फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमग्लोकल स्क्वेअर मॉल मधील दूर्घटनेसाठी प्रशासन जवाबदार नाहीत का?

ग्लोकल स्क्वेअर मॉल मधील दूर्घटनेसाठी प्रशासन जवाबदार नाहीत का?

Advertisements

मजुराच्या अपघाती मृत्यूमुळे जनभावना संतप्त

पार्ट ओसी असतानाही अवैध निर्माण कार्य सुरुच:नासुप्रला दिलेल्या शपथपत्राचे सर्रास उल्लंघन

ग्लोकल मॉलचा नकाशाच अवैध:अंकित मोदीची न्यायालयात धाव

सीताबर्डी पोलिस ठाण्याचा कारभारही संशयाच्या भोव-यात!

नागपूर,ता.१२ एप्रिल २०२३: नुकतेच सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सीताबर्डी हद्दीतील ग्लोकल स्क्वेअर मॉल येथील एका माळ्यावर लाेखंडाच्या जाळीचे बांधकाम करताना अवघ्या २५ वर्षीय इंदम भारती पंचम गौतम,राहणार तुर्कदा तांडापाल,जि.(फिरजापुर)उत्तरप्रदेश याचा वरुन पडून दूर्देवी मृत्यू झाला.त्याचा पाय घसरल्याने तोल जाऊन खाली पडल्याची नोंद सीताबर्डी पोलिस ठाण्यातील एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.उपचाराकरिता म्युर मेमोरीयल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.फिर्यादी दिलीपकुमार नेबुलाल गौतम वय वर्ष २६,राहणारा मिर्झापुर(उत्तरप्रदेश)यांनी दिलेल्या सुचनेवरुन सीताबर्डी पोलिस ठाण्यातील सहायक पोेेलिस निरीक्षक सोनटक्के यांनी अकस्मात मृत्युची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.फक्त तीन ओळींची बातमी या अपघाती मृत्यूबद्दल अनेक वृत्तपत्रांनी देखील छापली मात्र, उत्तर प्रदेशसारख्या दूरवरच्या एका राज्यातून स्वत:ची व आपल्या कुटुंबियांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीत आलेल्या एक तरुणाचा, असा दूर्देवी अपघाती मृत्यू, भ्रष्ट प्रशासनाच्या कारभाराचे अनेक अनुत्तरित प्रश्‍न आपल्या मागे सोडून जात नाही का?अशी संतप्त जनभावना ऐकू येत आहे.

मुळात ग्लोकल स्क्वेअर मॉल हा सुरवातीपासूनच अनेक वादांच्या भोव-यात अडकलेला प्रकल्प आहे.मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बसून कितीही कंठशोष केला ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा‘तरीही त्यांच्या पक्षाचे काही हेव्हीव्हेट नेते कश्‍याप्रकार नागपूर शहरात भ्रष्टाचाराच्या गटारगंगेला पतित पावन करीत आहेत याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सीताबर्डी येथील हा ग्लोकल स्क्वेअर मॉल प्रकल्प आहे.

‘सत्ताधीश’ने निर्भिडपणे या प्रकल्पातील अतिशय भ्रष्ट व अवैध कारभाराविषयी वृत्तमालिकाच या आधी देखील प्रसिद्ध केली आहे.बुटी चाळीतील या वास्तूमध्ये राहणा-या अनेक सर्वसामान्य बुटींच्या भाडेकरुंना कश्‍याप्रकारे गुंडांकरवी घरे व दूकाने रिकामे करण्यास भाग पाडण्यात आले,भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असणा-या मनपातील प्रशासनाला] कश्‍याप्रकारे हाताशी धरुन,घर व दूकाने रिकामे न करुन देण्या-यांचे पाणी बंद करण्यात आले व गडरलाईन्स चोक करण्यात आले.दिवस रात्र गुंडांच्या वास्तव्यात राहण्याची ज्यांची हिंमत नव्हती ते मुकाट्याने आपापली चार-चार पिढ्यांची वास्तू सोडून कोणताही मोबदला न मिळताच निघून गेलेत,ज्यांची कुवत होती ते ‘गणगौर’ सारख्या दूकानांचे मालक मेहता हे न्यायालयात पोहोचले.येथील अनेक भाडेकरुंनी बिल्डच्या गुंडांच्या विरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या होत्या मात्र,हाकेच्या अंतरावर असणा-या पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी त्या तक्रारींची कोणतीही दखल घेतली नव्हती,हे विशेष!

हे पण वाचा….

धक्कादायक!गोयल गंगा बिल्डरला सहकार्य करण्याचे गडकरींचे नासुप्र सभापतींना पत्र!

