

बंटी शेळके यांना न्यायालयीन कोठडी:मनसर तपासणी नाका आंदोलन प्रकरण
कारागृहात करणार अन्नत्याग उपोषण
नागपूरचे पालकमंत्री हे तर ‘परिवार मंत्री’:राऊतांवर बाबा शेळके यांची आगपाखड
नागपूर,ता.६ मे २०२२: कलम ३५३ अर्थात सरकारी कामात अडथळे आणने या आरोपाखाली राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव बंटी शेळके यांना आज रामटेक पोलिसांनी अटक केली.विशेष म्हणजे काल रामटेक पोलिसांचा प्रचंड ताफा शेळके यांच्या महाल येथील घरी दाखल झाला होता,दोन तास तळ ठोकून होता,अखेर आज सकाळी ११ वाजता रामटेक पोलिस ठाण्यात हजर होण्याचे पत्र देऊन काल शेळके यांच्या घरुन रवाना झाले होते,आज शुक्रवारी बंटी शेळके हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रामटेक पोलिस ठाण्यात पोहोचले असता चौकशी नंतर बंटी शेळके यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना अटक करण्यात आली.या सर्व घडामोडी म्हणजे माझ्या मुलाच्या विरोधात राजकीय नेत्यांचे कटकारस्थान असून रामटेक नाक्यावरील भ्रष्टाचारात ’टक्केवारी’ने सहभागी असणारे परिवहन आधिका-यांसोबतच शहरातील काही राजकीय पक्षाचे नेते हे सहभागी असल्याचा धक्कादायक आरोप करीत हे ‘लोकप्रतिनिधी’ नसून चंबल खो-यातील ’डाकू‘असल्याचा संताप माध्यमांकडे बंटी शेळके यांचे वडील बाबा शेळके यांनी व्यक्त केला.
दोन वेळा काँग्रेसचे व एक वेळा अपक्ष नगरसेवक राहीलेले बाबा शेळके यांचे वय आता ७१ वर्ष असून एकेकाळी शहरातील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे ते नायक राहीलेले आहेत.बंटी यांना भ्रष्टाचार विरोधातले बाळकडू हे वडीलांकडूनच प्राप्त झालेत,शहरातील काँग्रेसच्या आमदार पुत्रांसारखे बंटीला राजकारणात ‘प्रमोट’करण्याची मला गरज पडली नाही,तो स्वयंभू राजकारणी असल्याचे बाबा शेळके सांगतात.बंटीला रामटेक पोलिसांनी अटक केली तो आज कारागृहात देखील गेला मात्र नागपूरचे पालकमंत्री जे काँग्रेसचेच आहे त्यांनी या एवढ्या मोठ्या घटनेची साधी चौकशी करण्याचे देखील कष्ट उपसले नाहीत कारण नागपूरचे पालकमंत्री हे तर आपल्या मुलाला राजकारणात प्रमोट करण्यासाठी,त्याला प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष पद देण्यात व राजकारणात त्याचे बस्तान नीट बसवण्यातच व्यस्त असतात,ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नसून ‘परिवार मंत्री’असल्याची खरमरीत टिका बाबा शेळके यांनी केली.

मनसर तपासणी नाक्यावर दररोज तीस ते चाळीस लाखांचा ’गल्ला’ कश्याप्रकारे भरल्या जातो,शासनाकडे कश्याप्रकारे फक्त एक ते दीड लाखांचा महसूल जमा होतो,याची तक्रार व्हिडीयोसहीत बंटी यांना प्राप्त झाली होती.राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन येणे-जाणे करणा-या वाहन चालकांकडून प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणी नाक्यावर काही भ्रष्ट अधिका-यांकडून गाव गुंडांना हाताशी धरुन अवैध वसुली करण्यात येते.शेकडो वाहन चालकांकडून बंटी यांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.ट्रक चालकांना अधिका-यांच्या गुंडांकरवी होणारी मारहाण याचे व्हिडीयो देखील बंटी यांनी सोशल मिडीयावर टाकले असल्याचे बाबा शेळके सांगतात.
मनसर येथील या नाक्यावर खासगी लोकांकडून तसेच ट्रक चालकांकडून संपूर्ण कागद पत्रे असताना देखील परिवहन अधिका-यांचे भाडोत्री गुंड जबरीने १५०० ते २००० रुपये प्रत्येकी वसूल करीत होते.जे या गुंडगिरीला विरोध करीत होते त्यांना मारहाण केली जात होती.ट्रक चालकांकडून जबरीने पैसे वसूल करणारे हे खासगी लोक कोण आहेत?असा प्रश्न बंटी शेळके यांनी या ठिकाणी कर्तव्यावर असणा-या प्रादेशिक परिवहन अधिका-यांना विचारला.या विरोधात त्यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रादेशिक परिवहन विभागातील(आरटीओ)अधिका-यांच्या विरोधात कालपासून आंदोलन पुकारले होते.
