

इंदोरा चौकात चालान करणा-या वाहतूक महिला पोलिसाला तरुणाची अश्लील शेरेबाजी!
जनरल स्टोर्समधील दोन महिलांमधील किरकोळ भांडणाला दिले ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या नेत्याने राजकीय स्वरुप
तहसीलदारांकडे तक्रारीसोबतच सोशल मिडीयावर शेकली राजकारणाची पोळी
संदीप नरेश रियाल (पटेल)च्या फेसबूक पेजवर महिला पोलिस कर्मचा-याच्या विरोधात ‘क्रांतीकारक’कमेन्टस:पोलिस स्टेशनचा घेराव,महिला पोलिस कर्मचा-यानी पायावर पडून माफी मागण्याची मागणी
महाराष्ट्र न्यूज २४ व दैनिक युगधर्मने केली एकतर्फी बातमी प्रसिद्ध:महिला पोलिस कर्मचा-याचा प्रतिष्ठेला धक्का: महिला पोलिस कर्मचारी पाठवणार कायदेशीर नोटीस
महिला पोलिस कर्मचा-यानी वरिष्ठांकडे केलेल्या न्यायाच्या मागणीचे निवेदन ‘सत्ताधीश’कडे
नागपूर,ता.९ सप्टेंबर २०२३: पोलिस मुख्यालयात कार्यरत असणा-या महिला पोलिस हेड कान्सटेबल भारती बालकृष्ण मालवीय,ब.नं २७८३ वय वर्ष ४६ यांच्या विरुद्ध सध्या राजकीय पातळीवर,माध्यमात तसेच सोशल मिडीयावर पूर्वग्रह दूषित दृष्टिकोणातून एक वृत्त चालविले जात आहे. आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी एखाद्याच्या प्रतिष्ठेला किती सोयीस्करपणे धक्का लावल्या जाऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण ,राज्याचे उपमुख्यमंत्री व पोलिस खाते त्यांच्या अखत्यारितीत आहे त्या गृह विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर नागपूरात, नुकतेच मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी घडलेल्या एका घटनेचे सांगता येईल.
ड्यूटीवरुन घरी परतत असताना केसांना लावणारे बो आणि क्लचर घेण्यासाठी भारती या गौरी.एन.एक्स इमिटेशन ज्वेलरी,हंसापुरी,टिमकी रोड,या दूकानात दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास गेल्या असता तेथील महिला सेल्स गर्लने काही वस्तू भारती यांना दाखवल्या ज्या भारती यांना पसंद पडल्या नाहीत.यापेक्षा महाग असतील पण चांगल्या असतील तर ते दाखविण्यास भारती यांनी सांगताच ती तरुणी भडकली व भारती यांना चालती हो,पुन्हा दूकानात यायचं नाही,अश्या अवमानकारक शब्दात बोलली.भारतीय संस्कृतीत ‘ग्राहक देव भव:’अशी श्रद्धा जुळलेली असताना एका सेल्स गर्लकडून ग्राहकासोबत अश्या प्रकारची वागणूक मुळीच अपेक्षीत नव्हती,परिणामी भारती यांनी तिला स्वत:ची ओळख सांगितली व दूकानाच्या मालकाला सेल्स गर्लचे वर्तन तसेच भाषेविषयी समज देण्यास सांगितले.
यावर त्या सेल्स गर्लने चिडून दूकानातल्या एका पुरुष कर्मचारी तसेच उपस्थित असणारे आठ दहा पुरुष यांना बोलावून घेतले.आठ ते दहा पुरुषांनी भारती यांचा बाहेर जाण्याचा रस्ता अर्धा तास रोखून धरला.या सर्व शाब्दिक चकमकीत मालकाच्या तरुण मुलाचे आगमन होताच सेल्स गर्ल त्याच्या गळ्यात पडून रडू लागली.
‘तेरी वर्दी देख मै कैसे उतारता हूं और तुझे तेरे पुरे पोलीस डिपार्टमेंट के सामने नंगा नही किया तो देख लेना’अश्या अर्वाच्य भाषेत दूकान मालकाच्या मुलाने वर्दीमध्ये असणा-या एका महिला पोलिस कर्मचा-याला धमकी देण्याचा महापराक्रम केला.या भागातील व्यापारी वर्गाची एकी नागपूरकरांना सर्वविदीत आहे.एकाच्या दूकानात खट्ट झालं की ते संकट आपल्या समुदायावरील समजून सगळेच धावून येतात मात्र,कोणत्याही घटनेला सत्य-असत्याची एक किनार असते,भावनेच्या आहारी जाऊन कोणत्याही महिलेला नग्न करण्याची भाषा बोलणा-याचा साथ देणे, हे कोणत्याही सभ्यतेच्या व नागपूर शहरातील सभ्य समजल्या जाणा-या व्यापारिक समुदायाच्याही चौकटीत न बसणारे आहे.
