फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकरोडपती बावणकुळे रोडपतीला घाबरले!

करोडपती बावणकुळे रोडपतीला घाबरले!

Advertisements
महाभ्रष्टाचारी बावणकुळेंनी कामठीत ’दलाल’ला केले उभे

निवडणूकीपूर्वीच बावणकुळेंनी भाषणात हार मानली होती:बोगस मतदारांना वाटले कोट्यावधी रुपये
मुंडवा महार वतनाच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारसोबत बावणकुळेंचीच भागिदारी!
सुलेखा कुंभारे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.४ डिसेंबर २०२५: संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकीचा केंद्रबिंदू ठरलेल्या कामठी मतदारसंघ हा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळेंचा मतदारसंघ असून,नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद ही कामठी नगरपरिषद आहे.गेल्या विधानसभेत १७ हजार मतांनी कामठी मतदारसंघातून माघारल्याचे दु:ख कवटाळलेले बावणकुळेंनी कामठी नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली.ही निवडणूक जिंकण्यासाठी बावणकुळे यांनी लोकशाहीचा इतका स्तर घसरवला जे नैतिकतेच्या चौकटीत बसत नाही,करोडपती बावणकुळे आमच्या अजय कदम या रोडपती उमेदवाराला घाबरले व मध्यरात्री घरोघरी जाऊन मतदारांना,व्यवसायिक,दूकानदारांना धमक्या देण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली,ज्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे,बावणकुळेंनी मतदानापूर्वीच कार्यकर्त्यांना संबोधित करताना हार स्वीकारली होती,पैशांचा पाऊस पाडून व बोगस मतदानातून त्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडण्याचे काम केले आहे,त्यामुळे बावणकुळे यांना महाराष्ट्रसारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून, त्यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा,अशी मागणी बहूजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखाताई कुंभारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या,की गेल्या पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष म्हणून आम्ही राजकारणात आहोत.या निवडणूकीत देखील आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल अशी आमची अपेक्षा होती मात्र,आम्हाला विश्‍वासात न घेताच बावणकुळे यांनी कामठीतील सर्व ३४ नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.शेवटच्या घटकेपर्यंत आम्हाला युतीची अपेक्षा होती मात्र,उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या चार दिवसांआधी आम्ही वेळेवर आपल्या १५ उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली.आम्हाला प्रचारासाठी फक्त चार दिवसांचा अवधी मिळाला.
गेल्या निवडणूकीत आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष अजय कदम फार कमी मतांनी पराभूत झाले होते.त्यामुळे भाजपने युती करुन अजय कदम यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करावी,अशी आमची मागणी होती मात्र,त्यांनी आम्हाला गृहीत धरलं.त्यांना हा चुकीचा समज होता की काहीही केलं तरी आमचा पक्ष त्यांच्या मागे बांधिल राहील.आम्हाला उमेदवारी नाही दिली तरी आम्ही गप्प बसू.पण,आम्ही स्वाभिमानाची लढाई लढलो.करोडपती बावणकुळे यांनी रोडपती अजय कदमांविरुद्ध त्यांचा ‘दलाल’अजय अग्रवालाला उमेदवारी दिली.अजय अग्रवालला कामठीत कोणीही ओळखतसुद्धा नाही.तो साधा नगरसेवकही नाही.त्याला कामठीच्या प्रशासनाची कोणतीही जाण नाही.मात्र,अजय कदम चार वेळा नगरसेवक राहीले आहेत,त्यांना डावलून बावणकुळे यांनी स्वत:च्या व्यवसायिक भागीदार असलेल्या ‘दलाल’अजय अग्रवालला उमेदवारी दिली.असा घणाघाती आरोप करीत,याच अजय अग्रवालने पक्षाच्या व युतीच्या विरोधात जाऊन अजय कदमविरुद्ध निवडणूकीत कारस्थान केले होते,असा आरोप सुलेखा कुंभारे यांनी केला.
