

[डॉ नंदा पुरी]
नागपूर: महाकवी कालिदासांनी जगप्रसिद्ध काव्य मेघदूतम् मध्ये भावनांचे सामान्यीकरण साधले असे प्रतिपादन ‘कालिदासाचे काव्य सौंदर्य‘ विषयावर संस्कृत विदुषी डॉ. नंदा पुरी यांनी त्यांच्या व्याख्यानादरम्यान केले. गुरुपौणिमेच्या मुहूर्तावर पत्रभेट संपादकीय मंडळाच्या वतीने ‘आबार एसेछे आषाढ’ या उपक्रमाला आज, २१ जुलै पासून आभासी माध्यमाने प्रारंभ झाला. त्याचे पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.
डॉ. पुरी यांनी पुढे सांगितले की, कालिदासांनी एका यक्षाचे विरह वर्णन कोणत्याही काळातील व्यक्तीला स्वानुभव वाटावा इतके प्रभावीपणे मांडले आहे. या सोबतच काव्याच्या पहिल्या श्लोकात विरह सहन करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भावना एकेका शब्दातून व्यक्त होतात. तसेच आषाढाचा पहिला मेघ दिसल्यावर त्या मेघाला ‘दूत’ म्हणून आपल्या पत्नीला विरहाचा उरलेले थोडा काळ सहन करण्याचा संदेश देणारे काव्य निसर्ग आणि भावना या दोन्हीचे अत्यंत प्रभावी कल्पनावर्णन आहे . कालिदासांच्या काव्यात निसर्गाचे अप्रतिम सजीव वर्णन अनेक लेखकांना कवींना भावले आहे. त्यांच्या एकाच काव्यात भावना आणि निसर्ग याचा उत्कृष्ट समतोल बघायला मिळतो असे त्या म्हणाल्या.
कुसुमाग्रज मेघदूत काव्याबद्दल सांगताना म्हणतात, निवांतस्थळी जाऊन पुस्तक वाचायचे झाले तर मेघदूतासारखे दुसरे पुस्तक नाही. कालिदासांनी निसर्गाचे केलेले वर्णन हे सौंदर्याने ओतप्रोत आहे. रामगिरी इथल्या जलाचे वर्णन करताना ते जल सीता मातेच्या स्पर्शाने पवित्र झाल्याचा ते उल्लेख करतात. यावरून एखाद्या स्थानाचे केवळ नैसर्गिक नव्हे तर अध्यामिक आणि ऐतिहासिक सौंदर्य देखील त्यांनी टिपले आहे. ही आणि अशी अनेक सौंदर्यस्थाने डॉ पुरी यांनी आपल्या व्याख्यानातून उल्लेखित केली.
तत्पूर्वी ‘दिंडी निघाली पंढरपुरा’ या लेखाचे अभिवाचन अपूर्वा जगदाळे यांनी केले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल … आणि अनेक अभंगांच्या ओव्या असलेल्या लेखाचे वाचन खरोखर पंढरीची वारी शाब्दिक स्वरूपात करून देणारे ठरले. मनाला साद घालणाऱ्या या लेखाने भक्त आणि विठुराया यांच्यातील संवाद मांडला आहे. रिंगण, फुगडी, पताका यांचे देखणे वर्णन सद्गुरुदास महाराजांनी या लेखात केले आहे. तसेच पंढरीचा सोहळा, त्याची सुरवात , त्याचा इतिहास आणि आत्ता पर्यंतचा प्रवास याची माहिती आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांनी गायलेल्या आणि प.पू.सद्गुरूदास महाराज रचीत शारदा स्तवनाने झाली. यावर नृत्य प्रस्तुती देखील करण्यात आली. प्रास्ताविक व सूत्र संचालन अपूर्वा मार्डीकर यांनी केले.
आजचा कार्यक्रम –
सायंकाळी ७ वाजता साहित्यिक डॉ. माधवी भट यांचे ‘रवींद्र संगीत – सगुणातून निर्गुणाकडे’ विषयावर भाषण व ‘आबार एसेछे आषाढ’ या ललित लेखांचे प्रज्ञा फडणीस अभिवाचन करतील.




आमचे चॅनल subscribe करा
