फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकोणी भी राहो येथून गाडी जाऊ द्यायची नाही...

कोणी भी राहो येथून गाडी जाऊ द्यायची नाही…

Advertisements


गोंड गोवारी आंदोलनकर्त्यांचा चक्का जाम,नागपूरकरांची रात्री नऊला सुटका

नागपूरकरांना वेठीस धरल्याशिवाय शासनाला आमची ताकद कशी कळणार?आंदोलनकर्तंचे अजब तर्कशास्त्र

वाहतूक,पोलिस, प्रशासन आणि सरकारच्या सपशेल अपयशावर वाहनचालकांचा तीव्र संताप

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.५ फेब्रुवारी २०२४: सध्या महाराष्ट्रासारख्या ‘पुरोगामी‘राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा धगधगता प्रश्‍न पुन्हा एकदा वेळ साधून पेटलेला असताना, गोंड-गोवारी आदिवासी बांधवांनी देखील जरांगे यांच्या कागदाेपत्री यशाचे कवित्व बघून ,गोंड-गोवारी आरक्षणाची मागणी पुन्हा शासन दरबारी रेटण्यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन सुरु केले आहे,या समाजातील तीन तरुण हे उपोषणाला बसले असतानाही नागपूरातील तसेच राज्यातील सत्तेत बसलेल्या नेत्यांनी कोणतीही दखल या समाजाच्या उपोषणाची घेतली नाही,परिणामी आजच्या दुपारच्या सभेनंतर या समाजातील बांधवांचे धैर्य संपले व मंचावरुन ‘कोणीही घरी जाणार नाही’असा आदेश धडकताच,दूपार पासून संविधान चौक,व्हेरायटी चौक या बांधवांनी ताब्यात घेतला व एक ही वाहन जागेवरुन हलू दिले नाही.या अकस्मात उफाळलेल्या आंदोलनाची कोणतीही कल्पना नागपूरकरांना नसल्याने आपल्या कामासाठी त्यांनी हाच नेहमीचा मध्यवर्ती रस्ता धरला होता आणि अनपेक्षीतपणे तब्बल ८ ते ९ तास आंदोलनकांच्या कोंडीत सापडले.

गोंड-गोवारी यांची अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची मागणी असून शासनाचा १९८५ चा अध्यादेश रद्द करण्याची त्यांची मागणी आहे तर दुसरीकडे आदिवासी बांधवांना त्यांच्या आरक्षणात नव्याने गोंड-गोवारी बांधवांची हिस्सेदारी नको आहे.१९९४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात सत्तेत असताना नागपूरात हिवाळी अधिवेशना दरम्यान आदिवासी बांधवांनी आपल्या मागणीसाठी विशाल मोर्चा विधान भवनावर काढला होता.झिरो माईलवरच हा मोर्चा पोलिस विभागाने सक्तीने अडवला.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना वाटाघाटीसाठी समोर येण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र,फक्त दोन मिनिटे बोलण्यासाठीही शरद पवार यांनी नकार दिला. यामुळे आंदोलनकारी यांनी विधान भवनाकडे कूच करताच नागपूर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरवात केली.यामुळे आंदोलकारी सैरभैर पळू लागल्याने चेंगराचेंगरी झाली.यात ११४ गोवारी आंदोलकांचा दूर्देवी मृत्यू झाला.यात लहान मुले व महिलांचा सर्वाधिक समावेश होता कारण,तेच आंदोलनात सर्वात पुढे होते.

