

२००५ च्या रहीवाशी इमारतीतील सातवा मजला विकण्याचा घाट
एफएसआयमध्ये फेरफार करण्याचा अवैध प्रयत्न:रहीवाश्यांचा आरोप
नागपूर,ता.१० मे २०२२: ‘पूनम प्राईड’ नावाची सात मजली सदनिका ही खामला येथे स्थित आहे. शहरातील ’कु’प्रसिद्ध बिल्डर एन. कुमार यांनी ही मालमत्ता २००५ मध्ये बांधली होती. सात मजली या इमारतीत एकूण २१ सदनिका आहेत.प्रत्येक मजल्यावर तीन सदनिका असून ज्या वेळी एन.कुमार यांनी या सदनिका विक्रीच्या जाहीराती त्या काळी प्रसिद्ध केल्या त्यात या इमारतीत सदनिका विकत घेणा-यांना क्लब हाऊस,जनरेटर,वीज,अग्निशमन यंत्रणा इत्यादी अनेक सुविधांबाबतचे विविध प्रलोभन देण्यात आले होते परिणामी फक्त जाहीराती व ब्रोशर बघून या इमारतीत अनेक मध्यम वर्गीयांनी सदनिका विकत घेतल्या मात्र एन.कुमार यांनी जाहीरातीत प्रसिद्ध केलेले कोणतेही वचन पूर्ण न करताच येथील रहीवाश्यांना इतर ही बाबतीत आर्थिक व कायदेशीर अडचणीत आणून एकटे सोडले.
अनेक वेळा एन.कुमार यांच्याकडे वचन पूर्ततेचा तकादा लाऊन देखील एन.कुमार यांनी ग्राहक सदनिका मालकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत,अश्यातच अचानक १७ वर्षांनंतर बिल्डरने या इमारतीतील सातव्या मजल्यावरील तीन सदनिका विकण्याचा घाट घातला,या सदनिकासह गच्चीवर देखील माझा हक्क असल्याचा एन.कुमार यांनी येथील सदनिका मालकांना बजावले,परिणामी आज मंगळवारी या सदनिकेतील सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अनुप मरार यांच्या मार्गदर्शनात कोषाध्यक्ष सुभादिप बेरा व सचिव भाविक पारेख यांनी प्रताप नगर पोलिस ठाणे गाठून बिल्डर एन.कुमार यांच्या विरोधात तक्रार नोंदवली.
नुकतीच २ मे रोजी या बिल्डरसोबत या इमारतीतील सदनिका धारकांची बैठक पार पडली,यात बिल्डरला वचन पूर्ततेची मागणी करण्यात आली मात्र एन.कुमार यांनी ती धुडकावून लावली. ही इमारतीचे सीटी सर्व्हेमध्ये नाव चढवण्याची जबाबदारी ही देखील सर्वस्वी बिल्डरची असताना त्यांनी त्याची देखील पूर्तता केली नाही, परिणामी या इमारतीतील रहीवाश्यांनी
महत् प्रयत्सायातून २० लाख रुपये गोळा करुन ही इमारत सिटी सर्व्हेत आणली.यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करताना येथील रहीवाश्यांना ३३ कोटी देव आठवले एवढा झोल या बिल्डरने कागदपत्रांच्या बाबतीत करुन ठेवला होता.संपूर्ण बोगस कारभार या बिल्डरने केला असल्याचा अारोप येथील रहीवाशी करतात,एक तर ब्रोशरमध्ये दाखवण्यात आलेल्या बाबी बिल्डरने पूर्ण केल्या नाहीत त्यात सिटी सर्व्हेसाठी देखील रहीवाश्यांना जबर आर्थिक फटका ही बसला.मात्र आता अचानक बिल्डरने सातव्या मजल्यावरील त्यांच्या ताब्यात असणा-या तीन सदनिका विकण्याचा घाट घातला व त्यासाठी वेगवेगळे ग्राहक इमारतीत येऊ लागल्याने येथील रहीवाश्यांनी बिल्डरला आधी जाहीरातीत दिलेल्या वचनांची पूर्तता करा मगच सदनिका विका,तोपर्यंत कोणीही बिल्डरच्या सदनिका घेऊ नये असे फलक व नोटीसा इमारतीच्य परिसरात व सातव्या मजल्यावर लावले.