पाच वर्ष फक्त म्हणण्याकरिता अग्रवाल काँग्रेसमध्ये होता,दलाली मात्र बावणकुळेंचीच करीत होता.अशा या दलाल विरुद्ध जमीनीशी जुळलेला समर्पित कार्यकर्ता अजय कदम यांच्यातील निवडणूक लढा थेट जनतेच्या दरबारात गेला.मोठ्या प्रमाणात कामठीत अजय कदमची लहर उसळली.कामठीत आमच्या पक्षाचे एक ही कार्यालय नसतानासुद्धा अजय कदमला मोठ्या प्रमाणात कामठीच्या नागरिकांनी पाठींबा दर्शवला.आमचा पक्ष नोंदणीकृत नसल्याने आम्हाला वेळेवर निवडणूक चिन्ह वाटप झाले.अशा वेळी ज्या अजय अग्रवालला कामठीच्या मतदारांनी कधीही बघितले नाही,त्या बावणकुळेंच्या ‘दोन नंबरच्या’ पैशांची राखण करणा-या रखवालदार दलालाविरुद्ध अजय कदमची लढाई ही थेट जनतेची लढाई झाली.कामठीच्या नगराध्यक्ष पदावर अनोळखी अग्रवाल याच्या ऐवजी मूळ कामठीकर अजय कदम हा मतदारांच्या पसंदीचा उमेदवार ठरला.परिणामी, मागील निवडणूकीसारखेच बोगस मतदारांचे पिक बावणकुळेंनी या देखील निवडणूकीत उगवले.
थेट अग्रवालच्या फॉर्म हाऊसवर अतिशय गोरगरीब जनतेला गाड्या भरुन आणण्यात आले.त्यांचे आधारकार्ड जप्त करण्यात आले,प्रत्येकाला पाच-पाच हजार रुपयांचे वाटप झाले व जे कामठीचे मूळ मतदारच नाहीत,त्यांचे मतदान कामठीत झाले,असा गंभीर आरोप याप्रसंगी सुलेखा कुंभारे यांनी केला.आम्ही स्वत: अग्रवालच्या फॉर्म हाऊसवर धाड टाकून बोगस उमेदवारांचे व्हिडीयोज काढले,पोलिसांना व निवडणूक अधिका-यांना पाचारण केले.त्यांच्या बोटांना शाई लावली जात होती व लिक्विडने पुसून पुन्हा मतदानासाठी त्यांना पाठविले जात होते!ती शाई,हॅण्डग्लोज,कोट्यावधी रुपयांचे बंडल,हे सर्व आम्ही व्हिडीयोमध्ये टिपले.बावणकुळे यांनी ही निवडणूक अशा पद्धतीने जिंकण्यासाठी जो अट्टहास केला,त्यातून त्यांना संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही,असे त्या म्हणाल्या.
प्रचारात देखील रात्री १० वाजता नंतर अडीच,तीन वाजेपर्यंत ते कामठीत फिरले,दूकानदार,मतदार,व्यवसायिकांना धमकावले.आमच्या उमेदवाराला मतदान केलं नाही तर तपास यंत्रणांची कारवाई करु,अशी उघड धमकी त्यांनी मतदारांना दिली.(याचा देखील व्हिडीयो सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्क्रीनवर दाखवला)एक मंत्री दहशतीचे राजकारण करतोय,याला काय म्हणावे?असा सवाल त्यांनी केला.
राहूल गांधी यांनी मतचाेरीचे रॅकेट उघड केले तेव्हा कामठीत कशाप्रकारे मतचोरी झाली याचे उदाहरण दिले होते.राहूल गांधी यांच्या आरोपांची सिद्धता पुन्हा कामठीत नगर परिषदेतच्या निवडणूकीत झाली,असा दावा कुंभारे यांनी केला.बोगस मतदानाचे थैमान बावणकुळेंनी घातले.झोपडपट्टीतील गोर,गरीब गरजूंना पाच पाच हजार वाटून त्यांना मतदान करण्यास भाग पाडले.गेली चाळीस वर्षे मी राजकारणात आहे परंतू,राजकारणाचा इतका स्तर घसरलेला मी कधीच अनुभवला नाही,अशी खंत याप्रसंगी सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केली.आम्ही ही निवडणूक आजच जिंकलो आहोत,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.भाजपसोबत या पुढे आम्ही कोणतीही युती करणार नाही,असा दावा त्यांनी केला.
