Advertisements

नागपूर, ता. १६ : शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र या खड्ड्यांबाबत अचूक आणि योग्य माहिती मिळाल्यास तात्काळ ते बुजविता येऊ शकतात. यासाठी मनपाच्या ई-मेल, फेसबुक व ट्विटरवर पेजवर तक्रार नोंदवून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
मनपातर्फे प्राप्त झालेल्या तक्रारी आणि सर्वेद्वारे निदर्शनास आलेले खड्डे बुजविण्यात आले. मात्र शहरातील अनेक भागात अजूनही खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहे. अशा खड्ड्यांची माहिती मिळाल्यास मनपातर्फे त्वरीत बुजविण्याचे काम करण्यात येईल. यासाठी आता ई-मेलसह फेसबुक आणि ट्विटर पेजवर तक्रार करता येणार आहे.
शहरातील खड्ड्यांसंदर्भात विविध विभागाच्या अधिका-यांची समन्वय समितीही गठीत करण्यात आली आहे. समितीतर्फे शहरात खड्डे दुरूस्त करण्यात येत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरूस्तीबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रस्ता वापरण्यायोग्य नसल्यास व रस्त्यावर अपघात झाल्यास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. कंत्राटदारावर गुन्हा न नोंदविल्यास संबंधित अधिका-यावर जबाबदारी निश्चीत करून गुन्हा नोंदविला जाणार आहे. त्यामुळे खड्ड्यांसंदर्भात गांभीर्याने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिका-यांना दिले आहे.
तक्रार करताना ही काळजी घ्या-
ई-मेल, फेसबुक आणि ट्विटर पेजवर तक्रार करताना तक्रारदारांनी संबंधित रस्त्याचे अचूक स्थान जिओ टॅगिंगद्वारे नमूद करावे ज्यामुळे संबंधित मार्गावरील खड्ड्यांची तात्काळ दुरूस्ती करणे सोपे जाईल. याशिवाय तिन्ही सोशल मिडीयावर करण्यात येणा-या तक्रारी या केवळ खड्ड्यांसंदर्भातच असाव्यात. संपूर्ण रस्ता उखडला असल्यास त्याबाबत रितसर लेखी तक्रार मनपा कार्यालयात करण्यात यावी. विशेष म्हणजे नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारितील मार्गांवरील खड्ड्यांच्या तक्रारी त्यांच्या ई-मेल, फेसबुक आणि ट्विटर पेजवर पाठवाव्यात. नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारितील तक्रारी मनपाच्या ई-मेल, फेसबुक आणि ट्विटर पेजवर आल्यास त्या संबंधित विभागाकडे फॉरवर्ड करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी जागरुकता दाखवून खड्ड्यांसंदर्भात मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Advertisements

Advertisements

Advertisements
