Advertisements

भाजप आमदार परिणय फुके यांच्या मातोश्रीच्या आरोपावर दिले उत्तर
राजकारण करायचं असतं तर फुकेंवर टिका केली असती,फडणवीसांचा राजीनामा मागितला असता: सुषमा अंधारे
नागपूर,ता.२९ मे २०२५: नागपूरातील भाजप आमदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे व विश्वासहार्य समजले जाणारे मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील आमदार परिणय फुके यांच्यावर काल शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन फुके कुटूंबातील धाकटी सून प्रिया फुके यांच्यावरील अन्यायाला वाचा फाेडली.या पत्रकार परिषदे प्रिया यांनी फुके कुटूंबियांवर अतिशय गंभीर अारोप केले होते.या पत्रकार परिषदेच्या संदर्भात परिणय फुके यांच्या मातोश्री रमा फुके यांनी एक निवेदन जारी केले ,त्यात रमा फुके यांनी सुषमाताई,रोहिणीताई यांनी नागपूरात येऊन राजकारण करण्यापेक्षा आमच्या कुटूंबातील वाद सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता,असा टोला हाणला,यावर अंधारे यांनी संपूर्ण पत्रकार परिषद ऐकून सुद्धा हा पराकोटीचा बेशरमपणा असल्याचा संताप व्यक्त केला.
राजकारण करायचं असतं तर कालच्या पत्रकार परिषदेत आम्ही भाजप आमदार परिणय फुकेंवर टिका केली असती व परिणय फुकेंचा राजीनामा मागितला असता.प्रिया फुके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार ते पाच वेळा प्रत्यक्ष भेटून,त्यांच्यावरील अन्यायाची संपूर्ण कागदपत्रे दाखवून देखील फडणवीस यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रिया हिला न्याय देण्यासाठी काहीही केले नाही,या पार्श्वभूमीवर आम्ही फडणवीस यांचा ही राजीनामा मागितला असता मात्र,आम्ही असे काहीही केले नाही तर प्रिया यांना त्यांच्या दोन चिमुकल्यांसह फुके कुटूंबियांनी पुन्हा आपल्या कुटूंबात सामावून घेतलं पाहिजे,असे आवाहन केले,तरी देखील आमच्यावर राजकारण करीत असल्याचा आरोप हा दूर्देवी असल्याचे अंधारे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या.
परिणय फुके यांच्या मातोश्री निवेदनात सांगतात त्यानुसार, आम्ही राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या कुटूंबातील वाद सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता,आम्ही प्रिया यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व कुटूंबातील वाद मिटवण्यासाठीच नागपूर गाठले होते,असे अंधारे सांगतात.त्यांनी आमची पत्रकार परिषद कान देऊन पुन्हा नीट ऐकावी व शेवटपर्यंत आम्ही जे वास्तव मांडले व प्रियाला न्याय देण्याची मागणी केली त्यावर विचार करावा,असे आवाहन त्यांनी केले.
सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी माझी देखील बाजू ऐकून घेतली असती तर खरी वस्तुस्थिती कळली असती आणि डोळेसुद्धा उघडले असते,असे परिणय फुके यांच्या आई रमा फुके म्हणाल्या.मी एक ज्येष्ठ नागरिक असून आजारी असते,हा आमचा कौटूंबिक वाद असून त्याला राजकीय वळण देण्यात आल्याचा आरोप रमा फुके यांनी केला.आमच्या घरगुती वादाबद्दल व माझ्या कुटूंबियांवर केलेले आरोप दूर्देवी व समाजाची दिशाभूल करणारे असल्याचे सांगत,हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे यावर अधिक बोलणे हा न्यायालयाचा अवमान होईल.