५० हजार बांधवांच्या त्या विशाल मोर्च्यात तब्बल ५०० पेक्षा अधिक बांधव हे जखमी झाले होते.२३ नोव्हेंबर १९९४ रोजी चपला,कपडे,गाठोडे,शिदोरी,लोखंडी काटेरी तारांवरुन जीव वाचवण्यासाठी चढून पळण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या अनेकांच्या रक्ताचा सडा,लहान मुलांच्या,महीलांचा किंकाळ्या याने हा परिसर शहारुन गेला होता.तत्कालीन महाराष्ट्र सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय न्यायमूर्ती एस.एस.दानी आयोगाची नियुक्ती केली.मात्र,या घटनेसाठी कोणालाही जवाबदार न धरता या घटनेला फक्त ‘दूर्भाग्यपूर्ण’ठरवले गेले तसेच एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या मोर्च्याला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकरवी केलेल्या लाठीचार्जला योग्य ठरविण्यात आले.आयोगाने राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार तसेच सरकारमधील इतर मंत्र्यांना या घटनेच्या जवाबदारीपासून मुक्त केले,इतकंच की तत्कालीन आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांनी नैतिक जवाबदारीतून आपला राजीनामा दिला मात्र,त्यांच्या राजीनाम्यामुळे गेलेले ते ११४ हूतात्मा परत येणार नव्हतेच.आज त्याच ठिकाणी झिरो माईलवर ११४ हूतात्मांची नावे असलेले स्मारक बनविण्यात आले आहे,जे या समाजासाठी पवित्र तीर्थस्थळ झाले.दर वर्षी २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून गोंड-गोवारी बांधव हूतात्म्यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी अश्रूपूर्ण नयनांनी या स्थळी येतात व ह्दयात २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडलेल्या त्या ह्दयद्रावक घटनेचे स्मरण करुन व्यथित होतात.

या संपूर्ण घटनाक्रमाची उजळणी यासाठी महत्वाची होती, कारण आज ही तीच धग मनात घेऊन आपल्या आरक्षणाची मागणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले गोंड-गोवारी बांधव हे गेल्या ११ दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन करीत आहे मात्र,साल १९९४ असो किवा तीन दशके ओलांडल्यानंतरही २०२४ असो,सत्ताधारी व प्रशासनाच्या संवेदना या,या समाजासाठी तशाच सुप्त आहेत,परिणामी आज पुन्हा या समाजाच्या भावनांचा उद्रेग झाला,इतंकच.

मात्र,या वेळी पोलिस प्रशासन सावध होते.९ तास आंदोलनकर्त्यांनी नागपूरचा मध्यवर्ती भागच पूर्णपणे ठप्प करुन ठेवला असताना देखील ते फक्त हतबल होऊन बघत राहीले.मोठमोठी वाहने,बसेस,शाळेची वाहने,ऑटो,चारचाकी,दूचाक्या सगळेच जागच्या जागी अडकून पडले होते.ना मागे,ना पुढे कुठेही हलण्यासाठी देखील वाहनांना जागा उरली नव्हती.संविधान चौक,व्हेरायटी चौक,झांशी राणी चौक(नशीब, पंचशील चौक २३ नोव्हेंबरच्या अतिवृष्टीमुळे पूल वाहून गेल्याने बंद आहे)विद्यापीठ चौक,अलंकार चौक,महाराज बाग रोड,विद्यापीठ लायब्ररी,कॅनोल रोड ते मेहाडीया चौक मध्यवर्ती नागपूरातील असा एकही मुख्य रस्ता किवा आडरस्ता असा नव्हता जाे गोंड-गोवारी आंदोलनकर्त्यांच्या या चक्का जाम आंदोलनामुळे जागच्या जागी वाहनांच्या गर्दीने थबकून गेला नव्हता.

गोंड-गोवारींच्या या आंदोलनाला नागपूरकरांची सहानुभूतीच होती.कोणताही दोष नसताना आणि संवैधानिक हक्काने शांततापूर्ण आंदोलन करीत असताना सत्ताधा-यांची मगरुरी व पोलिसांच्या लाठीचार्जमुळे ११४ कुटुंबे ही कायमची उधवस्त झाली होती.मात्र,आज नागपूरकरांना वेठीस धरण्याचा जो ’उद्दामपणा’या आंदोलनकर्त्यांनी केला तो अक्षम्य असाच आहे.व्हेरायटी चौकात महिला,मुली,दुचाकी वाहनचालक हे आंदोलनकर्त्यांना अक्षरश: विनंती करताना दिसत होती मात्र,‘कोणी भी राहो येथून गाडी जाऊ द्यायची नाही’असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.

