
मनपाच्या आर्थिक उत्पन्नाचा मांडला ताळेबंद
नागपूर,ता. १५ फेब्रुवारी २०२२ :प्रदीर्घ अश्या चाललेल्या करोना महामारीच्या प्रकोपामुळे शासन,प्रशासन,सरकार व सामान्य नागरिकांचे अर्थकारणच कोलमडले.यात नागपूर महानगरपालिका देखील अपवाद राहीली नाही.लॉकडाऊनमुळे मनपाच्या विविध विभागाच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला असून अपेक्षीत उत्पन्नापेक्षा कोट्यावधीचे उत्पन्न कमी प्राप्त झाले व करोनाचा फटका विविध विभागांना बसला असल्याची माहिती आज मनपा मुख्यालयात आयोजित पत्र परिषदेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली.
नगर रचना विभागात अर्थसंकल्पात करोना महामारीचा काळ बघता फक्त ८४ कोटींचे लक्ष्य ठेवले होते मात्र या काळात गुंठेवारीचा अधिकार नागपूर सुधार प्रन्यास ऐवजी मनपाकडे असल्याने २६ कोटी गुंठेवारीतून मनपाला प्राप्त झाले.३१ जानेवारी २०२२ पर्यंत मनपाला तीन मार्गाने उत्पन्न प्राप्त झाले.ऑन लाईनद्वारे ६२ कोटी,ऑफ लाईनद्वारे १७३ कोटी व गुंठेवारीतून २६ कोटी असे एकूण २०५ कोटी ७८ लाख रुपये मनपाच्या नगर रचना विभागाला प्राप्त झाले.या विभागाकडून ८४ कोटींचे जे लक्ष्य ठेवण्यात आले होते त्यापेक्षा अधिक म्हणजे १२१ कोटी मनपाला प्राप्त झाल्याची माहिती भोयर यांनी याप्रसंगी दिली.स्थायी समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
पाणी पुरवठा विभागात या वर्षी १९५ कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले होते,गेल्या वर्षी हेच लक्ष्य १६२ कोटींचे होते.३१ जानेवारी २०२२ पर्यंत या विभागाला १३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकले.मार्च पर्यंत आणखी तीस ते पसतीस कोटी मिळू शकतात.ओटीएस योजनेमुळे यंदा पंधरा ते वीस कोटींची रक्कम जास्त मिळू शकली.पाणी पुरवठा कर मध्ये दर वर्षी ५ टक्क्यांची दरवाढ केली जात होती मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीच्या प्रकोपामुळे व नागरिकांच्या उत्पन्नाचे साधन विस्कळीत झाल्यामुळे दरवाढ करण्यात आली नव्हती.१९५ कोटींपैकी या विभागाला यंदा १७० कोटी रुपयेच प्राप्त झाले असल्याची माहिती भोयर यांनी दिली..
बाजार विभागाकडून १० कोटी ६० लाख रुपयांचे लक्ष्य हाेते, या विभागातून देखील फक्त ७ कोटी ७९७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.पुढील दोन महिन्यात हा आकडा ९ कोटींपर्यंत जाऊ शकतो,असे भोयर यांनी सांगितले.मनपाचा कर विभाग मोठ्या प्रमाणात लक्षय गाठण्यास मात्र मागे पडला असून या विभागाकडून ३२५ कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले होते मात्र करोना प्रकोपामुळे या विभागाच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला व फक्त १५८ कोटींचेच उत्पन्न प्राप्त होऊ शकले.गेल्या वर्षी २४० कोटींचे उत्पन्न या विभागाला प्राप्त झाले होते.नागपूर शहरातील नागरिकांकडून व विविध शासकीय व खासगी प्रतिष्ठानांकडू अद्यापही ६५० कोटींचा कर वसूल होणे बाकी आहे.या विभागाने फक्त ४८ टक्केच लक्ष प्राप्ती केल्याचे ते म्हणाले.
जाहीरात विभागासाठी उत्पन्नाचे ६ कोटी ९० लाख लक्ष्य ठेवण्यात आले होते.केवळ ८० लाख रु.मिळाले स्थावर विभागासाठी ६ कोटी २० लक्ष रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते फक्त १ कोटी २ लक्ष रुपयांची प्राप्ती झाली.अश्याप्रकारे ६३२ कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले असता मनपाला फक्त ५१४ कोटींची आवक झाली असल्याची माहिती भोयर यांनी पत्र परिषदेत दिली.
निराधार महिलांना शिवणयंत्रांचे वाटप-
याप्रसंगी माहिती देताना भोयर यांनी सांगितले की मनपाच्या समाज विकास विभागांतर्गत महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून नागपूर क्षेत्रातील अल्प-आय गटातील गरीब,गरजू,विधवा,परित्यक्ता,घटोस्फोटीत अश्या एकूण २१३ महिलांना शिवणयंत्राचे वाटप केले जाणार आहे.२०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण २४९ अर्ज प्राप्त झाले होते.या पैकी अटी व शर्तींची पूर्तता करणा-या एकूण २१३ महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले.१४ अर्ज संपूर्ण कागदपत्रे नसल्याने खारीज करण्यात आले.निकषानुसार पात्र अर्जदारांना प्रती शिवणयंत्र ११ हजार ५०० रु.प्रमाणे लाभ देण्याच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.विशेष म्हणजे प्रत्येक नगरसेवकाला दोन लार्थ्यांची यादी देण्याची मुभा आहे.
