फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमगाेयल-गंगाच्या अवैध बांधकामावर सभापतींचा दणका

गाेयल-गंगाच्या अवैध बांधकामावर सभापतींचा दणका

Advertisements

सुनावणीसाठी पाचारण:बुटी-बिल्डर येणार अडचणीत?

सभापतींच्या भूमिकेकडे नागपूरकरांचे लक्ष

नागपूर,ता.२५ ऑक्टोबर: जवळपास एकोणीस वर्षांपूर्वी २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नागपूरातील बुटी चाळीसंदर्भात वादी-प्रतिवादींमध्ये आपसी समझौता झाल्यामुळे याचिका निकाली काढताना,भविष्यात या जागेसंबधी पुन्हा कोणताही वाद निर्माण झाल्यास नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींना ‘मध्यस्थी‘करण्याचे निर्देश दिले होते.गेल्या दोन दशकांपासून या प्रकल्पाविषयी अनेक वाद निर्माण झाल्यानंतर देखील कोणत्याही सभापतींनी मध्यस्थीसाठी पुढाकार घेतलाच नाही मात्र विद्यमान नासुप्र सभापतींनी आता गोयल-गंगाच्या बिल्डरतर्फे अनुप खंडेलवाल तसेच बुटी चाळीत राहणारे निवडक दूकानदार व भाडेकरु यांना बुधवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीसाठी बोलावले असून गाेयल-गंगाच्या अवैद्य बांधकामाविषयी ते कोणती भूमिका घेणार?याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

सीताबर्डीतील हा ग्लोकल मॉल प्रकल्प उभारतानाच अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका स्वत: नासुप्रनेेेच ठेवला आहे.नियमांची पूर्तता करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देखील देत नासुप्रने भोगवटा प्रमाणपत्र देण्यास गोयल-गंगा इन्फ्रास्टक्चर कंपनीला नकार दिला आहे.सीताबर्डीत खसरा क्रमांक ३२०,३१५ येथे ग्लोकल मॉल उभारला जात आहे.बेसमेंटमध्ये परवागगी नसतानाही स्टोअर रुम साकारण्यात आले आहे.अग्निशमन विभागाकडून इमारत उंचीबाबत देण्यात आलेल्या सूचनांचेही पालन झाले नाही उलट अग्निशमन विभागात वेळोवेळी वेगवेगळे नकाशे सादर करण्यात आले व त्या आधारावर परवागनी मागण्यात आली.

दूकानदारांसोबत झालेल्या कराराचेही सर्रास उल्लंघन बिल्डरने केले.जवळपास चार पिढ्यांपासून बुटींचे भाडेकरु म्हणून राहत असलेल्या अनेक दूकानदार व भाडेकरुंना बिल्डरने गुंडांकरवी जबरीने हूसकावून लावले असून या विरोधात अनेक दूकानदार व भाडेकरुंनी न्यायालयात दाद मागितली आहे.

योग्य प्रकाश योजनेसाठी खालच्या आणि वरच्या बेसमेंटमध्ये व्हेंटीलेशनची व्यवस्थाही बिल्डरने केली नाही.रेन वॉटर हार्वेस्टिंगला ही चक्क हरताळ फासण्यात आला,लिफ्ट बसवण्याचे प्रमाणपत्र देखील बिल्डरने सादर केले नाही,करारात नमूद केल्याप्रमाणे ३७७ झाडे बिल्डरने एवढी दशके उलटून देखील लावलीच नाही,एवढंच नव्हे तर ३७७ तर सोडा,एका वृक्षारोपणाची देखील जागा बिल्डरने या प्रकल्पात शिल्लक ठेवली नाही.

अग्निशमन विभागाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रानुसार इमारतीची उंची २२.५ मीटर असताना इमारतीची उंची २५ मीटरपर्यंत बिल्डरने कोणत्याही परवानगीशिवाय वाढवली.२००२ मध्ये जागेचे मूळ मालक बुटी,नासुप्र व भाडेकरु यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा या प्रकल्पात फक्त दोन मजले निर्माण होणार होते,हे विशेष

अनायास २००६ मध्ये गाेयल-गंगाची एंट्री या प्रकल्पात झाली व आज २०२१ मध्ये हा प्रकल्प बघता-बघता कोणत्याही कायदेशीर परवानगींशिवाय ६ ते ७ मजल्यांपर्यंत पोहोचला. या प्रकल्पाला लागणारी वीज,पाणी,सब-स्टेशनसाठी लागणारी जागा जी आता उपलब्धच नाही,या सर्वच बाबींमध्ये बिल्डरने सर्व कायदेशरी अटी व शर्थींना हरताळ फासल्यामुळेच नासुप्रने भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.

