Advertisements


डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२७ डिसेंबर २०२४: माझ्या खात्यात अजिबात भ्रष्टाचार होत नाही असा दावा केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कर्नाटक-म्हैसूर महामार्ग पाहणी दौ-यात गेल्या वर्षी ५ जानेवरी २०२३ रोजी केला होता.माझ्या खात्यात शूून्य भ्रष्टाचार होत असून ,आपण कोणत्याही कंत्राटदारांना भेट देत नसल्याचा दावा ही गडकरी यांनी केला होता.यानंतर ‘पूला ‘ खालून बरेच पाणी वाहून गेले. बुटीबोरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील शहराच्या मुख्य चौकात ७० कोटी रुपये खर्च करुन भव्य उड्डाणपूल बांधण्यात आला होता.त्यातील एक पिलर नुकताच २४ डिसेंबर रोजी खचला.या उड्डाणपूलावर सहा ठिकाणी काँक्रिटचा भाग तुटला,११ पिलरला तडे पडलेले आढळले.परिणामी,अतिशय रहदारीचा हा महामार्ग वाहतूकीसाठी बंद करावा लागला व या ७० कोटींच्या पुलावरुन पुन्हा एकदा ‘पुलकरी गडकरी‘यांच्या विभागावर ताशेरे ओढण्यास सुरवात झाली.
१७ जून २०२१ रोजी गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे लोकार्पण थाटात पार पडले होते.बुटीबोरीच्या या उड्डाणपुलासाठी उत्कृष्ट स्थापत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ साधण्यात आला असल्याचे सांगून हा पूल अपघातरहित राहील,असा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला होता.हा पुल सहा पदरी केला जाईल अशी घोषणा ही त्यांनी केली होती.१.६९ किलोमीटर लांबीच्या या पुलाच्या निर्मितीसाठी ७० कोटी रुपये खर्च झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.याप्रसंगी त्यांनी बुटीबोरी नगर परिषद दत्तक घेत असल्याचीही घोषणा केली होती.१ डिसेंबर २०१८ रोजी या पुलाच्या बांधकामास सुरवात झाली व १७ जून २०२१ रोजी या पुलाचे लोकार्पण झाले.मात्र,मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी अवघ्या साढे तीन वर्षातच सकाळी उड्डाणपूलाच्या सपोर्टिंग बिमला तडा जाऊन काँक्रिट खाली कोसळ्याने एकच खळबळ उडाली.बिमला तडा गेल्याने उड्डाणपुल हा अंदाजे ८ ते १० इंच खाली घसरला.

परिणामी,गडकरींच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास,बुटीबोरीचा हा उड्डाणपुल कोणत्या दर्जाच्या स्थापत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ साधून बांधण्यात आला आहे,याची पोल खुलली.आता पुलाला नेमके तडे कशा मुळे गेले?याचा शोध तज्ज्ञांकडून सुरु आहे.अर्थातच या पुलाची निर्मिती करणा-या कंत्राटदाराला तातडीने पुलाची दुरुस्ती करण्याची सूचना देण्यात आली आहे मात्र,उड्डाणपूलाच्या लोकार्पणानंतर पूल तसेच त्याच्या संलग्नित असलेल्या १६०० मीटर लांब सेवा रस्त्याचा ५ वर्ष डागडूजीचा करार कंपनीसोबत असताना देखील बांधकामाची संपूर्ण रक्कम मिळताच इतर अनेक पुलांसारखेच,’लाडक्या’ कंपनीने सर्वसामान्य वाहनधारकांना या ही पुलावर ‘भगवान भरोसे‘सोडल्याचे सिद्ध झाले.
१७ जून रोजी बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले आणि त्याच वर्षी २० ऑक्टोबर २०२१ रोजी कळमना परिसरातील पुलाचे गर्डर कोसळण्याची घटना घडली!सुदैवाने हा गर्डर रात्री पडला.रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास जोरदार आवाज करत पुलाचा गर्डर खाली कोसळला.उपराजधानीत याचे तीव्र पडसाद उमटले होते.विविध राजकीय पक्षांनी निर्दशने करीत, या भ्रष्ट कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता.या ही पुलाची तज्ज्ञांकडून चौकशी करण्याची घोषणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचएआय)ने केली होती.कळमनाकडून एचबी टाऊनकडे जाणा-या महामार्गावरील महाकाय पुलाचा पीआर-७ वाकून खाली पडला.पीआर-७ पडण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे!प्राथमिक अंदाजानुसार पुलाखाली लावण्यात आलेले बेअरिंग भक्कम नव्हते.तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीकडून सखोल चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाईची घोषणाही, या विभागाने केली होती.पारडी पुलाचे काम मेसर्स गॅननॉन डर्कले ॲण्ड कंपनी आणि मेसर्स एमएमएस इन्फ्रास्ट्रक्चरच्या संयुक्त उपक्रमातून करण्यात आले आहे.सात वर्षांपासून पारडी पुलाचे बांधकाम सुरु होते.