बावणकुळे फक्त इथेच नाही थांबले तर आपल्याच समर्थकांना न्यायालयात याचिका दाखल करण्यास पाठवले.कामठीतील तीन प्रभागात निवडणूक आता पुढे ढकलल्या गेली आहे.मतमोजणी तर चक्क २१ डिसेंबर रोजी होणार आहे.ही लोकशाहीची थट्टाच निवडणूक आयोगाने चालवली असून, आम्हाला सत्ताधा-यांचे मिंधे झालेल्या राज्य निवडणूक आयोगावर कोणताही विश्‍वास नाही त्यामुळे आम्ही सर्व पुराव्यानिशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असल्याची माहिती कुंभारे यांनी दिली.आयोगाला हाताशी धरुन राज्यातले सत्ताधारी हे लोकशाहीची क्रूर हत्या करीत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.आम्ही सत्ताधारी व निवडणूक आयोगाच्या या मनमानी कारभाराचा निषेध करतो,असे त्या म्हणाल्या.
कामठीत एक ही मतदान केंद्र असे नव्हते ज्यावर तक्रारींचा पाऊस कोसळला नाही.अनेक केंद्रांवर अर्धा-अर्धा,पाऊण पाऊण तास ईव्हीएम मशीन्स बंद होते.अनेक केंद्रांवर आमच्या ’कपबशी’चिन्हावर मतदान केल्यावरही ’कमळा’चे चिन्ह उमटत होते.अनेक केंद्रांमध्ये मृत पावलेल्या मतदारांनीही मतदान केले होते.अनेक केंद्रात जे कामठीत राहत नाही,नागपूरात तसेच आजूबाजूच्या गावात राहतात त्यांनी देखील येऊन मतदान केले होते.व्हीलचेअरवर आलेल्या आजीबाईचे मत आधीच कोणीतरी देऊन चुकले होते.फार उत्साहात मतदान केंद्रावर आलेल्या त्या आजीला मतदानापासून मुकावे लागले.ही ’ठोकशाही’नाही तर काय आहे?असा सवाल करीत, आम्ही संबंधित पोलिस ठाण्यासह निवडणूक आयोगाकडे तसेच देशाच्या पंतप्रधानसह सर्व प्रशासकीय पातळीवर रितसर तक्रार नोंदवली असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘महाराष्ट्र बिहारच्या मार्गावर नव्हे तर महाराष्ट्राचा आता बिहारच झाला आहे,अशी जळजळीत टिका त्यांनी केली.राज्याचा निवडणूक आयोग आता स्वायत्त राहीला नसून सत्ताधा-यांची कठपुतली झाला आहे.जर कामठीसारख्या छोट्याशा शहरात अशी निवडणूक होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे निवडणूका पार पडल्या असतील?असा सवाल त्यांनी केला.हा महाराष्ट्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आहे.शाहू,फूले,सावित्रीबाईंचा महाराष्ट्र अशाप्रकारे नेस्तनाबूत करण्यासाठी सत्ताधारी व बावणकुळे जबाबदार आहे,असा आरोप त्यांनी केला.इतक्या खालच्या स्तरावरील राजकारण खेळणारे बावणकुळेंना मंत्री पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.असे सांगत बावणकुळे कोणतीही निवडणूक आपल्या ‘कामाच्या’भरवश्‍यावर लढत नाहीत फक्त पैशांच्या भरवश्‍यावर ते निवडणूक जिंकतात,असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
कामठीत बावणकुळेंनीच वंचित,बसपा,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठबळ पुरवले.आजपर्यंत अजित पवारांची घड्याळ कामठीत कुठेही नव्हती,यंदाच्या निवडणूकीत चार-चार घड्याळीवर नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे करण्यात आले.स्वत:बावणकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले,कामठीत भाजप निवडून येऊ शकत नाही,अशावेळी युतीच्या उमेदवारांना निवडून द्या!याचा अर्थ भाजपने कामठीत आधीच आपला पराभव स्वीकारला आहे.आम्ही आज चार वाजता नागपूरात पत्रकार परिषद घेणार असल्याचे कळताच अजय अग्रवालने कामठीत दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन आमच्यावरच आरोप केले.यावरुन ते किती घाबरलेले आहेत हे कळून येतं.आम्ही तर अग्रवालच्या फॉर्म हाऊसच्या आत घूसून आर-पारची लढाई लढली,एवढेच ते खरे होते तर फॉर्म हाऊसवरुन गाडीत बसून का पळून गेले?त्यांच्या फॉर्म हाऊसवर शेकडो बोगस मतदार काय करीत होते?आपल्या पत्रकार परिषदेत अग्रवाल यांनी ते सर्व आमचेच ’षडयंत्र’आहे,अशी जी मखलाशी केली ते सर्वस्वी खोटे असून, आम्ही बाबासाहेबांची लेकरं असून आम्हाला आर-पारची लढाई लढण्याची सवय आहे,षडयंत्र रचणे हे आमच्या रक्तात नाही.मूळात फॉर्म हाऊसवर धाड टाकणे हे आमचे षडयंत्र असेल तर त्यांनी पोलिसात आमच्याविरुद्ध तक्रार का नोदंवली नाही?असा सवाल त्यांनी केला.उलट आम्ही खरे असल्यानेच पोलिसांना व निवडणूक अधिका-यांना घटनास्थळी पाचारण केले.फॉर्म हाऊसवर सापडलेले अर्धे अधिक ’अग्रवाल’होते,आम्ही अग्रवाल यांच्याकडे का जाणार?मी लढवैय्या राजकारणी आहे.बोगस कामे आम्ही करीत नसल्याचा टोला त्यांनी हाणला.
