
स्वच्छतेसाठी अजित पवार गट आक्रमक
ढोल वाजवत,पदयात्रा काढून केली स्वचछता
नागपूर,ता.२ फेब्रुवरी २०२४:मागील दोन वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक नाहीत,संपूर्ण महानगरपालिकेचा कार्यभार मनपाचे प्रशासकच करीत आहेत.याच प्रशासकांनी एजी.एनव्हायरो तसेच बीव्हीजी कंपनीला शहरातील दहा ही झोनमधील कचरा संकलनाचे कोट्यावधीचे कंत्राट देऊन ठेवले आहे मात्र,नागपूर शहरात सर्वदूर घाणीचे साम्राज्यच दिसून पडतंय.या कच-यामुळे रोगराई वाढत आहे.नागरिक हवालदिल झाले आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ‘स्वच्छ भारताची’हाक दिली आहे.त्यांची साद ऐकूनच आम्ही मध्य नागपूरात स्वच्छता मोहीम हातात घेतली असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष व मुख्य प्रवक्ते प्रशांत पवार यांनी माध्यमांना सांगितले.
आम्ही आता गांधी बाग झोनचे सहाय्यक आयुक्तांच्या हातातच झाडू देणार असून, जोपर्यंत मध्य नागपूरातील घाण स्वच्छ होणार नाही तोपर्यंत मनपावर आमचा मोर्चा चालू राहणार असल्याचा इशारा प्रशांत पवार यांनी दिला. आज शुक्रवारी अचानक आक्रमक पवित्रा घेत थेट मध्य नागपूरातील स्वच्छतेवरुन महानगरपालिका प्रशासनाला त्यांनी घेरले.शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली महालातील गांधी गेट ते गांधी बाग झोन कार्यालयातपर्यंत ढोल वाजवत,पदयात्रा काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मध्य नागपूरात दाट वसाहती व बाजारपेठा आहेत.मात्र,महानगरपालिकेतर्फे कचरा उचलण्यासाठी कोणतीही तसदी घेतली जात नाही.शाळा,रुग्णालये,बाजारपेठ,वसतीगृहाच्या परिसरातील कचरा उचलला जात नाही.सर्व प्रभागातील स्थिती अशीच दयनीय आहे.मध्य नागपूरात गांधी बाग झोनच्या अधिकारी व कर्मचा-यांनी तातडीने स्वच्छता अभियान सुरु न केल्यास, संपूर्ण क्षेत्रातील कचरा उचलून गांधीबाग झोन कार्यालया समोर टाकण्यात येईल असा इशारा प्रशांत पवार यांनी सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांना दिला.
स्वच्छतेनंतर छायाचित्र काढण्यापूर्वी संबंधित कर्मचा-यांवर कारवाई करावी,स्वच्छता अभियानाबाबत जनजागरण करावे.यात पक्षाकडू सहकार्य करण्यात येईल,अशी ग्वाही पवार यांनी दिली.नागरिकांना आजारांचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी प्रभाग-१८ मधील परिसरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व महानगरपालिकेच्या वतीने संयुक्तपणे स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याचे गणेश राठोड यांनी स्पष्ट केले.
आंदोलनामध्ये उपाध्यक्ष गौस मोमिन,पश्चिमचे अध्यक्ष योगेश ठाकरे,मोंटी गोंडेचा,राजू मिश्रा,मनोज जरेल,राजेंद्र भोतमांगे,दीपक चिकाने,शुभम देवतळे,मिलिंद महादेवकर,शुभम नरेशराज,मोहन तिसोबे,देवाराम जरे,इरखान खान आदी सहभागी झाले होते.




आमचे चॅनल subscribe करा
