फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकरोनाच्या महामारीविषयी मनपा प्रशासन गंभीर नाही!

करोनाच्या महामारीविषयी मनपा प्रशासन गंभीर नाही!

Advertisements

मनपाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा रोष:प्रशासनाची अद्यापही आकड्यांची ‘जगलरी‘

अधिक आक्रमक कार्यप्रणालीची गरज:महापौरांचे निर्देश

नागपूर,ता.२५ मार्च: देशात दुहेरी उत्परिवर्तन झालेल्या करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळत असल्याची चिंता भारतीय सार्स कोव्ही-२ जिनोमिक्स कन्सोर्टिअम(आयएनएसएसीओजी)द्वारे व्यक्त करण्यात आली असतानाही नागपूर महानगरपालिकेचे प्रशासन करोनाच्या या नवीन स्ट्रेनविषयी किती गंभीर आहे याचे दर्शन मनपाच्या आज गुरुवार दि. २५ मार्चच्या पार पडलेल्या ऑन लाईन सभेत घडले.

माजी महापौर प्रवीण दटके यांनी या विषयावर आज स्थगन प्रस्ताव सादर केला.कोविडच्या संदर्भात शहरात या संसर्गावर प्रतिबंधाची कोणती उपाययोजना आहे?लसीकरणाची काय आकडेवारी आहे?फ्रंट लाईनवर काम करणारे मनपाचे कर्मचारी तसेच अारोग्य व पोलीस विभागात काम करणा-या कर्मचा-यांच्या लसीकरणाचे काय स्टेट्स आहेत?शहरात सरकारी व खासगी रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत?गृहविलगीकरणात असणा-या संसर्गितांना आैषधे उपलब्ध होत आहेत का?त्यांची विचारणा केली जात आहे का?गृहविलगीकरणातील संसर्गिंतांवर त्यांनी बाहेर फिरु नये यासाठी मनपातर्फे कोणती यंत्रणा काम करीत आहे?असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले.

यावर आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या आदेशावर प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.चिलकर व यानंतर अति.आयुक्त राम जोशी यांनी उत्तर सादर केले.डॉ.चिलकर यांनी आकडेवारीची जंत्रीच सभागृहात वाचली.शहरात सध्या एकूण ५२ चाचणी केंद्रे असून या केंद्रावर ॲण्टीजन व आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जातात,असे त्यांनी सांगितले.लसीकरणाबाबत शासनाने निर्धारित केलेल्या चार गटांमध्ये सध्या लसीकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे यात आरोग्य क्ष्ेत्रातील कर्मचारी,फ्रंट लाईन वकर्स,मनपाचे कर्मचारी तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठांचे लसीकरण सुरु आहे.यात आता १ एप्रिलपासून वय वर्षे ४५ पुढे सर्वांचे लसीकरण सुरु होईल.आतापर्यंत १ लाख १६ हजार ६७३ ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण झाले.उर्वरित गटातील १ लाख ९२ हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले.यात मनपा,रेल्वे,महसूल विभाग,पोलीस आदीचा समावेश आहे.शहरात एकूण ७४ लसीकरण केंद्रामध्ये मनपाचे ४५ तर २९ खासगी केंद्रे आहेत.या पुढे ही उपसंचालकांच्या माध्यमांतून जेवढ्या लस उपलब्ध होतील तसे लसीकरण पार पडेल.सध्या २५ ते ३० हजार लसी शिल्लक असून पुढील २ ते ३ दिवसांपूरती त्या उपलब्ध आहेत.झोन कार्यालय,स्वयंसेवी संस्था व नगरसेवकांच्या सहकार्याने लसीकरणासाठी अंदाजे २७ ते २८ लाख नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

दररोज अडीच ते तीन हजार नव्या बाधितांची भर पडत आहे.दवाखान्याच्या संख्येत वाढ केली जात आहे.या माहितीवर दटके यांनी प्रशासन हे मोघम माहिती देत असल्याचा आक्ष्ेप नोंदवला.अनेक स्वच्छता कर्मचारीच नव्हे तर पीपीई किट घालून करोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे मनपा कर्मचारी यांचे अद्याप ही लसीकरण झाले नसल्याचे ते म्हणाले.प्रशासनाने खरे उत्तर द्यावे,फ्रंट लाईन लसीकरणासाठी ज्या खासगी डॉक्टरांनी नोंदणी केली,ओपीडी सुरु केली त्यांनाच लसीकरणाच्या प्रक्रियापासून दूर ठेवण्यात आले,असा आरोप त्यांनी केला.

