Advertisements

प्रवाश्यांचा जीव धोक्यात: भरपाई ही मिळत नाही

(छायाचित्र: चालकाला डूलकी लागल्याने सैनी ट्रॅव्हल्सची बस दूभाजकाला धडकून अशी अपघातग्रस्त झाली!बसचा समोरचा भाग पूर्णपणे अपघातग्रस्त झाला)
नागपूरातील ज्येष्ठ पत्रकाराचाही मुलासह अपघात
नागपूर,ता.२७ एप्रिल २०२५: सैनी ट्रॅव्हल्सच्या बसचा मार्च महिन्याच्या २४ तारखेला यवतमाळ जिल्ह्यात कोल्हापूर-नागपूर बसचा (एमच एच ४०/सीएम ५०३५) पहाटे पावणे चार वाजता चालकाला डूलकी लागल्याने भीषण अपघात झाला. भरधाव बस दूभाजकाला धडकून बसमधील ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले.यात या प्रवाश्यांची काय चूक होती?राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सवाले कोणाच्या जीवावर इतके उदार झाले आहेत?विदर्भ ट्रॅव्हल्सचा जीवघेणा अपघात घडून २५ प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला हाेता,त्या घटनेवर नुकतेच युती सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ पाहणारे अजित पवार,तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हळळत व्यक्त करीत तात्काळ घटनास्थळ गाठले होते कारण,दुस-याच दिवशी अजित पवार यांचा शपथविधी सोहळा होता!२५ लाखांची मदत त्या वेळी महायुती सरकारने मृतकांच्या कुटूंबियांना जाहीर केली होती,चार वर्षांचा कालावधी उलटला,पाच लाखांची बोळवण करुन सरकारने हात झटकले.
आजपर्यंत २५ मृत्यूंसाठी कारणीभूत ठरलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या मालकाला,चालकाला किवा कोणत्याही आरोपीला अटक झाली नाही,या मृत्यूमध्ये संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला तो माय-लेकीच्या मृत्यूमुळे.आपल्या चिमुकलीला आगीपासून वाचवण्यासाठी त्या आईने किती धडपड केली असावी,त्या ट्रॅव्हल्सचे आपातकालीन दार देखील उघडले जाऊ शकले नव्हते ,इतकं नियमबाह्यरित्या सामान त्यात कोंबलेलं होतं.चालक आणि वाहक तर उड्या मारुन खिडकी बाहेर सुखरुप निघाले मात्र,ज्या चालकाच्या भरवश्यावर इतके जीव निर्धास्त प्रवास करीत होते,त्यांचा मात्र कोळसा झाला.मृत्यूनंतर देखील त्या माय-लेकी एकमेकींना बिलगलेल्या होत्या! प्रशासनाला त्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांचे डीएनए जुळवण्यासाठी भागीरथ प्रयत्न करावे लागले होते.१ जुलै २०२३ रोजी समृद्धि महामार्गावर हा अपघात झाला होता यात २५ मृत्यू व ८ गंभीर जखमी झाले होते.ही घटना पिंपलखुटा गावाजवळ झाली होती.विदर्भ ट्रॅव्हल्सची ती बस नियमबार्ह्यरित्या ‘यमदूत’ बनून महामार्गावर धावत होती परंतु पांढ-या वर्दीचे पहरेदार,प्रशासन व सरकार सगळ्यांची अर्थपूर्ण डोळेझाक सुरु होती.

त्या घटनेनंतर राणा भीमादेवी थाटात सरकारने खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहतूकीसंबंधी अनेक घोषणा केल्या होत्या.काही काळ खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची मनमानी थांबली ही होती मात्र,पुन्हा त्यांच्या मनमानी कारभाराने डोके वर काढले असल्याचे अनेक अपघातातून सिद्ध झाले.सैनी ट्रॅव्हल्सच्या अपघाताला आता एक महिना उलटला आहे,इतक्या भीषण अपघातानंतर देखील यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री,आमदार,नागपूरचे पालकमंत्री,नागपूरचे आमदार कोणी देखील त्याची दखल घेतली नाही.त्या अपघातात नागपूरातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार व त्यांचा तरुण मुलगा हे देखील गंभीर जखमी झाले.अपघातानंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात व नंतर नागपूरपर्यंत अनेक प्रवासी हे स्वखर्चाने उपचारासाठी आले.सैनीच्या मालकाने गंभीर प्रवाश्यांची कोणतीही विचारपूस केली नाही, ना मदतीचा हात दिला ना उपचाराचा खर्च भरुन दिला.खासगी ट्रॅव्हल्सच्या मालकांना कशाची इतकी गुर्मी आहे की ते कायदा आणि नियमांनाही जुमानत नाही?‘कानून के हात लंबे होते है’,आजपर्यंत हे ऐकले आहेे मात्र,ट्रॅव्हल्सवाल्यांचे हात किती वरपर्यंत पोहोचले असतात?प्रवाश्यांचा प्राण वेठीस धरुन ते कसे इतके र्निढावलेले असतात?यावर देखील संशोधन होणे गरजेचे आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या महामार्गावर तर अपघातांची मालिकाच सुरु असते.या जिल्ह्याला अशोक उईके हे कॅबिनेट मंत्री मिळाले आहे.पूर्व मंत्री संजय राठोड देखील याच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात.त्यांनी देखील या गंभीर अपघातांची कोणतीही दखल घेतली नाही.इतकंच नव्हे तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लेखी देखील, खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवाश्यांच्या जीवावर उदार होऊन केला जाणारा मनमानी कारभार,खिजगणतीत.त्यांच्या तोंडी अद्यापही खासगी ट्रॅव्हल्स ,अपघात आणि प्रवाश्यांची सुुरक्षा हा विषय कधी आलाच नाही.कारवाईचे अधिकार असणा-या वाहतूक पोलिस विभागावर तर काहीही न लिहलेलेच बरे!धृतराष्ट्राची आधुनिक औलाद देखील त्यांच्याहून जास्त डोळस ठरेल!