रेरा एक्ट कलम-१४ प्रमाणे विकलेल्या जागेचा नकाशा बदलायचा असल्यास पुन्हा ज्यांना जागा विकलेल्या आहेत त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र बिल्डरला घ्यावे लागते.गोयल-गंगाच्या बिल्डरने तर अनेकदा नकाशात बदल करुन अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र प्राप्त केले,याचा अर्थ या प्रकल्पात ‘रेरा’चे देखील सर्रास उल्लंघन झाले आहे.

याशिवाय वारंवार प्रकल्पासाठी बिल्डरने मुदतवाढ घेतली.कराराप्रमाणे १६ कोटींचे भू-भाटक देखील अद्याप बिल्डरने भरले नाहीत.
२०१२ साली ज्या ‘अमानवीय‘पद्धतीने या ठिकाणच्या ५९ भाडेकरु व दूकानदारांना बिल्डरच्या गुंडांनी नेसत्या वस्त्रानिशी हूसकावून लावले ते बघता आता नासुप्र सभापती परवाच्या बैठकीत कोणता निर्णय घेतात,याकडे या भाडेकरुंचे देखील लक्ष लागले आहे.हा प्रकल्प नागपूरात जेव्हा सुरु झाला तेव्हा ‘बाकायदा’पत्र परिषद घेेेेेेेेऊन या प्रकल्पात ९ मजले व २ हजार दूकान रहाणार असून यामुळे नागपूरचा ‘विकास’व राेजगारामध्ये वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला होता.प्रत्यक्षात मात्र चार पिढ्यांपासून व्यवसाय करणा-या दूकानदार व भाडेकरुंनाच गुंडांकरवी हूसकावण्यात आले.एवढंच नव्हे तर हॅरिटेजमध्ये मोडणार्या बावळी विहीरीवर अतिक्रमण करीत हॅरिटेज असणा-या रिगल टॉकिजचे प्रवेशद्वारच भुईसपाट केले!

बिल्डरच्या या धाकदपटशाहीच्या विरोधात बुटी चाळीतील सर्व भाडेकरु व दूकानदारांनी ‘किरायदार संघा‘ची स्थापना केली होती मात्र यातील अनेक भाडेकरुंनी बिल्डरने देऊ केलेल्या फक्त २ लाख ते १५ लाखांची रक्कम स्वीकारुन जागेचा ताबा सोडला.ज्या ५ ते ६ भाडेकरुंना प्रकल्पात न्याय वाटा मिळाला नाही त्यांनी न्यायालयात दाद मागितली.त्यातीलच काही भाडेकरुंना नासुप्र सभापतींनी परवा बुधवारी सुनावणीसाठी बोलावले असल्याचे पत्र ‘सत्ताधीश’ला प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे या पत्रामध्ये मूळ मालक असणारे बुटी यांचा नामोल्लेखच नाही!उलट सर्वोच्च न्यायालयात जाणारे बुटी,नासूप्र व भाडेकरु हे तीनच पक्ष होते,यात बिल्डरची एंट्रीच त्यावेळी नसताना सभापतींनी मध्यस्थी करताना बिल्डरच्यावतीने खंडेलवाल यांना का पाचारण केले?याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

बुटी हे ७ भाऊ आहेत मात्र यापैकी ४ भावांचा गाेयल-गंगाला या प्रकल्पाचे कामकाज देण्यास विरोध होता,परिणामी सभापतींपुढे हा देखील पेच असावा त्यांनी सुनावणीसाठी बुटींपैकी नेमके कोणाला बाेलवावे?

आता सभापतींनी बिल्डर व दूकानदार,भाडेकरु यांना बोलावलेच आहे तर या सुनावणीत ते कोणती ‘न्याय’भूमिका घेतात?सर्वस्वी अवैध असणारी ग्लोकल मॉलची इमारत पाडण्याचा निर्णय ते घेतील का?पत्रामध्ये बुटींचे नाव का नाही?ही बैठक कशी पार पडणार?कोणता निर्णय होणार?याकडे आता दूकानदार,भाडेकरु तसेच नागपूरकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी यांना मिळाली नासुप्रची नोटीस-
१) गोविंदलाल मोहता(गणगौर रेस्टॉरेंट)
२)अंकित प्रसन्ना मोदी(सम्राट गारमेन्ट्स,मेन रोड)
३)सुनिल अंभोरे
४)मालसी माला
५)अनुप खंडेलवाल(कार्यकारी संचालक,ग्लोकल मॉल,सिताबर्डी)

(छायाचित्र-हॅरिटेज असणारी बुटी बावडी,ग्लोकल मॉलच्या अतिक्रमणामुळे आता नामशेष झाली आहे)

(छायाचित्र-हॅरिटेज असणारा रिगल टॉकिजचा प्रवेश द्वार,शोधूनही हे अस्सल नागपूरी वैभव नागपूरकरांना सापडणार नाही,कधीचेच झाले भुईसपाट)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या