फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकरोनायोद्धा निमजे यांचे संपूर्ण कुटुंबियच रुग्णालयात!

करोनायोद्धा निमजे यांचे संपूर्ण कुटुंबियच रुग्णालयात!

Advertisements

(छायाचित्र-महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासोबत अरविंदकुमार रतोडी व चंदन पांडूरंग निमजे)

मनपा प्रशासन ढिम्मच!आर्थिक मदतीसाठी किंग कोब्रा संघटनेचे आवाहन

नागपूर,ता. ११ मे: मृत्यूच्या भयाणतेत शहरातील एक ६७ वर्षीय करोनायोद्धा चंदन पाडूरंग निमजे हे गेल्या चार दिवसांपासून वर्धमान नगर येथील डॉ.शेंडे यांच्या रिलायबल ब्रेन ॲण्ड स्पाईन केअर’रुग्णालयात गंभीर अवस्थेत भरती आहेत,दूर्देवाने त्यांच्या ६५ वर्षीय पत्नी,४० व ३७ वर्षीय दोन्ही मुले व सोबत राहणारी बहीण हे देखील करोना बाधित झाले मात्र ते घरीच उपचार घेत असताना काल सोमवार दि. १० मे रोजी त्यांचा मोठा मुलगा व पत्नीची अवस्था गंभीर झाल्याने त्यांना राधाकृष्ण या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले तर आज मंगळवार दि. ११ मे रोजी त्यांचा मोठा मुलगा व ४७ वर्षीय बहीण यांना देखील त्याच रुग्णालात अत्यावस्थेत भरती करण्यात आल्याची माहिती किंग कोब्रा संघटनेचे अध्यक्ष् अरविंदकुमार रतोडी यांनी दिली.

महत्वाचे म्हणजे,हे कुटुंबिय करोना बाधित झाले असल्याचे कळल्यावर देखील नागपूर महानगरपालिकेचा एक ही कर्मचारी यांच्या घरी सेनिटायझर करण्यासाठी किवा साधी एक विटामिनची गोळी घेऊन पोहोचला नाही.नागपूर शहरात अशी लाखो घरे आहेत ज्यात करोना बाधित हे भगवान भरोसे जमेल तसे घरीच उपचार घेत आहे मात्र ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर म्हणजे नागपूर महानगरपालिकेवर नागपूरकर जनतेच्या आरोग्याची काळजी वाहण्याची जवाबदारी आहे त्याच संस्थेनी,तेथील प्रशासकीय अधिका-यांनी,लोकप्रतिनिधींनी व सत्ताधा-यांनी जनतेला मरणासाठी वा-यावर सोडून दिले असल्याचे वास्तव आहे.

नुकतेच न्यायालयाच्या दणक्यानंतर मनपा मुख्यालयात ६ व्या मजल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त उपक्रमात २४ तास सुरु रहाणारे व ३ शिफ्टमध्ये चालणा-या कंट्रोल रुमचे उद् घाटन माननीय पालकमंत्री नितीन राऊत,मनपा आयुक्त राधाकृष्णन बी,महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत केले गेले त्या कंट्रोल रुमध्ये २४ रिंग्स करुन ही फोन उचलल्या गेला नाही.दुस-या दिवशी त्यांचे उत्तर मिळाले,शासकीय मेडीकलमध्ये निमजे कुटुंबियांना भरतीसाठी नंबर लाऊन ठेवा!तुमचा नंबर उद्या लागू शकतो!
येथे प्रत्येक श्‍वासागणिक माणूस हा जगण्यासाठी धडपडतो आहे तिथे उच्च न्यायालयात शपथपत्रावर सादर करण्यात आलेल्या व स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रुममधून अशी उत्तरे मिळतात?

डॉ.शेंडे यांच्या रुग्णालयातून फक्त पैशे भरण्याचा तकादा लावणारे फोन येतात.आतापर्यंत निमजे या महान करोनायोद्धाच्या उपचारावर दोन लाख रुपये खर्च झालेत.त्यांचे कुटुंबिय हे देखील आमचीच जवाबदारी असून त्यांना मरणासाठी महानगरपालिकेच्या मुर्दाड प्रशासनावर व भ्रष्ट सत्ताधा-यांच्या उपकारावर सोडू शकत नसल्याने मी व माझ्या इतर सहका-यांनी धावपळ करुन त्या चार ही कुटुबियांना राधाकृष्ण या खासगी रुग्णालयात भरती केले.