(छायाचित्र-ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार)
सैनी ट्रॅव्हल्सच्या दूर्घटनंतर लगेच यवतमाळ जवळ असलेल्या उमर्डा घाटात पुणे-चंद्रपर ही डीएनआर ट्रॅव्हल्सची बस (एम ३४ बीजी ००७७)उलटली.सुदैवाने ती एका भक्कम झाडाला अडकली,त्यामुळे बसमधील २९ प्रवाश्यांचा जीव वाचला.मात्र,या अपघातात १२ प्रवासी जखमी झाले.त्या पूर्वी जबलपूर रोडवर बुलढाणा जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला,यात पाच जणांचा मृत्यू झाला!गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर याच सोमवारी रात्री भीषण अपघात झाला.रायपूरहून नागपूरच्या दिशेने निघालेली कांकेर ट्रॅव्हल्सची बस(सीजी ०४ एनए ७७७६)रात्री १० च्या सुमारास सौंदड रेल्वे फाटकाजवळ अचानक पेटली.मात्र,प्रसंगावधान राखत बसचालकाने बस थांबवत सर्व प्रवाश्यांना बाहेर काढल्याने अनर्थ टळला.प्रवासी बाहेर पडण्याची आणि संपूर्ण बस धू-धू करुन जळण्याची एकच वेळ साधली गेली होती! या बसमध्ये देखील ३० प्रवासी होते.ही घटना रात्री १० च्या सुमारास घडली ,ती पहाटे ४-५ वा.च्या सुमारास घडली असती तर?याची कल्पना देखील करु शकत नाही.सैनी ट्रॅव्हल्सच्या चालकाला याच कातर वेळी डूलकी लागली होती अन्..अपघात झाला.

मूळात दोन चालक असतानाही दुस-या चालकाकडे वाहन का सोपवण्यात आले नाही?ते प्रवासी रिकामटेकडे होते की पर्यटनासाठी निघाले होते का?कोणाची परिक्षा होती,कोणाचे व्यापार उद्दीम होते.कोणती आपल्या कुटूंबात परत जात होते.सुरक्ष्त प्रवासाचा त्यांचा हक्क नव्हता का?ज्या अपघातात मृत्यू होत नाही,त्या प्रवाश्यांना खासगी बस मालक आणि सरकार कोणतीही भरपाई देत नाही,हे सरकारच्या तरी नितीमत्तेमध्ये बसतं का?असा सवाल केला जात आहे.ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून ते अंथरुणावर खिळले आहेत.त्यांच्या तरुण मुलांच्या पायांना देखील जबर मार लागला असून शस्त्रक्रियेसाठी अडीच-तीन लाखांचा खर्च मागितला जात आहे.त्याच्या पुढे तर अजून संपूर्ण आयुष्य जगायचं पडलं आहे!ऐरवी कोणाकोणाच्या मदतीसाठी धाव घेणारे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे अतिशय सामान्य कुटूंबातील पत्रकाराच्या तरुण मुलाच्या उपचारासाठी धाव घेतील का?
१५००,१८०० ते २५०० रुपयांपर्यत तिकीट दर आकारुन सुद्धा खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाश्यांच्या जिवितेची सुरक्षा देऊ शकणार नसतील तर,परिवहन मंत्रालयाने खासगी प्रवासी वाहतूकीवर बंदी आणावी,अशी मागणी केली जात आहे.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ हा नेमका कोणत्या श्रेणीतील पत्रकारांसाठी कार्यरत आहे?असा देखील सवाल नागपूरच्या पत्रकार जगतात उमटला आहे.
संपर्क क्रमांक-राजेंद्र उट्टलवार- ७७७०००८६१३
………………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
