
विकास ठाकरेंचा गडकरींवर घणाघात
गडकरींचा वचननामा ‘जुमलापत्र’:अतुल लोंढे
नागपूर,ता.१७ एप्रिल २०२४: देशात लोकसभेची निवडणूक सुरु आहे मात्र,नागपूरात रस्ते,खड्डे,पाणी,वीज,जीर्ण झाल्याने चोक झालेल्या गडर लाईन्स असे विषय मला माझ्या प्रचार यात्रेत जिथे जिथे गेलो तेथील जनतेने सांगितले,यावरुन ही लोकसभेची निवडणूक आहे की नागपूर महानगरपालिकेची?हाच आहे का नागपूरसाठी दहा वर्षांत एक लाख कोटींचा ‘विकास?’असा घणाघात ,काँग्रेसेचे लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्रिय मंत्री नितीन गडकरींवर केला.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, की गडकरीं यांनी याच विकास कामांच्या भरवश्यावर मला मत द्या किवा नका देऊ,मत मागायला येणार नाही,सभा घेणार नाही,बॅनर लावणार नाही,प्रचार करणार नाही इत्यादी दावे गेले होते मात्र,एक लाख कोटींचा विकास केल्यानंतर ही आज त्यांना संपूर्ण कुटूंबियांसह गल्लो गल्ली प्रचार करावा लागत आहे.त्यांनी केलेल्या विकासावर इतका विश्वास असता तर आपल्या विधानावर ते ठाम राहीले असते मात्र,त्यांचा विकास हा नागपूरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवणारा ठरला,असा टोमणा त्यांनी हाणला.नागपूरात आज चांगल्या शाळा नाहीत,आहे त्या देखील बंद पाडण्यात आल्या.दूसरीकडे वाठोडा येथे मनपाची हक्काची जागा सिम्बॉयसिससारख्या खासगी शिक्षण संस्थेला फक्त १ रुपया लीजवर देण्यात आली.दीड कोटींची जागा फूकटात देण्यात आली.मनपाने ती जागा त्या खासगी शिक्षण संस्थेला विकत दिली असती तर मनपाला त्यातून उत्पन्न मिळाले असते जे या शहराच्या मूलभूत सुविधांवर व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात खर्च करता आला असता.
नागपूरात आरोग्य सेवेचाही बोजवारा वाजला आहे.वीजेचे बिल दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करुन दोन टक्क्यांनी वाढवले आहे त्यामुळे यंदा नागपूरकरांचे कंबरडे चांगलेच मोडणार आहे.ही निवडणूक विचारधारेची निवडणूक असताना मूलभूत मुद्यांभोवती लढली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात तानाशाही पद्धतीने कारभार चालवला.दहा वर्षांत जनतेला दिलेले एक ही वचन पूर्ण केले नाही.फक्त इतर राजकीय पक्षात फोडाफोडी करुन विरोधी पक्ष उधवस्त करण्याचे काम केले.संविधानाने त्यांना पक्ष फोडण्याचे अधिकार दिले का?असा प्रश्न त्यांनी केला.
ज्या देशात विरोधी पक्ष सक्षम नाही त्या देशात लोकशाही ही धोक्यात आली आहे.विरोधी पक्ष हे सरकारच्या कामावर अंकूश ठेवण्याचे काम करीत असतात,मोदी हे विरोधकांनाच संपविण्याची भाषा करतात.त्यामुळे नागपूरच्या जनतेला समजलं आहे कोणाला मतदान करायचं.यंदा इंडिया आघाडीची सरकार येणार असून देशातील बुद्धिजीवी वर्ग,जाती-धर्माच्या लोकांनी हा निर्धार केला असल्याचे विकास ठाकरे म्हणाले.
