फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकूछ आवाजे खामोश अच्छी नही लगती ऐ दोस्त....

कूछ आवाजे खामोश अच्छी नही लगती ऐ दोस्त….

Advertisements

गायक विजय चिवंडे यांचा करोनाने मृत्यू!कलाविश्‍व स्तब्ध!

डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)

नागपूर,ता. १४ ऑगस्ट: शुक्रवारी नागपूरातील कलावंत जगताला आणखी एक हादरा बसला,विजय चिवंडे नामक सुरेल तारा अचानक सूरांच्या अवकाशातून निखळला. करोनामुळे मेयो रुग्णालयात अवघ्या ४२ वर्षे वयात त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. ही माहिती कलावंत जगताला होताच अनेकांना धक्का बसला!

११ ऑगस्ट रोजी विजय यांची पहील्या करोना चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह आला होता. पण लक्ष् णे मात्र कोविडची होती. तीन-चार दिवसात मी घरी परत जाईल असे त्यांनी कलाकारांना फोनवर कळवले ही होते. विजय यांच्या भाऊजींच्या सांगण्याप्रमाणे काल रात्री विजयला श्‍वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर मात्र त्यांना त्या शासकीय रुग्णालयात वेंटिलेटर मिळाले का?वेळेवर ऑक्सीजन लावण्यात आले का?या विषयी सांगता येत नाही.एका रात्रीत असे काय झाले की दुस-या दिवशी पहाटे त्यांच्या मृत्यूचीच बातमी यावी?

नुकतेच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काेविड संदर्भात आढावा बैठक घेतली त्यात ’उशिरा चाचणी करण्यात येत असल्यामुळे अंतिम क्ष् णी मृत्यूचे प्रमाण वाढले’असल्याचे सांगितले.मात्र मृत्यूच्या या प्रमाणात खासगी तर सोडा,शासकीय रुग्णालयात तरी ‘योग्य व वेळेवर’उपचार मिळत आहे का?असा प्रश्‍न आता हे मृत्यू बघितले की उपस्थित होतो!

अनेक कलावंतांनी फेसबूक पाेस्टवर आपल्या हळव्या भावना व्यक्त केल्या. प्रफूल्ल माटेगावकर यांनी देखील खूप हळवी पोस्ट केली आणि कलाविश्‍व गहीवरुन गेले.एकमेकांना धीर देत एकमेकांना धारेवर धरत,एकमेकांना सल्ला ही देण्यात आला.
विजय यांना मधुमेह असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मागे वृद्ध आई,पत्नी व दहा वर्षीय मुलगा आहे.एक सुरेल,हसरं व्यक्तिमत्व,कुटुंबियांचा आधार निष्ठूर करोनाने अलगद हिरावंल…!

सुप्रसिद्ध गायक साजिद कुरैशी यांनी तर फेबसबूकवर काही कलाकारांना चांगलेच धारेवर धरले. सध्या ‘फेसबूक’लाईव्ह चा ट्रॅण्ड अनेकांनी सुरु केला आहे. यासाठी अनेकांनी सुसज्ज स्टुडियो बनविले. या लाईव्ह शोमुळे अनेक कलाकार एकत्रित येत आहेत. एकच माईक एंकर ही हाताळतो तोच माईक गायक-गायिका देखील हाताळतात. सध्या करोनाचा प्रार्दुभाव बघता हे अतिशय अयोग्य आहे. मात्र असं घडतंय. ना मास्क घातल्या जात आहे ना सोशल डिस्टंसिंग पाळल्या जात आहे. ’ये जान बचाने का साल है कमाने का नही’असे साजिद म्हणतात. ’जान है तो जहां है जिंदगी रही तो बहोत शो करेंगे’असा सल्ला ही ते देतात.

नुकतेच १ ऑगस्ट रोजी शहरातील एक नामवंत ऑकेस्ट्रा संचालक व निवेदक शेखर घटाटे यांचा तसेच ऑकेस्ट्रा फनकारचे माजी संचालक मोहम्मद अफजल यांचा करोनाने मृत्यू झाला.या धक्क्यातूनच अद्याप नागपूरचे कलाविश्‍व सावरले नसून आज पुन्हा एक चांगला,सुरेल ,उम्द्या व्यक्तिमत्वाचा गायक करोनामुळे जगातून निघून गेला.

धक्कादायक बाब म्हणजे शहरातील आणखी एक ज्येष्ठ कलावंत ज्यांनी सत्तर-ऐंशीच्या काळापासून संगीताची अविरत साधना केली,त्यांना देखील करोनाची लागण झाली असून ते गेल्या तीन दिवसांपासून मेडीकल रुग्णालयात उपचार घेत असल्याची खात्रीशीर माहिती आहे.त्यांच्या मुलाला देखील करोनाची लागण झाली आहे मात्र तो घरीच विलगीकरणात उपचार घेत आहे. या ज्येष्ठ कलावंतांनीच ही माहिती शहरातील कलाविश्‍वाला न कळवण्याची सूचना केल्याची माहिती आहे.

मात्र असे असले तरी प्रश्‍न उर्वरित राहतोच फक्त ४२ वर्ष..हे विजय चिवंडे यांचे जग सोडून जाण्याचे वय नव्हतेच!

