
आमदार चषक स्पर्धेची थाटात सुरवात
नागपूर,ता.१४ मे २०२२: नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे आमदार चषक ही स्पर्धा आम्ही २०२० मध्येच आयोजित करणार होतो मात्र करोना महामारीच्या प्रकोपामुळे हे आयोजन पुढे ढकलावे लागले.या स्पर्धेत एकूण ३२ चमूंची निवड आम्ही केली आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पावणे दोनशे चमू आल्या होत्या त्यामुळे सर्वात मोठी अडचण प्राथमिक स्तरावरच आली की कोणत्या चमूला संधी द्यावी कोणत्या नाही,आम्हाला कोणालाही निराश करायचं नव्हतं पण वेळेचं बंधनही पाळणे गरजेचे होते त्यामुळेच आम्ही यंदाच्या आमदार चषक स्पर्धेसाठी एकूण ३२ चमूंची निवड केली मात्र इतरांनीही निराश होण्याची गरज नाही कारण ज्यांची निवड यंदाच्या स्पर्धेसाठी झाली नाही त्यांची निवड आम्ही पुढील वर्षीच्या आमदार चषक स्पर्धेतसाठी नक्कीच करु,आधी त्यांना संधी देऊ असे प्रदेश युवा काँग्रेसचे सरचिटणीस केतन ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.सदर येथील बिशप कॉटन शाळेच्या मैदानात आज पासून आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद् घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की शेवटी हा एक खेळ आहे आणि खेळण्यासाठी सगळेच उत्साही असतात.सर्वांची अशीच ईच्छा असते त्यांनी खेळात सहभाग घ्यावा,पारितोषिक मिळवावे.विशेष म्हणजे आमदार क्रिकेट स्पर्धेसाठी आम्ही नागपूर शहरातील खेळाडूंनाच प्राधान्य दिले आहे कारण इतर भागातून खेळाडूंना समाविष्ट केले असते तर नागपूर शहरातील कर्तुत्ववान व प्रतिभावान खेळाडूंची प्रतिभा ही झाकोळलीच राहीली असती.खेळ आणि राजकारण हे हातात हात घालून चालतात, केतन ठाकरे याची ‘खेळातून राजकारणाकडे’ ही वाटचाल मानायची का?या प्रश्नावर बोलताना, माझ्या मतानुसार खेळ वेगळं आणि राजकारण वेगळं आहे,ही स्पर्धा आम्ही महालक्ष्मी फाऊंडेशनद्वारा आयोजित केली आहे आणि आमचे जे प्रेरणास्थान,मार्गदर्शक आहेत त्यांना आम्ही येथे निमंत्रित केले आहे,ते राजकीय आहेत आमचा खेळ नाही, त्यामुळे राजकारण आणि ’खेळ’हे जरी हातात हात घालून चालत असले तरी या ठिकाणी आपण दोन्ही गोष्टी वेगवेगळे ठेवले आहे त्यामुळेच या ठिकाणी आपण पक्षाची फलके लावली नाहीत फक्त काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शकांचीच फलके लावण्यात आली असल्याचे केतन यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलताना पश्चिम नागपूर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे म्हणाले,की महालक्ष्मी फाऊंडेशन व पश्चिम नागपूर, यूथ काँग्रेसतर्फे व सर्व मंडळींनी मिळून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.दोन वर्ष करोनाच्या काळात गेल्याने तरुणाईला ही संधी मिळाली नाही आणि टेनिस बॉल क्रिकेटचे नागपूर शहरात एक वेगळे आकर्षण आहे.या प्रकारच्या स्पर्धा आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा देखील अावडीने खेळायचो तसेच अश्या स्पर्धांचे आयोजन करीत होतो.आता मात्र यूथ काँग्रेसच्या तरुणांनी ही स्पर्धा आयोजित केली असून याला ’आमदार चषक’असे नाव दिले आहे.
शहरातील तरुणाईला आनंद व उत्साह प्रदान करणारी ही स्पर्धा फक्त यंदाच नव्हे तर कायम सुरु राहावी,अशीच माझी सदिच्छा आहे.दर वर्षी याचे आयोजन व्हावे.या वर्षी नियोजनात काही चूका राहील्यास पुढील वर्षी त्यात सुधारणा करावी,त्या पुढील वर्षी आणखी सुधारणा व्हावी अशी माझी अपेक्षा अाहे.रात्रीच्या वेळी टेनिस बॉलने खेळल्या जाणा-या क्रिकेट खेळाचे तरुणाईमध्ये जास्त आकर्षण असून या स्पर्धेत ते दिसून ही पडत आहे.पश्चिम नागपूरच्याच अनेक चमूंनी स्पर्धेत भाग घेतला असून अश्या प्रकारच्याच स्पर्धा खेळातून त्यांचा सराव होत असतो व पुढे आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये लेदर चेंडूसोबत खेळण्यास ते सक्षम ही होतात,असे ठाकरे यांनी सांगितले.अश्या प्रकारच्या स्पर्धा या खेळाडूंमध्ये उत्साह संचारतात,त्यांना खेळण्यास संधी प्राप्त करुन देतात व त्यांच्या खेळात सुधारणा देखील घडवून आणतात.या स्पर्धेत तर आयपीएलमध्ये खेळून चुकलेले देखील काही खेळाडू आहेत ज्यांनी या आमदार चषक स्पर्धेत भाग घेतला.
