Advertisements

सव्वा कोटींच्या कृत्रिम टाकीत सात वर्षीय महेशचा अपघाती मृत्यू कि राजकीय हत्या!

भाजप नगरसेवकाचा कारनामा:खोट्या सह्या सादर करुन अट्टहासाने मंजूर करुन घेतली कृत्रिम टाकी
नागपूर,ता.१५ जुलै २०२५: दिनांक २० डिसेंबर २०१८ रोजी भरलेल्या मनपाच्या सर्वसाधाण सभेत, सदस्यांनी सादर केलेल्या विविध विषयात एक विषय हा कृत्रिम टँकच्या निर्माणाचा होता.त्यांची संख्या,झोननिहाय अथवा शहरस्तरावर एकत्रित निविदा काढण्यात आलेल्या कृत्रिम टँकची जागा व कोटेशन करण्यात आले किंवा कसे याबाबत माहिती तसेच सदर कामाचे कंत्राट शहरस्तरावर किंवा झोननिहाय कोटेशन एकाच कंत्राटदाराला मिळाले किंवा कसे?सदर कामाचे झोननिहाय प्राकलनाची माहिती व त्यात कंत्राटदारास कृत्रिम टँक बनविण्या व्यतिरिक्त कोण कोणते काम करणे अपेक्षीत होते .तसेच या संपूर्ण कामास कोणत्या हेडमधून निधी उलब्ध करण्यात आले.तसेच त्या संपूर्ण कामाचे देयके अदा झाली किवा नाही,या संदर्भात घेतलेल्या निर्णयावर सविस्तर चर्चा करुन उचित निर्णय घेण्याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील १(जे)प्रमाणे मनपाच्या अरोग्य विभागाच्या अधिका-यांसोबत भाजपचे माजी स्थायी समितीचे सभापती व नगरसेवक पिंटू झलके यांच्या द्वारे जारी नोटीसवर चर्चा पार पडली.यात संपूर्ण नोटीसचा विषय फक्त देयके,कंत्राटदार हाच होता,यात कृत्रिम टँकच्या निर्मिती स्थानाची सुरक्षा,यावर कोणतीही चर्चा भाजपच्या नगरसेवक,पदाधिकारी व मुर्दाड प्रशासनाच्या अधिका-यांना गरजेची वाटली नाही.
शहरातील तलावांमध्ये गणेश विसर्जन कायदेशीररित्या बंद झाल्याने शहरात विविध झोनमध्ये कृत्रिम टँकच्या निर्मितीसाठी या निविदा काढण्यात आल्या होत्या.यातील एक निविदा सरदार वल्लभभाई पटेल मैदान(कच्छी विसा)ए.वि.जी.ले-आऊट लकडगंजसाठी देखील होती ज्याचा विरोध तेथील नागरिकांनी केला.अर्जदार विजय वासुदेवराव कारंजकर यांनी मनपा आयुक्त व पोलिस आयुक्तांना केलेल्या तक्रार अर्जात या मैदानात कृत्रिम टँकची मागणी येथील स्थानिक रहीवाशींनी केल्याचे दावा पत्र भाजपचे तत्कालीन व आताचे माजी नगरसेवक नरेंद्र(बाल्या)बोरकर यांनी शेकडो लोकांच्या सहीनिशी ,मनपा आयुक्तांना दिले मात्र,त्या निवेदनात केवळ बोगस सह्या नसून, मृत व्यक्तींच्या देखील सह्या होत्या!
याचा अर्थ बाल्या बाेरकर यांना स्थानिकांचा विरोध डावलून लहान मुले खेळत असलेल्या त्या मैदानात काहीही करुन ,१ कोटी २८ लाख २६ हजार ३१७ रुपये एवढ्या निधीतून हा कृत्रिम टँक निर्माण करायचाच होता.मनपाने गोरेवाडासह विविध झोनमध्ये अशी ८ ते ९ कृत्रिम टँक निर्माणाचे धोरण स्वीकारुन त्यासाठी अंदाजे ४९ कोटींचे बजेट ठेवले असल्याची बाब पुढे आली आहे.

