काय म्हणतात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी?
नागपूर,ता.२२ जानेवरी २०२३: कुख्यात मुन्ना यादव यांची दोन्ही मुले करण आणि अर्जूनकडून मागील गुरुवारी दि.१९ जानेवरी रोजी छत्रपती नगरच्या मैदानात खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित क्रिकेटच्या स्पर्धे दरम्यान गाेंधळ घालून स्कोरअररला मारहाण करण्याची घटना घडली.अमित होशिंग नावाच्या या स्कोरअररला काहीही कारण नसताना मुन्ना यादवच्या मुलांनी एका थ्रो बॉलच्या संदर्भात वाद घालून बॅटने मारहाण केली,या घटनेचा व्हिडीयो माध्यमांमध्येही चांगलाच व्हायरल झाला.खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने काल शनिवारी, ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालयात क्रीडा महोत्सव समितीतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस‘मध्ये केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांसोबत या क्रीडा महोत्सवानिमित्त संवाद साधला.
याप्रसंगी छत्रपती नगर मैदानात घडलेल्या या घटनेविषयी गडकरी यांचे मत जाणून घेतले असता व नागपूरच्या नावलौकिकात भर घालणा-या अश्या भव्य व अभिमानास्पद खासदार क्रीडा महोत्सवाला, काळीमा फासणा-या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या स्पर्धकांवर बंदी घालण्या संदर्भात प्रश्न विचारला असता,नेमक्या या मताशी मी सहमत नसल्याचे गडकरी म्हणाले.
अशा घटना व्हायला नको,त्या होणार नाही अशी आम्ही काळजी घेऊ,मी तुमच्या या मताशी सहमत नाही की गुन्हेगारांना थांबवा.मी माझ्या आयुष्यात अनेक विख्यात गुन्हेगारांना सज्जन माणसं बनवलं.माणूस हा मूळात वाईट नसतो,परिस्थिती त्याला वाईट करत असते,असे ते म्हणाले.
चांगला माणूस वाईट वातावरणात वाईट होतो आणि वाईट माणूस चांगल्या वातावरणात चांगला होतो.सगळ्यांना चांगलं करणं,सुधरवणं,त्यांचं व्यक्तिमत्व मोठं करणं,स्पोर्टसमन स्पिरिट त्यांच्यात उत्पन्न करणं हेच तर या क्रीडा महोत्सवाचं उद्देश्य आहे,असे त्यांनी सांगितले.
मात्र,त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गुन्हेगारी आचरण होता कामा नये,आपल्या आया-बहीणी,आपल्या मुली स्पर्धेत भाग घेतात,कुठल्याही प्रकारचा त्यांचा अपमान होता कामा नये,सगळ्या शांततेत नियमाप्रमाणे स्पर्धा पार पडायला हवेत,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अश्या घटना गेल्या पाच-सात वर्षात एखादी घटना अशी घडणे दुर्लक्ष्त करण्यासारखी आहे,एखादी घटना असते की तिच्याकडे दुर्लक्ष करायचं तुम्ही न छापून आणि…आमची त्याची काळजी घेऊ,पुन्हा होणार नाही,अशी काळजी घेऊ,असे आश्वासन ही त्यांनी दिले.
चांगलं काम करणा-याला प्रोत्साहन द्या,त्यांना सन्मान द्या,त्यांना प्रसिद्धी द्या आणि वाईट काम करणा-याला दूर्लक्ष्त करा,त्यामुळे आपोआप चांगलं काम करणा-यांची संख्या वाढेल आणि वाईट काम करणा-यांची संख्या कमी होईल,असं ‘लॉजिक‘या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी मांडले.
मूळात मुन्ना यादव हा नागपूर शहरातील कुप्रसिद्ध असा गुन्हेगार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो खंदा समर्थक मानला जातो.अनेक राजकीय मंचावर मुन्ना यादव हा फडणवीस यांच्यासोबत मंचावर उपस्थित असल्याचे छायाचित्रे व चित्रफिते ही चांगलीच व्हायरल झाली आहेत.