अश्या प्रकारच्या खेळांचे आयोजन हे खेळाडूच करु शकतात,राजकीय नेते अश्या प्रकारचे आयोजन करु शकत नाही,राजकीय लोकं आयोजनासाठी मागे राहू शकतात मात्र अश्या प्रकारच्या स्पर्धांसाठी खेळाडू तरुणांनीच समोर यावं व आज ज्या प्रकारे आमदार चषकचे उद् घाटन झाले आहे त्याच प्रकारे दर वर्षी या आयोजनातून शहरातील खेळाडूंना संधी प्राप्त व्हावी आणि ही चषक स्पर्धा पुढे ही अविरत सुरु राहावी अशी आमची ईच्छा असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलताना माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांची प्रशंसा करीत त्यांनी जर मनामध्ये एखादी गोष्ट आणली तर ती पूर्ण करीत असल्याचे सांगितले.नागपूरात क्रिकेटची मैदाने यांची संख्या वाढली पाहिजे अशी मागणी मुत्तेमवार यांनी केली.याच मैदानातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होणार आहेत असे ते म्हणाले.खेळांडूनीही त्यांना जी संधी प्राप्त झाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करुन घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला.
केतन व त्याच्या चमूने ही जी आमदार चषक स्पर्धा आयोजित केली आहे ती फक्त एकाच वर्षा पूरती मर्यादित राहू नये तर दरवर्षी याचे आयोजन करावे अशी सूचना त्यांनी दिली व स्पर्धेतील सर्व चमूंंना यश प्राप्त होण्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.सध्या आयपीएलच्या स्पर्धा सुरु आहेत अश्यावेळी प्रेक्षककांचा प्रतिसाद आमदार चषकला मिळले का?असा प्रश्न मी केतनला केला होता मात्र जवळपास पावणे दोनशे चमू ही स्पर्धा खेळण्यास उत्सूक असल्याचे तो म्हणाला.तसं ही आपल्या देशात क्रिकेट हा सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे.अश्या या खेळाचे आयोजन केतन व काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केले याचा मला विशेष आनंद झाला असल्याचे मुत्तेमवार म्हणाले.अश्याच प्रकारच्या स्पर्धांमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडत असतात.ज्यांना संधी मिळत नाही त्यांना अश्या स्पर्धा संधी मिळवून देत असतात.आयपीएलवरुन क्रिकेटच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो,एका एका खेळाडूंला कोट्यावधीची किंमत देऊन बुक केले जाते.सध्या मुंबईचे स्टेडियम हे आयपीएलचे सामने बघण्यासाठी दहा-वीस हजारांच्या गर्दीने नव्हे तर संपूर्ण स्टेडियम भरगच्च भरलेले आपण पाहतो.आमदार चषकने अश्याच लोकप्रिय खेळाची संधी तुम्हाला प्रदान केली त्यांचा योग्य विनियोग करा,असा सल्ला विलास मुत्तेमवार यांनी स्पर्धकांना दिला.
यावेळी बोलताना क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले,की करोनानंतर आता सगळीकडे आनंद व उत्साहाचे वातावरण आहे,अश्या वातावरणात सर्वांनी एकत्र आले पाहिजे,एकोपाने राहीले पाहिजे.फेसबुक व व्हाटॅस अपवर आजचा तरुण वर्ग खूप जास्तच गुंतलेला आहे.कुठेतरी आता आपल्याला एक मर्यादा रेषा आखणे गरजेचे आहे.जगामध्ये काय चाललं आहे याचे ज्ञान मिळवण्यासाठी या समाज माध्यमांचा उपयोग करने ठिक आहे,असे जर केले नाही तर आपण ज्ञानाच्या स्पर्धेतूनच बाद होऊन जाऊ मात्र समाज माध्यमांचा उपयोग करताना समाज माध्यमांना आपला उपयोग करु देऊ नका,असा सल्ला त्यांनी दिला.