या मैदानात कुठेही खोदकाम नको,हे मैदान लहान मुले,ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील रहीवाशींसाठी एकमेव विरुंगळ्याचे ठिकाण असल्याचे सांगत, या कृत्रिम टँकला स्थानिक रहीवाशींनी पुरजोर विरोध केला मात्र,सत्ताधारी राजकीय पक्षाचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी सर्वांचा विरोध झुगारुन,मनपा आयुक्तांवर राजकीय दबाव निर्माण करुन कोट्यावधीचा हा कृत्रिम टँक निर्माण करुन घेतला असल्याचा आरोप येथील स्थानिक करतात.
महत्वाचे म्हणजे,यासाठी शेकडो लोकांच्या बोगस सह्याचे निवेदन मनपा आयुक्तांकडे सोपविण्यात आले.यातील एक नाव स्व.वासुदेवराजी कारंजकर(स्वातंत्र संग्राम सैनिक) यांचे देखील होते ज्यांचे १९ मे १९८८ रोजी सकाळी ४ वाजता देहवासन झाले होते!मृत्यूचे प्रमाणपत्र व त्या दिवशी वृत्तपत्रामध्ये आलेले कात्रण जोडून त्यांचे सुपुत्र विजय वासुदेवराव कारंजकर, राहणार कच्छी विसा भवनच्या मागे,लकडगंज यांनी मनपा आयुक्त व पोलिस आयुक्तांकडे तक्रार पत्र सादर केले.प्रभाग क्र.२३ ,गरोबा मैदान,छापरु नगर येथे राहणारे भाजपचे माजी नगरसेवक बाल्या बोरकर यांनी खोट्या सह्या करुन,स्वत:चा राजकीय ताकदीचा गैरउपयोग करुन कच्छी विसा मैदानातील हिरवेगार एकूण आठ झाडांचा बळी घेऊन,अवैध रितीने गणपती विसर्जनासाठी अवाढव्य अश्या कृत्रिम टँकचे निर्माण कार्य सुरु केले आहे,हे काम तात्काळ थांंबवून या कामाची चौकशी करुन दोषीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी विजय कारंजकर यांनी गेल्या वर्षी १२ जून २०२४ रोजी पोलिस आयुक्तांना दिलेल्या अर्जात केली.

या पूर्वी हाच अर्ज त्यांनी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना दिला होता,ज्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
बाल्या बोरकर यांनी कृत्रिम टँकसाठी मनपा आयुक्तांना सोपवलेल्या निवेदनात ६४ व्या क्रमांकावर स्व.वासुदेवराव कारंजकर यांचे नाव असून त्या समोर चक्क खोटी सही करण्यात आली होती!
गणपती विसर्जनासाठी नागरिकांचा पराकोटीचा विरोध झुगारुन भाजपचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी आठ हिरवेगार झाडांचा बळी घेत आपले आर्थिक उखळ तर पांढरे करुन घेतले मात्र,याच टँकमध्ये तीन दिवस आधी १० जुलै रोजी एका सात वर्षीय निरागस चिमुकल्याचा जीव गेला!अग्निशमन विभागाला चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी टँकमधील संपूर्ण पाणी मशीनने आधी बाहेर काढावे लागले,त्यानंतर त्या निरागस चिमुकल्याचे पार्थिव त्यांना दिसले!ज्याच्या आयुष्याची सुरवात ही झाली नव्हती तो निपचित त्या मानवनिर्मित स्वार्थाच्या थडग्यात निजलेला होता!