गडकरी यांनी ही दहा वर्षात जनतेसाठी सत्ता राबवली असती तर आज मत मागायला बाहेर फिरावे लागले नसते.जो सत्तेवर असतो जनता त्यालाच आपल्या मतांचा हिशेब मागत असते.आज गडकरी यांना मत मागण्यासाठी फिरावे लागत आहे हे बघून नागपूरची जनता ही मतमोजणी पूर्वीच जिंकली आहे,असा दावा ठाकरे यांनी केला.फक्त वचननामा काढून जनता मत देत नसते.एक पूल बांधला मग गरज नसताना दूसरा पूल बांधला,दहा वर्ष पदावर होते,मंत्री राहीले,नागपूरचे खासदार होते,अनेक वचन त्यांनी नागपूरकरांना दिले पण जनतेला हव्या असणा-या काय सुविधा त्यांनी दिल्या?असा प्रश्न त्यांनी केला.
आज चार वर्षांपासून तुम्ही देखील पश्चिम नागपूरचे आमदार आहात,तुम्ही जनतेसाठी काय केले?असा प्रश्न केला असता,गोरेवाडा,झिंगाबाई टाकली,दाभा इत्यादी अनेक भागात रस्ते,दिवे,गडर लाईन्स,समाज मंदिरे इत्यादी कामे जनतेची मी करुन दिली.मी बेसिक कामे केली,सामान्य जनता जिथे राहते त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला,गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला कारण शेवटी ते माझे मतदार होते.मी हवेत विकास केला नाही,असा टोमणा त्यांनी हाणला.
किती मताधिक्याने जिंकणार?असा प्रश्न केला असता एक लाख मताधिक्याने विजयी होणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले.एवढे कमी मताधिक्य का सांगता?असा प्रश्न केला असता,मी ओवर कॉन्फिडन्समध्ये नसतो ,पाच लाख मताधिक्य सांगायला,असा टोला त्यांनी हाणला.
गडकरी यांनी काल प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या वचननाम्यात नागपूरच्या मध्यभागी असणा-या एरिगेशन कॉलनी,हेल्थ डिपार्टमेंट तसेच कारागृहाच्या जाग्यावर इटलीच्या धर्तीवर ‘युरोपीयन स्कॅवर’हा प्रकल्प बांधणार असल्याचे जाहीर केले आहे मात्र,शहरातील पर्यावरणवाद्यांनी अजनीवन सारखाच हा हरित पट्टा कमर्शियल वापरासाठी नष्ट करण्याचा विरोध केला आहे,तुमची भूमिका काय?असा प्रश्न केला असता माझा देखील अशा स्वरुपाच्या विकासाला विरोध आहे असे ते म्हणाले.कोणातही प्रकल्प हा जनतेचे मत घेऊन व पर्यावरणाचा विचार करुन राबवला गेला पाहिजे.नागपूरातील मध्य भागातील एकमेव उरलेला हरित पट्टा नष्ट करुन युरोपीयन स्कॅवर्स बांधल्याने नागपूरच्या जनतेचा काय फायदा होणार आहे?अश्या प्रकारचे विदेशी कर्ज करुन,शहरातील पर्यावरण नष्ट करुन,जनतेने न मागितलेली प्रकल्पे निर्माण करुन जनतेवर लादने याचा भुर्दंड शेवटी नेत्याला नाही जनतेला भरुन द्यावा लागत असतो.
पूर्व नागपूरातील एका व्यापारी बांधवाने,मी भयभीत झालो असल्याचे सांगितले.पारडीचा पूल हा २०१९ मध्येच पूर्ण झाला पाहीजे होता,आज २०२४ सुरु आहे परंतु,अद्यापही हा पूल निर्माणाधीनच आहे.या ऐवजी शहरात गरज नसताना आणखी अनेक उड्डाण पुले बांधण्यात आली.अनेक अपघात स्थळे वाढली.चुकीच्या बांधकामामुळे अनेकांचे जीव गेले,कुटूंबे उधवस्त झाली,या सर्वांचा हिशेब यंदा मतदार घेतील,असा दावा त्यांनी केला.