या घटनेत भारती यांना पकडून ठेवण्यात आले होते.त्या सेल्स गर्लने भारती या वर्दीवर असतानाही त्यांच्या गालावर व चेह-यावर चापटा मारल्या,भारती यांनी तिला ढकलण्याचा प्रयत्न केला.या सर्व झटापटीचा ‘एडिट’केलेला व्हिडीयो सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.दूकानातील एका पुरुष कर्मचा-यानी भारती यांना मारहाण होताना चक्क कमरेपासून पकडून ठेवले होते व दुस-या हाताने मोबाईल रेकॉर्डींग करीत होता.भारती यांच्या वक्षस्थळापर्यंत हात नेत अश्लील चाळे केल्याची तक्रार भारती यांनी तक्रारीत नमूद केली आहे.सीसीटीव्ही फूटेजमध्ये देखील भारती यांचा चेह-याचा भाग दिसत असून त्या तरुणी सोबत झटापट करताना दिसून पडत आहे मात्र तरुणीने भारती यांना केलेली मारहाण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना मोबाईल इतरत्र हलवून रेकॉर्डींगमध्ये न येऊ देण्याची तसदी घेण्यात आली!
हाच व्हिडीयो रितेश बोरकर यांनी त्यांच्या महाराष्ट्र टी.व्ही २४ या यूट्यूब चॅनलवर व्हायरल केला व एकतर्फी बातमी प्रसिद्ध केली.‘युगधर्म’या दैनिकाने देखील एकतर्फी बातमी प्रसिद्ध केली यामुळे भारती यांच्या प्रतिष्ठेला चांगलाच तडा बसला.वास्तवतेत कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणा-या वृत्तामध्ये दोन्ही बाजूची भूमिका मांडणे हे पत्रकारितेचे मूल्य असताना देखील या दोन्ही माध्यमकर्मींनी या मूल्यालाच तिलांजली देत व्यापा-यांची एकतर्फी बाजू उचलून धरली.

या भागातील उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हा समन्वयक संदिप नरेश रियाल(पटेल)यांनी वास्तविक घटनेची कोणतीही तसदी न घेता आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी हा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल केला.इतकंच नव्हे तर शिष्टमंडळ घेऊन तहसिल पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडे भारती यांची तक्रार नोंदवली.भारती यांना वरिष्ठाने बोलावले असता युगधर्मचे प्रतिनिधी आपला कॅमरा गुंडाळत होते…!त्यांना भारती यांची या घटनेबाबत भूमिका समजून घेण्याची गरज वाटली नाही.दूर्देवाने भारती यांच्या त्या वरिष्ठांनी त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली,इतकंच नव्हे तर भारती यांना त्या सेल्स गर्लची माफी मागण्याचे फर्मान सोडले!
माध्यमकर्मींसमोर वरिष्ठांनी अशी भूमिका घेतली असती तर समजून घेता आली असती, ही त्यांची अपरिहार्यता असती मात्र, कोणीही कक्षात उपस्थित नसताना आपल्याच पोलिस खात्यातील ज्या महिला कर्मचा-याला दोन दिवसात वर्दी उतरवून संपूर्ण पोलिस डिपार्टमेंट समोर नग्न करण्याची धमकी देण्यात आली,त्या महिला कर्मचा-याला ‘अर्थपूर्ण’व्यवहारातून एका सेल्स गर्लची माफी मागण्याचे फर्मान सोडण्यात आल्याने, परिणामी भारती या कोलमडून पडल्या.संपूर्ण रात्र त्यांनी अपमानाच्या व हताशाच्या अंगारलेल्या ज्वालेत जळत काढली.शेवटी त्यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागल्या!
‘
युगधर्म’ने भारती यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे वृत्त प्रसिद्ध केले.हे वृत्त प्रसिद्ध करताना त्यांनी भारती यांचे कोणतेही वैद्यकीय कागदपत्रे बघितले नाहीत!