या पुला खालून कळमनासारख्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत व्यापारी,ग्राहक,मजुरांचा व नागरिकांचा सतत राबता असतो.हीच घटना रात्री सव्वा नऊ ऐवजी सकाळी घडली असती तर अनेकांना आपले प्राण हकनाक गमवावे लागले असते.कंत्राटदाराच्या चुकीमुळे असो किंवा कोणत्याही कारणाने,दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,यात कोणालाही सोडले जाणार नाही,असे प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक राजीव अग्रवाल यांनी आश्वान दिले होते.व्हीएनआयटीला पत्र लिहून तज्ज्ञांना त्या ही घटनेत पाचारण करुन अहवाल मागवण्यात आला होता.पुढे त्या अहवालाचे काय झाले?दोषी कंत्राटदाराला काय शिक्षा झाली?
शहरातील झाडूनपुसून सर्व विरोधी पक्षांनी या घटनेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते,त्यांनाही नंतर अहवालाचा शोध का घ्यावासा वाटला नाही?उद्धव सेना,राष्ट्रवादी शरद पवार गट,आप,मनसे,पीरिपाच्या आक्रमक पवित्र्याचे पुढे काय झाले?अद्याप नागपूरकरांना कळले नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ मध्ये पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले होते,६४९ कोटींच्या या प्रकल्पातंर्गत एकूण ६ किमीचा हा उड्डाणपुल,१४ किलोमीटर ४ लेनचा रस्ता,दोन रेल्वे अंडरब्रिज,नाग नदीवर दोन पुल आणि २२ बसशेड तयार करण्याचे प्रस्तावित होते.मात्र,९ वर्ष या पुलाचे काम रखडलेले होते.याशिवाय मनमानेल तसे वारंवार कायदे-नियम धाब्यावर बसवून मूळ मंजूर झालेल्या निवेदत बदल करण्यात आले!बांधकामा दरम्यान या ठिकाणी अनेक प्राणांतिक अपघातांची मालिकाच घडत राहीली होती.
बोले पेट्रोल पंप चौक ते वाडीपर्यंतच्या उड्डाणपुलाचे बांधकाम हे चक्क न्यायालयात पोहोचले व या महामार्गावरील मलबा,खड्डे व कठडे सात दिवसात हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला कंत्राटदाराला द्यावे लागले.कंत्राटदाराने कागदावर कागदी घोडे नाचवू नये,अशी मौखिक टिपण्णीही न्यायालयाने केली.खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाला चांगलेच धारेवर धरले होते.गडकरींच्या विभागाने,एनएचएआयने न्यायालयात उत्तर सादर करताना,या रस्त्यांच्या देखभाली दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडे नसून सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले.याचा अर्थ मलाईदार उड्डाणपुलाचे बांधकाम त्यांच्याकडे,मात्र,या बांधकामामुळे खालील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे!यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची चांगल्या भागाची छायाचित्रे न्यायालयात सादर केली,बांधकाम विभागाची ही ‘फसवेगिरी’ न्यायालयाच्या लक्षात आल्याने एनएचएआयचे अधिक्षक अभियंता आणि बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाच्या अधिका-यांना तातडीने उपस्थित राहण्याचे आदेश ३० जानेवरी २०२४ रोजी न्यायालयाने दिले होते.अमरावती महामार्गावर नागरिकांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा खर्च हा ४७८ कोटीवरुन ४८५ कोटींवर पोहोचला होता.५ किलोमीटरच्या भागात मार्च २०२२ पासून कामाला सुरवात झाली होती.
मोमीनपुरा परीसरातील पहेलवानशहा दर्गा ते गुप्ता आटा चक्कीपर्यंंत प्रस्तावितअसलेल्या उड्डाणपुलाला प्रशासकीय मान्यता नसल्याचा दावा करीत जामा मशिदीचे अध्यक्ष यांनी देखील नागपूर खंडपीठात आव्हान केले.इटारसी पुलाच्या जागी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले.
