
मुंबईचे पत्रकार ’इन’स्थानिक पत्रकार हॉटेलमधून केले’आऊट’
स्थानिक पत्रकारांचा भाजपच्या बातम्यांवर बहीष्कार
नागपूर,ता.२७ मार्च २०२२: भाजपानेते किरीट सोमय्या सध्या कोकण दौ-यावर आहेत. ते महाड येथे आले असता अगोदर मुंबईच्या मिडियाला घेऊन ते विसावा नावाच्या हॉटेलमध्ये प्रवेशकर्ते झाले. तेथे त्यांनी दोन तासांपासून रणरणत्या उन्हात वाट बघत असलेल्या स्थानिक पत्रकारांवर डाफरत पत्रकारांना बाहेर काढून अपमानास्पद वागणूक दिली. सुरवातीला सोमय्यांनी स्थानिक पत्रकारांसोबत फोटोसेशन केले,बाईट ही दिली मात्र हॉटेलच्या आतमध्ये जाताच त्यांनी ‘रौद्र’रुप धारण केले.सोमेय्या यांच्यासोबत मुंबईचे पत्रकार होते ते हॉटेलच्या आत गेले तेव्हा स्थानिक पत्रकार देखील आतमध्ये बातमी मिळेल या अपेक्षेने हॉटेलच्या आत गेले मात्र अलीकडच्या काळात ‘सातव्या आसमानवर’उडणारे हे माजी आमदार बातमीसाठी गेलेल्या स्थानिक पत्रकारांना तुच्छतेची वागणूक देऊन,त्यांना हॉटेलच्या बाहेर हाकलून मोकळे झाले.
या घटनेचा रायगड प्रेस क्लबने निषेध केला आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने देखील घटनेचा निषेध केला आहे. किरिट सोमय्या सारखे नेते जेव्हा ग्रामीण भागात येतात तेव्हा त्यांना मुंबईतील मिडियाचा ताफा का लागतो? माध्यम समुहांनी देखील आपल्या स्थानिक पत्रकारांवर अविश्वास दाखवत मुंबईतील पत्रकारांना का नेत्यांबरोबर पाठवावे? यातून मुंबईतील मीडिया आमच्याबरोबर आहे, स्थानिक पत्रकारांची गरज काय अशी घमेंड या नेत्यांमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेली आढळते.तसं ही दिवसभर मराठी वृत्त वाहिन्यांना सोमय्या यांचे ‘अतिरंजित उपदव्याप’ दाखविण्यापलीकडे बातम्याच मिळत नाही.मराठी प्रेक्षकही अश्या या अतिरंजित व अतिरेकी बातम्याच्या भडीमारमुळे इतर वृत्त वाहीनीकडे वळतो तेव्हा त्या देखील वाहिनीवर सोमेय्यांशिवाय महाराष्ट्रात इतर काय-काय घडले याचा ‘थांगपत्ता’नसतो. आपल्याला मिळणारे ‘मुंबईकर फूटेज’या घमेंडमध्ये वावरत असणारे भाजपच्या या माजी आमदारांची मजल त्यामुळेच पत्रकारांना अपमानित करुन हॉटेलच्या बाहेर काढण्यापर्यंत गेली.
महाडमधील घटनेबद्दल भाजपने जाहीरपणे माफी मागेपर्यंत भाजपच्या स्थानिक बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लब आणि स्थानिक पत्रकारांनी घेतला आहे. मुंबईतील प्रतिनिधी जेव्हा येतात तेव्हा ते सारी माहिती स्थानिक पत्रकारांकडूनच घेतात आणि सवत:च्या नावाने बातमी तयार करतात. असे असले तरी आज महाडमध्ये जे घडले त्याबाबत ताफ्यातील पत्रकारांच्या प्रतिक्रिया थंड होत्या.. महाडच्या पत्रकारांना बाहेर काढल्यानंतर ताफ्यात असलेल्या मुंबईतील एका ही पत्रकाराने त्याला विरोध केला नाही. यावरुन मुंबईचे हे काही पत्रकार ’खालल्या मिठाला किती जागले’आहेत याची प्रचिती आली.
रायगढ जिल्ह्याच्या पणवेलपासून तर महाडपर्यंतच्या मार्गात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सोमेय्या यांचे उस्फूर्तपणे स्वागत केले.अगदी महाडमध्ये येईपर्यंत या स्वागतांनी भारावलेले सोमेय्या हे अतिशय चांगल्या मूडमध्ये होते.दापोलीमध्ये तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी साेमेय्या यांना काळे झेंडे दाखवले होते मात्र पणवेल किवा महाडमध्ये असं काहीच घडलं नव्हतं ज्यामुळे सोमेय्या हे संतप्त होतील.
भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनीच स्थानिक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी विसावा हॉटेलमध्ये बोलावले होते.दोन तास उन्हात उभं राहून हे पत्रकार व छायाचित्रकार सोमेय्या यांची वाट बघत होते.दोन तासांनंतर सोमेय्या यांचे आगमन त्या ठिकाणी झाले.या ठिकाणी त्यांचे झालेल्या स्वागताचे छायाचित्र,व्हिडीयो काढल्या जाऊ लागले,याला ही सोमेय्या यांनी योग्य तो प्रतिसाद दिला.