जिल्हा परिषदेतील दोन महिला शासकीय कर्मचा-यांनी साखळी करुन बसलेल्या आंदोलनकर्त्यांना अनेक वेळा विनंती केली मात्र त्यांची दुचाकी जाण्यासाठी जागा करुन देण्यास त्यांनी वारंवार नकार दिला.अखेर एका महिला पत्रकाराच्या पुढाकारातून आंदोलनकर्त्यांनी त्या महीलांसाठी मार्ग खूला केला,परंतू या नंतर एकाही दुचाकी वाहनाला जाऊ देणार नाही मग ते महिलांचे वाहन असो किवा इतर कोणाचेही,असा दम त्यांनी भरला.याच वेळी त्या ठिकाणी अगदी समाेरच उभ्या असणा-या तीन दुचाकीधारक महिला कासाविस होऊन त्यांच्याकडे बघत होत्या…!रात्री नऊ शिवाय त्यांना सूटका नव्हतीच…!

एक झमॅटोचा कर्मचारीही डिलीव्हरी घेऊन जाताना व्हेरायटी चौकात अडकला.सर्वदूर भिरभिर नजर मारत होता,जाऊ तरी कूठून..!त्याच्या नोकरीचा प्रश्‍न होता.वेळेवर डिलीव्हरी पोहोचली नाही तर..!मालकाला फोन करण्यासाठी इतर कोणाच्या तरी मोबाईलमध्ये सीम टाकावा लागेल असे कासावीस होऊन तो बोलला कारण त्याच्या फोनचा डिसप्ले खराब होता.अनेक तास अडकलेल्या एका मध्यमवयीन दूचाकीधारकाने प्रयत्न केला पुढे दुचाकी दामटण्याचा तर एकच हलकल्लोळ माजला अन्…आंदोलनकर्त्यांनी त्याला घेरले.अनेकांनी पायातली वाहणे काढली व त्याच्यावर उगारली,एका वृद्ध पुरुषाने त्याचा हेलमेट उलवटला,सगळ्यांनी मिळून त्याला मागे ढकलले..महिला आंदोलनकर्ती देखील दमदाटी करण्यात मागे नव्हती…निमूटपणे त्याने माघार घेतली कारण वारंवार तो करीत असलेल्या विनंतीला आंदोलनकर्त्यांच्या लेखी कोणतीही किंमत नव्हती.नागपूरकरांना वेठीस धरल्याशिवाय सरकार आमच्याशी बोलणी करणार नाही…असा अजब तर्कशास्त्र त्यांनी लावला होता!

एका न्यायधीशाचे चारचाकी वाहन देखील व्हेरायटी चौकातील या चक्रव्यूहात अडकले होते.नशीब,त्यात फक्त वाहनचालक तसेच एक महिला व एक पुरुष कर्मचारी बसले होते.वाहन चालक वाहतूक पोलिसांकडून बाहेर पडण्याच्या मार्गाविषयी बोलण्यास खाली उतरला होता,त्याची देखील कोणतीही मदत वाहतूक पोलिस करु शकले नाही.अनेक तास माननीय न्यायाधीशांचे वाहन व निर्दोष कर्मचारी वाहनात तसेच अडकून पडले होते.

एक वाहतूक पोलिस वारंवार मोबाईलवर इतर पोलिसकर्मींना सूचना देत होता,काहीही झाले तरी झांशी राणीकडून वाहने मागे वळवून घ्या,मागच्या मागे वाहनांची गर्दी पांगवा.व्हेरायटीचे झांशी राणी मार्गावरील वाहनांची गर्दी पांगविण्यासाठी विद्यापीठ लायब्ररीपर्यंत व पुढे ही अलंकार टॉकीजपर्यंतची वाहनांची गर्दी मागच्या मागे वळवणे हे खेळ गंमत नव्हतेच.अनेक तास या महाकसरतींमध्ये गेले मात्र मोठमोठी वाहने आजूबाजूला कुठेही वळवता येणे शक्य नव्हते.तिथे रिझर्व बँक ते एलआयसी चौकात देखील याहून वेगळी परिस्थिती नव्हती.