बावणकुळे यांनी कामठीत ‘हारी हूयी लढाई’लढली.आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना जिथे भाजप हरत असेल त्या ठिकाणी शिंदे व अजित पवारच्या उमेदवारांना मते द्या,असे आवाहन केले.त्यांचा दलाल उमेदवार अजय अग्रवाल स्वत: भाजपच्या कमळावर उभा राहू इच्छित नव्हता.कामठीत कमळ चालत नाही,मला घड्याळ किवा धनुष्यबाणावर लढवा अशी मागणी त्याने बावणकुळेंकडे केली होती,असा दावा पत्रकार परिषदेत कुंभारे यांनी केला.बावणकुळेंवर लोकशाहीही हत्या केल्यामुळे कलम ३०२ पेक्षाही गंभीर कलम लावली गेली पाहिजे,असे त्या म्हणाल्या.

आम्ही पीआय पासून तर पंतप्रधान व मुख्यमंत्री फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपासून तर केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत सर्व पुराव्यानिशी तक्रार केली आहे.आमच्या तक्रारींची त्यांनी तात्काळ दखल घ्यावी. कामठी निवडणूकीत जे गैरप्रकार झालेत त्याची सखोल चौकशी व्हावी तसेच बावणकुळे यांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.

मी वकील आहे.कोणत्या कलमांखाली कोणते गुन्हे घडले याचा संपूर्ण अभ्यास आहे.वेळ पडली तर पुन्हा एकदा काळा कोट अंगावर न्यायासाठी चढवेल,असा इशारा त्यांनी दिला.
बावणुळेंचा ‘वैयक्तिक’ विकास!
गेल्या पंधरा वर्षांपासून तुम्ही भाजपसोबत युतीमध्ये होता,तुम्हाला भाजपचे धोरण माहिती नव्हते का?असा सवाल केला असता,युतीमध्ये होतो म्हणूनच तर त्यांना मते मिळवण्यासाठी माझाच व्हिडीयो व्हायरल करावा लागला.त्यांच्याकडे स्वत:चे काहीही नव्हते.ज्या व्हिडीयोमध्ये मी बावणकुळेंना दम दिला की मतदारांना धमकावणे महाग पडेल,तोच व्हिडीयो व्हायरल करुन ते मत मागत होते.त्या व्हिडीयोमध्ये माझी एकच चूक झाली ती म्हणजे बावणकुळेंनी कामठीत खूप विकास केला असे मी म्हणाले मात्र,मला ‘वैयक्तिक विकास केला’असे म्हणायचे होते,ती चूक मी आता सुधारते असा टोला सुलेखा कुंभारे यांनी हाणला.ते महसूल मंत्री आहे आणि महसूल खात्यांतर्गत रेती घाट येतात.बावणकुळेंच्या चेले चपाटे यांनी मोठ्या प्रमाणात स्वत:चा विकास केला.चंद्रपूर जिल्ह्याचा रेती घाट हा कोणत्या कंत्राटदाराच्या घश्‍यात आहे?बावणकुळेंचा दलालच टेंडरच्या अटी शर्थी बनवतो व तोच टेंडर भरतो,बावणकुळेंच्या रेतीच्या दलालीमुळेच रेती सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर गेली आहे.
