

मनपा सभेत गाजली लक्ष् वेधी
नागपूर,ता. २५ मार्च: शहराचे पालकत्व असणा-या नागपूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या सुरस कथा आता जनतेला ही चांगल्याने मुखोद् गद झाल्या असल्या तरी ही मालिका कुठेही खंडीत होण्याचे नाव घेत नाही,आता मनपाच्या मालमत्ता कर विभागातील काही कर्मचा-यांनी काही ‘खास’प्रतिष्ठानांचे कोट्यावधी रुपयांचे कर लाच खाऊन कसे कमी केले,याची जंत्रीच माजी महापौर प्रवीण दटके यांनी मनपाच्या गुरुवारी पार पडलेल्या ऑन लाईन सभेत वाचली.
सभेच्या सुरवातीलाच दटके यांनी लक्ष् वेधी मांडून एकच खळबळ उडवून दिली.मालमत्ता कर विभागात कोट्यावधींचा कर कमी करुन देणारे रॅकेट सक्रीय असून आधीच आर्थिक अडचणीत असणारी मनपा आणखी आर्थिक अडचणीत जात असल्याचेच हे प्रकरण द्योतक आहे.
निवृत्त अधिकारी तसेच कर विभागातून बदली झालेल्या अधिका-यांचा पासवर्ड व यूजर आय-डी वापरुन कोट्यावधी रुपयांचा कर कमी केला जात असल्याचा आरोप दटके यांनी केला.याप्रकरणी चौकशी गठीत करण्याची मागणी त्यांनी केली.एवढंच नव्हे तर चौकशी पूर्ण होईपर्यंत विभागप्रमुखाची बदली दूसरीकडे करण्यात यावी अशी मागणी ही त्यांनी केली.
मनपा कर्मचा-यांना सातवा वेतन लागू झाला असताना कर्मचारी असे वागत असतील आणि मनपाच्या उत्पन्नात घट होत राहणार असेल तर ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे ते म्हणाले.काही कर्मचा-यांमुळे मनपाचीच बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.याचा परिणाम शहराच्या विकास कामांवर होत असल्याचे ते म्हणाले.विशेष म्हणजे जे घोटाळे करीत आहे त्यांना ‘अवॉर्ड’ मिळत आहे ज्यांनी प्रामाणिकपणे या घोटाळ्याची तक्रार सायबर सेलकडे केली त्यांचेच निलंबन करण्यात आले.
अश्यारितीने महसूल विभाग चालूच शकत नाही.त्यामुळे लोकप्रतिनिधी व मनपा अधिकारी यांची संयुक्त चौकशी समिती स्थापून नि:पक्ष् चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.या समितीसमोर पुरावे मांडू असे ते म्हणाले.
दटके यांच्या मागणीवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी ही पूर्णत:प्रशासकीय बाब असून या प्रकरणाची दखल देखील घेण्यात आली आहे,यावर कारवाई ही केली असून चौकशीही सुरु असल्याचे आयुक्त म्हणाले.त्यामुळे अन्य समितीची गरज नाही,असे आयुक्तांनी सांगितले.
यावर दटके यांनी आयुक्तांच्या कारवाईवर विश्वास नसल्याचे ठणकावले.अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणा-या समितीकडूनच या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती त्यांनी महापौरांना केली.प्रशासनाकडे मी या गंभीर बाबीची तक्रार दीड महिन्यांपूर्वीच केली होती मात्र त्या कर्मचा-याला २३ मार्च रोजी म्हणजे सभेच्या दोन दिवसांआधी निलंबित करण्यात आले.दीड महिने प्रशासन हे झोपले होते का?असा सवाल त्यांनी केला.
ज्या कर्मचा-याने स्वत: दखल घेऊन कोट्यावधीच्या या कर चोरीची तक्रार शहर पोलीसांच्या सायबर सेलकडे केली त्यालाच निलंबित करण्यात आले.या विभागातून ज्यांच्या बदल्या झाल्या त्यांचेच पासवर्ड,यूझर आय-डी वापरुन हा संपूर्ण घोटाळा करण्यात आला.या गंभीर घटनांची चौकशी समितीच्या माध्यमातूनच होऊ शकते,असे दटके म्हणाले.
वाटल्यास मनपा आयुक्तांनाही समितीत सहभागी करण्यात यावे,पण लोकप्रतिनिधींचा सहभाग असणारी समिती ही झालीच पाहिजे.दोषी असलेल्यांवर कारवाई करावी,ते निर्दोष सिद्ध झाल्यास त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे,अशी मागणी दटके यांनी केली.
महापौर यांनी प्रशासनाला याबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिल्यानंतर उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी या संदर्भात नागपूर पोलिसांच्या सायबर सेल विभागाची मदत घेण्यात येत असून याबाबत तक्रार ही दाखल करण्यात आली असल्याचे सांगितले.तसेच या प्रकरणात गांधीबाग आणि हनुमाननगर झोनमधील संजय खडगी आणि गौरीशंकर रहाटे यांना निलंबित करण्यात करण्यात आले असल्याचे सांगितले.
सभेत दटके यांनी खडगी यांच्या लॉगिन व पासवर्डचा वापर करुन धंतोली झोनअंतर्गत येणा-या व्यावसायिक अडीच लाखांचा मालमत्ता कर कश्याप्रकारे ७० हजार करण्यात आला हे सउदाहरण सांगितले.विशेष म्हणजे खडगी हे गांधीबाग झोनमध्ये कार्यरत आहेत,मात्र असे असताना त्यांनी धंतोली झोनमधील मालमत्तेचा कर कमी करण्याचा ‘चमत्कार’ केला.या संबंधित मालमत्तेचे प्रकरण मालक व मनपा यांच्यात, कराच्या रकमेवरुन न्यायप्रविष्ट आहे,असे असताना खडगी यांनी चुकीच्या पद्धतीने मालमत्तेचे मुल्यांकन करुन कर कमी केला.तसेच रहाटे यांनी देखील अश्याच प्रकारचा गैरप्रकार केला असल्याचा आरोप दटके यांनी केला.
यावर निर्देश देताना महापौरांनी हा विषय अतिशय गंभीर असून याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले.एका माणसाने आपला पासवर्ड इतरांना सांगायला नाही पाहिजे,व दूस-याने याच गैरवापर केला त्याचीही चूक आहे.हे कोणामुळे घडले याची चौकशी समितीच करेल.अश्या प्रकारामुळे खूप प्रमाणात महसूलीचे नुकसान होत असून याबाबतीत आयुक्तांचे मात्र वगेळे म्हणने आहे.त्यांना वेगळी चौकशी समिती नको आहे.मात्र ही चौकशी होताना संबंधित कर्मचारी हा पदावर बसला असल्यास त्याचा हस्तक्ष्ेप नाही झाला पाहीजे,याची खबरदारी आयुक्तांनाच घ्यावी लागेल.या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा,सहायक आयुक्त तसेच कर समिती सभापती यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करुन पुढील सभागृहात या समितीने अहवाल ठेवण्याचे निर्देश दिले.




आमचे चॅनल subscribe करा
