एक लाख ३७ हजार ६०३ मतांनी गडकरी विजयी:तिस-यांदा नागपूरच्या खासदारकीवर यशस्वी दावा:६ लाख ५५ हजार ०२७ मते गडकरींना
काँग्रेसची तगडी झुंज: ५ लाख १७ हजार ४२४ मते विकास ठाकरेंना: उत्तर नागपूरची अपुरी साथ:मध्य नागपूरने केला घात
गडकरींचा विजय स्वप्रतिमेमुळे:पक्ष,चिन्ह,मोदी यांचा करिष्मा नागपूरातही प्रभावहीन
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.४ जून २०२४: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिस-यांदा विजयी झाले.त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचा १ लाख ३७ हजार ६०३ मतांनी पराभव केला.गडकरींना एकूण ६ लाख ५५ हजार ०२७ मते मिळाली तर विकास ठाकरे यांनी गडकरींना तगडी लढत देत ५ लाख १७ हजार ४२४ मते मिळवली.गडकरी यांच्या विजयानंतर सोशल मिडीयावर अनेक पोस्ट व्हायरल झाले त्यात ‘जो जीता वो सिंकदर’अशी गडकरींनी खेचून आणलेल्या विजयश्रीचे कौतूक होते तर विकास ठाकरे यांनी शेवटपर्यंत जी लाखांची बढत व लढत कायम ठेवली त्यासाठी ‘हार कर भी जितनेवाले को बाजीगर कहते है’अशी प्रशंसा विकास ठाकरे यांच्यासाठी उमटली.
गडकरी यांनी मतमोजणीच्या पहील्या फेरीपासूनच बढत घेतली.अंतिम विसाव्या फेरीपर्यंत ही बढत कायम होती.सर्वात महत्वाची बढत गडकरींना पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघातून मिळाली.पूर्व नागपूर मतदारसंघातून गडकरी यांनी तब्बल ७३ हजारांची बढत घेतली व पाच लाखांच्या वर मत घेऊन देखील पूर्व नागपूरने प्रतिस्पर्धी उमेदवार विकास ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग रोखला.
काँग्रेसला मध्य नागपूरमधून चांगली मते मिळतील अशी अपेक्षा होती.मध्य नागपूरात हलबा मतदारांचा प्रभाव असून ती मते निर्णायक ठरणार होती मात्र,मध्य नागपूरात २३ हजार मतांनी काँग्रेसचा उमेदवार मागे राहीला,त्या तुलनेने उत्तर नागपूरने काँग्रेसला चांगली साथ दिली,उत्तर नागपूरात काँग्रेसने ३० हजार मतांचे मताधिक्य घेतले.पश्चिम नागपूर जो आमदार विकास ठाकरेंचा गड मानला जातो,तो मतदार संघ काँग्रेसच्या मागे उभा राहीला व या मतदारसंघात गडकरी हे ६ हजार ६०० मतांनी मागे राहीले,पश्चिम नागपूरात लोकसभा निवडणूकीत चांगले मतदान झाले होते.दक्ष्ण-पश्चिम मतदारसंघ जो भारतीय जनता पक्षाचा व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड मानला जातो या मतदारसंघाने ‘परंपरे ‘प्रमाणे’गडकरींना २१ हजार मतांचे मताधिक्य मिळवून दिले.दक्ष्ण नागपूर मतदारसंघात मात्र काँग्रेसने २९ हजार मतांची आघाडी घेतली.
हे सर्व चित्र आणि मतदारांचा कौल आगामी विधानसभेच्या निवडणूकीत प्रभावी राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.पूर्व नागपूरात गडकरींना ७३ हजारांचे मताधिक्य मिळाले नसते तसेच मध्य नागपूरात अपेक्षेप्रमाणे हलबा,ओबीसी आणि मुस्लिमांची एकगठ्ठा मते विकास ठाकरेंकडे वळली असती तर जय-पराजयाचे चित्र हे वेगळे राहीले असते,यात दुमत नाही.बहूजन समाजवादी पक्षाचे उमेदवार योगेश लांजेवार यांनी १९ हजार २४२ मते घेऊन काँग्रेसच्या विजयाचा मार्ग नेहमीप्रमाणे खडतर केला.२०१९ च्या निवडणूकीत बसपाच्या मो.जमाल यांना २६ हजारच्या जवळपास मत मिळाले होते.यंदा वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार रिंगणात नव्हता.वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केला होता.२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत वंचितच्या सागर डबरासे यांनी ३१ हजार मते मिळवली होती.यंदा एकूण २६ उमेदवार रिंगणात होते मात्र,तिन्ही राष्ट्रीय पक्ष सोडून इतर सर्वांची अमानत रक्कम जप्त झाली.