नगरसेवक़ांची ‘टक्केवारी’-
समाजातील गरीब व गरजू महिलांना शिवणयंत्राचा लाभ देण्याची मुभा नगरसेवकांना असल्यामुळे ११ हजार ५०० रुपयांमधून काही नगरसेवक आपली ’टक्केवारी’काढून घेत असल्याच्या संशयाला यामुळे वाव मिळत असल्याची चर्चा आहे.या योजनेनुसार पात्र महिलांना आधी शिवणयंत्र स्वत:च्या पैश्यातून घेणे क्रमप्राप्त आहे व गरीब,गरजू महिलांकडे एवढी रक्कम असणे अशक्यप्राय बाब असल्याने आधी नगरसेवकच ही रक्कम भरुन शिवणयंत्र घेऊन देतात व बिल, विभागात सबमिट करतात,यात ही शिवणयंत्र संपूर्ण ११ हजार ५०० रुपयांचेच असेल याची देखील खात्री नाही,कमी दर्जाची किवा नामांकित कंपनीची शिवणयंत्रे नसल्यास कर्मी पैश्यात ही यंत्रे खरेदी करण्यात येतात,बिल मात्र संपूर्ण ११ हजार ५०० रुपयांचे दूकानदारांकडून घेऊन मनपा विभागात जमा करण्यात येत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.परिणामी,मनपा प्रशासनाची कोणतीही याेजना ही ’टक्केवारीत’मोडणारीच असल्याचा आरोप देखील अश्या योजना बघून होत असतो.
टँकरवर लक्ष ठेवण्यासाठी होणार १ कोटी ७० लाख ७२ हजार ७९० रुपये खर्च!
नागपूर शहरात जलवाहीन्यांचे जाळे नसलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो.या टँकरवर जीपीआरएस प्रणालीद्वारा लक्ष ठेवण्यात येते.या यंत्रणेवर २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षांकरीता तब्बल १ कोटी ७० लाख,७२ हजार ७९० रुपयांचा खर्च होणार आहे.ही प्रणाली संचालित करण्यासाठी प्रति टँकर १५ रुपयांचा दर ठेवण्यात आला आहे.पाम टेक्नॉलॉजी प्रा.लि.या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
ऑपरेशन व मेंटनेंसवर दोन वर्षासाठी ही रक्कम खर्च होणार आहे.पूर्वी विदर्भ इन्फोटेक ही प्रणाली हाताळीत होती.एक टँकर प्रति दिन जवळपास ८ फे-या मारत असतो.या यंत्रणेद्वारे प्रत्येक टँेकरवर लक्ष ठेवले जात असते.हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीचाच असून मंजूरी आता देण्यात आली असल्याचे भोयर यांनी सांगितले.प्रत्येक टँकरमध्ये ४ हजार लिटर पाणी राहत असून ३६० रुपये प्रति फेरी घेतली जाते.या टँकर्सवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा गेल्या ६ ते ७ वर्षांपासून कार्यरत असल्याचे व ती अत्यावश्यक असल्याचे जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.स्लीप देणे,देखरेख ठेवणे,डाटा जनरेट करने,तो सर्व्हरमध्ये सेव्ह करने याशिवाय दैनदिन,मासिक व वार्षिक बैठकीत अहवाल सादर करने,हे काम ही कंपनी करणार आहे मात्र यावर दोन वर्षात दोन कोटींच्या जवळपास रक्कम खर्च होणार आहे.
मात्र हा भुर्दंड मनपावर बसत नसून प्रति टँकरकडून मनपालाच एकशे वीस रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्या रकमेतून हा खर्च भागविला जात असल्याचे भोयर यांनी पत्र परिषदेत सांगितले.मनपावर कोणताही आर्थिक बोजा पडत नाही.पूर्वी या टँकर्सची संख्या साढे तीनशेच्या जवळपास होती आता मात्र अमृत योजनेच्या माध्यमातून अनेक वस्त्यांमध्ये नळ जोडणी झाली असल्यामुळे सध्या शहरात फक्त १९४ टँकर असल्याची माहिती त्यांनी दिली.गेल्या निवडणूकीत २०१७ मध्ये भाजपने आपल्या घोषणापत्रात पाच वर्षात टँकरमुक्त शहराची घोषणा केली होती याचे काय?या प्रश्नावर बोलताना नागपूर शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने अनेक आऊटर भागात टँकरने पाणी पुरवठा करने क्रमप्राप्त असल्याचे ते म्हणाले.टँकरची संख्या घटली मात्र खर्च तेवढाच कसा?या प्रश्नावर टँकरची संख्या घटली, दर ही कमी झाले असल्याची पुश्ती भोयर यांनी जोडली.




आमचे चॅनल subscribe करा