स्थगन प्रस्तावावर आधी सदस्य आपले म्हणने मांडत असतो यानंतर प्रशासन त्यावर उत्तर सादर करीत असतो मात्र आज महापौरांनी संमत केलेल्या स्थगन प्रस्तावावर आधी प्रशासन बोलले,स्थगन प्रस्ताव हा प्रश्‍नो-उत्तरासारखा चर्चिला जाऊ शकत नसल्याचा आक्ष्ेप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी नोंदवला.नियमावलीनुसार दटके यांनी आधी मत मांडले पाहिजे,असे ते म्हणाले.
यावर दटके यांनी नियमावलीची मलाही माहिती असल्याची पुश्‍ती जोडली,मी फक्त दोन ओळींचे निवेदन दिले असल्याचे ते म्हणाले.शहरात कोविड आणि लसीकरणाची काय स्थिती आहे?काय करतेय मनपा?यावर पुन्हा गुडधे पाटील यांनी मला दटके यांच्या ज्ञानावर अाक्ष्ेप नसल्याची कोटी केली. लक्ष् वेधीवर चर्चा करता येत नाही मात्र दटके यांच्या लक्ष् वेधीवर आज सभागृहात चर्चा झाली,स्थगन प्रस्तावावर प्रश्‍न-उत्तरे अपेक्ष्ि त नसताना सदनात प्रश्‍न-उत्तरे झडत आहेत.

यावर दटके यांनी मला प्रश्‍न-उत्तरे करायचे नाही मात्र माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदनात प्रचंड खोटी माहिती दिली आहे,अद्याप ही प्रशासन हेच करीत असल्याचा आरोप केला.ती ऐकून घेण्यासाठी आम्ही सभागृहात बसलो नसल्याचा संताप व्यक्त केला.
यावर खोटी माहिती देत असतील तर प्रशासनावर कारवाई करता येते असे प्रफूल्ल गुडधे पाटील म्हणाले.तुम्हाला महापौरांवर विश्‍वास नाही का?असा दटके यांना अडचणीत आणनारा प्रश्‍न उपस्थित केला!यावर चिडून मला शब्दछळ किवा राजकारण करायचं नाही,असे दटके म्हणाले.मला आधीच्या महापौरांवरही विश्‍वास होता या ही महापौरांवर विश्‍वास आहे.मात्र सभागृहात खोटी माहिती देणा-या मनपा आयुक्तांच्या माहितीचे अद्याप विखंडन झाले नसल्याचे ते म्हणाले.जर प्रशासन खोटंच बोलणार असेल तर चर्चेला काही अर्थच उरत नाही.

यावर सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी डॉ.चिलकर हे कोविडसारख्या अतिशय गंभीर प्रश्‍नावर त्रोटक माहिती देत असल्याचा आक्ष्े प नोंदवला.सदस्यांना प्रशासनाला संपूर्ण माहिती मागण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.रुग्णालयात कोविडसाठी किती खाटा आहेत?त्यात किती भरलेल्या आहेत किती रिकाम्या आहेत?सभागृहातील १५६ सदस्यांना व शहरातील जनतेला अगदी वस्तूनिष्ठ माहिती द्यावी एवढीच अपेक्ष्ा असल्याचे दटके हे म्हणाले.