‘हा फक्त ट्रेलर आहे,पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’असा टोला हाणत लवकरच बावणकुळेंच्या कोट्यावधींचा जमीन घोटाळाही बाहेर काढणार,असा इशारा सुलेखा कुंभारे यांनी दिला.जो अजय अग्रवाल कामठीत चहा टपरीवर बसत असून ५० रुपयांना मोहताच होता तो आज बावणकुळेंच्या कृपेमुळे ५०० कोटींचा मालक झाला आहे.बावणकुळेंचे सगळे घोटाळे बाहेर काढून त्याची संपूर्ण मालमत्ता मी गरीबांमध्ये वाटून देईल,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.
पार्थ पवारांसोबत बावणकुळे भागीदार!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मालकीच्या ‘अमेडिया एंटरप्राईझ’कंपनीने पुणे जिल्ह्यातील मुंडवा येथील महार वतनाच्या मूळ मालकीची ४२ एकर शासकीय जमीनीचा जो घोटाळा केला आहे त्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे बरोबरीने भागीदार असल्याचा धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेत सुलेखा कुंभारे यांनी केला.बावणकुळेंच्या मंत्रालय व मर्जीशिवाय एवढा मोठा आर्थिक घोटाळा होणे शक्यच नाही,असा दावा त्यांनी केला.
प्रेस क्लबमध्ये व्हिडीयोजचे आवाज गायब!
अनेक तास बसून पत्रकारांना बावणकुळे यांच्या धमकीचे भाषणांचे,अजय अग्रवालच्या फॉर्म हाऊसमधील धाड,बोगस मतदार,बोटावरची शाई पुसणारे लिक्विड,नोटांचे बंडल,बोगस मतदारांचे बाईटस,पोलिसांची कारवाई इत्यादी अनेक व्हिडीयोज मोठ्या स्क्रीनवर दाखवण्याची तयारी केली होती मात्र,जे व्हिडीयोज लॅप टॉपवर आवाजासह इतके व्यवस्थित दिसत होते त्याचा आवाज नेमका प्रेस क्लबमध्ये आल्यावर कसा गायब झाला?इथे देखील आमच्या विरोधकांची घूसखोरी आहे का?असा मिश्‍किल सवाल त्यांनी केला.
ही बेईमानी वर्सेस इमानदारीची लढाई:अजय कदम
मी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी १७ नोव्हेंबर या तारखेला दुपारी अडीच वाजता उमेदवारी अर्ज भरला,त्यावेळी अनेक लोकांचा उत्साह वाखाण्याजोगा होता.आमचे एक ही कार्यालय कामठीत नाही.परंतू वेगवेगळ्या जाती,धर्माच्या मतदारांनी फार उत्साहात मला पाठिंबा दर्शवला.भाजपला खूप गरुर आहे स्वत:वर त्यामुळे यावेळी त्यांचा गरुर मोडायचाच यासाठी तुमची उमेदवारी महत्वाची होती,असे निरोप मला मिळू लागले.हातठेले,रिक्क्षेवाले,फळ विक्रेते अशा सर्वसामान्यांसह दूकानदार,व्यवसायिक मतदारांनीही मला उघड पाठींबा दिला.ही पराकोटीची‘बेईमानी वर्सेस इमानदारी’ची लढाई होती.प्रचंड भ्रष्टाचार आणि बोकाळलेली कमिशनखोरी या विरुद्धचा हा लढा होता.पुढे निवडणूकीत प्रत्यक्ष प्रशासनाला हाताशी धरुन जी बेईमानी करण्यात आली,त्याविरुद्ध सुलेखा ताईंनी आपला आवाज उठवला असल्याचे कदम म्हणाले.
एका पोलिस शिपायाने कदम यांची धरलेली कॉलर व त्यानंतर पोलिस ठाण्यासमोर आंदोलकांचा ठिय्या,या प्रकरणाविषयी विचारले असता.बावणकुळेंनी कामठीतील प्रत्येक बूथवर एक पोलिस शिपाई व एक निवडणूक अधिकारी मर्जीतला बसवला होता ज्यांना अजय कदम यांना कोणत्याही बूथवर प्रवेश देण्यात येऊ नये असे सख्त निर्देश होते.मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्याने माझा मतदान केंद्रांवर जाणे हा संवैधानिक अधिकार होता.मात्र,एका बूथवर गेलो असता तेथील पोलिस शिपायाने माझी कॉलर धरुन मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.मतदान सुरु असल्याने आम्ही त्याला संवैधानिक पद्धतीनेच उत्तर दिले.त्या शिपायाचे निलंबन ४८ तासात करावे यासाठी आम्ही पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले असल्याचे कदम यांनी सांगितले.मूळात मी बूथवर फिरलो तर मतदार प्रभावित होतील व भाजपचा पराभव होईल,अशी बावणकुळेंना भीती होती,असा सरळ आरोप याप्रसंगी कदम यांनी केला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………..