भारतीय समाजात कोणत्याही महिलेला परिवार पद आणि प्रतिष्ठा प्राप्त करायला एक तप झिजावं लागतं.पोलिस खात्यातही सहजासहजी नोकरी मिळत नाही.भारती यांचे पती शिक्षक असून मुलगा सिव्हिल इंजिनिअर तर मुलगी रशियात आहे.भारती यांच्या माहेर व सासरकडील मंडळी ही उच्च विद्याभूषित आहे.अश्यावेळी युवासेनेच्या नेत्याने त्यांच्याविरुद्ध सोशल मिडीयावर जी पोस्ट टाकली व ज्यावर अतिशय अंगार पेटवणारे कमेंन्टस येत आहे ते वाचून भारती यांच्या दोन्ही उच्च विद्याभूषित अपत्यांना काय वाटत असेल?याचा कोणताही विचार आपली राजकीय पोळी शेकणा-या संदीप रियाल पटेल यांनी केला नाही.
दोन दिवस पराकोटीच्या मानसिक धक्क्यानंतर सावरलेल्या भारतीने अखेर पोलिस आयुक्तांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला असता ते सुटीवर आहेत तर ज्वाईंट पोलिस आयुक्त अश्विनी दोरजे या जन्माष्टमीच्या बंदोबस्तात व्यस्त होत्या.
अखेर आपली तक्रार त्यांच्या रिडर यांना देऊन भारती कर्तव्यावर परतल्या.‘सत्ताधीश’कडे त्यांनी दिलेल्या तक्राराची प्रत असून त्यात सेल्स गर्लने ’तुझ्यासारख्या खूप पोलिसवाल्यांना बघितले,तुझ्या सारखे पोलिस हे फक्त लोकांना लृटत असतात,संरक्षणाचे काम सोडून तुमचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी लुटमारीचा धंदा करतात,तुझ्यासारखे लेडीज पोलिस वरिष्ठ अधिका-यांसोबत….!’इतक्या खालच्या स्तराची भाषा वापरली.
एका दूकानातील दोन महिलांमधील साधारणशी झटापट काही तथाकथित राजकीय नेते व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या रक्षणाचा आव आणनारे पत्रकार, हे एखाद्या महिलेच्या आत्मसन्मानाच्या व आयुष्यभर जपलेल्या प्रतिष्ठेच्या कश्याप्रकारे क्षणार्धात चिंधड्या उडवू शकतात याची ही घटना ‘दूर्देवी’ उदाहरण म्हणून सांगता येईल.महिला पोलिसाला ‘गिडगिडाकर पैरो पे पडकर माफी मांगेगी वाे पोलिसवाली नही तो पोलिस आयुक्त का घेराव करेंगे’यासारख्या चिथावणीखोर भाषेचा उपयोग मोठ्या प्रमाणात पटेल यांच्या पोस्टवर झाला असून ती पोलिसवाली कोणाची तरी पत्नी आहे,दोन मुलांची आई आहे,ती सासर व माहेर नावाच्या सामाजिक घटकांची प्रतिष्ठा आहे,समाजाचा एक सन्मानित घटक आहे याचा कोणताही विचार अविचारी माध्यमकर्मी व त्या युवा नेत्याने या घटनेला प्रसिद्धी देताना केला नाही,त्यामुळे ते तितकेच दोषी ठरतात,याच दुमत नाही.
परिणामी, भारती यांनी दिलेल्या तक्रारीत रितेश बोरकर यांच्यासह सेल्स गर्ल,दूकानातील कर्मचारी,दूकान मालकाचा तरुण मुलगा व आठ ते दहा पुरुष व्यापारी ज्यांनी त्यांचा बाहेर जाण्याचा मार्ग अवरुद्ध करुन ठेवला यांचा उल्लेख केला असून लवकरच दोन्ही माध्यकर्मी व तरुण युवा नेत्यालाही मानहानि केल्याची कायदेशीर नोटीस जारी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘सत्ताधीश’ने ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किशोर कुमेरिया यांना युवा संघटनेच्या नेत्याच्या कृत्याविषयी विचारले असता,तहसील पोलिस ठाण्यात सर्व प्रतिवाद्यांना बोलावून मार्ग काढण्याचा प्रयत्न करु,असे त्यांनी सांगितले.भारती यांना तहसील पोलिस ठाण्यात बोलावले असता त्या निघून गेल्या होत्या अशी माहिती आमचा युवा नेता सांगत असल्याचेही किशोर कुमारिया म्हणाले.यावर माझ्या ड्यूटीची वेळ झाल्याने मी निघून आले असल्याचे भारती यांनी कुमेरिया यांना सांगितल्याची माहिती आहे.

मणिपूरची दाहक घटना अद्याप देशवासियांच्या स्मृतिपटलावर कोरलेली असताना राज्यातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात एखाद्या महिला पोलिसाला एक दूकानदार तरुण ‘तेरी वर्दी देख मै कैसे उतारता हूं और तुझे तेरे पुरे पोलीस डिपार्टमेंट के सामने नंगा नही किया तो देख लेना’अशी उघडपणे धमकी देतो,ही निश्चितच पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब नाही.
