फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणकाँग्रेसला मत देण्याचा आम्ही ठेका घेतला नाही!

काँग्रेसला मत देण्याचा आम्ही ठेका घेतला नाही!

Advertisements

नागपूरात इम्तियाज जलील यांचा रोखठोक बाणा
आघाडीची मानसिकता बोटचेपी: ९ सप्टेंबर नंतर एमआयएम स्वबळावर जाहीर करणार उमेदवार
रामगिरी महाराज शिंदेंचे तर नीतेश राणे फडणवीसांचे ‘पिल्लू’
रामगिरी महाराजांचा जीव शिंदे सरकारच घेऊ शकते!जलील यांची शंका
संभाजीनगर नामपरिर्वनावर आक्षेप कायम राहणार
नागपूर,ता.७ सप्टेंबर २०२४: भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी आम्ही काही पावले मागे येण्यास तयार आहोत मात्र,आघाडीतील राजकीय पक्षांना एमआयएमच्या मतदारांची मते तर हवीत परंतू मंचावर ते आमच्यासाठी चौथी खुर्ची टाकण्यास तयार नाहीत.लोकसभेच्या निवडणूकीत आघाडीच्या उमेवारांसाठी मुस्लिमांनी रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहून भरभरुन मतदान केले,त्यामुळे येत्या विधान सभेच्या निवडणूकीत ते आम्हाला आघाडीत सहभागी करु शकत नसतील, तर भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला मत देण्याचा आम्ही ठेका घेतला नाही,असे राेखठोक विधान आज प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत एमआयएमचे [#MIM] महाराष्ट्राचे प्रदेशअध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मज्तिद पाडण्याचे समर्थन केले होते.त्यांची शिवसेना ही आघाडीत आहे,मात्र,आज आघाडीसोबत गेलो नाहीत तर भाजपकडे आणखी मस्जिदी पाडण्यासाठी फार मोठी यादी तयार आहे,परिणामी भाजपला हरवण्यासाठी एमआयएमकडे राजकीय पर्याय नाही,महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांची विचारधारा आम्हाला पटत नसली तरी आघाडीसोबत जाण्यास आम्ही तयार आहोत,असे जलील यांनी सांगितले.
रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता,हे अतिशय दूर्देवी असून आम्ही इतर धर्मांचा सन्मान करतो त्यामुळे इतरांनी देखील आमच्या धर्माबाबत वादग्रस्त विधान करणे टाळले पाहिजे,असे ते म्हणाले.दूर्देवाने त्यांच्या विधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: रामगिरी महाराजांच्या बाजूला जाऊन बसतात,त्यांची पाठ थोपटतात,वरुन त्यांना कोणाच्याही धर्माबद्दल वादग्रस्त बाेलण्याची खुली छूट देतात.त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे आश्‍वासन देतात,यापेक्षा दूर्देवाची दूसरी गोष्ट आणखी कोणती होऊ शकेल?असे सांगून,आम्हाला तर अपेक्षा होती की संवैधानिक पदावर बसणारे सरकारचे मुख्य यांनी तर रामगिरींना कडक शब्दात ताकीद देत,प्रवचनांमध्ये कोणाच्याही धर्माच्या धार्मिक भावना दूखवाल्या गेल्या नाही पाहि,जे अशी तंबी द्यायला हवी होती.मात्र,असे घडले नाही.त्यामुळे आमचा समज पक्का  झाला आहे,की रामगिरी महाराजांचा ‘बोलविता धनी’शिंदे सरकारच आहे.
सरकारनेच महाराजांना खुली छूट दिली आहे की तुम्ही वादग्रस्त बोलत रहा,आम्ही तुमच्या पाठीशी राहू,आम्ही तर उलट रामगिरी महाराजांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे कारण,उद्या महारांजांसोबत काही अघटित घडले तर सरकारला तर हेच हवे आहे,ते मुस्लिमांवर आरोप करतील,महाराष्ट्रातील सरकार ही त्यांच्या राजकारणासाठी कितीही खाली पडू शकते,असा आरोप याप्रसंगी जलील यांनी केला.