अनेक प्रवासी बसेस,एस.टी,शाळेच्या बसेस,ऑटोतील प्रवाशी,ॲम्ब्यूलेंस,दुचाक्या,चारचाकी जागच्या जागेवर खिळून होत्या,माणसाला मलमूत्र विसर्जन,भूक-तहान या नैसर्गिक गरजा असतात,त्यातल्या त्यात महिला,तरुणी,शाळकरी मुलींची अवस्था ही आणखी अवघड असते याचे कोणतेही भान आज आंदोलनकर्त्यांनी ठेवले नाही.आमची ११४ माणसे मारल्या गेली तरी या सरकारला जाग येत नाही,त्यांना जागे करायचे असेल तर चक्का जाम करावाच लागेल,तुम्हाला त्रास होत असेल पण आमच्या त्रासाचे काय?असा उरफाटा सवाल ते वाहनचालकांशीच करीत होते.

आज राज्यातील महायुतीची सरकार,नागपूरातील वजनदार नेते,नोकरशाही, पोलिस प्रशासन व वाहतूक व्यवस्थापन सर्व यंत्रणा जणू ठप्प होत्या,जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहत होत्या.नागपूरात एखादा मंत्री येतो तेव्हा हीच पोलिस यंत्रणा कशी सज्ज होते,संपूर्ण रस्ते अडवून ठेवते,आज कुठेही ती सज्जता दिसून पडली नाही.आदिवासी गोवारी पूल ही बंद करुन ठेवण्यात आला होता.निदान आंदोलनकर्त्यांनी खालचे सगळे चौक वेठीस धरले असलेले बघून, तातडीने उड्डाण पूले पोलिसांना खुली करता आली असती मात्र,कोणतेही नियोजन वाहतूक पोलिसांकडे नव्हते.संकट समयी उपायेग होऊ शकणार नसेल तर कोट्यावधी रुपये खर्च करुन ही उड्डाण पुले बनवलीच कशाला?असा संताप वाहनधारकांमध्ये निर्माण झालेला आढळून आला.

‘स्मार्ट सिटी’चा टेंभा मिरविणा-या शहरातील प्रशासनाला संविधान चौका ऐवजी मोर्चा कस्तुरचंद पार्कमध्ये रेटता आला असता मात्र,तसे कोणतेही नियोजन पोलिस विभागाकडून करण्यात आले नाही.

महत्वाचे म्हणजे,सर्वसामान्य नागपूरकर जनतेचा सार्वजनिक रस्त्यांवरुन सहज आणि सुलभतेने वाहतूक करण्याचा संवैधानिक हक्क असताना, आज जणू हाच नागपूरकर या रस्त्यांचा उपयोग करीत असल्याने ‘अपराधी’च्या श्रेणीत पोहोचला.तो वेठीस धरल्या गेल्या.अतिशय वाईट वागणूक त्यांना देण्यात आली.यात महिला,पुरुष,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले,रुग्ण,शाळकरी मुले असा कोणताही भेद आंदोलनकारींनी ठेवला नाही.परिणामी,आजपर्यंत गोंड-गोवारी समाजाशी मनापासून सहानुभूती ठेवणारा नागपूरकर आज चांगलाच ‘दुखावला’ व ‘दुरावला’ गेल्याचे आढळून आले.

सरकार,शासन,प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा पराकोटीचा फटका सर्वसामान्य नागपूरकरांना बसला,याचाही संताप समाज माध्यमांवर उमटला.रात्री नऊ वाजता शहरातील हे मध्यवर्ती चौक आंदोलनकर्त्यांनी रिकामे केले ते ही मायबाप सरकारकडून येत्या १२ फेब्रुवरी रोजी तोडगा काढण्याचे आश्‍वासन मिळाल्यामुळे.हाच तोडगा मायबाप नेत्यांनी सगळे चौक जायबंद झाल्याबरोबर पंधरा मिनिटात काढला असता तर!

