

-सह्याद्री फाउंडेशनची १२५० कुटुंबांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत
नागपूर, दि. ३० : कोविडमुळे अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शासन अशा कुटुंबांना मदत करीत आहेच. मात्र, समाजातील विविध घटकांनीही प्रशासनासोबत सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले.
कोविडमुळे पालक गमाविलेले बालक, तसेच घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या कुटुंबातील महिलांना मदतीचे धनादेश वितरणासाठी फंक्शन जंक्शन सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आणि सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त रवींद्र पाटील, बालकल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे, सह्याद्री फाउंडेशनचे संचालक विजय क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात 100 कुटुंबांना प्रत्येकी 30 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
कोविडमुळे गेल्या दीड वर्षात अनेक विदारक घटना अनुभवायला मिळाल्या. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंबांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. अशा कुटुंबांना केवळ आर्थिक मदत उपलब्ध करून देऊन चालणार नाही, त्यांना या असाधारण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. आर्थिक मदतीचा योग्य विनियोग करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याविषयी त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे श्रीमती लवंगारे-वर्मा यावेळी म्हणाल्या.
कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संगोपन व संरक्षणासाठी शासनाने निर्णय घेतले आहेत. अशा बालकांचे शिक्षण अखंडपणे सुरु राहणे आवश्यक असून शासनामार्फत यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगून श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमाविलेली मुले, तसेच घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या कुटुंबातील महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम सह्याद्री फाउंडेशनने हाती घेतला आहे. इतर स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा अशाप्रकारे शासन, प्रशासनासोबत येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोविडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच एक पालक गमाविलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अनाथ बालकांसाठी शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या मुलांच्या शिक्षणाबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त श्री. पाटील यांनी सांगितले.
सह्याद्री फाउंडेशनने कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांना तसेच कर्ता पुरुष गमाविलेल्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याविषयी ‘गिव्ह इंडिया फाउंडेशन’ आणि ‘लाईफ फर्स्ट फाउंडेशन’कडे प्रस्ताव सादर केला होता. यासाठी जिल्ह्यातील 2 हजार 34 बालकांची नोंदणी झाली होती. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 1 हजार 250 कुटुंबांना प्रत्येकी 30 हजार रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. उर्वरित कुटुंबांना सुद्धा लवकरच अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, असे सह्याद्री फाउंडेशनचे संचालक श्री. क्षीरसागर यावेळी म्हणाले.
श्रीमती कोल्हे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.




आमचे चॅनल subscribe करा