राज्यातील अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची आज नागपूरात भेट घेऊन रामगिरी महाराजांच्या विरोधात त्यांनी काय केले?याचा जाब विचारला असल्याचे जलील यांनी सांगितले.ते अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत,अल्पसंख्यांकांमध्ये फक्त मुस्लिम समुदाय येत नसून जैन,पारसी,शिख,बौद्ध व इतर समुदाय देखील येतात.,त्या सर्वांच्या संवैधानिक हक्कांचे रक्षण करण्याची नैतिक जबाबदरी प्यारे खान यांच्यावर आहे.भाजपच्या मोठ्या नेत्यांचे ते जवळचे असून त्यामुळेच त्यांना त्या पदावर बसवण्यात आले आहे,हे जगजाहीर आहे.त्यामुळे त्यांना मी हा सरळ प्रश्‍न विचारला की मुस्लिम समुदायावर खुलेआम या राज्यात इतके अत्याचार होत आहेत,त्यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत,जे नितेश राणे हे पोलिसांच्या पत्नीच्या बाबतीत ही इतक्या खालच्या स्तरावर जाऊन भाष्य करतात,ते उघडपणे मुस्लिमांच्या मजिदीमध्ये घुसून त्यांना मारण्याची वलग्ना करतो,मूळात नितेश राणे हे सहा-सहा जीपभरुन पोलिस व बाऊंरर्सच्या गराड्यात वावरतो,वरुन म्हणतो मला हिंदूंचं रक्षण करायचं आहे,जो स्वत:चं  रक्षण करु शकत नाही तो हिंदूंचं काय रक्षण करणार?असा टोला हाणत,प्यारे खान यांना आम्ही रामगिरी महाराज तसेच नीतेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर काय कारवाई केली,अशी विचारणा केली असल्याचे जलील यांनी सांगितले.

बांग्लादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात एमआयएमने जाहीर निंदा केली आहे.कोणीही त्याचे समर्थन करु शकत नाही परंतू,बांग्लादेशात जे झालं त्या विरोधात ‘हिंदू जन आक्रोश आंदोलन’महाराष्ट्रात करायचं मात्र,आमच्या प्रेषितांबाबत वादग्रस्त वक्तव्य करुनसुद्धा कोणीही त्याची निंदा करीत नाही,आम्ही देखील जन आक्रोश आंदोलन करु शकतो,गणपती उत्सवानंतर आम्ही देखील असेच जन आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी जलील यांनी दिला.मुंबईपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने हा मोर्चा काढणार असून संविधानाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस व अजित पवारांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फूले,शाहू,आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन आपल्या राजकीय भाषणांची सुरवात करणा-या राज्यकर्त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अश्‍या गुंडशाहीची भाषा खुलेआम वापरली जात असेल, तर त्यांना संविधानाची प्रत देणे गरजेचे असल्याचा टोमणा जलील यांनी हाणला.तसेच देशात सर्वात चांगले पोलिस प्रशासन म्हणून ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा नावलौकिक आहे,त्यातल्या त्यात मुंबई पोलिसांचं तर जगभरातच नाव घेतल्या जातं,ते पोलिस प्रशासन देखील रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानावर गप्प का?असा सवाल त्यांनी केला.आयपीएस परिक्षेत पास झाल्यानंतर पोलिसांना पारदर्शक आणि निष्पक्षपाती कर्तव्य बजावण्याची  एक शपथ दिली जाते,त्या शपथेचं विस्मरण महाराष्ट्राच्या पोलिसांना झाले आहे,त्यामुळे त्या शपथपत्रांना फ्रेम करुन सर्व आयपीएस अधिका-यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला,या घटनेमुळे महाराष्ट्रात प्रचंड जनक्षोभ उसळला,यावर एमआयएमचे कोणतेही अधिकृत निवेदन आले नाही,असा प्रश्‍न केला असता, माझ्या ‘एक्स’वर मी याबाबत सविस्तर पोस्ट केली असल्याचे जलील यांनी सांगितले,मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे माझ्या पक्षाची अधिकृत भूमिकाच मी एक्सवर जाहीररित्या मांडली असल्याचे ते म्हणाले.