
पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीने घेतली पतीला वाचवण्यासाठी धाव
वृद्ध आई वडीलांचा मुलाला वाचवण्यासाठी टाहो
सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
घराजवळील दारुच्या दुकानासमोर मोबाईलवर बाेलणे पडले राजा धार्मिक यांना महाग
एकीकडे ‘राजा‘ दूसरीकडे शासनाचे पाच अधिकारसंपन्न अधिका-यांची दबंगशाही:घोटला लोकशाहचा गळा
पोलिसांनी दिला ‘मध्यस्थी’चा प्रस्ताव:राजा यांचा आरोप
सर्वसामान्यांना जगणे कठीण:पत्रकारांकडे केली व्यथा व्यक्त:न्यायाची मागणी
नागपूर,ता.६ मे २०२३: धापेवाडा हे गांव केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळ गांव म्हणून ओळखले जाते.या गावात महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुखमिणीचे देऊळ विदर्भात प्रसिद्ध आहे.आषाढी व कार्तिकी एकादशीला वैदर्भियांची पावले आत्मशुद्धीसाठी या पतित पावन मंदिराकडे वळत असतात,अश्या या गावात १ मे रोजी म्हणजे, महाराष्ट्र दिनी जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री हाकेच्या अंतरावर नागपूरात ध्वजारोहण करीत होते त्याच दिवशी त्यांच्याच राज्य सरकारचे एकूण पाच आबकारी अधिकारी हे अधिकाराच्या नशेत मगरुर होऊन, एका अतिशय सर्वसामान्य नागरिकाला जाडजूड लाकडी दंडूक्याने झोडपत होते!कारण काय तर ते मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते आणि त्यांचे घर राष्ट्रीय महामार्गावर अगदी देशी दारुचे दूकान आणि बारच्या अगदी शेजारी आहे!
राजा धार्मिक असे या इसमानचे नाव असून , सायंकाळी ते नेहमीच घरासमोर उभे राहूनच मोबाईल वर बोलत असतात.१ मे महाराष्ट्र दिनी मात्र या मराठी माणसावर ‘सरकारी’कहर तुटून पडला.ते ओरडत राहीले माझा दोष काय?मी काय गुन्हा केला?मात्र बुडाखालच्या पदाची गुर्मी या पाचही आबकारी अधिका-यांना इतकी चढली होती, की ते कायदा हातात घेऊन एका निरपराध माणसाला सर्व शक्तीनिशी झोडपत होते,त्याच्या किंचाळण्याचा आसुरी आनंद घेत होते.

राजा यांना क्रूरतेने होणारी मारहाण बघून त्यांचे वयोवृद्ध वडील मध्ये पडले मात्र त्या अधिका-यांनी ‘तुझे वडील फार बोलत आहेत’असे दांभिक बोल मार खाणा-यालाच सुनावले.एकमेव त्या व्हॅनमधला ड्रायव्हर तेवढा बसून होता इतर पाच अधिकारी यांचे हात मात्र राजा यांना बदडण्यासाठी सतत चालत होते.जीवाच्या आकांताने राजा हे सगळीडे धावत सुटले त्यांच्या मागे हे सरकारी जावई हातात दंडूके घेऊन धावत होते.
अखेर पतीला मार खाताना बघणे सहन झाले नसल्याने राजा यांची पाच महिन्याची गर्भवती असणारी पत्नी मध्ये पडली व या मगरुर अधिका-यांना तिने चांगलाच दम दिला.मी गर्भवती आहे आणि तरीही तुम्ही मला जोरात ढकललं.माझ्या किवा माझ्या पतीच्या जीवाला काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही,तुमची पोलिसात तक्रार करील,तिचे गर्भवती असल्याचे शब्द ऐकताच हे यमदूताचे सहकारी तिथून निघून गेलेत.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमरेमध्ये कैद झाली.राजाला यानंतर सावनेरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.त्यांच्या वैद्यकीय अहवालात त्यांना जबर मारहाण झाल्याचे नमूद आहे.पोलिसांची भूमिका या घटनेत सरकारी अधिका-यांना पाठीशी घालण्याची असल्याचा आरोप खास ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना या पिडीत दाम्पत्याने केला.