बिल्डरच्या माणसाने आज या इमारतीत अवैधरित्या शिरुन हे फलक व नोटीसा फाडल्या,त्यामुळे त्या अज्ञात माणसाचा शोध घेण्यसाठी व एन.कुमार यांच्या विरोधात आज या इमारतीतील रहीवाश्यांनी प्रताप नगर पोलिस ठाणे गाठले.आज या सदनिकेत एकूण १८ कुटुंबे राहत असून बिल्डरला ज्या तीन सदनिका विकायच्या आहेत त्याचीच किंमत आजच्या तारखेत तीन कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जात आहे.

इमारत तयार करुन दिल्यावर इमारतीच्या देखरेखीवरच येथील रहीवाश्यांना अतोनात खर्च करावा लागला.बिल्डरने मेंटनेंसचा वायदा देखील पूर्ण केला नाही व ग्राहकांची फसवणूक केली.एवढंच नव्हे तर मनपातील अधिका-यांना हाताशी धरुन अनाधिकृतपणे सातवा मजला ही चढवला जो मूळ नकाश्यात नाही,बिल्डरने एफएसआय नसताना सातवा मजला चढवला,असे येथील रहीवाश्यांचे म्हणने आहे.येथील रहीवाश्यांनी नागपूर महानगरपालिकेला या इमारतीच्या चौकशीबाबत अनेक निवेदन दिले मात्र मनपाच्या काही भ्रष्ट अधिका-यांचे बिल्डरसोबत साटेलोटे असल्याने येथील रहीवाश्यांच्या निवेदनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.दूसरीकडे मनपाचा हाच अतिक्रमण विभाग हा शहरातील दिव्यांग आणि गरीबांची अस्थायी दूकाने मात्र ज्या ’कर्तव्य दक्षतेने’ उखडून फेकण्यास सरसावतो हे अवघ्या नागपूरकरांनाही माहीती आहे.
एन.कुमार हा शहरातील एक(कू)प्रसिद्ध बिल्डर असून नागपूरात त्याचे ८० ते ९० प्रकल्प असून भाजप व काँग्रेसच्या एका मंत्र्यांचा हा बिल्डर खूप ’खास’मानला जातो.याचा अर्थ ‘सर्व पक्षीय राजकीय सोह्यार्द्र’साधण्याची किमया या बिल्डरने साधल्यामुळेच २ मे च्या रहीवाश्यांसोबतच्या बैठकीत ’तुम कितनी भी अपनी चप्पले रगड लो मेरा कोई कुछ भी नही बिगाड सकता’अशी मगरुरीची भाषा हा बिल्डर सहज वापरत असतो.’मै पुरा सिस्टिम जेब में लेकर घूमता हूं’असे उद् गार हा बिल्डर बिनधोकपणे काढत असतो’कितना भी उखाड लो, मै कुछ भी बनाके नही देनेवाला’अशी मुजोरीची भाषा हा महान बिल्डर फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या चक्क तोंडावर फेकण्याची हिमाकत दाखवतो.
या इमारतीत बिल्डरने जवळपास दहा दूकानांचे देखील बांधकाम केले आहे.आतापर्यंत या दूकानांची देखील स्वच्छता व देखरेखीचा खर्च इमारतीतील रहीवाशींच करीत होते.आता मात्र त्यांनी या दूकानांचे मेंटनेंस करने बंद केले.आम्ही बँकेतून कर्ज काढून खामल्याच्या या भागात २००५ मध्ये सदनिका घेतल्या होत्या मात्र धूर्त बिल्डरचे पैसे चूकते करुन देखील लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड आमच्यावर बसला असल्याची व्यथा येथील रहीवाशी मांडतात.
या संदर्भात आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती असे ते सांगतात.यावरही हा सर्वस्वी धूर्त व भ्रष्ट बिल्डर सरळ सरळ पत्रकारांना देखील हूल देत ’जो छापना है छापो,मेरा कोई कुछ नही बिघाड सकता’असा दम देतो.विशेष म्हणजे या बिल्डरने आपल्या व्यवसायात शासकीय सेवेत मुरलेले निवृत्त सनदी अधिकारी,तहसीलदार आदी यांची नेमणूक केलेली असून नोकरशाहीत मुरलेले हे माजी सनदी अधिकारीच एन.कुमार यांना सर्व कायदेशीर बाबींमधून ‘सुखरुप’वाट काढून देत असतात,अशी माहिती समोर आली आहे.
अलंकार चौकातील सेंट्रल मॉलच्या कर चुकवेगिरी प्रकरणात याच एन.कुमार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलाच दणका देत मनपाने आकारलेल्या दंडाच्या रकमेत सूट मिळणार नसल्याचे सांगून दंडाच्या रकमेसह संपूर्ण कर भरण्याचे आदेश दिले होते,हे विशेष!
