

ज्वाला धोटे यांचा इशारा:वारांगणांमध्ये तीव्र रोष
आभा पांडे पोलिस आयुक्तांच्या भेटीस:चर्चेला उधाण
आमची घरे ‘कुंटनखाण्याच्या श्रेणीत येत नाही’:वारांगणांचा प्रतिवाद
नागपूर,ता.३१ मे २०२२: शहरातील बहूचर्चित वस्ती गंगा-जमुना गेल्या दहा महिन्यांपासून अख्ख्या राज्यात चर्चित आहे.पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी अचानक मोहल्ला बैठकीनंतर स्थानिकांच्या तक्रारीनंतर तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मनोज चाफले व वंदना यनगंटीवार यांच्या पुढाकारातून ही वस्तीच सील गेली,कलम १४४ लावले,वारांगणांच्या घरासमोर नोटीसा चिटकवल्या यामुळे येथील हजारो वारांगणांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला,ही लढाई ‘स्थानिकविरुद्ध वारांगणा’ अशी चालली त्यातच अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी वारांगणांच्या बाजूने सक्रीय उडी घेत हे आंदोलन तीव्र केले मात्र पोलिस आयुक्तांनी तरी देखील वस्तीत तगडा पोलिस बंदोबस्त लाऊन चिटपाखरुही फिरकू दिला नाही,अश्यातच परवा वारांगणांच्या संदर्भात देशातील सर्वोच्च न्यायालयाचा अतिशय महत्वपूर्ण असा निकाल आला,याचा जल्लोषही ज्वाला धोटे यांनी वारांगणांसोबत साजरा केला मात्र आज वस्तीत काही ग्राहक फिरकताच गंगा-जमुना वस्तीतील पोलिस चौकीतील पोलिसांनी या ग्राहकांना दंडूके मारुन व त्यांचे मुंडके धरुन वस्तीतून हूसकावून लावले.या विरोधात वारांगणांमध्ये तीव्र रोष उसळला असून राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी अमितेश कुमार यांची भेट घेऊन दबाव निर्माण केल्याचा आरोप आज माध्यमांकडे ज्वाला धोटे यांनी व्यक्त केला तसेच अमितेश कुमार हे आभा पांडे व बिल्डर लॉबीच्या दबावात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावित असल्याचा आरोप करीत आता ही लढाई न्यायालयातच लढली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने देहविक्री हा व्यवसाय असून या व्यवसायातील महिलांना सन्मान आणि कायद्याने पुरवलेल्या सुरक्षेचा समान अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदविले होते.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना वेश्या व्यवसायातील महिलांना पोलिसांकडून मिळणा-या वागणुकीविषयी आणि त्यांच्या समस्यांविषयी विस्तृत मत मांडले होते.पोलिसांचा देहविक्री करणा-या महिलांप्रतिचा दृष्टिकोण अनेकदा क्रूर आणि हिंसक असतो असे मत नोंदवित त्यांच्या मानवीय हक्कांची दखल घेतली जात नसल्याचे ताशेरे ओढले होते.
सर्वोच्च न्यायालयाने देहविक्री करणा-या वारांगणांच्या संदर्भात संवेदनशीलतेने वागण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेला केले होते.वेश्या व्यवसायातील मुलांंविषयीही सर्वोच्च न्यायलयाने आपले मत मांडले होते.पोलिसांनी त्या मुलांशी कशाप्रकारे वागावे,हे देखील न्यायालाने सांगितले होते.यासोबतच लैंगिक अत्याचाराची तक्रार देहविक्री करणा-या महिलेेने जरी दिली असेल तरी तिला कायदेशीर मदत देण्याचे आदेश दिले .
मात्र सर्वोच्च न्यायालयाचे हे आदेश नागपूरातील पोलिस विभागापर्यंत कितपत पोहोचले याचे उदाहरणच आज गंगा-जमुना वस्तीत बघायला मिळाले.स्वच्छेने या वस्तीतील वारांगणा आपले व आपल्या कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी ग्राहकांच्या वाटेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डोळे लाऊन बसली असतानाच पोलिसांनी दंडूकेशाहीचा वापर करीत आज वस्तीत आपल्या देहाची भूक भागविण्यासाठी आलेल्या काही ग्राहकांना चांगलाच चोप दिला.या विरोधात आता गंगा-जमुनात तीव्र संताप उमटला आहे.
नागपूरातील पोलिस विभाग हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापेक्षाही वरचा आहे का?असा प्रश्न ज्वाला धोटे यांनी उपस्थित केला.सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रीला सन्मानजनक परवानगी बहाल करतानाच ‘कुटंणखान्याला मात्र परवानगी नाकारली’ आहे त्याचे स्वागतच आहे मात्र दीडशे ते दोनशे वर्षे जुन्या वस्तीतील वारांगणांची घरे याला कुंटणखाना म्हणता येणार नाही,असे स्पष्टीकरण त्या देतात.