शरद पवारांनी फक्त दोन मिनिटे आंदोलनकर्त्यांच्या समोर येऊन न बोलल्याने केवढा अनर्थ घडला…आज पुन्हा त्याचीच जणू प्रचिती नागपूरकरांनी अनुभवली.आरक्षण,आंदोलने,आंदोलनकर्त्यांचे नेते-सरकार यांच्या भांडणात भरडला जातो शेवटी सर्वसामान्य नागरिक..जरांगेंच्या ‘मुंबई पोहचो’आंदोलनात पुणे-मुंबई महामार्गावर ३८ तास जाम लागला होता!तीन कृषि कायद्यांच्या विरोधात तब्बल एक वर्ष दिल्ली-नोएडा महामार्ग शेतकरी आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिपण्णी करीत ,सार्वजनिक रस्त्यांवरुन आवागमनाचा मार्ग कोणत्याही कारणाने रोखता येणार नसल्याचे सांगून, तात्काळ हा मार्ग खुला करण्याचे आदेश दिले होते.न्यायालयाला कळतं रस्ते हे नागरिकांचा सुखरुप आणि वेळेवर घरी परत जाण्यासाठीचा संवैधानिक हक्क आहे,सरकारला हे कळत नाही का?

या शहरात अनेक राजकीय पक्ष आहेत,विविध विचारधारा आहेत,नेते आहेत,कार्यकर्ते आहेत त्यांची ही आंदोलने आहेत.विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळणे असो,त्याच्या निषेधार्थ पुन्हा भाजप युवा मोर्चाचे आंदोलन असो,जिल्हा परिषदेत चक्क पंतप्रधानांच्या छायाचित्रालाच काळे फासण्यासाठीचा वाहीयात पुढाकार असो,त्या विरोधात आजच तीन तास जि.प.परिसरात भाजपचे उस्फूर्त झालेले आंदोलन असो,वाहतूक कोंडीत अडकलेल्या माता-भगिनींच्या व कासाविस झालेल्या सर्वसामान्य वाहनधारकांच्या मदतीला मात्र एका ही राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते हिरीरीने धावून आल्याचे दिसून पडले नाही.ग्लोकल मॉल समोर हल्दीराम रोडवर वाहनधारकांचा कोंडलेला श्‍वास सोडविण्यासाठी गळ्यात शिवसेनेचा दुपट्टा घातलेल्या दोघे-तिघे थोडा प्रयत्न करीत असल्याचे दिसून पडले मात्र,शहरातील बूथ पर्यंत कार्यकर्त्यांची फौज असलेले राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते या महासंकटाच्या काळात वाहनधारकांच्या मदतीसाठी अगदी कुठेही दिसून पडले नाही,याचे देखील वैषम्य वाहनधारकांमध्ये दिसून पडले.‘गांव चलो अभियान’ किवा ‘वॉर्ड चलो अभियान’होत राहील,शहरातील नागरिकांसाठी करोनासारख्या त्रासदीनंतरच्या आजच्याही भयंकर त्रासदीतून सुटका करण्यासाठी किती पुढाकार घेतला?याचा हिशेब आठ-नऊ तास वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले,श्‍वासात इतके तास डिजेल-पेट्रोलचा धूर ओढलेले पिडीत नक्कीच विचारल्या शिवाय राहणार नाही,हे देखील तितकेच खरे.

शहराच्या कानाकोप-यात राहणारा नागपूरकर हा आज रात्री नऊ वाजता आंदोलन संपल्यानंतर दहा वाजता आपापल्या वाहनांसह सुखरुप घरी पोहाचला,हे कोणाचे ‘अपयश’म्हणावे?

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या