

मोबाईल डॉक्टर वॅनच नदारद: विभागीय आयुक्तांना काँग्रेस शिष्टमंडळाने दिले निवेदन
नागपूर,ता,२८ मे: मोमिनपुरा येथील काल झालेला वृद्धेचा मृत्यू हा सरासर नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या आठमुठे धोरणामुळेच झाला असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला. या रुग्णाला प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे वेळेवर औषधोपचार मिळाले नाही तसेच वैद्यकीय चिकित्सक देखील या भागात उपचारासाठी येऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.शासनाच्या निर्देशानुसार’ प्रतिबंधित क्षेत्रात’ मोबाईल डॉक्टर वॅन’असणे गरजेचे असतात,नागपूर शहरात प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी अशी सुविधा कोठेही उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले. या मृतक रुग्णाला वेळेवर औषधोपचार मिळवून देणे मनपा प्रशासनाचे काम होते मात्र मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मरणासाठी सोडून दिले असल्याची टिका त्यांनी केली.

अंबाझरी येथील ट्रस्ट-ले-आऊटमध्ये देखील मनपाने नागरिकांच्या अन्नधान्याची,जेवणाची कोणतीही सोय केली नाही,या ठिकाणी गुरे ढोरे देखील उपाशी मरत आहेत. परिणामी येथील लोकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. पार्वती नगर,जवाहर नगर येथील नागरिक देखील भर उन्हात रस्त्यावर निघाले.मुंढे यांनी साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या नावाखाली संपूर्ण नागपूर शहराला वेठीस धरले असल्याचा अारोप आ.विकास ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला. मध्यवर्ती भागातील सर्वात मोठा भाजी बाजार असणा-या कॉटन मार्केटमध्ये देखील घोळ घालून ठेवला आहे. तेथील व्यापा-यांचे जगणे देखील मुंढे यांच्या अदूरदर्शी धोरणांनी मुश्किल करुन टाकले असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांनी आवाज उठवला असता झोनचे सहायक आयुक्त यांच्याकरवी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी साठवणे यांच्या विरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम केले. या भागातील शेकडो नागरिकांना विलगीकरणासाठी मनपाचे कर्मचारी घेऊन जातात मात्र त्यांना कपडेलत्ते,औषधे,लहान मुलांच्या गरजेच्या वस्तू सोबत घेऊन जाण्यासाठी दोन तासांचाही वेळ हे कर्मचारी देत नाहीत.असे विलगीकरण माणूसकीला धरुन आहे का?असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.या विरोधात आवाज उठवल्यास आमच्याच नगरसेवकाविरोधात पोलीसात तक्रार नोंदवली जाते!
मनपा आयुक्त हे फक्त नागपूर शहराला वेठीस धरुन अनेक झोनमधील ५-५ किलोमीटरपर्यंचा परिसर प्रतिबंधित करीत आहे.यासाठी ते जनप्रतिनिधी,स्थानिक नगरसेवक यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेत नसून केवळ पोलीसांच्या दंडूकांचे सहाय्य घेतात,असा घणाघात त्यांनी केला.
मुंढे यांच्या या तुघलकी कारभाराविरोधात आज शुक्रवार दि. २९ मे रोजी आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात १८ ते २० नगरसेवकांनी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांना निवेदन सादर केले.अनेेक मुद्दांवर आयुक्तांसोबत चर्चा करुन नागरिकांच्या अनेक समस्या मांडल्या.
यात नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेणे,शहरातील कोणत्याही भागात प्रतिबंधित किवा विलगीकरणाची कारवाई करताना मुंढेंनी येथील स्थानिक जनप्रतिनिधींना विश्वासात घेणे,त्यांना या कारवाईप्रति अवगत करणे,कोरोनासंबंधी परिस्थिती कशी नियंत्रणात येईल याविषयी शहरातील आमदार,मंत्री यांनाही विचारुन कारवाई करणे, चौथ्या लॉक डाऊननंतर शासनाने जी अंशत:शिथिलता दिली आहे त्यामुळे इतर शहरांमधून नागरिक जे नागपूर शहरात चारचाकी किवा खाजगी वाहनांनी परततात आहेत, त्या सर्व नागरिकांची नोंद विमानतळ व रेल्वे स्टेशनवरील नोंदीसारख्याच करण्यात यावे,अशी मागणी त्यांनी केली. शहरातील प्रत्येक गल्लीत सर्दी खोकल्याचे रुग्ण जे असतील त्याची नोंद घेण्यास मनपाच्या कर्मचा-यांनी स्थानिक नगरसेवक किवा त्यांच्या १-१ कार्यकर्त्याला सोबत घ्यावे. अश्या प्रकारची यंत्रणा उभारल्यानेच शहरात काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकेल,असे निवेदनात त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्तांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवण्यात येईल व खुलासा मागवण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात ठाकरे यांच्यासोबत ज्येष्ठ काँग्रेस नेते अभिजित वंजारी, नगरसेवक अविनाश महाकाळकर, संदीप सहारे इ.चा समावेश होता.




आमचे चॅनल subscribe करा
