

लॉक डाऊनमुळे आले नैराश्य:मला मरु द्या प्रवीणचा अट्टहास
आत्महत्येची मालिका होणार सुरु! जवाबदार कोण?कलाकार संघटनांचा प्रश्न
तरुण नृत्यांगनाने लावला गळफास
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १३ मार्च: पालकमंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी अचानक १५ ते २१ मार्चपर्यंत नागपूरात कडक लॉक डाऊन घोषित केला त्यामुळे हातावर पोट असणा-या अनेक कलावंतांची घाेर निराशा झाली.तब्बल एक वर्षापासून गरीब,गरजू कलावंतांचा कोणताही विचार न करता सांस्कृतिक कार्यक्रमांवर शासनाने सरसकट बंदी घातली आहे त्यामुळे शहरातील अनेक कलावंतांच्या घरातील आर्थिक परिस्थिती हलाकीची बिघडली .प्रवीण मून या युवा गायक कलावंताने आज शनिवार दि. १३ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला!
कलाकारांना याची माहिती मिळताच अनेक कलावंतांनी पारडी येथील त्याच्या राहत्या घराकडे धाव घेतली. प्रवीण यांना आधी एका खासगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले यानंतर त्याला मेडीकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
नस कापून रक्तामध्ये पडलेल्या प्रवीणच्या तोंडी एकच वाक्य आहे ‘मला मरायचे आहे,मला मरु द्या’एवढे नैराश्य त्याच्या मनात दाटले आहे.नुकतेच नोव्हेंबरपासून ५० श्रोत्यांच्या उपस्थितीत माय-बाप सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली होती,यानंतर शहरातील गरीब,गरजू व हातावर पोट असणा-या कलावंतांची रोजी रोटीची गाडी जरा कुठे रुळावर येत असतानाच पुन्हा मार्चच्या पहील्याच आठवड्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणण्यात आली,सभागृह बंद ठेवण्यात आले.
याचा खोलवर परिणाम अनेक कलावंतांच्या मनावर झाला,एवढंच नव्हे तर शनिवार,रविवार शहर,मार्केट बंद असतानाच आता पालकमंत्री नितीन राऊत यांनी करोनाचा वाढत्या प्रादुर्भावासाठी नागरिकांना जवाबदार धरुन १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉक डाऊनची घोषणा केली.
दूसरीकडे पोलिस आयुक्त अमितेश कूमार यांनी देखील शहरात फिरणा-यांवर कडक कारवाई करण्याचा व कारागृहात डांबण्याचा इशारा दिला.यामुळे घराबाहेर पडून दोन वेळेच्या जेवणाची सोय कशी करायची?हा प्रश्न प्रवीण याला पडला.त्याच्या घरी पत्नी आणि ९ वर्षाची चिमुकली आहे.प्रवीणने हे असे आत्मविघातक पाऊल उचलताच त्याची पत्नी दू:खाने कोसळून पडली.
तिचा आक्रंद माय बाप शासनाच्या कानी पडणार नाही कारण हे सरकार गेंड्याच्या कातडाचे असल्याचा संताप कलाकार जगतात उमटला आहे.
एवढंच नव्हे तर पालकमंत्री यांनी आपल्या मूलाचा कूणाल याचा शुभ-विवाह केला तेव्हा शहरात करोना नव्हता का?असा संताप व्यक्त केला जात आहे.पालकमंत्री यांनी जाणून बूजून आपल्या मुलाचा विवाह आधी होऊ दिला.मात्र स्नेहभोजन हे फक्त दाखवण्यासाठी रद्द केलं,तत्पूर्वी नवदाम्पत्याला ५ मार्च रोजी मॉरिशसमधून परत येऊ दिले,असा संताप अनेक व्हॉट्स ॲप ग्रूपवर आता व्हायरल होत आहे.
प्रवीण याच्या या नैराश्याला करोना नव्हे तर केवळ पालकमंत्री,प्रशासन आणि पोलीस अायुक्त जवाबदार असल्याचे सांगितले जात आहे.पोलीसांना सामान्य जनतेवर फक्त दंडूका चालविण्याची ईच्छा असते का?आम्ही चोर,दरोडेखारे,गुन्हेगार आहोत का?घरा बाहेर पडायचे नाही तर मूलाबाळांना काय खाऊ घालायचे?असा पराकोटीचा संताप शहरातील कलाकार व्यक्त करीत आहे.
आता तरी पालकमंत्री यांचे डोळे उघडतील का?किती कलावंतांच्या आत्महत्या झाल्यावर करोना महामारी संपणार आहे?सभागृह सुरु होणार आहे?कार्यक्रमांना परवानगी मिळणार आहे?एकदाच काय ते पालकमंत्र्यांनी सांगून द्यावे,आम्ही सर्व उपोषणाला बसून जीव देतो,आमच्या मरणानंतर मग करा लॉक डाऊन उघडे ,असे कलावंत सांगत आहे.
गडकरी यांच्या दारात घालवले अडीच तास!
कलाकरांच्या जगण्या मरणाचा प्रश्न घेऊन कलावंतांच्या संघटनेतील सदस्य हे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आज दूपारी निवेदन घेऊन गेले असता,तब्बल अडीच तास गडकरी यांच्या दारावर बसून हे कलावंत निराश परतले,त्यांना उद्या दूपारी १ वाजता चा वेळ देण्यात आला आहे.जिथे शहारातील अनेक कलावंताना एक-एक दिवस हा मृत्यूच्या दारात ढकळत आहे तिथे आपल्याच शहारातील केंद्रिय मंत्र्यांजवळ दहा मिनिटे कलाकारांची व्यथा ऐकायला मिळत नाही,असा देखील ‘सूर’व्हाट्स ॲप ग्रूपमध्ये उमटला.
लॉक डाऊनचा निर्णय तात्काळ प्रभावाने गडकरी यांनी पुढकार घेऊन रद्द करावा अशी या संघटनेची मागणी आहे.सभागृह सुरु करुन कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी,अन्यथा प्रत्येक कलाकाराच्या घरात महिन्या भराची शिधा पोहोचविण्याची जवाबदारी शासनाने उचलावी अशी या कलाकारांची मागणी आहे.
आम्ही भिकारी नाही,आम्ही कलावंत आहोत,आम्हाला सन्मानाने जगू द्या,आम्ही करोनाने मरायला तयार आहोत मात्र उपाशी मारु नका,अशी आर्त साद आता या शहरातील कलावंत माय बाप सरकारला घालत आहे.गेले संपूर्ण वर्षभर लॉक डाऊन पाळले,गेला का करोना?हा करोना कधी संपणार आहे?आम्ही संपल्यावर?
लस आली ना आता,मग का जगू देत नाही?एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबूक लाईव्हवर सांगतात ‘करोनासोबत जगायला शिका’दूसरीकडे आम्हाला घरात बसवून मरणाची यातना देत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.आम्ही कराेनासोबत जगायला मानसिकरित्या तयार झालो होतो तरीही का ही लॉक डाऊनची हूकूमशाही?असे संतापाचे ‘सूर’शहरातील कला जगतात उमटले आहे.
प्रवीण हा अतिशय गुणी गायक असून भीमगीतांचे अनेक कार्यक्रम तो करीत असतो.गेल्या १८ वर्षांपासून प्रवीण याने गायकीच्या क्ष्ेत्रात आपले एक नाव कमावले आहे,आज त्याचे ‘सूर’ मात्र रुसले ,निराश झाले ,या वेड्या गायकाने ’रुक जाना नही तू कही हार के…कांटो पे चलके मिलेंगे साये बहार के..ओ राही ओ राही..’हे गाता गाता त्याचे सूरच आज पूर्णत:बहकले.
आपल्या तरुण पत्नीचा,चिमूकलीचा विचार न करता तो त्याने या जगातून ‘एक्झीट’घेण्याचा प्रयत्न केला आणि…संपूर्ण कला जगत हे थक्क झालं.
नागपूरातील ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीचे कलाकार यांनी प्रवीण याने हे आत्मविघातक पाऊल उचलताच त्याच्या घराकडे धाव घेतली.अद्यापही हे सदस्य रुग्णालयात असून संपूर्णत:त्याच्या पाठीशी उभे आहेत.