गोयल गंगा त्या जागेचे मालक नाहीत ते विकासक आहेत,त्या जागेची मालकी अद्यापती नासुप्रची आहे.या मॉलमध्ये अनेक अनियमितता असून अनेक कायद्यांचे सर्रास उल्लंघन झाले आहे.नागपूर सुधार प्रन्यासने याच सर्व अनियमिततेच्या अनुषंगाने या प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता.मात्र,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी नासुप्र सभापतींना पत्र लिहून गोयल गंगा स्क्वेअर पार्ट ऑक्युपन्सी (भाेगवटा प्रमाणपत्र) यासाठी केलेल्या अर्जाचा विचार, नासुप्रने योग्य पद्धतीने केलेला नाही,असे गाेयल गंगाचे मालक अनुप खंडेलवाल यांनी मला दिलेल्या निवेदनात म्हटल्याचे नमूद केले..त्यांना पार्ट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हवे आहे.ते मिळाल्यास दूकानदारांना जागा उपलब्ध करुन देणे त्यांना शक्य होणार आहे.या संबंधीच्या सर्व त्रुटींची पूर्तता प्रकल्प उभारणा-या कंपनीने केलेली असतानासुद्धा ,नासुप्रचे सहकार्य मिळत नसेल तर ही गंभीर बाब आहे.या विषयात नासुप्र सभापतींनी व्यक्तिश: लक्ष घालून या प्रकल्पाच्या प्रगतीतील अडचणी दूर करण्यासाठी नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी,असे सूचनावजा खरमरीत पत्र गडकरी यांच्या कार्यालयातून नासप्र सभापतींना मिळाले ज्यात बिल्डर अनुप खंडेलवाल यांना सहकार्य करण्याची सूचना केली होती!

गडकरींच्या या पत्रानंतर ग्लोकल स्क्वेअर मॉलला पार्ट ओसी ही मिळाली.मात्र,ते देताना बिल्डरकडून जे शपथपत्र नासुप्रला देण्यात आले ज्यात मॉलमध्ये कोणतीही दुर्घटना घडली तर ती सर्वस्वी माझी जबाबदारी असल्याचा उल्लेख आहे.मग या निष्पाप मजुराच्या अपघाती मृत्यू प्रकरणी आता कोणावर जबाबदारी निश्‍चित होणार आहे?असा सवाल आता विचारला जात आहे.

हे पण वाचा….

गाेयल-गंगा बिल्डरच्या सुरक्षा रक्षकांचा महिला पत्रकारासोबत असभ्य व्यवहार

गडकरींच्या या पत्रानंतर सभापतींनी नासुप्रचे पश्‍चिमचे अधिकारी राघवेंद्र चौरसिया यांची तडकाफडकी बदली करुन त्या जागेवर प्रशांत भांडारकर यांची नियुक्ती करण्यात आली होती,हे विशेष!

हे पण वाचा….

गोयल-गंगाने केली पार्किंगची जागाच गडप!

 

महत्वाचे म्हणजे याच प्रकल्पातील एक बाधित दूकानदार अंकित प्रसन्न मोदी याने या प्रकल्पाचा संपूर्ण नकाशाच बोगस आहे,अशी तक्रार त्याने सीताबर्डी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.याचा अर्थ सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिसांना देखील माहिती आहे ग्लोकल मॉलचा नकाशा खोटा आहे तरी देखील अवैध बांधकाम काम सुरु आहे आणि अश्‍या बांधकामात एका तरुण मजुराचा खाली पडून मृत्यू झाला, तरी देखील एवढ्या गंभीर घटनेची सीताबर्डी पोलिसांच्या एफआयआरमध्ये अपघाती मृत्यूची नोंद व्हावी?अंकित मोदीच्या तक्रारीनंतर व न्यायालयात ग्लोकल मॉलच्या खोट्या नकाश्‍याच्या मुद्दावर खटला सुरु असतानाही अश्‍या इमारतीच्या बांधकामावर होणारा मृत्यू हा अपघाती कसा?असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

हे पण वाचा….

हॅरिटेज समितीच्या अध्यक्षांनीच केले नियमांचे सर्रास उल्लंघन

महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाच्या मालकाने नासुप्रला लिहून दिलेल्या शपथपत्राचे काय?ज्यात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेविषयी ते स्वत:जबाबदार असतील,शपथपत्रावरील हे शब्द नासुप्रसाठी फक्त खानापूर्तीसाठी होते का?सीताबर्डी पोलिसांनी या प्रकल्पाच्या मालकाला का नाही एफआयआरमध्ये प्रतिवादी बनवले?ठेकेदार,सुपरवायझर हे तर छोटे मासे आहेत,कायदा काय सांगतो?शपथपत्र दिल्यानंतर मूळ मालकाची जवाबदारी  सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस निश्‍चित करणार का?कर्मचारी विमा योजनेचा कायदा काय सांगतो?सुपरवायझरने या मजुरांची नोंदणी कर्मचारी विमा आयोगाकडे केली होती का?त्यांच्या सुरक्षेमध्ये कोणती हलगर्जी ठेवण्यात आली होती?