ग्रेट नाग रोडवर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरुच आहे.पूर्व नागपूरात जवळपास सगळीकडेच उड्डाणपुलाचे काम सुरु असून रस्त्यांची अक्षरश: दुरावस्था झाली आहे. शहरभर उड्डाणपुलांच्या बांधकामांमुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीचा आता नागपूरकरांना चांगला सराव झाला आहे.नंदनवन ते हिवरीनगर भागात जाताना तर मध्येच रस्ते बंद झाले,खोदकामांचा अतिरेकी फटका नागरिकांना बसत राहीला,दूर्देवाने डॉली बोरकर नावाच्या महिलेचा अपघाती मृत्यू याच रस्त्यावर झाला.
सदर उड्डाणपुल हा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरला असल्याची ग्वाही अनेक दूर्घटनेतून मिळाली असून, उत्तर नागपूरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी,हा उद्देश्य सपशेल चुकला. हा उड्डाणपूल नागपूरकरांसाठी सर्वाधिक धोकादायक व जीवघेणा ठरला आहे.याही उड्डाणपूलावर जागोजागी भेगा व खड्डे पडल्यामुळे वाहने उसळी घेतात.पाच वर्षांपूर्वीच लिबर्टी टॉकिज ते मानकापूरपर्यंत हा पुल बांधण्यात आला होता.सप्टेंबर २०२३ मध्ये याच पुलावर एका कार व दुचाकीच्या अपघातात एका शाळेतील मुख्याध्यपकासह लिपिकाचा मृत्यू झाला.सदर उड्डाणपुलावर अनेक लहान-मोठे अपघात घडून पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे.रात्रीच्या सुमारास दुचाकीधारक या उड्डाणपुलावरुन जाण्याची हिंमत देखील करत नाही.या उड्डाणपुलावरील काटोल रोड व मानकापूर रस्त्याकडे जाणारा ‘वाय‘पॉईंट हा सर्वाधिक धोकादायक ठरत आहे.सिग्नल,सीवीटीव्ही,वाहतूक पोलिस,वाहनांच्या वेगावर नियंत्रण अशी कोणतीही सुरक्षा उड्डाणपुलांवर नागपूरकर नागरिकांसाठी नाही.
या शिवाय उड्डाणपुलावरील कठड्यांच्या उंचीने देखील अनेकांचा घात केला आहे.चारचाकीने दुचाकींना धडक दिल्यास उंचावरुन खाली पडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना,उड्डाणपूलांवर घडल्या आहेत.
आता एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत आशियातील सर्वात मोठा उड्डाण पूल तयार झाला आहे.५.५ किमी लांबीचा हा उड्डाणपूल आणि मेट्रोचा मार्ग, एका पिलरवच आहे.एनएचआयकडून ५८० कोटी रुपयात हा पुल तयार करण्यात आला.
टेकडी मंदिर उड्डाणपुल जितक्या कोटीमध्ये तयार झाला होता,त्याच्या तीनपट मोबदला देऊन महामेट्रोकडून तो जमीनदोस्त झाला आहे.
लवकरच नागपूर शहरात आणखी दोन कोट्यावधींची नव्या उड्डाणपुलांची गडकरी यांनी घोषणा केली आहे.मात्र,दुसरीकडे त्यांच्या विभागाने इनर रिंग रोड ते फेटरीपर्यंतच्या महामार्गाचे बांधकाम स्वत:च्या अधिकारक्षेत्रातून वगळल्याने, ॲड.अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली.हायकोर्टाने यावर गडकरी यांच्या विभागाला यावर स्पष्टीकरण मागितले.न्यायालयाने महामार्गावरील वृक्षरोपणाचा मुद्दाही गांर्भीयाने घेतला.
गडकरी यांच्या विभागाच्या उड्डाणपुलांची महाकाव्ये इथेच थांबत नाही तर ६ सप्टेंबर २०२४ रोजी दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी सुरु करण्यात आलेल्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणुपुलाला तडे गेल्याचे वास्तव समोर आले.परिणामी,या पुलावरुन एनएचएआयने एकेरी वाहतू सुरु केली!या निमित्ताने पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.विशेष म्हणजे या पुलावरुन वाहतूक सुरु होताच एकाच आठवड्यात भले मोठे भगदाड पडले,ते दुरुस्त करुन पुन्हा वाहतूक सुरु केली असता पुलावर मोठमोठ्या भेगा पडल्याने हा उड्डाणपूल पूर्णत:दुभंगुन गेला.
