Advertisements

नागपूरात महाल भागात दंगल:महत्वाची प्रतिष्ठाने,अनेक घरांवर दगडफेक:गाड्यांची तोडफोड
दोन जेसीबींची जाळपोळ: अनेक घरांचे नुकसान
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या
नागपूरचे सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी:पोलिसांचे घराघरात सर्च ऑपरेशन
गडकरी,फडणवीसांचे शांततेचे आवाहन
नागरिकांनी अफवाहांवर विश्वास ठेऊ नये: पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांचे आवाहन
बाहेरच्या लोकांचा उपद्रव: आमदार दटके यांचा आरोप
्महाराष्ट्र पेटवण्यचा प्रयत्न :विरोधकांनी केली सरकारवर परखड टिका
मुख्यमंत्री उद्या विधीमंडळात करणार घटनेवर निवेदन
नागपूर,ता.१७ मार्च २०२५: लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’हा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला,या चित्रपटात मोगल बादशाह औंरंगजेबने छत्रपती संभाजी महाराज यांना फितूरीतून पकडून हाल-हाल करुन ठार मारल्याचे दृष्य हे प्रत्येक मराठा किंबहूना हिंदूंच्या जिव्हारी लागणारे होते मात्र,हा चित्रपट जवळपास चारशे वर्षांपूर्वी मराठा साम्राज्यात घडलेल्या पडद्यावरील भावनांपुरती आता मर्यादित राहीला नसून, देशभरात औरंगजेबविषयी द्वेषाच्या पातळीवर पोहोचला आहे.त्यातच भर पडली तिथीनुसार आज आलेल्या छत्रपती शिवरायांच्या जन्मतिथीची.महाराष्ट्रात सर्वदूर शिवजयंती साजरी होत असताना यावेळी त्याला किनार होती औरंगजेबच्या कबर व प्रतिकृती जाळण्याची.नागपूरात महाल भागातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे दरवर्षीप्रमाणे शिवरायांची जयंती उत्साहात साजरी होत असतानाच, औरंगजेबचा पुतळा दुपारी एक वाजताच्या सुमारास जाळण्यात आला व जोरदार नारेबाजी झाली.याच परिसरात दुस-या गटातील समुदायाचे धार्मिकस्थळ व मोठ्या प्रमाणात रहीवासी भाग असल्याने लगेच तनावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

गणेशपेठ पाेलिस ठाण्यात बजरंग दलाच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यासाठी दूस-या गटातील सुमारे चारशे जण एकत्रित आले व पोलिस ठाण्यातच बजरंग दलाच्या मुर्दाबादचे नारे लागले,तसेच औरंगजेबची कबर जिथे आहे तिथे ती सर्वकाळ राहील असे धमकावण्याचे अनेक व्हिडीयो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले.
पोलिसांनी दोन्ही गटाशी बोलून सांयकाळपर्यंत परिस्थिती चांगलीच आटोक्यात आणली मात्र,सायंकाळनंतर वातातवारण चिघळले किंबहूना दंगलखोरांनी चिखळवले,श्याम टॉकिजजवळच्या परिसरात बघता बघता तूफान दगडफेक झाली,गडकरी यांच्या पुढाकारातून याच भागात निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उभ्या असणा-या दोन जेसीबी दंगलखोरांनी पेटवून दिले.इतकंच नव्हे आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन गाड्यांवर देखील तूफान दगडफेक केली.शिवराज्याभिषेक सोहळा समिती तसेच हिंदूत्ववादी संघटनांतर्फे आज आंदोलनस्थळी दुपारी एक वाजताच्या सुमारास औरंगजेबची जी प्रतिकृती जाळण्यात आली त्याला हिरवी चादर गुंडालेली होती.त्याच चादरीवर कुराणाची आयत लिहलेली होती,असा संदेश किंबहूना अफवाह सोशल मिडीयावर व्हायरल होताच, शेकडोच्या संख्येने दंगलखोर रस्त्यावर उतरले.महत्वाचे म्हणजे दगडफेकीत चाळीसच्यावर पोलिस जखमी झाले,माध्यमकर्मींवर देखील दगडफेक करण्यात आली.
ई-रिक्क्षा,चारचाक्या व दंगलखोरांच्या हातात त्या परिसरात जी वाहने आली त्याच्या काचा फोडण्यात आल्या.त्याहून महत्वाचे म्हणजे दरवर्षी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील जो सोहळा शिवराज्याभिषेक समितीचे संयोजक व सदस्य हिरिरीने साजरा करतात,त्या संयोजकाच्या घरासमोरील जेसीबीच दंगलखोरांनी जाळल्या मात्र,यावेळी घरामध्ये असणारे समितीचे संयोजक बाहेर पडलेच नाही,अशी चर्चा परिसरात रंगली.परिणामी,मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री या शहराचे असून सत्तास्थानावर असल्याने आपण कोणतेही कृत्य आंदोलनाच्या नावाखाली केल्यास ते दूसरा गट खपवून घेईल असा समज हिंदूत्ववादी संघटनांचा झाला मात्र,घडले अघटित असे येथील जाणकार सांगतात!