हे पण वाचा….

मेश्राम यांच्या दोन महिन्याच्या मूलाचाही जीव होता धोक्यात:गाेयल-गंगाची भाडेकरु हूसकावण्याची ‘दाऊद स्टाईल’

या मृत मजुराला उंचावर काम करीत असताना सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट का नाही पुरवण्यात आला होता?या घटनेला तीन दिवस उलटून देखील पोलिसांना शवविच्छेदन अहवाल मिळालाच नाही का?त्या अहवालाप्रमाणे सीताबर्डी पोलिसांनी काय कारवाई केली?‘सत्ताधीश’ने सीताबर्डी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी अतुल सबनीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता एका मजुराचा अपघाती मृत्यू झाला असल्याची एफआयआर नोंदविली असल्याचे त्यांनी सांगितले मात्र सुपरवायझर हा बाहेर गावी गेला असल्याने, अधिक तपशील अद्याप कळायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक गंभीर बाब म्हणजे एका कष्टकरी तरुणाचा अपघाती मृत्यू होतो,त्याला कामाच्या ठिकाणी आणनारा सुपरवायझर मात्र बाहेर गावी असला तरी किंबहूना बाहेर गावी पाठवला गेला असला तरी, त्याच्या मुसक्या आवळून पोलिस ठाण्यात आणायचे काम कोणाचे आहे?या मजुराच्या जगण्याला महाराष्ट्राच्या उपराजधानीत काहीच किंमत नव्हती का?

हे पण वाचा….

गाेयल-गंगाच्या अवैध बांधकामावर सभापतींचा दणका

त्याच्या मूळ गावी त्याचे पार्थिव गेल्यावर काय अवस्था झाली असेल त्याच्या कुटुंबियांची?प्रकल्पाच्या मालकाकडून त्याच्या जीवाचे मोल म्हणून किती रक्कम मृत मजुराच्या कुटुंबियांना मिळाली?याचा तपशील कोण देणार?

मूळात फक्त बेसमेंट आणि पहील्या माळ्याला परवानगी मिळाली असतानाही दुस-या माळ्याचे काम सर्व नियमांना झुगारुन  सुरु आहे.दुस-या माळ्यावर ‘आशिष एनएक्स’हे कपड्याचे दूकान भाडेतत्वावर ग्लोकल मॉलने देऊन ही टाकले आहे,अश्‍या इमारतीत येणा-या ग्राहकांसोबत कोणतीही दुर्घटना घडली तर प्रकल्पाचे मालक अतुल गोयल याची जवाबदारी घेतील का?असा सवाल आता विचारला जात आहे.

नासुप्रने या प्रकल्पाच्या मालकाला प्रकल्पाचा सुधारित नकाशा रद्द केल्याची नोटीस दिली आहे,हे विशेष.जागेच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी व मुदतवाढीचे १५ ते १८ कोटी रुपये न भरल्याने नासुप्रने या प्रकल्पाच्या मालकाला नोटीस बजावली आहे.हेव्हीवेट नेत्याच्या ढवळाढवळीमुळे या दंडाची रक्कम १८ कोटी वरुन ५ कोटीवर आल्याचे देखील सूत्र सांगतात.अशी देखील चर्चा आहे राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर आता विद्यमान नासुप्र सभापतींची बदली होऊन त्या ठिकाणी माजी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना पदारुढ केले जाणार आहे!

नासुप्रने ग्लोकल मॉलचा सुधारित नकाशा रद्द करुन प्रकल्पाच्या मालकाला नोटीस बजावली असतानाही बेधडकपणे बांधकाम सुरु आहे.याची ही दखल सीताबर्डी पोलिस ठाण्याने घ्यावी व सर्व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे.त्यासोबतच राजकीय नेता,बिल्डर व पोलिस विभागाच्या अभद्र युतीतून एका कष्टकरी तरुणाचा मृत्यू होत असेल मात्र ,नागपूरातील माध्यमे फक्त तीन ओळींचे दुर्घटनेचे वृत्त छापून स्वनाम धन्यता मानून घेत असतील ,तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवून घेण्याचा अधिकार तरी त्यांना उरतो का?असा सवाल विचारला जात आहे.

हे पण वाचा….

गाेयल-गंगाच्या प्रकल्पात स्टोअर रुमच्या जागेत ‘शो-रुम’!

Indias first Globel mall with a Local Heart’अशी बिरुदावली मिरविणा-या या ‘ग्लोबल’मॉलच्या एकंदरित कारभाराविषयी किमान ‘लाेकल’ माध्यमांनी एका कष्टकरी तरुणाच्या अकाली मृत्यूला तरी वाचा फोडावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

………………………………………….

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या