देहविक्री करुन आपल्या कुटुंबियांच्या गरजा भागविण्यासाठी व दोन पैसे कमविण्यासाठी या वारांगणा कुण्या ’तारांकित ओयो’हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळेच अतिशय लहान-लहान घरातच त्यांना हा व्यवसाय करने भाग आहे,ही वस्तूस्थिती नागपूरातील पोलिस विभागालाही माहिती असूनसुद्धा ज्या पद्धतीने आज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली ते बघता,काहीही झाले तरी एका हेव्हीवेट राजकीय मंत्र्यांना वारांगणांची ही जागा गिळंकृत करुन बिल्डर लाॅबीला सोपवायची आहे,कंत्राटदारांचे उखळ पांढरे करायचे आहे,स्वत:ची टक्केवारी प्राप्त करायची आहे म्हणूनच पोलिसांवर दवाब आणल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी देखील अमितेश कुमार यांची भेट घेतली,त्यांनी वारांगणांच्या वस्तीच्या विरोधात स्थानिक नागरिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते,वारांगणांचे पुर्नवसनाचे आश्वासन दिले होते मात्र गेल्या दहा महिन्यात त्या वस्तीत फिरकल्या देखील नाही,वारांगणा हे काय खातात आहेत?कश्या जगतात आहेत?त्यांच्या मुलांना दूध मिळत आहे की नाही?त्यांच्या घरी धान्य आहे की नाही?त्यांच्या मुलांचे शिक्षण कश्यारितीने सुरु आहे?हे प्रश्न राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय सदस्यांना महिला म्हणून, वारांगणांच्या भेडसावत नाहीत का?की त्यांना ‘पद’ फक्त सभ्य समजल्या जाणा-या महिलांचेच प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीने बहाल केले आहे?
एकीकडे सर्वोच्च न्यायालय वारांगणांच्या बाबतीत इतके संवेदनशील मत नोंदवित आहेत मात्र दूसरीकडे आभा पांडे या संवैधानिक पदावर असतानाही समाजातीलच एक घटक असणा-या महिलांचा परोकाटीचा दु:श्वास करीत असल्याचा आरोप धोटे यांनी केला.
आभा पांडे यांच्या पोलिस आयुक्त भेटीनंतरच पोलिसांनी वस्तीत येणा-या ग्राहकांवर दंडूके वापरली,असा आरोप करीत अमितेश कुमार,लकडगंज पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व गंगा-जमुना येथील पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या अवमाननाचे प्रकरण दाखल करणार असून हा लढा आता अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
काहीही करुन ही वस्ती शहराबाहेर घालवावी यासाठी अतिशय नियोजनबद्धरित्या शासनाचे विविध विभाग हे संगनमत करुन गेल्या दहा महिन्यांपासून वारांगणांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवीत आहे मात्र काहीही झाले तरी वारांगणांची ही वस्ती या ठिकाणाहून हलू देणार नाही,स्थानिकांच्या समस्या या देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत,वारांगना या रस्त्यावर येऊन कोणतेही अश्लील हावभाव करणार नाहीत,वारांगणांच्या या वस्तीचा या पुढे स्थानिकांनाही त्रास होणार नाही यासाठी दोन्ही पक्षाच्या बैठका मी स्वत: आयोजित करेल व समस्यांचा निपटारा करेल मात्र फक्त वारांगणांच्या या वस्तीचा स्थानिकांना त्रास होतो,या ‘फसव्या’ सबबीखाली ही वस्ती उठू देणार नाही,असा दम ज्वाला धोटे यांनी भरला.
संपूर्ण राज्यात फक्त नागपूरच एकमेव असे शहर आहे ज्या शहरात वारांगणांच्या वस्तीवर राजकारण्यांच्या सांगण्यावरुन पोलिसांचा कहर सुरु आहे,इतर शहरात मात्र देहविक्री करणा-या वस्त्यांना महाराष्ट्र पोलिस हात देखील लावत नाही,मग नागपूरात असे कोणते घबाड लपले आहे जे मिळवण्यासाठी संपूर्ण पोलिस विभाग इतका जोर लावत आहे?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी अनन्वित अत्याचारांचा कळस आता गाठला आहे,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वारांगणांना फार मोठा दिलासा मिळाला होता मात्र नागपूरातील पोलिस विभाग व विशेषत: पोलिस आयुक्त अमितेश कुमार,राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे या स्वत:ला सर्वोच्च न्यायालयापेक्षाही वरचढ समजत असतील तर या पुढे त्यांना कायद्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल,लवकरच त्यांच्या विरोधात न्यायालयीन अवमाननेचा गुन्हा आम्ही दाखल करणार असल्याचा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला.‘कुंटणखाना आणि वारांगणांची घरे’या शब्दछलाचाही सोक्ष मोक्ष लावणार असल्याचे त्या म्हणाल्या.
या संदर्भात आभा पांडे यांच्याशी संपर्क साधला असता,या विषयावर त्यांना काहीही बोलायचे नाही असे त्या म्हणाल्या.माध्यमांनी गंगा-जमुना विषयावर माझे मत घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधू नये असे त्यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