गडकरी यांनी अगदी पहील्या फेरीपासूनच बढत घेतली ती अखेरच्या विसाव्या फेरीपर्यंत कायम राहीली.पहील्या फेरीत गडकरींना ४० हजार ८५६ तर काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना २९ हजार १८१ मत मिळाले.पहील्याच फेरीत गडकरी यांनी ११ हजार ६७५ मतांचे मताधिक्य मिळवले.दूस-या फेरीत गडकरींना ३९ हजार ३८४ मते मिळाली तर विकास ठाकरेंना २६ हजार ३३८ मते मिळाली,या फेरीत गडकरींनी १३ हजार ०४६ मतांची बढत घेतली.तिस-या फेरीत गडकरींना ३६ हजार ५११ मते मिळाली तर विकास ठाकरेंना २७ हजार ३४२ मते मिळाली,या फेरीत गडकरींनी ९ हजार १६९ मतांची बढत घेतली.चौथ्या फेरीत गडकरींना १ लाख,५४ हजार ०६६ मते मिळाली तर विकास ठाकरेंना १ लाख १३ हजार ९१८ मते मिळाली.या फेरीत गडकरींनी ४० हजार १४८ मतांची बढत घेतली.पाचव्या फेरीत गडकरींना ३७ हजार ७८२ मते मिळाली तर विकास ठाकरेंना ३० हजार ५३२ मते मिळाली.या फेरीत गडकरींनी ७ हजार २५० मतांची लीड घेतली.सहाव्या फेरीत गडकरींना २ लाख २३ हजार ८१० मते मिळाली तर विकास ठाकरेंना १ लाख ७९ हजार ८५२ मते मिळाली.या फेरीत गडकरींनी ४३ हजार ९५८ मतांचे मताधिक्य घेतले.सातव्या फेरीत गडकरींना २,५४,३१० मते होती तर विकास ठाकरेंच्या मतांची बेरिज या फेरीपर्यंत २,१३,३८३ झाली..या फेरीत गडकरींनी ४० हजार ९२४ मतांची लीड घेतली होती.आठव्या फेरीपर्यंत गडकरींनी २ लाख ८९ हजार ३०६ मते घेतली तर विकास ठाकरेंनी २ लाख ४२ हजार१०७ मते घेतली.या फेरीपर्यंत गडकरींना ४७ हजार १९९ मतांची लीड मिळाली.नवव्या फेरीत गडकरींना ३,२७,२०५ मते मिळाली तर विकास ठाकरेंना २,६७,०६२ मते मिळाली.या फेरीत गडकरींची लीड ही ६० हजार १४३ पर्यंत झाली होती.दहाव्या फेरीत गडकरींना मिळालेल्या मतांची संख्या ३ लाख ६३ हजार १३९ एवढी होती तर विकास ठाकरेंना २ लाख ९९ हजार ९३० मते प्राप्त झाली होती.या फेरीत गडकरी व ठाकरे यांच्या मतांमध्ये ६३ हजार २०९ मतांचा फरक होता.
