
विकासकामांसाठी पहील्यांदा अखर्चित निधींचा होणार वापर
ऐतिहासिक सभा:महापौरांचा दावा
नागपूर,ता. १३ ऑक्टोबर: शहरातील खड्डयांवर नुकतेच २७ सप्टेंबर २०२१ रोजी मनपाची विशेष सभा पार पडली होती. त्यात प्रशासनाच्या कामांवर चर्चा झाली व प्रशासनाने स्वत:मान्य केले होते ,गेल्या दीड वर्षांपासून सर्व विकास कामे ठप्प असल्यामुळे शहरातील खड्डयांची देखील दुरुस्ती होऊ शकली नाही.एवढंच नव्हे तर या खड्डयांमध्ये उलट आणखी ४० टक्क्यांची वाढ झाली असल्याची कबुली प्रशासनाने दिली होती.
खड्ड्यांची समस्या ही चांगलीच पेटली असून विविध सामाजिक संघटनेकडून खड्ड्यांसोबत मनपा पदाधिकारी व मनपा आयुक्तांचे मुखवटे घालून छायाचित्रे काढण्यात आली होती.प्रसार-प्रचार माध्यमात ती चांगलीच गाजली.याची गंभीर दखल घेत शहरातील खड्ड्यांसाठी नेमके जवाबदार कोण?मनपा पदाधिकारी की मनपा प्रशासन?यासोबतच शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे देखील खड्डे आहेत,त्यासाठी देखील नागरिक हे फक्त मनपा पदाधिका-यांनाच जवाबदार धरत असल्याचे बघून महापौरांनी २७ सप्टेंबर रोजी विशेष सभेचे नियोजन केले होते.
याच सभेत महापौरांनी डिसेंबर २०२१ पर्यंत शहरातील रस्ते सुधरवण्यासाठीचा वेळ प्रशासनाला दिला होता तसेच अर्थसंकल्पात जो निधी विविध पदांमध्ये अखर्चित आहे, तो निधी खड्डेयुक्त रस्त्यांची दशा सुधरवण्यासाठी खर्च करण्यात यावा याबाबत नियोजन करण्यात यावे,असे निर्दश प्रशासनाला दिले होते.परिणामी आज प्रशासनातर्फे विशेष सभेत एकूण ३६.५ कोंटींचे नियोजन केले असल्याची माहिती देण्यात आली.
आता हे संपूर्ण ३६.५ कोटी रुपये शहरातील खड्डे बुजवण्यासाठी तसेच कच-याच्या व्यवस्थापनात खर्च केले जाणार असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. मनपाच्या हॉटमिक्स प्रकल्पातील निधीत प्रशासनाने ८ कोटींची वाढ केली आहे.रस्त्यांच्या सुधारणेसोबतच कच-याच्या व्यवस्थापनासाठी जो निधी राखीव आहे त्यात १० कोटींची वाढ करण्यात आली असल्याची माहिती महापौर यांनी सांगिते.
मात्र ही सर्व कामे वेगाने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादीत करुन यासाठी मनपाच्या हॉटमिक्स प्लान्टसोबतच आता नागपूर सुधार प्रन्यासचा हॉट मिक्स प्लान्ट देखील १० दिवसांसाठी लीजवर घेण्यात आले असल्याचे महापौर म्हणाले.
आजची विशेष सभा ही ऐतिहासिक असल्याचे सांगून आजपर्यंत मनपा आयुक्त दरवर्षी डिसेंबरमध्ये जो प्रस्तावित अंदाजपत्रक सादर करतात त्यात बजेटमध्ये कात्री लावण्याचे काम करीत असतात मात्र पहील्यांदा प्रशासनाने इतर पदांमधील अखर्चित निधी शहरातील विकासकामांसाठी उपलब्ध करुन दिल्याने ही सभा ऐतिहासिक ठरल्याचा दावा महापौरांनी केला.
सभेत आज मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी देखील माहिती देताना विविध पदांमधील फक्त ७५ टक्के कामे होत होती असे सांगितले.या वर्षी आधीच ९६ टक्के कामांना मंजूरी दिली असून यात जर आताचे अतिरिक्त नियोजन जोडले तर हीच टक्केवारी १२० टक्के विकासकामांची होईल,असे ते म्हणाले.प्रशासनाने सर्व कामांची नोंद घेतली असून वेळेत काम व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.याशिवाय प्रत्येक हेडमध्ये पुरेसा निधी दिला असल्याची पुश्ती ही त्यांनी जोडली.
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी निदान स्थायी समितीतील १६ सदस्यांनी प्रशासनाकडे सादर केलेल्या विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली.पिंटू झलके यांनी रस्त्यांच्या प्रश्नावर मनपा व नासुप्रमध्ये ताळमेल असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी ३ कोटींची जी शिल्लक आहे त्याचा समावेश जुन्या १५ कोटींमध्ये करण्यात आला असून हा विषय मंजूर करण्यात यावा,अशी मागणी करत, शहरातील सर्वात धोकादायक ठरलेल्या रस्त्यांची सुधारणा आधी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
आजची विशेष सभा जुन्या पदांधील अखर्चित निधी नव्या नियोजनामध्ये खर्च करण्यासाठी सभेच्या मंजूरीसाठी पार पडली,हे विशेष!




आमचे चॅनल subscribe करा