चिमुकला महेश व त्याचा लहान भाऊ हिलाल परिहार वय वर्ष ३ व चुलत भाऊसोबत नेहमीसारखेच कच्छी विसा मैदानात खेळत होता.खेळताना त्यांचा चेंडू मैदानाच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या त्या कृत्रिम विसर्जन टँकमध्ये पडला.चेंडू काढण्यासाठी महेश खाली उतरला.सुमारे चार फूट पाणी असलेल्या या विर्सजन केंद्रात उतरताच तो बुडू लागला.त्याच्यासोबतचे दोघे टाकीतून बाहेर पडले.त्यांनी आरडाओरड सुरु केली.आसपासचे नागरिक धावले मात्र,अवाढव्य उंची व खोलीच्या त्या कृत्रिम टँकमध्ये उतरण्याचे धाडस कोणामध्येही नव्हते.नागरिकांनी लकडगंज अग्निशमन केंद्राला माहिती कळवली.संपूर्ण पाणी आधी मशीनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले यानंतर फायरमन दिलीप चव्हाण यांनी त्या चिमुकल्या पार्थिवाला बाहेर काढले!
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने(प्रकल्प)हा कृत्रिम विसर्जन टॅंंक निर्माण केला आहे मात्र,सव्वा कोटींच्या या कृत्रिम टँकमध्ये आणखी काहीशे लाख खर्च करुन या विभागाला सुरक्षेची उपाययोजना करने गरजचे वाटले नाही.
गणेशोत्सवाला अद्याप दीड महिन्यांचा अवधी असताना या अवाढव्य उंची व लांबीच्या कृत्रिम टँकला कुठेही सुरक्षेसाठी कठडे लावण्यात आले नव्हते.महत्वाचे म्हणजे मैदानात लहान मुले सतत खेळत असतात,याची माहिती असतानाही कुठेही सूचना फलक नव्हते.अट्टहासाने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमधील हा दूर्देवी मृत्यू म्हणजे भाजप नगरसेवक बाल्या बोरकर यांच्या महत्वाकांक्षेचा आणि लोभाचा बळी असल्याचा संताप येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.हे खेळाचे मैदान असून भाजप नगरसेवकाची जागीर नाही,मात्र,केंद्र व राज्यातील सत्तेच्या बळावर स्थानिकांचे मत झुगारुन, बाल्या बोरकर यांनी आपली मागणी कोट्यावधीच्या या टँकसाठी खोट्या सह्यांचा आधार घेऊन रेटली,परिणामी,खोट्या सह्यांच्या आधारे निर्माण करण्यात आलेल्या टँकमध्ये अवघ्या सात वर्षीय महेश या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू ही ‘राजकीय हत्याच’ असल्याचा आरोप येथील स्थानिक करतात.
महत्वाचे म्हणजे आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या नागपूर महानगरपालिकेने गोरेवाडा येथील वनराई नष्ट करीत,पर्यावरणवाद्यांचा विरोध झुगारुन त्या ठिकाणी देखील १३ कोटी,५१ लाख ४२ हजार ६८० रुपयांचा कृत्रिम टँक तयार केला आहे!
महेश कमल परिहार हा आज या जगात नाही.त्याचे वडील कमल परिहार हे त्यांच्या चार मुलांसह उमीया सोसायटी परिसरात राहतात.ते मूळचे नेपाल येथील आहेत. एक वर्षा पूर्वीच ते नागपूरात आले होते.महेश हा त्यांचा दूस-या क्रमांकाचा मुलगा होता.ते बरबटे उद्यान परिसरात सुरक्षा रक्षकाचे काम करतात.महेशची आई अापल्या मोबाईलमध्ये महेशसोबत घालवलेले आयुष्यातील सात वर्षांची सुख-दु:खाची गोळाबेरीज करत ठार वेडी झाली आहे.लाखमोलाच्या मातृत्वाला काही लाखांच्या स्वार्थाने आज कायमचे उजाडले.
या घटनेतून महापालिकेने धडा घेत इतर सर्व ठिकाणच्या कृत्रिम टँकच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.अन्यथा,नगरसेवकांच्या दबावाखाली शहरातील उद्याने,मैदाने अशाच कोणत्या तरी चिमुकल्यांचे थडगे बनत राहतील,असे येथील स्थानिक म्हणतात.
या घटनेविषयी ‘सत्ताधीश’ने खास बाल्या बोरकर यांच्याशी संपर्क केला असता ते गोवाहटीमध्ये कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