यावर अति.आयुक्त राम जोशी यांनी शहरातील ७९ रुग्णालयांमध्ये २ हजार ९३६ खाटा उपलब्ध असल्याचे सांगितले.यात १८३९ ऑक्सीजन,२२४ आयसीयू २६१ वेंटिलेटरच्या खाटा असल्याचे सांगितले.यातील १९४ ऑक्सीजन,४६ आयसीयू तर ३६ खाटा या वेंटिलेटरच्या रिकाम्या असल्याची माहिती दिली.सरकारी रुग्णालयांमध्ये १५५० ऑक्सीजन १०३ आयसीयू ४५७ वेंटिलेटर खाटा असल्याचे त्यांनी सांगितले.७४ लसीकरण केंद्र असून ४५ खासगी तर २९ सरकारी असल्याची माहिती त्यांनी दिली.मनपाच्या एकूण ७ हजार ४७७ सफाई कामगारांपैकी ३८५८ कामगारांची लस घेतली असल्याचे ते म्हणाले.पाठपुरावा करुन उर्वरित कामगारांचे देखील लसीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौरांच्या निर्देशानुसार आज सकाळी १० वाजेपर्यंत रिकाम्या व भरलेल्या खाटांची काय स्थिती आहे?किती शिफ्टमध्ये लसीरकणाचे काम सुरु आहे?पालकमंत्र्यांच्या बैठकीत लसीकरण केंद्रांची संख्या २८०० होती ती ७४ वर का आली?खासगीत ७९ आणि सरकारी रुग्णालयातील १८३९ खाटा का रिकाम्या आहेत?याबाबत काय नियोजन केले आहे?लोकप्रतिनिधी प्रशासनाची मदत करायला तयार आहेत प्रशासनाची मदत घेण्याची तयारी आहे का? शहरात जनजागृतीसाठी जाहीरात फलके लावण्यात आली आहे का?काल शहरात एकाच दिवसात २९०० बाधित आढळले आज गुरुवार दि. २५ मार्च रोजी ही संख्या २६०० झाली,गृहविलगीकरणात असणा-या बाधितांचर लक्ष् ठेवण्यासाठी किती स्टाफ आहे? यावर उत्तर देण्यास सागितले.

अविनाश ठाकरे यांनी देखील गृहविलगीकरणातील किती बाधितांशी संपर्क साधून औषधे पुरविण्यात आली?ही माहिती मिळाली पाहिजे,अशी मागणी केली.गुडधे यांनी देखील रुग्णालयात भर्ती प्रक्रिया कमकुवत असल्याचा ठपका ठेवला.राम जोशी हे योग्य माहिती देत नसल्याचा आरोप केला.ते सांगतात त्याप्रमाणे खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा रिकाम्या नाहीत.बाधितांना दोन-दोन,तीन-तीन दिवस खाटा मिळत नाहीत.एकेका खाटेसाठी शहरातील बाधित हा झटतोय,त्यांच्यापर्यंत मनपाचा मदतीचा हात हा पाेहोचला पाहिजे.मनपाच्या कंट्रोल रुमची आंकडेवारी देखील वारंवार चुकतेय.ऑक्सीजन पुरवठा संपणार हे माहिती असून देखील त्याकडे दुर्लक्ष् केल्या जात आहे.

‘कागदोपत्री’ उपलब्धता पूर्ण मिळेतय मात्र मनपाच्या दवाखान्यांतील औषधे संपली.ही स्थिती भूषणावह नसल्याचा ठपका ठेवीत गुडधे पाटील यांनी मनपाच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या वाहनांमधील पेट्रोल कधी संपत नाही,पण मनपाच्या रुग्णालयातील ऑक्सीजन संपतंय असा टोला हाणला. मनपा प्रशासन विषयाला गांर्भीयाने घेताना दिसत नसल्याचा रोष त्यांनी व्यक्त केला.

प्रशासन गंभीर नाहीच:आभा पांडे
यावर ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी कोविडला घेऊन प्रशासन गंभीर नाहीच असा संताप व्यक्त केला.खाटांची स्थिती पूर्णपणे चूकीची सांगितली.परवा मध्यरात्री मी माझ्या प्रभागतील ३ करोना बाधितांना रुग्णालयात भर्ती करण्यासाठी हजारो फोन फिरवले मात्र दूर्देवाने दोन दिवस झाले तरी मी त्यांना सरकारी असो किवा खासगी,रुग्णालयात भर्ती करु शकले नाही.याला मनपा प्रशासन जवाबदार नाही का?
ऑक्सीजन,आयसीयू,रिकाम्या खाटा यांची माहिती प्रशासन सरासर चुकीची सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला.माझ्या एका परिचित करोना बाधिताला मनपा अधिका-यानेच पोलीसी खाक्या दाखवला.त्याचीच तक्रार पोलीसात केली.आधीच बाधितांची मानसिक स्थिती ढासळलेली असते.आमच्याच प्रभागातील बाधितांविषयी आमची मदत का घेतली जात नाही?असा सवाल त्यांनी केला.प्रभागातील करोना बाधित कोण आहेत?याची माहिती नगरसेवकांना का दिली जात नाही?आम्ही देखील त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला मदत करु शकतो,असे त्या म्हणाल्या.