यावेळी अवैध वसुली करणा-या अधिका-यांना जाब विचारल्यानंतर या अधिका-यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.या आंदोलकांवर भारतीय दंड संहितेच्या ३५३ व ३४ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले .
या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारकडून राज्यभरातील नाक्यांबाबत एक समिती स्थापन करण्यात आली मात्र या समितीत देखील निलंबित अधिका-याची वर्णी लावली असल्याचा आंरोप करीत बाबा शेळके यांनी या पाच जणांच्या समितीत सामान्य पाच लोक का समाविष्ट नाहीत?असा सवाल केला.
काल माझ्या घरी दुपारी २ वाजता रामटेकचे १०-१५ पोलिस आलेत.यात पीआय,पीएसआय,महिला पोलिस,कोतवाली पोलिस ठाण्यातील ५० माणसे असा सर्व लावाजमा माझ्या घरी बंटी साठी आला.त्यावेळी बंटी घरी नव्हता,बंटीच्या नावे आज सकाळी ११ वाजता हजर होण्याचे पत्र देऊन ते निघून गेलेत.आज ११ वाजता माझा मुलगा कायद्याचे पालन करण्यासाठी रामटेक पोलिस ठाण्यात गेला असता त्याला अटक करुन प्रथम श्रेणी न्याय दंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आले.त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली.आता तो कारागृहातच अन्नत्याग उपोषण करणार आहे.
कॉंग्रेसच्या इतर आमदारांसारखं व प्रदेशाध्यक्षांसारखा ‘मी दिल्लीतला नाही मी गल्लीतला माणूस’ आहे,गल्लीतल्या माणसांच्या सुख-दु:खांशी माझं नातं राहीलं आहे,नाही तर कधी काळी बिना शॉकअपच्या गाडीत ज्याला उजव्या भागातील बॅकअप ही नव्हता,अश्या दूचाकीवर फिरणारा, भाजीची एक जुडी विकत घेणारा व एक पाव भाजीसोबत सांभाराच्या चार काड्या व चार र्मिच्या फूकट मागणारा नेता ही आज ‘मंत्री’होऊन या शहरात सात माले इमारतीचा मालक आहे,असे राजकारण ना मला जमलं ना माझ्या मुलाला जमलं त्यामुळेच मी देखील आता उपाेषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
शहरातील नंबर-१ च्या डाकूंविरुद्धचा हा लढा खूप खडतर आहे.युवक काँग्रेसचे कार्यकर्ते इतकं चांगलं काम करीत असताना त्यांच्या वाटेला, आमचंच सरकार असून देखील अशी मुस्कटदाबी येणार असेल तर जरी मी आज ७१ वर्षांचा असलो तरी मी हा अन्याय मुक्याने सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही चांगलेच तोंडसुख घेत,पटोले यांना काँग्रेसची संस्कृती तरी कळते का?असा घणाघात त्यांनी केला.काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाणारा,भाजपकडून खासदार झालेला मग भाजपचा त्याग करुन पुन्हा काँग्रेसमध्ये येणारा,साकोलीतून आमदार झालेला,आघाडी सरकारच्या काळात विधान सभा अध्यक्ष झाला मग त्या ही पदाचा राजीनामा देऊन आज प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान श्रीमान नाना पटोले यांना प्रदेशाची तर जाऊच द्या,नागपूर शहराच्या गल्ली-बोळ्यातील काँग्रेस तरी कळते का?गडकरींच्या आशिर्वादाने खासदार झालेले,आज खासदार व आमदार पदांची पेंशन घेणारे नाना यांनीही इडीच्या भीतीने त्यांच्या पक्षातील,त्यांच्याच शहरातील एका युवा नेत्याविरुद्ध पोलिसांनी जी कारवाई केली त्यावर मौन बाळगले असल्याची घणाघाती टिका बाबा शेळके यांनी केली.
काय अपराध होता माझ्या मुलाचा?सरकार जरी आमची असली तरी शासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराच्या विरोधातच तो बोलत होता ना?माझ्या घरात अण्णा हजारे पासून अविनाश धर्माधिकारी आदी अनेकांनी २०१३ पर्यंत वर्णी लावली आहे.माझ्याच घरी ते वास्तव्यास होते.बंटी शेळकेवर त्यांच्याही विचारांचे संस्कार झाले असल्याचे बाबा शेळके संतापून सांगतात
महाराष्ट्र सरकारकडून २६ एप्रिल २०२२ रोजी राज्यातील सर्व नाक्यांबाबत राज्याचे परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चार इतर सदस्यांची समिती स्थापन करण्यात आल्याने व तपासणी नाके बंद करण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे व यामुळे राज्याच्या महसूलावर हाेणा-या परिणामांबाबत तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.शेळके यांनी केलेल्या आंदोलनामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे काही महाभ्रष्ट अधिकारी चांगलेच संतापले आहेत,त्याचाच वचपा काढीत बंटी यांना अटक करण्यात आली असल्याचा अारोप बाबा शेळके यांनी केला.
बंटी यांच्यासोबत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसीफ खान व मध्य नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नयन तरवटकर यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