कश्‍यामुळे फेसबूक लाईव्ह कार्यक्रमाचा कलावंत अट्टहास धरतात?का घराबाहेर पडतात?का इतरांच्या संपर्कात येतात?हजार,पंधराशे रुपयांसाठी जीव धाेक्यात घालतात?गेल्या दोन महिन्यांपासून तर फेसबूक लाईव्ह शो चे चांगलेच पेव शहरात फूटले आहेत,हे आता तरी थांबणार का?अनेक कलावंतांनी फेसबूक लाईव्हसाठी स्टूडियोमध्ये येऊन वाजविण्यास चक्क नकार दिला आहे मात्र अनेक कलाकार असे आहेत ज्यांना जीवापेक्ष्ा पैसा कमावणे जास्त महत्वाचे वाटत आहे,विजय यांचे अकाली जाणे इतर कलाकारांना जणू एक संदेशच देऊन गेला आहे.

त्यांचे सुरेल सूर आता पुन्हा नागपूरच्या रंगमंचावर कधीही दर्दी श्रोत्यांना आता ऐकू येणार नाहीत..त्यांच्या अश्‍या जाण्यानेनागपूरचे कलाविश्‍व हे स्तब्ध आहे….मात्र…आत्मचिंतन करणार का?

प्रफूल्ल माटेगावकर यांनी लिहलेली भावनिक पोस्ट…….

नागपुरातील प्रसिद्ध हरहुन्नरी गायक.. मोहोम्मद रफी साहेब.. किशोर कुमार ह्यांची गाणी लीलया गाणारा गुणी गायक.. आणि जवळचा मित्र विजय चिवंडे काळानं आपल्यातुन ओढुन नेला.. काय काय अजुन बघावं लागणार ह्या कोरोनामुळे काहीच समजत नाही.. जेव्हा एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला झळ लागते तेव्हाच आपण त्या गोष्टीचं महत्व जाणु शकतो.. तसं काहीसं झालं आहे..
खुप काही मनात येतं आहे म्हणुन व्यक्त होतो आहे… कदाचित अनेकांना मी जे म्हणतो आहे ते पटणार नाही… पण, अनेकांना पटेल देखील.. माझ्या कलाकार मित्रांना एक कळकळीची विनंती.. आपण अनेक fb live कार्यक्रमाच्या निमित्तानी एकत्र येतो.. अगदी social distancing चे सगळे नियम पाळायचा अतोनात प्रयत्न करतो.. पण तरीही जे व्हायचं त्याचे परिणाम होताहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.. कारण नाहीतर होणारी हानी ही आपल्याला नं परवडणारी आहे.. ह्या रोगावर मात करायला फक्त आणि फक्त एकच उपाय.. तो म्हणजे आपण थोडा ब्रेक घ्यायला हवा.. कार्यक्रम करायला हरकत नाही.. पण घरातल्या घरातून.. with available resources..नका निघु नं सध्या बाहेर.. घरातून जे शक्य ते करा.. रसिक ते पण accept करतील.. जान है तो जहान है.. मधे एक सुंदर पोस्ट वाचण्यात आली..राजीव नाईक ह्यानी लिहिलेली..

रंगभूमी व जीवनात विरामाला, पॉजला महत्त्व असतं. स्थलकाल व कला ह्यांचा अन्योन्य संबंध असतो. आणि मनन, चिंतन, वाचन, ऐकणं, पाहणं, रियाझ ह्याची तर सतत गरज असते. आपली कला तयारीनिशी, विचारपूर्वक मांडायची असते. समाजाला आपला आविष्कार अनुभवण्याची असोशी नसते. रसिकांनाही अधूनमधून विश्रांती लागते. तसंच हेही लक्षात ठेवावं की प्रत्येकाला शब्द माहीत असले तरी कविता येतेच असं नाही आणि शब्द उच्चारता आले तरी भाषण साधतंच असं नाही. काळ सबुरीचा आहे, घायकुतीला येण्याचा नाही. अभिनय किंवा गाणं ताकदीचं असेल तर काही काळ विंगेत गेल्याने प्रेक्षक नटाला किंवा गायकाला विसरत नाही. प्रेक्षकांची आराधना नाही तर कलेची उपासना करावी. अनुभव मुरला नाही तर अभिव्यक्ती उठवळ होते. संधी आहे तर जरा आत बघावं…आपण सध्या रियाझ करु.. नव्या संहिता तयार करुन ठेवा..अभ्यास करु.. मला कल्पना आहे अनेक कलाकारांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे.. काहीतरी वेगळा मार्ग सध्या स्वीकारणं गरजेचं आहे….हीच सध्याची खरी परिस्थिती आहे… भगवंतानंच कलेचं वाण घेऊन तुम्हाला पाठवलं आहे… तोच मार्गही दाखवेल.. विचार करा मित्रांनो… नाहीतर एवढा मोठा loss कुठुन भरून काढणार… प्लीज… प्लीज… अगदी मनापासुन कळकळीची विनंती.. ३…४..लोकांपेक्षा जास्त एकत्र जमणे.. आणि कला सादर करणे शक्यतोवर टाळा…बघा पटतंय का?… miss you dear Vijay..

विजय यांचे गायलेले एक गीत….हे सुरेल सूर आता कायमचे हरवले…..!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या