सध्या करोनाची एवढी धास्ती लोकांमध्ये बसली आहे की चाचणी पॉझिटीव्ह येताच हजारो बाधित हे तुरंत खासगी किवा सरकारी रुग्णालयात भर्ती होऊन जातात,त्यामुळे ज्यांना खरोखरच खाटांची गरज असते त्यांना रुग्णालयात खाटा मिळत नाही.त्यामुळे गेल्या वर्षीसारखेच शहरात अनेक ठिकाणी विलगीकरण केंद्रे उघडले पाहिजे.प्रत्येक प्रभागातील समाज भवनात जनप्रतिनिधींची बैठक घेण्याची सूचना देखील त्यांनी मांडली.अनेक खासगी परिचारिका या लसीकरण करण्यास तयार आहेत,त्यांची ही मदत घेतली जाऊ शकते.
प्रत्यक्ष् फिल्डवर काम करणा-या मनपा कर्मचा-यांनाच लस मिळत नाही,त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष् नाही,हा अतिशय दु:खद विषय आहे.त्यांना देखील असुरक्ष्ति वाटतंय,ते प्रशासनाची जवाबदारी नाहीत का?

पाच महिने झाले मी केंद्र व राज्य सरकारकडून करोनासाठी आलेल्या पैश्‍यांचा तपशील मागण्यासाठी अनेक पत्र दिले मात्र मनपा प्रशासन सतत मला गोलमाल,त्रोटक व अपूरी माहिती देत असल्याचा आरोप आभा पांडे यांनी केला.जनप्रतिनिधी म्हणून माझा हा अधिकार नाही का?दोन दिवसांपूर्वी मी आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.चिलकर यांना फोन करुन केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेला निधी जो सरळ बँकेतून वळविला जात अाहे त्याचा तपशील मागितला.त्यांनी टाळाटाळ केली,शेवटी मला असा निरोप दिला की अति.आयुक्त राम जोशी यांनी तुम्हाला तपशील देण्यास मनाई केली आहे?

मनपा प्रशासन एवढा मगरुर झाला आहे?मी राम जोशी यांनी स्वत:च्या बायकोवर, मुलांवर किती पैसा खर्च केला,याची माहीती मागितली नाही,मी जनतेसाठी आलेला शासनाचा पैसा प्रशासनाने नेमका कुठे खर्च केला?याचा तपशील मागितला होता,असा संताप आभा पांडे यांनी व्यक्त केला.हा अधिकार मला देशाच्या संविधान तसेच मनपा कायद्याने दिला आहे.प्रशासनाने मला ही माहिती प्रदान करावी असे आदेश महापौरांनी द्यावे,अशी मागणी आभा पांडे यांनी केली.

काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांनी देखील मनपा प्रशासन हे कोविडच्या संदर्भात अजिबात गंभीर नसल्याचा अारोप केला.या पूर्वी देखील खासगी रुग्णालयांनी जनतेची करोनाच्या उपचाराबाबत लृट केली आहे.तो ७४ लाख मनपाने खासगी रुग्णालयांना परत देखील करायला लावला मात्र त्या खासगी रुग्णालयांवर काय दंडात्मक कारवाई केली?असा प्रश्‍न उपस्थित केला.कोविड केअर सेंटर का बंद करण्यात आले?जेव्हा की आताच त्यांची नितांत जनतेला आवश्‍यकता आहे.माझ्याच प्रभागात दोन नागरिकांचा कराेनामुळे मृत्यू झाला.मनपा प्रशासन हे चुकीची माहिती पटलावर ठेवीत आहेत.पॉझिटीव्ह रुग्णांचे विलगीकरण होत नाही आहे,त्यांच्या घरांवर स्टीकर लावल्या जात नाही.ते खुलेआम फिरत आहेत.

