


चमचमला कोणी मारले? समाज,सरकार की पोलिसांनी!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर शहरात नुकतीच अत्यंत दूर्देवी घटना घडली, तृतीयपंथी चमचमचा निघृण खून करण्यात आला. या घटनेने केवल तृतीय पंथी किंवा एलजीबीटीकयू हा समुदायच नव्हे तर स्वस्थ समाज देखील खोलवर हादरला. वरवर पाहता हत्येचे कारण जरी पैसे किंवा सत्तेचे वर्चस्व ही दोन कारणे दिसून पडत असली तरी खोलवर याचा शोध घेता चमचमचा खून समाज,समाजाच्या संकुचित मानसिकतेने, सरकारने,पोलिसांनी केलेला असल्याची भावना आता या समुदायाच्या व्यक्तिंमध्ये खोलवर रुजली असल्याचे दिसून पडते.
‘सारथी’ ही गेल्या पंधरा वर्षांपासून तृतीय पंथी,गे,लेस्बियन, हिजडा या समुदायाच्या उत्थानासाठी व आत्मसन्मानासाठी सातत्याने कार्य करीत आहे. सारथीचे अध्यक्ष् आनंद चंद्राणी यांच्याशी या दूर्देवी घटनेबाबत ‘सत्ताधीश’ या न्यूज पोर्टलसाठी संवाद साधला असता त्यांनी चमचमची हत्या फक्त उत्तमबाबा किंवा त्यासारख्या प्रवृत्तींनी केली नसून संपूर्ण समाज,सरकार आणि पोलिसांनी केली असल्याचा घणाघाती आरोप केला! चमचमची हत्या झाली कारण या समुदायाचासाठी स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्षी सुद्धा कठोर कायदे नाही, कायद्यांची भीती नाही, सरकारला या समुदायाची पर्वा नाही,पोलिसांकडे मुक्तपणे समस्या किंवा प्रश्ने घेऊन गेल्यास सुनवाई नाही,न्यायालयातच फक्त प्रत्येक प्रश्नावर धाव घेणे आमच्या समुदायाला अपरिहार्य असल्याचे ते सांगतात.

चमचमवर वार करताना गुन्हेगारांच्या डोकयात हीच भावना स्पष्ट होती…आम्ही तृतीय पंथी असल्यामुळे सामान्यांचे कायदे आमचे काहीही बिघडवू शकत नाही! कायदा,सरकार,समाज यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत..चमचम ही तर प्रातिनिधिक उदाहरण आहे..अश्या अनेक घटना दररोज या समुदायात घडतात मात्र त्यांची कुठेही वाच्यता होत नाही.चमचम एक लोकप्रिय विभूती असल्यामुळे तिच्या हत्येची एवढी चर्चा तरी झाली. गुन्हेगारांनी स्वत:च्या घरात बोलावून तिचा थंड डोक्याने खून केला यावरुन त्यांचा र्निढावलेपणा व बेडरपणा लक्षात येतो. गेल्या काही महिन्यांपासून चमचम ही खूप तनावात जगत होती. तिच्या आईसोबत संवाद साधला असता आईजवळ देखील तिने हा तनाव व्यक्त केला होता. ‘मेरी जिंदगी का कोई भरोसा नही’ असे आपल्या जन्मदात्रीला सांगताना ती ढसाढसा रडली होती,दूर्देवाने तेच घडले. का पोलिसांकडून आधीच जिविताच्या,आत्मसन्मानाच्या सुरक्षेची हमी तृतीय पंथिय किंवा एलजीबीटीकयू समुदायाला मिळत नाही? तिच्या आईचे वय आज ६५ च्या जवळपास आहे. चमचम ही एकूलती एक लेक होती तिला. आता तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कोणता समाज,सरकार,पोलिस किंवा न्यायव्यवस्था सोडवणार?एलजीबीटीकयू समुदायाने दर महिन्यात तिला आर्थिक सरंक्ष ण देणे जरी स्वीकारले असले तरी या वयात तिला एकटीला जगणे सोसवेल का? पोलिसांच्या एफआयआर मध्ये मानवी संवेदनाच्या या गोष्टींची नोंद का नसते?
या घटनेने आम्ही स्वत: आतून हादरलो आहे असे ‘सारथी’चे कार्यकारी व्यवस्थापक निकुंज जोशी सांगतात.मात्र ज्या सामाजिक कार्याचा वसा आम्ही घेतला आहे तो वसा या आणि अश्या घटनेने टाकून न देता भीती मनात घेऊन देखील पुढील लढा द्यायचाच निर्धार निकूंज व्यक्त करतात. गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही तृतीय पंथी किंवा एलजीबीटीकयू समाजाला सन्मानाने, स्वस्थ समाजाने सामावून घ्या,असा लढा देत आहोत,या घटनेने त्याला देखील खोलवर आघात बसला. पुन्हा स्वस्थ समाज आता आमच्याकडे संशयाने व हिणकस नजरेने बघतो आहे. मात्र, एक गोष्ट विसरता येत नाही,अश्या घटना समाजाच्या सर्वच वर्गात,जाती,धर्मात घडतात,मग आम्हीच फक्त आरोपींच्या पिंजर्यात का? आपलं नागपूर शहर हे मेट्रो सिटी,स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे,मग नागपूर शहराच्या नागरिकांची विचारसरणी अाणि मानसिकता स्मार्ट सिटीला साजेल अशी ‘पुरोगामी’ कधी होणार? तृतीय पंथी आणि एलजीबीटीकयू समुदायाच्या प्रश्नांकडे आतातरी २१ सा व्या शतकातील १९ सा व्या दशकाचा हा समाज ‘माणूस’ म्हणून पाहणार का?
उद्या संविधान चौकात देणार श्रद्धांजली-
चमचमला आम्ही उद्या सोमवार दि. १७ जून रोजी संविधान चौकात ६ ते ७ वा.दरम्यान मूक श्रद्धांजली देणार आहोत. या पुढे तृतीय पंथी,ट्रांस जेंडर,हिजडा अश्या कोणत्याही समुदायाप्रति हिंसाचार वा उत्पीडन नको म्हणून मेणबत्ती पेटवणार असल्याचे निकूंज सांगतात. या घटने नंतर तरी आता एलजीबीटीकयू समुदायाला समाज,पोलिस,सरकार आणि न्याय व्यवस्थेकडून सरंक्ष् ण मिळणार का या प्रश्नांवर हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.




आमचे चॅनल subscribe करा