नुकतेच इंदाेरा चौकात कर्तव्यावर असणा-या एका वाहतूक महिला पोलिससोबत सिग्नल तोडणा-या २५-२६ वर्षीय तरुणाचे त्या चालान कापत असताना तिच्या स्त्रीत्वाला घेऊन अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ केल्याची धक्कादायक व तितकीच शर्मनाक घटना घडली मात्र,त्या महिला पोलिसाने एका शब्दाने त्या तरुणाला विरोध केला नाही कारण वरिष्ठांपर्यंत ही बाब गेल्यानंतरही महिला म्हणून तिचा आत्मसन्मान वरिष्ठांकडून जपला जाईल याची कोणतीही शाश्वती नसल्यानेच कदाचित, तो अपमान मूग गिळून त्या महिला पोलिसाने सहन केला.गृहमंत्र्यांनी याची ही तसदी घेणे गरजेचे आहे.
आज पोलिस विभागात चांगल्या कुटूंबातील महिला नोकरीवर आहेत.त्यांच्याही कुटूंबाला एक प्रतिष्ठा असते.पोलिस विभागात कार्यरत आहेत याचा अर्थ त्या भ्रष्ट आहेत किवा त्यांना चारित्र्य,प्रतिष्ठा नाही असा सरसकट आरोप करता येत नाही.गृहमंत्र्यांच्या शहरात एका महिला पोलिस कर्मचा-याला नग्न करण्याची भाषा उच्चारणा-या त्या दूकानदाराच्या तरुण मुलाला व सिग्नलवर ज्योत्सना नावाच्या महिला पोलिस कर्मचा-याशी अश्लील भाषेत शिवीगाळ करुन पळून जाणा-या त्या तरुणाचा शोध घेऊन योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे अशी मागणी खासगीत अनेक महिला पोलिस करीत आहेत.

या महिला पोलिसाने त्या सेल्स गर्लला मारहाण केली असती तर त्यांच्याविरुद्ध रितसर तक्रार नोंदवता आली असती,कायद्याला आपले काम करु द्यायला हवे होते मात्र ‘प्रसिद्धीजीवींनी’फक्त आपल्या टीआरपीसाठी एक महिला पोलिसाच्या प्रतिष्ठेला कायमचा तडा पोहोचवला.रात्रीची अस्वस्थता आणि अश्रूंनी भरलेले अभ्रे तिच्या वाट्याला आणले.चार दिवसांपासून त्या झोपल्या नाही आहे.त्यांच्या नोकरीवर येऊ पाहणारी गदा आणि प्रसिद्धीजीवींच्या अमानवीय कृत्यांचा अट्टहास याची वेदना संवेदनशील असणारे मनच समजू शकतं.
गृहमंत्री यांनी त्यांच्याच अखत्यारितीत असणा-या पोलिस खात्याविषयी आता तरी संवेदनशील व्हावे, याची ही चर्चा पोलिस खात्यात ऐकू येते.मराठा आरक्षणाचा वाद जालनात उफाळला आणि आंदोलनकर्ते आक्रमक झाले असताना वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार पोलिसांनी लाठीमार केला व अश्रूधारा सोडल्या.या घटनेत अनेक महिला कर्मचारी यांना दगडफेकीतून गंभीर जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात भर्ती करावे लागले.त्यांच्या कुटूंबाच्या पायाखालील वाळू यामुळे सरकली मात्र गृहमंत्र्यांनी पोलिसांचीच चौकशी करण्याचे आदेश काढले!या काळात वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी रुग्णालयात जाऊन महिला पोलिस कर्मचा-यांची भेट घेतली मात्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी कर्तव्यावर असणा-या व गंभीर जखमी झालेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची साधी चौकशी देखील केली नसल्याची खंत खासगीत व्यक्त होत आहे.
नुकतेच मेरठ-सुलतानपूर रेल्वे प्रवासात एक महिला पोलिस कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात आढळली.न्यायालयाने सज्ञान घेऊन यावर तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. ६ जणांनी तिच्यावर बलात्कार करुन तिच्या गालांचा चावा घेत संपूर्ण देह रक्तबंबाळ केल्याची चर्चा खासगीत होत आहे.अंगावर वर्दी असली व कायद्याचे कवच असले तरी स्त्री म्हणून ती कश्याप्रकारच्या वर्तनाला व मानसिक क्रोर्याला समोर जात असते,याचे हे आणखी एक ज्वलंत उदाहरण….. !
…………….




आमचे चॅनल subscribe करा