माजी महापौर नंदा जिचकार यांनी करोनाची दूसरी लाट ही पहील्यापेक्ष्ा ही भयंकर असल्याचे सांगितले.करोना दूत नेमून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची मागणी त्यांनी केली.शहरातील अनेक कलाकार हे बेरोजगार झाले त्यांची मदत घेता येईल.आपल्या कलेतून व पथनाट्यातून ते चौका चौकात जनजागृती करु शकतील.करोनाच्या या दुस-या लाटेविषयी प्रशासन आणि जनता दोघांमध्येही गांर्भीय नसल्याचे त्या म्हणाल्या.आज एकाच दिवशी शहरात ४० मृत्यू करोनामुळे झाले!ही फार मोठी शाेकांतिका असल्याचे सांगून करोनाची साखळी तोडायची असल्यास जनजागृती गरजेची असल्याचे त्या म्हणाल्या.

मनपा प्रशासन असहाय नसून असंवेदनशील असल्याचा आरोप आज अनेक नगरसेवकांनी चर्चेदरम्यान केला.शहरातील एका जैन कुटुंबाला करोनाची बाधा झाली,ते कांदा वगैरे खात नाही,आपल्याच समाजातील एका मुलाला त्यांनी जेवण घेऊन बोलावले असता मनपाच्या शोध उपद्रव पथकाने त्यांच्यावरच दंड ठोठावला असल्याचा आरोप एका नगरसेवकाने केला.नगरसेविका दिव्या धुरडे यांनी देखील शहरातील विलगीकरण केंद्रे सुरु करण्याची मागणी केली.

अविनाश ठाकरे यांनी प्रशासनात वरच्या पातळीवर प्रभावी उपाययोजना तयार होताना दिसतात मात्र झोन स्तरावर त्यांचे कोणतेच इंमप्लीमेंटेशन नाही.१ एिप्रलपासून आता ४५ वर्षांच्या वर नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे,आताच तर बोजवारा उडाला आहे,नंतर कसे करणार?झोन स्तरावर सहायक आयुक्तांना अधीक एक्टीव करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.कंट्रोल रुमचे नंबर वस्ती -वस्तीमध्ये झळकू द्या.धार्मिक स्थळांवर जनजागृतीपर बॅनर लावल्या गेले पाहिजे.राम जोशी हे खाटांच संख्या सांगतात मात्र ती नेमकी कुठे आहेत?कुठे उपलब्ध आहेत याची माहिती जनतेला नाही.सीटी व्हॅल्यूनंतर घरीच उपचार घेणे शक्य असतानाही अनेक रुग्ण हे खाटा अडवून ठेवित असल्याचे ते म्हणाले.रेमडिस्विर इंजेक्शनसचा कोर्स पूर्ण केला तरी रुग्ण घरी जाऊ शकतो याविषयी आरोग्य यंत्रणांनी जागरुगता निर्माण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.हा मेडिकल केअरचा विषय असल्याचे ते म्हणाले.

या संपूर्ण चर्चेनंतर महापौर दयाशंकर तिवारी यांनी करोचा प्रसार स्वस्थ समाजात फार वेगाने होत असल्याचे सांगून सुरवातीला करोना हा नवीन विषाणू होता त्या विषयी कोणालाही ठोस उपाययोजनांची माहिती नसल्याचे सांगितले.हळूहळू करोनाविषयी समजत गेले व त्या अनुषंगाने प्रशासन पाऊल उचलत होती.मात्र आता करोनाचा उद्रेग झाला असून हा लढा सर्वांनी मिळून लढायचा असल्याचे सांगितले.झोन सहायक आयुक्तांनी ही अधिक एक्टीव्ह होण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.आजचा बाधितांचा आकडा हा २,५९७ असून आतातरी प्रशासन व नगरसेवकांनी मिळून काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

आता पर्यंत शहरात १ लाख ६७ हजार पॉझिटीव्ह तर ३ हजार ७५ मृत्यू झाले.मनपाने लसीकरणाचा वेग वाढवून दोन्ही शिफ्ट नव्हे तर २४ तास काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.महापौरांनी प्रशासनाच्या उपयांपेक्ष्ा ही करोनाची गती ही अधिक असल्याचा टोला हाणला.१ एिप्रल पासून सर्व दहा ही झोनमध्ये २४ तास लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले.याशिवाय करोना कंट्रोल रुमचे नंबर,अधिकारी,सहायक अधिकारी यांचे फोन नंबर,रिक्त खांटाची संख्या,रुग्णालयांची नावे यांचे दररोज प्रसार माध्यामातून जनतेला देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या