पुढील १० फे-यांमध्ये देखील हे अंतर वाढतच गेले.११ व्या फेरीत गडकरी हे ४,०२,३०१ मतांपर्यंत पोहोचले तर विकास ठाकरेंना या फेरीपर्यंत ३,२८,२४९ मते होती.या फेरीत गडकरींनी ७४ हजार ५२ एवढी लीड घेतली होती.१२ व्या फेरीत गडकरींची मते ४ लाख ३७ हजार २६७ पर्यंत पोहोचली तर विकास ठाकरेंची मते ३ लाख ५९ हजार ३०८ होती.या फेरीत गडकरींची लीड ७७ हजार ९५९ एवढी होती.१३ व्या फेरीत गडकरींना एकूण ४ लाख ८० हजार ७६२ मते होती तर विकास ठाकरेंना ३ लाख ८१ हजार ०४६ मते होती.या फेरीमध्ये गडकरींनी ९९ हजार ७१६ मतांची लीड घेतली.१४ व्या फेरीमध्ये गडकरींना ५ लाख २० हजार ६६५ मते होती तर विकास ठाकरेंना ४ लाख१२ हजार ७३९ मते होती.या फेरीमध्ये गडकरींची लीड वाढून १ लाख ७ हजार ९२६ एवढी झाली.१५ व्या फेरीमध्ये गडकरींची एकूण मते ५ लाख ५९ हजार १५७ एवढी झाली तर विकास ठाकरेंना एकूण ४ लाख ४० हजार १७५ मते मिळाली.या फेरीत गडकरींची बढत १ लाख १८ हजार ९८३ एवढी झाली.१६ व्या फेरीमध्ये गडकरींना एकूण ५ लाख ८७ हजार ५१४ मते होती तर विकास ठाकरेंना ४ लाख ६८ हजार २५७ मते होती.या फेरीमध्ये गडकरींची लीड १ लाख १९ हजार २५७ एवढी झाली.१७ व्या फेरीमध्ये गडकरींची मते ६ लाख १७ हजार ६३८ एवढी झाली तर विकास ठाकरेंची मतांची बेरिज ४ लाख ९० हजार ६११ एवढी झाली.या फेरीमध्ये गडकरींचे मताधिक्य १ लाख १९ हजार २५७ एवढे झाले.१८ व्या फेरीमध्ये गडकरींना एकूण ६ लाख ३४ हजार ८१२ मते मिळाली तर विकास ठाकरेंना ५ लाख ०५६,७२ एवढी मते मिळाली.या फेरीत गडकरींचे मताधिक्य १ लाख २९ हजार १४० एवढे झाले.१९ साव्या फेरीमध्ये गडकरींना ६ लाख ४८ हजार २०१ मते होती तर विकास ठाकरेंना ५ लाख,१३ हजार ४१९ मते होती.शेवटच्या २० साव्या फेरीमध्ये गडकरींना ६ लाख ५२ हजार ८०९ मते होती तर विकास ठाकरेंना ५ लाख १५ हजार ९४१ मते मिळाली.या फेरीमध्ये देखील गडकरींना ४ हजार ६०८ मतांची लीड मिळाली.शेवटच्या काही फे-या या उत्तर नागपूरातील होत्या हे विशेष.
पोस्टल बॅलेट पेपरच्या मतगणनेतून गडकरी यांना २ हजार २१८ मत तर विकास ठाकरेंना १ हजार ४८३ मते मिळाली.पोस्टल बॅलेटची मते मिळून गडकरी यांना एकूण ६ लाख ५५ हजार २७ मते मिळाली तर विकास ठाकरेंना ५ लाख १७ हजार ४२४ मते मिळाली.
मतगणनेच्या वेळी उत्तर नागपूरातील ८१ क्रमांकाच्या वोट मशीनमध्ये बिघाड झाल्याने ती उघडत नव्हती.या मशीनचा क्रमांक BYTEYBE १२७११ होता.याशिवाय एका मशीनमध्ये एक मत मिसिंग होते.यानंतर ते सापडले.बूथनिहाय गडकरी व विकास ठाकरेंना किती मते पडली या मतगणनेला वेळ लागणार आहे.गडकरी यांनी हा विजय स्वप्रतिमवर खेचून आणला असल्याचे बोलले जात आहे.संपूर्ण देशात जिथे ‘मोदी’सरकारची गॅरेंटी जनतेनी काठावर उत्तीर्ण केली तिथे नागपूरात मात्र,गडकरी हे स्व-प्रतिमेवर निवडून आलेत,यात दुमत नाही.गडकरी यांच्या या विजयामध्ये भाजप,कमळ किवा पंतप्रधान मोदी यांचे कोणतेही श्रेय नसल्याचे जाणकार सांगतात.
गडकरी यांनी हा विजय अक्षरश: खेचून आणला असून पहिल्यांदा त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संपूर्ण कुटूंबिय प्रचारात उतरले होते.
पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक केंद्रिय मंत्र्यांच्या नावांसह भाजपने १९३ उमेदवारांची जी पहीली यादी जाहीर केली त्यात गडकरी यांचे नाव नव्हते.दूस-या यादीमध्ये गडकरींच्या नावाची घोषणा झाली होती.यानंतर मोदी यांच्यासोबत गडकरी यांच्या वैचारिक मतभेदांचे अनेक किस्से मशहूर झालेत.मोदी यांच्या एकूण दहा वर्षांच्या कारकीर्दीचा परिणाम गडकरी यांच्या निवडणूकीवर देखील होणार याची आक्षंका असल्यानेच गडकरी यांचे सुपुत्र सारंग गडकरी यांनी मुस्लिमांना आवाहन करताना,भाजप नव्हे तर गडकरींच्या विकासकामांना बघून मतदान करण्याचे आवाहन केले होते.तो व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला होता.यानंतर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी तर ‘सामना’मध्ये अग्रलेख लिहत नागपूरात गडकरी यांना हरविण्यासाठी मोदी,शहा आणि फडणवीस यांची मिलीभगत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.त्या आरोपावर गडकरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मोदी यांनी रामटेकचे शिंदे सेनाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ कन्हानमध्ये सभा घेतली त्यावेळी गडकरी हे मंचावर उपस्थित होते.१९ एप्रिल रोजी ज्या दिवशी देशात पहील्या टप्प्याचे मतदान होते त्या दिवशी मोदी यांनी वर्धा येथे सभा घेतली व नागपूरात रात्रभर मुक्कामी होते.मात्र,गडकरी-मोदी भेट टाळण्यात आली.यावर देखील चांगलेच चर्वित-चर्वण झाले.नागपूरातील अनेक नेते हे गडकरी यांच्या प्रचारापासून अलिप्त होते.त्यामुळेच गडकरी यांचे हे यश ठलकपणे उठून दिसले.४ लाखांच्या मताधिक्याने गडकरींचा विजय होणार असल्याची वल्गना करण्यात आली होती मात्र,दीड लाख ३७ हजार ६०३ मतांच्या मताधिक्यावर केंद्रात दोन टर्म मंत्री असलेल्या गडकरींची विजयश्री थांबली.याचे अनेक अन्वार्थ निघतात.२०१९ मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात गडकरींचे मताधिक्य अडीच लाखांच्या वर होते.
यंदा काँग्रेसने गट-तट विसरुन विकास ठाकरेंच्या पाठीशी उभे राहून एक दिलाने लढत दिल्यानेच पाच लाखांच्या वर विकास ठाकरे मत मिळवू शकले.मात्र,विजयामध्ये ते परवर्तित होऊ शकले नाही.तरी देखील महाराष्ट्राच्या उपराजधानीतील या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते.ही लढत एकतर्फी झाली नसून अटीतटीची झाली.विकास ठाकरेंच्या पारड्यात नागपूरकर मतदारांनी भरभरुन मते टाकली.याचा फायदा येत्या विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसला फायदा पोहोचविणारा व भाजपला अडचणीत आणनारा ठरेल,यात शंका नाही.
विजयी घोषित झाल्यानंतर गडकरी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.नातवंडांसोबत गडकरी यांनी या विजयाचा आनंद लृटला.कळमना येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांच्या चेह-यावर विजयाचा आनंद दिसत होता.मात्र,दुसरीकडे चारशे पारची वल्गना करणा-या त्यांच्या पक्षाला संपूर्ण देशात मतदारांनी बहूमताच्या उंबरठ्यावर आणून सोडले,याचे देखील चिंतन त्यांच्या चेह-यावर उमटलेेले दिसून पडले.
मतदानाचा निकाल निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी घोषित केला.यानंतर गडकरी यांनी कळमना येथे येऊन विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले.इटनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके,प्रा.संजय भेंडे,भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे,माजी नगरसेवक बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.माध्यमांशी संवाद साधताना गडकरी यांनी नागपूरकर मतदारांचे,कार्यकर्त्यांचे व शुभचिंतकांचे आभार मानत नागपूर शहराला स्वच्छ,सुंदर व प्रदुषणमुक्त नागपूर बनविण्याचा संकल्प जाहीर केला.
Shri Nitin Gadkari ji Tweets :
नागपूरच्या मतदार बंधू-भगिनींचे मन:पूर्वक आभार!
आपले प्रेम व आपला विश्वास यामुळेच हा विजय मिळाला आहे. नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. देशातील विकसित शहरांच्या यादीत नागपूरला स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आपले प्रेम व आपला विश्वास हीच माझी मोठी ताकद आहे.
पुन:श्च धन्यवाद!🙏🏻
…………………………………
गेली १० वषें केंद्रात मंत्री असलेल्या नेत्याविरोधात लढण्याची संधी मिळाली तसेच प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. त्यातही कॉंग्रेस व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. परिणामी,कॉंग्रेसचे मत वाढले. हे सर्व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले. पराभवाने खचून न जाता यापुढे सकारात्मक विकासाचे राजकारण सुरु राहील.