तळटीप:- 
काँग्रेसच्या सुरेश भोयर यांची महिला पत्रकारसोबत अरेरावी!
कामठीत फॉर्म हाऊसवर भर दुपारी हा सगळा राडा झाल्याचे व्हिडीयोज नागपूरातील अनेक पत्रकारांच्या व्हॉट्स ॲपवर झळकले.काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष असल्याने कामठीचे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे नेते ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विधान सभेचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांना नागपूरातून महिला पत्रकाराने फोन करुन या व्हिडीयोज मधील तथ्य व काँग्रेसची भूमिका या विषयी प्रश्‍न केला मात्र,प्रश्‍न ऐकताच भोयर यांनी अर्वाच्च भाषेत महिला पत्रकाराला खडसावले.हिंमत कशी झाली असा प्रश्‍न करण्याची?असा सवाल करीत प्रश्‍न विचारण्याची ‘लायकी’देखील काढली!
काँग्रेसचे शीर्षस्थ नेते राहूल गांधींनी ‘मत चोरी’सिद्ध करताना ज्या कामठीतील निवडणूकीचे उदाहरण दिले त्याच कामठीतील काँग्रेसचा एक शीर्षस्थ नेता प्रश्‍न ऐकताच महिला पत्रकारावर ज्याप्रमाणे भडकले, ते बघता,सुलेखा कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे सिद्ध होतं.कामठीत काँग्रेससह सर्वच पक्षाचे उमेदवार हे ’डमी व भाजपला सेट’होते असा सरळ आरोप त्यांनी केला.विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या विरुद्ध एकीने लढण्या ऐवजी काँग्रेससारखा पक्षच ‘आतून’सेट होणार असेल तर भाजप लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करण्याचा काँग्रेसला तरी नैतिक अधिकार पोहोचतो का? हा लाख मोलाचा प्रश्‍न उपस्थित होतो.
राहूल गांधी संविधानाची जी प्रत आपल्या हातात घेऊन देशभर सभा घेतात,त्याच संविधानाने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना ,लोकप्रतिनिधींना प्रश्‍न विचारण्याचा अधिकार दिला आहे.जी संविधानाची प्रत राहूल गांधी आपल्या हातात मिरवतात,त्या संविधानात स्त्री-पुरुष भेद कुठेही नाही,परिणामी,महिला पत्रकाराशी ज्या उन्मतपणे व उद्धटपणे सुरेश भोयर यांनी संवाद साधला ते बघता,त्या ठिकाणी पुरुष पत्रकार असता तरी भोयर यांची हीच कृती असती का?असा सवाल आता निर्माण झाला आहे.सुलेखा कुंभारे यांना भोयर यांच्या या कृतीविषयी माहिती दिली असता,ही कृती सर्वस्वी चुकीची असल्याचे त्या म्हणाल्या.पत्रकार हा माहिती घेण्यासाठी प्रश्‍न विचारत असतो,उत्तर द्यायचे नसेल तरी भाषेची एक मर्यादा निदान महिला पत्रकारासोबत पाळणे गरजेचे होते,असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे नेतेच संविधानाने दिलेल्या या अधिकाराची पायमल्ली अश्‍या रितीने करीत असतील तर राहूल गांधींनी सर्वात आधी आपल्या स्वत:च्या पक्षातील काही नेत्यांमधील नैतिकतेची व संविधानाप्रती जबाबदारीची घडी नीट बसवण्याची खरी गरज आहे,असेच आता म्हणावे लागेल.केदार यांनी किमान आपल्या या सर्वाधिक जवळच्या पदाधिका-याला संवैधानिक मर्यादा शिकवणे गरजेचे आहे,असा सूर कुंभारे यांच्या पत्रकार परिषदेनंतर उमटला.
………………………………………
………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या