यानंतर सोमेय्या हे विसावा हॉटेलच्या आतमध्ये गेले.ते आतमध्ये गेल्यानंतर मुंबईच्या पत्रकारांना आतमध्ये बोलावले आहे असा निरोप बाहेर देण्यात आला.मुंबईच्या पत्रकारांना सोमेय्या हे कोणती माहिती देणार आहेत त्याचेच वृत्तांकन करण्यासाठी महाडचे स्थानिक पत्रकार हे देखील हॉटेलच्या आत गेले मात्र स्थानिक पत्रकारांना बघताच सोमैय्या यांचा संताप अनावर झाला,त्यांनी लगेच स्थानिक पत्रकारांना बाहेर हाकलून लावले,एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांना देखील अतिशय अपमानास्पदरित्या बाहेर हाकलले.
या पदाधिका-यांमध्ये अनेक महिला पदाधिकारी देखील होत्या ज्यांना अपमानास्पदरित्या बाहेर पडावे लागले.पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून त्या हा अपमान गपगुमान मूग गिळून बसतील ही मात्र पत्रकारांवर आक्राळविक्राळ रुप धारण करुन अपमानास्पदरित्या बाहेर हाकलून लावण्याचा अधिकार या माजी लोकप्रतिनिधीला दिला कोणी?असा संताप आता व्यक्त केला जात आहे.केंद्रातील सत्तेची ‘गुर्मी आणि गर्मी’ महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यात देखील कशी तळपली याचाच प्रत्यय आज महाड येथील स्थानिक पत्रकारांना आला.
सिलेक्टीव्ह आक्रमकता दाखवणा-या सोमेय्या यांनी आज आणखी एक पराक्रम गाजवत सिलेक्टीव्ह पत्रकारांना मुंबईवरुन आणले,सोबत हॉटेलच्या आत नेले,त्यांना विशेष वागणून दिली,यात ही काहीच वावगे नाही मात्र मुंबईतील सिलेक्टीव्ह पत्रकारांची ‘मनापासून’आवभगत करीत असताना सोमेय्या यांना स्थानिक पत्रकारांचा अपमान करण्याचा हक्क कोणी दिला?
सिलेक्टीव्ह घोटाळे सातत्याने बाहेर काढणारे साेमेय्या यांना, स्थानिक पत्रकरांचे ज्यांना अधिक खोलवर ग्राऊंड रिएलिटी माहिती असते त्यांचे अडचणीत आणनारे प्रश्न हॉटेलमध्ये आयोजित पत्र परिषदेत नको होते का?भाजपचे नेते व केंद्रिय राज्य मंत्री नारायण राणे यांना देखील असेच अडचणीचे प्रश्न विचारण्यात आल्यावर अशीच एक घटना त्या ठिकाणी घडली होती.
बंदूकधारी सुरक्षा घे-यात वावरणारे असे हे लोकप्रतिधिनी जेव्हा हवेत उडू लागतात व आपल्या वर्तवणूकीची मर्यादा ओलांडतात तेव्हा असे दूर्देवी प्रसंग घडत असतात मात्र मुंबईचे पत्रकार असो किवा राज्यातील इतर शहर,ग्रामीण भागातील पत्रकार त्यांच्यामध्ये भेदाभेद करण्याची एक नवीनच टूम अलीकडच्या काळात निर्माण झालेली दिसून पडतेय.सिलेक्टीव्ह पत्रकारांकडून सिलेक्टीव्ह वार्तांकनाची अपेक्षा ठेवली जात आहे,जी लोकशाहीलाच मारक ठरत आहे.
अहमदनगरमध्ये एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एका स्थानिक पत्रकाराने त्यांचेच नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील यांच्या विषयी अडचणीत आणनारा प्रश्न विचारला तेव्हा कधीही आपला संयम न ढळू देणारे या संयमी नेत्याचा देखील तोल त्यावेळी ढासळला व ते या स्थानिक पत्रकारावर उखडले.नेत्यांना पत्र परिषदा तर घ्यायचा आहेत मात्र ते सांगतील तेच प्रसिद्ध करण्याचा अट्टहास हा सुदृढ लोकशाहीसाठी किती मारक आहे याचाच प्रत्यय आज महाड येथे आला.
नागपूर शहरात दरवेळी अधिवेशनासाठी येणा-या अनेक मुंबईकर पत्रकारांचा तोरा नागपूरातील स्थानिक पत्रकारांना देखील झेलावा लागतो.विधान सभेतील पत्रकार कक्षात यांना आधी समोरची जागा हवी असते.इतरांनी ते आधी बसलेली जागा धरलेल्या त्यांना चालत नाही,मंत्रालयातील सचिवांकडे वारंवार त्यांच्यासाठी चांगली आसने राखून ठेवण्याचा तकादा लावला जातो.मंत्रालयच मुंबईतच असल्याने या मुंबईकर पत्रकारांचे चेहरे हा सचिव वर्ग ‘चांगल्याने’ओळखून असतो.नागपूरात दर वेळी पत्रकारांना अधिवेशनात मुंबईकर पत्रकारांचे ‘हवेत उडणे’ याचा अनुभव येतच असतो.त्यांनी हवेत उडावं,मुंबईचे म्हणून मिरवावं,मंत्री-संत्री यांच्या ओळखीचे म्हणून दंभ ही बाळगावा मात्र नागपूर करारानुसार नागपूरात अधिवेशनासाठी आलेले असताना उगीच, नागपूरच्या स्थानिक पत्रकारांना विधी मंडळाच्या आत आणि विधीमंडळ परिसरात ‘तुच्छ’ समजून वागणूक देणारी कोती वृत्ती निदान ’पत्रकार’म्हणून तरी सोडावी,अशी अपेक्षा या महान ’मुंबईकर पत्रकारांकडून’महाडच्या कालच्या घटनेनंतर नागपूरचा पत्रकार वर्ग करीत आहे.




आमचे चॅनल subscribe करा