बिहारमधील एका पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर गडकरी यांनी या प्रकल्पावर काम करणा-या त्यांच्या मंत्रालयाच्या चार अधिका-यांना तडकाफडकी निलंबित केले.ही घटना २६ जून २०२२ रोजी घडली.बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील बांधकाम सुरु असलेल्या या पुलाचा एक भागच कोसळून खाली पडला होता.हा १५०० कोटींचा प्रकल्प होता.या ही घटनेत तज्ज्ञ समितीने चौकशी केली होती मात्र,त्याचाही अहवाल देशाच्या जनतेसमोर आलाच नाही.
१६ ऑक्टोबर २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूर शेख नाका येथे निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला.महत्वाचे म्हणजे सकाळीच एक भाग कोसळला होता तर दुपारी दुसराही भाग कोसळून पडला.या ही पुलाचे बांधकाम अतिशय निकृष्ट असल्याचा ठपका पुलाच्या निर्मितपासूनच स्थानिकांनी ठेवला होता.हा जनतेच्या कराच्या पैशांची ज्याप्रकारे ‘उड्डाणपूलांच्या निर्मितीवर कोटीच्या कोटी उड्डाणे’नागपूरसह देशभर होत आहे,त्यावर कॅगने देखील ठपका ठेवला होता.

१८ ऑगस्ट २०२३ रोजी गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून ‘द्वारका एक्सप्रेसवे‘च्या बांधकामावर करण्यात आलेल्या बेहिशोबी खर्चाबाबत महालेखापरिक्षकांनी (कॅग)कठोर शब्दात ताशेरे ओढले होते.यावर गडकरी यांनी काही अधिका-यांच्या कामकाजावर तीव्र नापसंती व्यक्त केली होती.कॅगने उपस्थित केलेल्या प्रश्नांना या अधिका-यांनी योग्य माहिती पुरविली नसल्याचे त्यांचे म्हणने होते.‘भारतमाला ’प्रकल्पातंर्गत तयार होणा-या या महामार्गाची मूळ किंमत ९१ हजार कोटी होती.परंतु यात पुढे उड्डाण पूल,उन्नत मार्ग,भुयारी मार्ग,बोगदे व रिंग रोडचा समावेश करण्यात आला.‘द्वारका एक्सप्रेसवे’मध्ये झालेल्या या कामांचा मूळ प्रकल्पाच्या किंमतीत समावेश नव्हता.मुळात या प्रकल्पाची निविदा १२ टक्के कमी दराने कंत्राटदाराला देण्यात आली असल्याचा दावा गडकरी यांच्या मंत्रालयाने केला.या महामार्गाची मूळ किंमत १८.२० कोटी प्रति किलोमीटर असताना प्रत्यक्षात या महामार्गाच्या बांधकामावर २५१ कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च झाल्याचे ‘कॅग’च्या अहवालात नमूद आहे.
नागपूरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी(एनएडीटी)ते जरीपटका रेल्वे ओव्हर ब्रिज(आरओबी)आणि मेकोसाबाग ते सेंट्रल माईन प्लानिंग ॲण्ड डिझाईन इन्सिटट्यूट(सीएमपीडीआय)या दोन्ही प्रकल्पांवरील उड्डाणपुलांसंदर्भात झालेल्या तांत्रिक चुकांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच सदस्यीय समिती गठित केली होती.तसेच या उड्डाणपूलांची पाहणी करुन ७ जून २०२३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.रमेश वानखेडे या याचिकाकर्त्याने ‘अज्ञात‘ व्यक्तीच्या दबावाखाली एनएडीटी आरओबीच्या मूळ आराखड्यात बदल केला असल्याचा दावा करीत,गरज नसताना मेकोसाबाग सीएमपीडीआय उड्डाणपुलाचा प्रकल्पात समावेश केला असल्याचा आरोप केला आहे!