आज काही राजकीय पक्ष हे छत्रपतींचे नाव घेऊन समाजामध्ये  तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे ते ख-या अर्थाने शिवरांयांचा अवमान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.आम्ही कधीही त्यांचे नाव घेऊन राजकारण केले नाही मात्र,जे त्यांचे नाव घेऊन राजकारण करतात,जाती-जातीत,धर्मा-धर्मात,समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहेत त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते,कसे होते,ते पुन्हा एकदा वाचून काढण्याचा सल्ला जलील यांनी दिला.छत्रपती संभाजी महाराजांनीही कधीही जाती,धर्मामध्ये भेदभाव केला नाही,ते पुस्तकच मी दिल्लीश्‍वरांना भेट दिली असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.
औरंगाबादचे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे नामांतरण झाले त्याचा एमआयएमने विरोध केला होता,याकडे लक्ष वेधले असता,प्रत्येक शहराची एक ओळख असते,एक इतिहास असतो,अचानक कोणत्याही शहराचे नाव बदलायचे झाल्यास मी देखील एक प्रस्ताव दिला होता,पुण्याचे नाव सावित्रीबाई फूलेंचे नाव करा,कोल्हापूरचे नाव बदला,नागपूरात तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली आहे त्यामुळे नागपूरचे नाव बदलून बाबासाहेबांचे नाव या शहराला द्या,मुंबईचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या.त्यांना फक्त माझ्या शहरात औरंगाबादमध्ये येऊन घाणेरडे राजकारण करायचे होते.बाळासाहेब ठाकरेंनीही या पूर्वी नावाचे राजकारण केले,मात्र कोणत्याही मागणीमध्ये एक औचित्य असायला हवे,ज्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसतात तेच अश्‍या प्रकारचे राजकारण करतात.
सिंधूदूर्गात छत्रपतींचा पुतळा पडल्याने जो जनक्षोभ निर्माण झाला त्यातून जनतेचे लक्ष  विचलित होण्यासाठीच नितेश राणेंना,मजिदीत घूसून मारण्यासंबधीचे वादग्रस्त वक्तव्य देण्यास सांगण्यात आले,जेणेकरुन छत्रपतींच्या पुतळ्याचा विषय विस्मरणात जाईल आणि तसेच घडले देखील,नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर छत्रपतींचा पुतळा हा दूस-या क्रमांकावर ढकलला गेला आणि राणे हेच बातम्यांमध्ये आणि सोशल मिडीयावर व्यापले गेले.त्यामुळेच रामगिरी महाराज हे एकनाथ शिंदेंचे तर नितेश राणे हे फडणवीसांनी सोडलेले ‘पिल्लू’आहे असा आमचा स्पष्ट आरोप असल्याचे जलील म्हणाले.

शिवरायांचा पुतळ्यासाठी ३६ कोटी खर्च करण्यात आले मात्र,शिल्पकार आपटेला फक्त २६ लाख रुपयांचा पूतळा निर्मितीचा कंत्राट देण्यात आला होता,एवढ्या कमी पैशात पुतळा निर्माण केला जाऊ शकतो का?किंवा नौदलाकडे आता बोट दाखवले जात आहे की नौदलाच्या सहकार्यातून पुतळ्याची निर्मिती झाली होती,देशाचे नौदल एवढे तकलादू काम करु शकते का?असा प्रश्‍न केला असता,राजकारणासाठी महायुतीचे सरकार कोणत्याही स्तरावर जाऊ शकते असे सांगून, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली काही हजार कोटी आपल्या खिशात जात असेल तर याचं तुम्हाला आश्‍चर्य वाटत असेल मला काहीच आश्‍चर्य वाटत नाही ,कारण त्यांनी हे एकच नाही तर असे अनेक उद्योग केले आहे.त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही घेणे देणे नाही,लोकसभेच्या निवडणूकीत माझा पराभव करण्यासाठी कसे-कसे,किती ताट भरुन पैसे आले होते,हे पैसे कुठून आले होते?असा प्रति प्रश्‍न त्यांनी केला.