याच बिल्डरच्या विरोधात एस.व्ही. सुळे, डॉ.के.एन. इंगले आणि डॉ. मोहम्मद नजर यांनी २००८ मध्ये ग्राहक न्यायालयात आश्वासनांचा भंग, माहितीपत्रकानुसार खात्रीशीर पायाभूत सुविधांची पूर्तता न करणे, अनुचित व्यापार पद्धती, सुधारणा कराराची अंमलबजावणी आणि संबंधित बाबींसाठी दावा दाखल केला होता.
या इमारतीत फ्लॅट्सची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरने ‘सुधारित ’रेखाचित्रे सादर करण्याच्या अलीकडेच प्रयत्न केल्याने, याचिकाकर्त्यांच्या नेतृत्वाखालील सदनिका मालकांनी नगररचना प्राधिकरण, मनपा आयुक्त, नासुप्र अध्यक्ष आणि खामला उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. गेल्या १२ ते १५ वर्षांपासून या इमारतीत १८ रहिवासी राहत असून प्रत्येक रहिवाशाच्या नावावर सदनिका आणि जमिनीचा योग्य हिस्साची कायदेशीररित्या नोंदणी झाली असताना,इतक्या वर्षांनंतर रहीवाश्यांची परवानगी न घेता आता एफएसआय वाढीचा प्रयत्न करणारा बिल्डर गच्चीचा मालक कसा असू शकतो? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
या मुद्द्यावरून रहिवासी आणि बिल्डर यांच्यात आता खडाजंगी सुरु झाली आहे. बिल्डरचा दावा आहे की ‘डीड ऑफ डिक्लेरेशन’ आणि मंजूर नकाशा या योजनेत प्रस्तावित ७ व्या मजल्यावरील फ्लॅट दर्शवित आहेत आणि बिल्डरच्या मालकीचीच गच्ची असून, भविष्यात कोणत्याही एफएसआयमध्ये वाढ होईल. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की अशा एकतर्फी ’डीओडी’ ला अनेक न्यायालयांनी फटकारले आहे आणि अनेक न्यायालयाच्या निकालांनी,ज्यांना देशभरातील त्यांच्या संबंधित बांधकाम व्यावसायिकांसोबत अशाच समस्यांना तोंड द्यावे लागले आहे,इमारतीतील रहिवाशांच्या बाजूने निर्णय दिला आहे,
सदनिकांची विक्री केल्यानंतर, रहिवाशांचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता १५ वर्षांनंतर फ्लॅट विकसित करण्याचा किंवा एफएसआय वाढवण्याचा बिल्डरला कोणताही अधिकार नाही. रहीवाश्यांच्या जुन्या तक्रारींचे समाधानकारक न्याय्य निपटारा आणि न्याय प्रदान केल्यानंतर व सर्व सदनिका मालकांची संमती मिळवण्यापूर्वी एन.कुमार या बिल्डरने इमारतीबाबतच्या प्रस्तावित सुधारित नकाशा सादरीकरणावर,बिल्डरने इमारतीतील सदनिका धारकांच्या कोणत्याही प्रकारच्या संवैधानिक आक्षेपांची दखल घेतली नाही. सदनिका धारकांचा आक्षेप योग्य आहे असे कायदेतज्ज्ञांचे देखील हेच मत आहे कारण बिल्डरला मालमत्ता विक्रीनंतर आणि वाटपानंतर इमारतीच्या बाबतीत आपल्याच एकट्याच्या मताने कोणताही निर्णय घेता येत नाही. इमारतीच्या बाबतीत कोणताही विकास फक्त सदनिका धारकांच्या व सर्व जमीन शेअर मालकांच्या संमतीनेच होऊ शकतो.
बिल्डरच्या याच सर्व अवैध कारभाराविरुद्ध तसेच इमारतीत शिरुन इमारत परिसरातील सूचनांचे फलक फाडून फेकणा-या अज्ञात इसमाच्या विरोधात सोसायटीचे कोषाध्यक्ष सुभदीप बेरा व सचिव भाविक पारिख यांनी आज प्रताप नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून बिल्डरने या मुद्दांवर जर कोणताही सौहार्दपूर्ण तोडगा काढला नाही, तर सदनिका मालक हे बिल्डरच्या अशा मनमानी एकतर्फी ’डीओडी’विरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा येथील रहीवाशी देतात.




आमचे चॅनल subscribe करा