पारडी येथे आणखी एका नृत्यांगनाची आत्महत्या!
प्रवीण याच्या उपचारामध्ये व्यग्र असतानाच ऑस्करच्या कलावंतांना आणखी एक दू:खद बातमी मिळाली,पारडी याच भागात राहणा-या एका नृत्यांगनाने गळ्याभोवती फास लावून रात्री ९ वाजता आत्महत्या केली!
१५ ते २१ मार्च हा पालकमंत्र्यांसाठी फक्त करोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी एकमेव आणि प्रभावी उपाय वाटत असला तरी १५ ते २१ मार्च दरम्यान या शहरातील आणखी किती प्रवीण हे ऐन उमेदीच्या काळात जग सोडून निघून गेले असतील,त्यामुळे माणसे वाचविण्यासाठी नव्हे तर पालकमंत्र्यांनी माणसे मारण्यासाठी लॉक डाऊन लावला आहे का?असा संताप शहरातील नृत्यांगना व्यक्त करीत आहेत!
या नृत्यांगनाचे माहेरचं नाव कीर्ती झिलपे असून सासरचे आडनाव कीर्ती गायकवाड असे आहे, वय वर्ष फक्त २५,पारडी नवीन नगर मधील शक्ती नगर येथे राहणारी ही तरुणी अनेक कार्यक्रमात नृत्य सादर करुन उदरनिर्वाह करीत होती. मात्र गेल्या वर्षापासून लागलेले लॉक डाऊन यामुळे तिला ही पराकोटीच्या नैराश्याने घेरलं आणि आज तिची कला तिच्या शरीरासोबतच मृत होऊन मेयोच्या शवागारमध्ये पांढ-या कपड्या गुंडाळून पडली आहे….!
शहरातील आणखी एक कलाकार धमकी देत आहे मी उद्या आपल्या डोक्यावर डिझेल घेईल,अशीच धमकी आता शहरातील अनेक कलावंत देत आहेत….याला जवाबदार कोण?




आमचे चॅनल subscribe करा
