासी (व्हरचूर्अल)सेक्स विषयी देखील आपलं मत सांगितलं.भारतात आभासी सेक्स हे बाल्यावस्थेत अाहे,असं म्हटलं तरी चालेल.मात्र,मोबाईल,स्मार्ट फोन,न्यूडनेस ब-याच स्वरुपात आहे.पार्नोग्राफी खूप वाढलेली आहे.हे चांगलं की वाईट,असाही प्रश्‍न मला विचारला जातो जो गैरलागू आहे.कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे वाईटच असतं.मला औषधाची मात्रा वाढवावी लागते,असे त्यांनी सांगितले.

सेक्स हा जिवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्याकडे धार्मिक संकल्पना घट्ट रुजलेल्या असल्यामुळे या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही.दूसरीकडे कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या बाहेर किवा खजूराहोमध्ये तसेच दक्षीणेकडील देवळांमध्ये अधिकतर सेक्सच्या विविध प्रतिकृती बाह्य खांबांवर कोरल्या गेलेल्या आहेत.याचा अर्थ ते मनोरंजनासाठी बघणे असून आत गर्भगृहात येताना मात्र अध्यात्मकडे वळण्याचा संदेश असतो.

खूपच फेमिनिस्ट झालो तर वीर्याची गरजच वाटणार नाही.सेक्स तर फार दूर राहीलं.मूल होण्यासाठी काही काळानंतर पुरुषाची गरज भासणार नाही एवढं तंत्रज्ञान प्रगत झालं आहे.म्हणूनच रिलेशनशिप खूप महत्वाची असते.स्वातंत्र्या पूर्वी भारतीयांचे आयुष्यमान ४७ वर्ष होते ते आता ७५ पल्ल्याड गेले आहे.मूलं ही मोठी झाल्यावर शिक्षण किवा नोकरीसाठी दूरस्थ गेलेली असतात.अश्‍या वेळी वार्धक्याकडे झूकलेल्या जोडप्यांमध्ये ‘रिक्रिएशन‘(मनोरंजन) खूप महत्वाचं ठरतं.प्रोगिएशन(प्रजनन)पेक्षा रिक्रिएशन हाच जीवनाचा गाभा असल्याचे त्यांनी सांगितले.जुन्या काळात वर्षाला एक अशी दहा वर्षात दहा मुल जन्माला येत असे,आता संपूर्ण आयुष्यातच एकच मूल जन्माला घातली जातात.

पुरुष हा फक्त सेक्स करण्यापूरती किवा मूल जन्माला घालण्यापूरती मर्यादित नाही.त्यामुळे नपुंसकता हा शब्दच मुळात चुकीचा आहे.त्याच्यात चांगलं ह्दय असतं,संवेदना असते.उत्तम आरोग्य असतं.सेक्स करणं हेच फक्त पुरुषाचं काम नसतं,त्याला व्यक्ती म्हणून स्वीकारता आलं पाहिजे,असा मोलाचा सल्लाही या प्रसंगी डॉ.देशपांडे यांनी दिला.

याप्रसंगी त्यांनी या क्षेत्रात झालेली सुरवात,अडचणी याविषयीचे अनुभव संागितले.नागपूरच्या शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करताना त्यांना एकदा नर्सिंग कॉलेजमध्ये ‘ह्यूमन सेक्शुअलिटी‘वर व्याख्यान देण्यासाठी बोलविण्यात आले.तोपर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमात हा विषय विशेषत्वाने अभ्यासला गेला नसल्याने काय बोलायचे,असा प्रश्‍न पडला.त्यासाठी डॉ.गुप्ता यांच्या काही नोट्स वाचल्या व त्यातून या विषयाबद्दल माहिती मिळत गेल्याचे त्यांनी सांगितले.पुढे मेडीकलच्या ‘सेक्स अँड मॅरेज कौन्सिलिं‘या विभागात काम करण्याचा योग आला मात्र,तिथे कोणीही येत नसे.फारच तुरळक रुग्ण यायचे. पुढे २००३ पासून सेक्सॉलॉजिस्ट म्हणून स्वतंत्र प्रेक्सिटस सुरु केली मात्र,तिथे पहील्याच दिवशी दोन पेशंट आले व नंतर महिना भर कोणी फिरकलेच नाही.

कशाप्रकारे त्यांनी आपलं ज्ञान अद्यावत केलं.ट्रेनिंग घेतली,इंडियन मेडीकल असोसिएशनसोबत जुळलले १४ वर्ष,यामूळे ज्ञानात पडलेली भर,मेडीकलच्या अंगाने जगात कशाप्रकारे सेक्सॉलॉजी हा विषय प्रगल्भ होत गेला,विविध सेमिनार,संशोधन,मित्रांची झालेली मदत,पालकांचे मार्गदर्शन,जोडीदाराची साथ,२०१२ साली देशपांडे सभागृहात आणलेले ‘योनिच्या मनाच्या गोष्टी‘या नाटकाला मिळालेला तूफान प्रतिसाद.प्रेक्षकांचा मोकळेपणा इत्यादी अनेक गोष्टींचा त्यांनी याप्रसंगी उहापोह केला तसेच उपस्थितांच्या अनेक प्रश्‍नांचे निरसन केले.याप्रसंगी त्यांच्या सुविज्ञ पत्नी एम.डी.मेडिसिन असलेल्या डॉ.सौ.देशपांडे या देखील उपस्थित होत्या.

डॉ.देशपांडे यांचा परिचय व सूत्र संचालन डॉ.स्वाती धर्माधिकारी यांनी करुन दिला.डॉ.प्रफूल्ल कंटक यांनी आभार मानले.

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या