महत्वाचे म्हणजे आघाडीतील जे नेते छत्रपतींच्या पुतळ्यासाठी रस्त्यावर उतरले ते मोहम्मद पैंगबरांच्या अवमाननेसाठी रस्त्यावर उतरले नाहीत!त्या पक्षातील मुस्लिम नेते देखील गप्प बसले.गाजापूरमध्ये कोणतेही अतिक्रमण नसताना हिंदूत्ववादी गुंड्यांनी ते काढून फेकले.वक्फ बोर्ड कायद्यासंबधी बैठकीतून शिवसेनेचे १२ खासदार बाहेर निघून जातात कारण हिंदू वोटबँक नाराज होऊ नये म्हणून,विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी कोणत्याही राजकीय पक्षाने एक ही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याची माहिती आहे,मागच्यावेळी काँग्रेस पक्षाने वझाहत मिर्जाला संधी दिली होती यंदा त्यांनी देखील ‘मुस्लिममुक्त’विधान परिषद केली,असा आरोप त्यांनी केला.गाजापूरच्या प्रकरणात तर गाजापूरच्या काँग्रेसचा आमदार रस्त्यावर मुस्लिम विरोध आंदोलनात उतरला होता,असे जलील यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर बुलडोजर कारवाईत घट होईल असं तुम्हाला वाटतं का?या प्रश्‍नावर बोलताना,अजिबात नाही असे उत्तर त्यांनी दिले.या पूर्वी देखील न्यायालयांनी अनेकदा असे निर्देश दिले आहेत मात्र,जंगलराज मानणारे न्यायालयाच्या आदेशाना जुमानत नसतात,अशी टिका त्यांनी केली.
बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासोबत येण्यास नकार दिला असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.मायावती यांच्या बहूजन समाजवादी पक्षासोबत आम्ही युती करण्यास तयार आहोत,असे ते म्हणाले.वेगळ्या विदर्भाच्या मुद्दावर बोलताना,ज्या पक्षांनी विदर्भवाद्यांना खोटे आश्‍वासन देऊन सत्ता बळकावली,आधी त्यांचा निर्णय येऊ द्या मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु,असे ते म्हणाले.
तुमच्या पक्षाच्या एका नेत्यानेच तुमच्या घरासमोर आंदोलन केले होते,याकडे लक्ष वेधले असता,हे तर पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण असल्याचे ते म्हणाले.आमचा पक्ष मृत नाही तर जिवंत आहे.मला पदावरुन काढल्यास माझे ही समर्थक नाराज होतीलच,ते स्वाभाविक आहे.मी मुंबईच्या पक्षाच्या अध्यक्षांना पदावरुन काढल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले मात्र,पद दिलं तर काम देखील दाखवावेच लागेल,परफॉमेंस नाही दाखवले तर घरी जावे लागेल,हे सर्वांवर लागू आहे,असे त्यांनी सांगितले.
आज एमआयएमचा नागपूरात मेळावा होता असे सांगून, ४०० च्या वर महिला या एमआयएम पक्षात सहभागी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.महिलांना राजकीय आरक्षण मिळाले असून पुढे मुस्लिम महिलांना राजकारणात भरपूर संधी असल्याचे ते म्हणाले.पत्रकार परिषदेला एमआयएमचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद शाहीद रंगूनवाला उपस्थित होते
…………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या