मुत्तेमवार यांनी आदेशच दिला आहे की शहरातील सगळी मैदाने नीट करा,आता सक्करदरापासूनच त्याची सुरवात करु,असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी बोलताना त्यांनी केतन ठाकरे याचे विशेष कौतूक करीत या तरुण पिढीचा ‘आयक्यू’ आपल्या पिढीपेक्षा फार जास्त असल्याची पुश्ती जोडली.आपल्या मोबाईल फोनमधील किती तरी फिचर्स आपल्यालाच कळत नाही मात्र ही तरुण पिढी ती सहज हाताळतात.खेळाडूंना उद्देश्ाून, खेळाडूंनी आपापसातील एकोपा कायम ठेवण्याचा सल्ला याप्रसंगी त्यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार ॲड.अभिजित वंजारी यांनी, केतन ठाकरे व त्याच्या चमूने करोना महामारीच्या काळानंतर एक चांगली सुरवात नागपूर शहरात केली असल्याचे सांगितले.अश्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धांची गरज फक्त नागपूरातच नव्हे तर संपूर्ण देशात असल्याचे त्यांनी सांगितले.आज सोशल मिडीयामुळे खेळ हा मागे पडत चालला आहे,सोशल मिडीयाचा योग्य तो वापर करुन खेळाला आपल्या जीवनात प्राधान्य द्या,असे अावाहन त्यांनी केले.खेळांना पुढे आणन्याची आज ख-या अर्थाने गरज असून ती गरज आ.विकास ठाकरे व क्रीडा मंत्री सुनील केदार हे निश्चितच पूर्ण करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आकाशात रंगबिरंगी फूगे सोडून आमदार चषक स्पर्धेची सुरवात करण्यात आली.मुत्तेमवार व केदार यांच्या हस्ते मैदानावरील फित कापण्यात आली.वंजारी यांनी नारळ फोडून शुभ शकुन केला.केदार यांच्या बॉलिंगवर मुत्तेमवार यांनी फटकेबाजी केली.
अशी रंगणार आमदार चषक स्पर्धा-
शहरातील पहिल्या आमदार चषक १४ ते २२ मे दरम्यान सिव्हिल लाइन्समधील बिशप कॉटन स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. पश्चिम नागपूरचे लोकप्रिय आमदार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या संकल्पनेतून व पश्चिम नागपूर काँग्रेस कमिटी व मित्र मंडळाच्या वतीने या आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फ्लड लाइटमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार असून अत्यंत भव्य असलेली ही स्पर्धा अशाप्रकारची पहिलीच स्पर्धा असणारआहे. स्पर्धेतील विजेत्यांना चार लाखांहून अधिक रकमेचे पुरस्कार देण्यात येणार आहे.
शहरातील टेनिस-बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आमदार विकास ठाकरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. टेनिस बॉल क्रिकेटपटूंना या स्पर्धेद्वारे मोठ्या रकमेची अनेक आकर्षक पारितोषिक प्राप्त करण्याची संधी असेल. स्पर्धेतील विजेत्याला आकर्षक चार फुंट उंच करंडकासह आणि दोन लाख, २२ हजार, २२२ रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. तर उपविजेत्या संघालाही चषकआणि १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. तर तिसऱ्या स्थानावरील संघ ५५हजार ,५५५ रुपये रोख पारितोषिक आणि चषकाचा मानकरी ठरणार आहे.
याशिवाय स्पर्धेत मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरवण्यात येईल. तर सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांनाही प्रत्येकी ५ हजार ५५५ रुपये रोख आणि चषक प्रदान पारितोषिक दिले जाईल. तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीराला आकर्षक चषक मिळेल.
स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळवण्यात येणार असून ३२ संघ सहभागी होतील. प्रत्येक संघात ११ खेळाडूंचा समावेश असेल. अंतिम सामना वगळता सर्व सामने आठ षटकांचे असतील. अंतिम लढत दहा षटकांचा खेळवण्यात येईल. सर्व संघाना रंगीत किट देण्यात येईल. स्पर्धेत १६ संघ पश्चिम नागपुरातील असतील तर इतर १६ संघ शहराच्या उर्वरित भागातील आहेत. स्पर्धेतील लढती सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होतील. दररोज पाच सामने खेळवण्यात येतील.
सर्व सामने tenniscricket.in द्वारे YouTube वर थेट प्रक्षेपित केले जातील. सामन्यांच्या थेट समालोचनाचा क्रिकेट रसिकांना आनंद घेता येईल. तसेच मैदानावर एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव केतन विकास ठाकरे, स्पर्धेचे संयोजक विनीत तोडकर, पश्चिम नागपूर ब्लॉक १० चे अध्यक्ष राजकुमार कमनानी, ब्लॉक ११ चे अध्यक्ष देवेन रौतेले, ब्लाॉक १२ चे प्रमोदसिंग ठाकूर आदी परिश्रम घेत आहेत.

आमचे चॅनल subscribe करा