मारहाणीचे कोणतेही कारण पोलिसांनाही माहिती नाही उलट राजा यांनीच या अधिका-यांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवून टाकू असा दम त्यांना देण्यात आला.एकटा निशस्त्र माणूस, पाच-पाच अधिका-यांना मारहाण करु शकतो यावर देशाचा संविधान तरी विश्वास करु शकेल का?मात्र सरकारी पद बुडाखाली असल्याने आणि आता तर २४ एप्रिल रोजी फडणवीस सरकारनेच अध्यादेश काढून भ्रष्ट सरकारी अधिका-यांवर व कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी बंधनकारक केल्याने, अश्या मगरुर नोकरशाहीच्या कृष्कृत्यांना चांगलेच कायदेशीर संरक्षण मिळाल्याचे बोलल्या जात आहे.
पोलिसांचे काम गुन्हा नोंदवून पिडीताला न्यायाच्या दरवाज्यापर्यंत घेऊन जाण्याचे असतानाही, सावनेर पोलिस ठाण्यातील पोलिसांची भूमिका ही ‘मध्यस्थी‘करणा-याची होती,असा आरोप पिडीत राजाच्या पत्नीने ‘ऑन कॅमरा ’केला.
ज्यांनी अशी मारहाण करुन पदाचा दुरुपयोग केला त्यांना जबर शिक्षा व्हावी.आज माझ्यासोबत घडले ते उद्या इतर कोणासोबतही घडू नये म्हणून न्याय मागायला पत्रकारांकडे आलो असल्याचे राजा म्हणाले.दोषी अधिका-यांना तातडीने निलंबित करण्यात यावे.ते श्रीमंत आहे म्हणून गरिबांचा जीव घेणार का?जर आम्ही त्यांना मारहाण केली असा त्यांचा आरोप असेल तर त्यांनी पुरावा दाखवावा,असे आव्हान करीत, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत म्हणून आम्ही पत्रकारांसमोर आलो असल्याचे त्या म्हणाल्या.

सावनेर पोलिस हे कोणत्या कारणामुळे माझ्या नव-याला कारागृहात टाकतील?त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत?असा प्रश्न त्या विचारतात.मारहाण करणारा आधिकारी हा प्रवीण गाडगे होता, याशिवाय देवेश कोर्ट,ठाकरे, ठाके अशी नावे आम्हाला सीसीटीव्ही फूटेज दाखवून इतरांकडून कळली असे राजा यांनी सांगितले.
गाडीचा क्रमांक पण आमच्याकडे आहे.मी समाजकारण करणारा माणूस असून माझा पोलिस ठाण्यात पण नंबर आहे,मी लोकांसाठी धावत असतो मात्र त्या दिवशी मला पोलिस ठाण्यातून फोन आला की आबकारी विभागातील अधिकारी तुझ्या विरोधात तक्रार करण्याासठी आले आहेत तू पोलिस ठाण्यात ये.
पोलिसच सांगतात ‘आपसी’करुन टाका,याच्यात तुमचा फायदा आहे नाही तर तुझ्यावरच ३५३ करुन टाकू,तीन महिने जेलात टाकू,असा दम मला देण्यात आल्याचे राजा यांनी सांगितले.आम्ही गरीब आहोत,ते आबकारी अधिकारी पोलिसांच्या ‘लेवलचे’ आहेत म्हणून झालेला अन्याय विसरुन जायचा का?यांच्या जीवाला त्या दिवशी काही झालं असतं तर गर्भातले बाळ घेऊन कसे जगले असते?लग्नाच्या दोन वर्षांनी मला हे बाळ राहीले असल्याची व्यथा राजा यांच्या पत्नी व्यक्त करतात.

अजूनही सावनेर पोलिसांनी जबर मारहाणीची तक्रार घेतली नाही त्यामुळेच एसपी ऑफिसला सोमवारी तक्रार देणार असल्याचे राजा सांगतात.वयोवृद्ध वडीलांसमोर ते मार मार मारत होते मग वडीला का नाही बोलणार?त्यांनी लहानाचे मोठे केले यांना,त्या आबकारी अधिका-यांनी मोठं केलं का यांना?कोणाच्याही मुलाला एवढ्या जाड जाड लाकडी दंडूकांनी जबर मारहाण केली जात असेल,ते ही कोणताही गुन्हा नसताना तर या अन्यायाच्या विरोधात लढायचंच नाही का?का?तर ते मोठे सरकारी अधिकारी आहे म्हणून?असा सवाल एका भावी निर्मितीला जन्म देणार असलेली सृजनकर्ती, संपूर्ण भ्रष्ट नोकरशाहीला आज विचारत आहे….!
संपर्क क्रमांक-
राजा धार्मिक- 9881608715
……………………………




आमचे चॅनल subscribe करा