कालच निमजे यांच्या उपचारासाठी डॉ.शेंडे यांच्या रुग्णालयातून त्यांना तातडीने ‘तोशील’हे इंजेक्शन लावणे गरजेचे असल्याचा फोन आला.खुल्या बाजारात याची अधिकृत किंमत ३५ हजार रुपये आहे.हे इंजेक्शन मिळवण्यासाठी काल जंग जंग पछाडल्यानंतर एका ब्लॅक मार्केटिंग करणा-याने ते इंजेक्शन आम्हाला १ लाख ४० हजार रुपयांत उपलब्ध करुन देतो म्हणाला,एवढा खर्च एखादी स्वयंसेवी संस्था कशी वहन करु शकणार आहे?असा प्रश्‍न रतोडी उपस्थित करतात.

मात्र जगात अद्याप थोडी माणूसकी शिल्लक आहे.माझा मोबाईल क्रमांक प्रसार-प्रचार माध्यमात प्रसिद्ध झाल्यामुळे मला एका सद गुणी तरुणाने ते इंजेक्शन ३५ हजारात उपलब्ध करुन दिले.अनेकांनी प्लाझमा डोनेट करण्यासाठी विचारणा ही केली.

खिशात ठेवा विषाची पुडी!
माझ्यासोबत गेल्या अनेक दशकांपासून खांद्याला खांदा लाऊन मानवतेची सेवा करणारे माझे ज्येष्ठ सहकारी,माझे वडीलधारी यांच्यावर ही अशी वेळ यावी,ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.मृत्यूच्या थैमानात देखील दहन घाटांवर मृतदेह जाळण्यासाठी डिजेलची व्यवस्था करणारे,आमच्या तांत्रिक अडचणी सोडवणारे माझे वडीलधारी निमजे यांच्यासारख्या महान करोनायोद्धावर जर नागपूर शहरात उपचारासाठी ही अशी इतक्या लाचारीची वेळ येत असेल तर या पुढे शहरातील प्रत्येक माणसाने खिशात विषाची पुडी ठेवणे सुरु करावे.हे मनपा प्रशासन,हे सत्ताधारी,ही खासगी रुग्णालये तुम्ही विष घेणार नसाल तरी तुम्हाला विष घेण्यास बाध्य करत असल्याची हताशा रतोडी यांनी व्यक्त केली.

मनपानेच निमजे यांच्या घरावर करोना बाधित असल्याचे बॅनर लावले,शेजारी,नातेवाईक आणि समाजापासून त्यांना दूर केले,वरुन त्यांच्या उपचारासाठी कोणताही पुढाकार ही घेतला नाही.मनपा प्रशासन व सत्ताधा-यांनाच हे शहर ‘लाशो का शहर’बनाना है,असा जळजळीत आरोप त्यांनी केला.

डॉ.शेंडे म्हणतात,तुम्ही कोण?आमचं नातेवाईकांसोबत बोलणं झालं आहे,निमजे यांचे अख्खे कुटुंबच रुग्णालयात भरती आहे मग ते कोणाशी बोलतात?निमजे यांची फक्त एक विवाहित मुलगी आहे जी कुटुंबासाठी लढा देत आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांचा कोणताही ऑडिटर मला या खासगी रुग्णालयात आढळून आला नाही.‘ऑडिटर’ ही फक्त धूळफेक असून तेच सर्वात जास्त भ्रष्टाचारी असल्याचा अारोप रतोडी यांनी केला.मनपासोबत सेटिंग व कमिशनच्या जोरावरच खासगी रुग्णालयांना कारवाईची कोणतीही भीती राहीली नाही.या शहरात जनतेचा कोणीही वाली नाही,हे सत्य जनतेने लवकरात लवकर स्वीकारावे व अखंड सावध रहावे,असा सल्ला रतोडी देतात.

मनपाच्या ६ व्या मजल्यावर स्थापित कंट्रोल रुममधून ना आम्हाला निमजे कुटुंबियांसाठी बेड्स मिळाले,ना औषधे मिळाली,ना मदत मिळाली.

निमजे हे एखाद्या सैनिकाप्रमाणे मानवतेच्या रक्ष् णासाठी अखंड लढत होते,त्यांच्या उपचारासाठी दानशूनर व्यक्तींनी व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन अरविंदकुमार रतोडी यांनी केले आहे.

(संपर्क क्रमांक-अरविंदकुमार रतोडी- ९०४९५५०८५४)

’जय जवान जय किसान संघटना’देणार ११ हजार रुपये-
शहरातील ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी निमजे कुटुंबियांच्या उपचारासाठी ११ हजार रुपयांची मदत जाहीर केली असून उद्या ती रतोडी यांना सुपुर्द केली जाईल,अशी माहिती पवार यांनी दिली.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या