कालच्या गडकरी यांच्या वचननाम्यात बांग्लादेश झोपडपट्टीच्या धर्तीवर नागपूरातील इतर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार असल्याचा दावा करण्यात आला मात्र,दहा वर्ष त्यांना कोणी रोखले होते?असा प्रश्न ठाकरे यांनी केला.मनपात गेली १५ वर्षे भाजपचेच राज्य होते,केंद्र व राज्यात भाजपचीच सरकारे आहेत मग का नाही नागपूरातील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केलेत?भाजपचा असली चेहरा आता जनतेच्या समोर आला आहे.निवडणूक रोखे(इलेक्टोरल बॉण्ड)मुळे कोणाचा फायदा झाला हे सर्वोच्च न्यायालयामुळे जनतेला कळाले आहे,अशी टिका त्यांनी केली.
मेट्रो,मिहान,कार्गो इत्यादी प्रकल्प गडकरींना आयते मिळाले आहे.या सर्व प्रकल्पांवर माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मेहनत घेतली होती.केंद्राकडून मंजुर करुन घेतले होते.गडकरी यांनी या सर्व योजना त्यांच्या असल्याचा कांगावा केला,असे ते म्हणाले.
निवडणूक म्हटली की मोठ्या प्रमाणात धनशक्ती खर्च केली जात असते.यावेळी देखील वाडी,दाभा इत्यादीसारख्या भागात चार कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली मात्र,केवळ दहा लाखांचा आकडा सांगितला गेल्याची चर्चा आहे,असा प्रश्न केला असता,कितीही धनशक्ती खर्च केली तरी यंदा जनशक्तीच चालणार असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपचे नेते हेगडे यांनी आम्हाला ४०० पार जागा द्या आम्ही संविधान देखील बदलू,असे वादग्रस्त विधान केले मात्र,भाजपने त्यांना पक्षातून निलंबित न करता पाठीशी घातले.भाजपच्या डोक्यात काय आहे हे जनतेला चांगल्याने माहिती झालं आहे,असे ते म्हणाले.
अल्लाना संस प्रा.लि,फ्रीगोरीफिको अलाना यासारख्या ‘बीफ’कंपन्यांकडून देखील भाजपचे निवडणूक रोखे विकत घेण्यात आले यावरुन भाजपची नीतीमत्ता दिसून पडते,असा टोमणा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मारला.गडकरींचा वचननामा हे ‘जुमला पत्र’असल्याची टिका त्यांनी केली.त्यांच्या कथनी व करनीमध्ये नेहमीच अंतर राहीले आहे.२०१४ पूर्वी यशवंत स्टेडियमध्ये भव्य मेळावा घेऊन दरवर्षी ५० हजार नोक-या मिहानमध्ये देणार असल्याचे स्वप्न त्यांनी नागपूरकरांना दाखवले होते.टाटा बसचा प्रकल्प गुजरातला निघून गेला,रामदेव बाबांना दीड कोटींची जमीन कवडीमोल भावाने २५ लाखात पतंजलीच्या प्रोडक्टसाठी दिली,अजूनही शेतक-यांचा संत्रा पतंजलीने विकत घेतला नाही आहे,नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वचन हे मागील वचननाम्यात देखील दिले होते,आजपर्यंत ते नागपूरात अवतरले नाही.भांडेवाडी डंपिग यार्डचा विकास झालाच नाही,त्या दुर्गंधीतून आजुबाजूच्या एक लाख नागरिकांना यामुळे दम्याचा विकार जडला,गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या.१५ वर्ष मनपात तुमचीच सत्ता होती पण कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे वचन पूर्ण झालेच नाही.तीन वेळा उद् घाटन झाले,दोनच दिवसांपूर्वी फडणवीस यांनी दोन टक्क्यांनी नागपूरकरांसाठी वीज महाग केली.
गडकरींचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल होत असून यात इथेनॉल मिक्स केल्याने जनतेला १५ रुपये लिटर पेट्रोल मिळेल असे सांगितले आहे.आज तेच पेट्रोल ११२ रुपये लिटर नागरिकांना घ्यावे लागत आहे.जेएनयूआरएम कडून ५५० सिटी बसेस घेण्यात आली त्यांची अवस्था अशी आहे की कधीही चालत्या बसेसमध्ये आग लागते.आज सिटी बसेसमध्ये प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे.फूटाळा फाऊंटन पर्यटनाचे ठिकाण म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करुन विकसित केले,ते ही किड्यांनी खालले.मतदानाच्या तोंडावर नागपूरच्या जनतेशी किती खोटे बोलणार आहात?असा प्रश्न लोंढे यांनी केला.
३५ लॉजिस्टिक हब हायवेच्या बाजूला तयार करणार होते,एक ही दिसत नाही,त्या वचनाचे काय झाले?कुवत नाही करण्याची पण हवेत गोष्टी करायचा,असा जनतेला मूर्ख बनविण्याचा कारभार सुरु आहे.औद्योगिक कॉरिडोरचे कल्सटर कुठे आहेत,दाखवा.इंडोरामामध्ये १९ हजार कोटींचे सोलर प्रकल्प मंजूर केले,जमीन ही संपादित केली,मग अद्याप का हा प्रकल्प बंद आहे?कोणाला फायदा पोहोचविण्यासाठी?
उमरेडला मेनिफॅक्चरिंग झोन मुकुल वासनिक यांनी मंजूर केले होते,ते ही बंद पाडले.वाठोडा येथील मौदा हरपूर येथे साई प्रकल्प साकारणार होते,काय झाले?केवलराम यांना एक रुपया लीजवर जमीन दिली व श्रीमतांना शिक्षणाची सोय केली.भाजपच्या आयटी सेलने एक फोटो व्हायरल केला आहे गडकरी-फडणवीस एकाच बोटीत बसले,पण त्यांच्या वजनाने पाणी कसं बाहेर आलं नाही?असा टोमणा त्यांनी हाणला.अंबाझरी भागातील लाखो लोकांच्या घरात पाणी शिरल्याने २३ सप्टेंबर २०२३ रोेजी नागपूरकरांना बोटीत बसून मात्र शहरात फिरावे लागले,११२७ कोटींचा बजेट पारित करुन नाग नदीच्या सौंदर्यीकरणाचा गाजावाजा करण्यात आला,कुठे आहेत नदीच्या काठांवर एसटीपी प्लान्ट?
गडकरींचे विधान आहे आरटीओ हा विभाग सर्वाधिक भ्रष्ट असून तो बंद केला पाहिजे मात्र,हा विभाग बंद तर झालाच नाही उलट वाहन परवाना,पीयूसी इत्यादीचे दर तीन पटीने वाढले!मग नागपूरच्या जनतेने या विभागातील भ्रष्टाचार तीन पटीने वाढला,असे समजावे का?बस स्टॅण्ड,रोड ट्रांसपोर्ट देखील दिसत नाही,सिमेंट रस्त्यांमुळे रस्ते वर लोकांची घरे दीड फूट खाली झाली,रेन वॉटर हारवेस्टींग देखील सिमेंटचे रस्ते बांधताना विसरले,याचे काय उत्तर देणार?त्यामुळेच दहा वर्षांपासून गडकरी हे वचननामा व वचनपूर्ती प्रसिद्ध करीत नसून केवळ ’जुमलापत्र’घोषित करीत असल्याची टिका करीत यावेळी नागपूरची जनता तुमच्या जुमल्यांना भुलणार नाही,असा दावा त्यांनी केला.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे सोशल मिडीया प्रमुख विशाल मुत्तेमवार,ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील,युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके,युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत,अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.
……………………………




आमचे चॅनल subscribe करा