(संग्रहीत छायाचित्र: मुन्ना यादव यांच्यासोबत फडणवीसांची खलबते!)
भाजपच्या या ‘खास‘कार्यकर्त्यावर खंडणीसह,विनय भंग,जीवे मारण्याची धमकी,संपत्ती हडपणे इत्यादी सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.मात्र थेट वरिष्ठांपर्यंतची ‘पोच’ असल्याने व त्यांचा वरदहस्त असल्याने हा कुख्यात गुन्हेगार कारागृहाच्या बाहेर बिंदास वावरत असल्याचे नागपूरकर जनतेला माहिती आहे.
अश्या या उपमुख्यमंत्र्यांच्या खंद्या समर्थकाच्या दोन्ही मुलांवर देखील मारहाणीसारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.यातील एक मुलगा उपमुख्यमंत्र्यांच्या दक्षीण-पश्चिम मतदारसंघातील युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे.

(छायाचित्र: मुन्ना यादव यांचे करण आणि अर्जून!)
येत्या २६ जानेवरीला यातील एका मुलाचा विवाह होणार असून त्या पूर्वीच क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या व त्यांच्या समर्थकांद्वारे मारहाणीची ही घटना घडली.परिणामी अमित होशिंग या तरुणावर भाजपच्या वरिष्ठांचा पोलिस ठाण्यात तक्रार न नोंदविण्यासाठी पराकोटीचा दबाब असल्याची बाब समोर आली आहे.मात्र,वैद्यकीय तपासणीनंतर या तरुणाने प्रताप नगर पोलिस ठाण्यात भाजपच्या या ‘दादा’ लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचे धाडस दाखवले.
पिडीत तरुणाला योग्य ती सुरक्षा पुरविण्या ऐवजी भाजपचे वरिष्ठ पातळीवरचे एक पदाधिकारी यांचा या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोण किती बेफिकिर आहे हे देखील समोर आले आहे.
अश्या घटना संपूर्ण क्रीडा महोत्सवादरम्यान अनेक मैदांनावर घडल्या!गरमा गरम वातावरण आणि वाद अनेक मैदानात स्पर्धकांमध्ये घडल्या फक्त त्या माध्यमांपर्यंत पोहोचल्या नाहीत,फक्त ही एक घटना माहिती झाली व तीच घटना आता सर्व माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असल्याची वल्गना त्यांनी केली!
उपमुख्यमंत्र्यांचे उजवे हात समजले जाणारे भाजपचे हे पदाधिकारी यांच्या बोलण्याचा अर्थ, मुन्ना यादव सारखे कुख्यात गुन्हेगाराचे पक्षामध्ये असणे,त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना भाजपसारख्या पक्षात महत्वाच्या पदाची खैरात मिळणे,एखाद्या स्पर्धेतील सामन्यादरम्यान त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांनी पंचाशी केलेले असभ्य वर्तन आणि स्कोअररला बॅटने केलेली मारहाण,अमित होशिंगसारख्या तरुणाच्या स्वाभिमानाला अश्लील शिवीगाळ करुन घायाळ करणा-या कृतीला,या पदाधिका-याच्या मते यात काहीच गंभीर बाब नसल्याचे ध्वनित झाले,अश्या झटापटी तर अनेक स्पर्धांदरम्यान अनेक मैदानांवर घडल्या,एवढ्या थंडपणे आणि तेवढ्याच निर्ढावल्यापणे या पदाधिका-याने पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना हे नग्न सत्य सांगितलं किंबहूना स्वीकारलं.त्यांच्या लेखी या क्षुल्लक घटना आहेत!यावर चर्चा देखील केली जाऊ शकत नाही,प्रसिद्धी देणे तर ‘दूर की बात’ठरते!
परिणामी, पदाधिकारी व सर्वोच्च पातळीवरचे भाजपचे नेतेच जर अश्या जीवघेण्या मारहाणीला,कोणाच्याही आत्मसन्मानाच्या घायाळ करण्याच्या वृत्तीला एवढं थंडपणे प्रतिक्रिया देत असतील तर भाजपसारख्या पक्षातील एका केंद्रिय राज्यमंत्र्यांच्या सुपुत्राने नि:शस्त्र शेतक-यांच्या आंदोलनात घूसून त्यांना जीपखाली चिरडण्याची घटना देखील तितकीच सामान्य भाजपसाठी का असते?याचाही उलगडा होतो.
अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी देखील या घटनेतील वरिष्ठांची ही अशी भूमिका बघता,या वर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवापासून भाजपने आणखी एक नवा पायंडा पाडावा अशी मागणी करीत,या वर्षीपासून भाजपने ‘क्रीडा गुंड’नावाच्या पुरस्काराची घोषणा करावी व या मानचिन्हांवर मुन्ना यादव यांच्या मुलांची छायाचित्रे छापावी,असा खोचक सल्ला दिला.

आमचे चॅनल subscribe करा