नैतिकता,अर्थव्यवस्था,पर्यावरण समाजाचे तीन स्तंभ असल्याचे सांगत सी-२० परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना गडकरी म्हणाले होते.ज्ञानेश्वर मुळे यांना चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना ‘सनदी अधिका-यांनी लोकाभिमुख राहीले तर सर्वसामान्य जनतेचे कल्याण साधले जाईल ‘असे मत ही व्यक्त केले होते.मात्र,त्यांच्याच विभागातील अधिका-यांच्या अनास्थेचे बळी शहरातील उड्डाणपुले कशी ठरत आहेत,याची प्रचिती नागपूरकर वारंवार घेतच असतो.काटोल-वरुड महामार्गावरील उड्डाण पुलांचे बांधकाम गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले आहे.राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अधिकारी या बांधकामाबाबत गंभीर नसल्याने दिरंगाई होत असल्याचा आरोप तेथील स्थानिक करतात.काटोल ते वरुड हा महामार्ग झाल्यानंतर या मार्गात असलेल्या पारडसिंगाजवळील जीवनी नदी,भारसिंगी जवळील जाम नदी व जलालखेडा जवळील वर्धा नदीवर पुलांचे बांधकाम मंजूर होते.पुलांचे बांधकाम सुरु ही होते मात्र मार्च २०२० मध्ये करोना आला आणि काम थांबले.याला देखील पाच वर्ष उलटून गेली.या तिन्ही नद्यांवर असलेल्या जुन्या पुलांवरुनच वाहतूक सुरु आहे.यातील दोन पूल तर धोकादायक स्थितीत आहेत.या तिन्ही पुलाच्या दोन्ही बाजूने वळण मार्ग असल्याने अपघातांना हमखास निमंत्रण मिळत असतं.या पुलाचे बांधकाम दर्जेदार व नियोजित वेळेत व्हावे यासाठी गडकरी यांच्या विभागातील अधिका-यांना पत्र व निवेदन देऊन येथील नागरिक आता पूर्णपणे हताश झाले आहेत!

‘मागील नऊ वर्षे भारताच्या विकासाचे सुवर्ण युग असल्याची’ पावती देखील गडकरी यांनी आपल्या एका भाषणात दिली होती.सुवर्ण युगा ऐवजी त्यांच्या विभागाने शहरभर निर्माण केलेल्या उड्डाण पुलांवरुन प्रवास करताना ‘सुरक्षेचे’युग येऊ द्या,अशी मागणी आता नागपूरकर करीत आहेत.प्रयागराजमध्ये गडकरी यांनी १७ फेब्रुवरी २०२२ रोजी ‘प्रयागराजमध्ये लवकरच उडत्या बसेस’ दाखल होणार असल्याचे सांगून ‘माझ्याकडे पैशांची कमतरता नसल्याचे’ सांगितले होते.प्रयागराज मध्ये उडत्या बसेस दाखल झाल्या की नाही,याची माहिती नाही मात्र,त्यांच्याच नागपूर शहरात उड्डाणपुलांना वारंवार तडे जात असून ती उडत्या स्कॉयलॅबसारखी झाली असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे!
४ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातातील जखमी होणा-यांची संख्या वाढू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी हेलिपॅडसह हेलिकॉप्टरची सोय केली जाणार असल्याची घोषणा वनामती येथे झालेल्या कार्यक्रमात केली होती.अद्याप राष्ट्रीय महामार्गांवर हेलिपॅड निर्माण झाले आहेत की नाही माहिती नाही मात्र,त्यांच्याच शहरात उड्डाणपुलांवरुन प्रवास करण्यांना अपघात घडून तातडीने रुग्णालयात नेण्याची श्रृखंला कुठेही खंडीत झाली नसल्याचे वास्तव दुर्लक्ष्त करता येत नाही.
एका मुलाखतीत अभिनेते अनुपम खेर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ‘परिवहन मंत्री असताना अपघात कमी करु शकलो नसल्याचे शल्य’ त्यांनी व्यक्त केले होते.परंतु,नागपूरात अनेक सदोष उड्डाणपुलांची निर्मिती,त्याच बरोबर गरज नसतानाही उड्डाण पुलांची केलेली निर्मिती,त्यावर घडलेले प्राणांतिक अपघात,अनेक कुटूंबांची झालेली कायमची वाताहत,एनएचएआयच्या अधिका-यांची बेफिकरी,कंत्राटदारांनी बांधलेले निकृष्ट दर्जाची उड्डाणपुले यासाठी देखील गडकरी हे कधीतरी खंत व्यक्त करतील का?असा सवाल बुटीबोरी उड्डाणपुलावरील तड्यानंतर आता विचारत आहे.
भ्रष्ट कारभाराची ही मालिका अशीच सुरु राहील्यास उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कितीही, गडकरी हे मोदींच्या मंत्रिमंडळातील रत्न असल्याची वल्गना केली किवा गडकरी हे ‘मिनिस्टर नव्हे इनोव्हेटर’ असल्याचे ग्वाही दिली तरी नागपूरकरांनाही त्याचा प्रत्यय येणे गरजेचे आहे. मागील ११ वर्षांच्या काळखंडात विकासाच्या नावावर शहराचा झालेला ‘अशाश्वत कायाकल्प‘दर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात नागपूरकर अनुभवतच आहे.थोडक्यात,गडकरी आणि उड्डाणपुलांचे हे कवित्व लवकरच नागपूरात आणखी दोन उड्डाणपुलांची भर पडणार असल्याने सध्या तरी संपण्याची चिन्हे नाहीत.
………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