मी माझा तरुण मुलगा गमावला आहे,त्या दु:खातून आम्ही अजूनही बाहेर पडलेलो नाही.मुलगा संकेत याचे निधन झाल्यानंतर आम्ही आमची सून प्रिया आणि दोन्ही नातवंडांना आंनदात ठेवण्याचा प्रयत्न केला.त्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव जाणवू नये यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत होतो.,पण आमच्या नशिबात ते नव्हते,असे निवेदनात रमा फुक़े सांगतात.माझे पती रमेश फुके आजारी असतात.प्रिया यांना कोणत्या गोष्टींचा राग आहे,तिला कोणता बदला घ्यायचा आहे,हे अजूनही आम्हाला कळलेले नाही.कुटूंबात एकत्र बसून वाद संपवण्याचे आम्ही सर्वांनी प्रयत्न केले,पण दूर्देवाने आम्ही अपयशी ठरलेा,असे रमा फुके सांगतात.
आमच्याकडे प्रत्येक वेळी पैशांची मागणी केली जाते,आम्ही ती पूर्ण सुद्धा करतो.पण आमच्या कुटूंबात शांती राहू नये,असेच प्रयत्न केले जात आहेत.सुषमाताई आणि रोहिणीताई यांनी आमच्या घरातील वाद लोकांसमोर आणून राजकारण करण्यापेक्षा वाद सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते तर अधिक बरे झाले असते,अशी तक्रार रमा फुके यांनी केली.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे व रोहिणी खडसे यांनी अनेकदा स्पष्ट केले की,
हा कौटूंबिक वाद कुटूंबातच मिटला तर आम्हाला खूप आंनदच होईल मात्र,२०२२ मध्ये प्रिया यांचे पती संकेत फुके यांच्या निधनानंतर ज्याप्रकारे रात्रीच्या साढे दहा वाजता प्रिया यांना त्यांच्या दहा व आठ वर्षांच्या मुलांसोबत घराबाहेर काढण्यात आले,ती कृती योग्य होती का?प्रिया यांना धमकावणे,त्यांची एफआयआर नोंदवून न घेणे,वारंवार प्रियालाच अंबाझरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सूचना पत्र देतात,प्रियावरच ॲट्रोसिटीचा व खंडणीचा गुन्हा दाखल करने हा कौटूंबिक वाद मिटविण्यासाठीचा पुढाकार आहे का?असा सवाल त्या करतात.
अवघ्या ३४ वर्षीय प्रिया आयुष्याच्या जोडीदाराला मुकली कारण लग्नाच्या दोनच वर्षांपूर्वी संकेत यांचे किडनी ट्रांसप्लान्ट झाले होते,ही बाब प्रिया व तिच्या कुटूंबियांपासून लपवण्यात आली होती.ज्याप्रकारे संकेत हे रमा फुके यांचे अपत्य होते त्याप्रमाणे अतिशय तरुण असलेल्या प्रिया यांच्या आयुष्याविषयी रमा फुके यांना विचार आला नाही का?लग्नानंतर प्रियाला ही धक्कादायक बाब कळाली असता,तिलाच धमकावण्यात आले.माहेरच्यांवर बलात्काराची धमकी देण्यात आली.दहा वर्षांच्या संसारात प्रिया हिला एक मुलगा व एक मुलगी झाली मात्र,संकेतचे मुंबईत उपचारादरम्यान निधन झाल्यावर प्रियाला संपत्तीबाबत अनेक गोष्टी खटकल्या.याविषयी जाब विचारु लागल्याने प्रिया हिला तिच्या चिमुकल्यांसह रात्रीच्या साढे दहा वाजता घरा बाहेर काढण्यात आले.यानंतर पोलिस,गुंड यांचा ससेमिरा,राज्य महिला आयोगाची निष्क्रियता,मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘मौन राग‘प्रिया हिची होणारी कुचंबना यावरच अंधारे व खडसे यांनी बोट ठेऊन,प्रिया हिला न्याय हक्क देण्याचे व कौटूंबिक वाद सोडविण्याचे आवाहन केले होते मात्र,रमा फुके यांच्या निवेदनानंतर अंधारे यांनी संताप व्यक्त केला.
…………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