मूळात अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा दफनविधी कबरेत केला.मृत्यूनंतर वैर संपतं हे हिंदूंचं तत्वज्ञान सांगतो.औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे केले ते एक युद्ध होते,युद्धबंदी असणा-या शत्रूसोबत केलेले क्रोर्य होते.तरी देखील मराठ्यांच्या शोर्या पुढे औरंगजेबाला हारच पत्कारावी लागली.छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर बसणारे छत्रपत्री राजाराम यांच्या पत्नी ताराराणी यांनी देखील औरंगजेबाला स्वत: युद्धाच्या रणांगणात उतरुन सात वर्षे जेरीस आणले होते ,परंतू मराठ्यांचे साम्राज्य औरंगजेबाच्या हाती लागू दिले नाही.शेवटी औरंगजेब दख्खन वर राज्य करण्याचे स्वप्न उराशी घेऊन याच भूमित निरर्वतला.त्याची कबर औरंगाबादपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खुल्दाबादमध्ये आहे.काँग्रेस सरकारने या ठिकाणाला ऐतिहासिक स्थळाचा ‘क’ दर्जा दिला असून केंद्राच्या पुरातत्व विभागाकडे या मकब-याच्या देखरेख व संरक्षणाची जबाबदारी आहे.
अचानक चारशे वर्षांनंतर‘छावा’चित्रपट आला व आता हा मकबरा हिंदूत्ववादी संघटनांच्या डोळ्यातली तिडक बनला.छत्रपती संभाजी महाराजांचा ३९ दिवस अन्वित छळ करुन मारणा-या औरंगजेबची कबर महाराष्ट्रात नको,यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरात आंदोलने सुरु आहेत.नागपूरात,महाल परिसरात देखील औरंगजेबाची प्रतिकृती जाळण्याचा सोपस्कार पार पडला मात्र,त्या प्रतिकृतीला हिरव्या रंगाच्या चादरीत गुंडाळण्याचा,आंदोलनका-यांचा फाजीलपणा महाल येथील कोणत्याही जात,धर्माच्या राजकारणात न पडणा-या नागरिकांच्या अंगलगट आला,असा सरळ आरोप आता महाल येथील रहीवासी नाव न छापण्याच्या अटीवर सांगत आहेत.
अशा दंगलीत पेटवली जातात ती हिंदूचीच घरे,दूकाने,प्रतिष्ठाने,आंदोलनका-यांचे यात नुकसान होत नाही,असा रोष ही व्यक्त करण्यात आला.नागपूर हे शांत शहर म्हणून गणल्या जातं.याच शहरात राष्ट्रीय स्वयंसंघाचे मुख्यालय आहे मात्र तरी देखील अशी दंगल नागपूरच्या इतिहासात या पूर्वी कधीही घडली नाही.मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी तर दंगल घडवणारे दोन्ही समुदायातील सामान्य नागरिक नव्हते तर बाहेरुन आलेले दंगलखोर असल्याचा सरळ आरोप माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला आहे.निष्पाप नागरिकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली.गांधीबाग बँकेच्या काचा देखील फोडण्यात आल्या.घाटे,शिर्के यांच्या घरावर तूफान दगडफेक करण्यात आली.अर्थात दंगल शमवण्यात यश आल्यानंतर पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन केले त्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनेक बांग्लादेशींचा समावेश असल्याची चर्चा आहे!
पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस घटनास्थळी हजर होते.पोलिसांकडून दंगलखोरांना पांगवण्यासाठी अश्रूंच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.महत्वाचे म्हणजे अनेक तास पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या मोठमोठ्या दगडांचा साठा अचानक कसा उपलब्ध झाला?नागपूर पोलिस याचाही शोध घेणार आहे.घटनास्थळी अश्या दगडांचा खच पडला होता.गांधी गेटजवळील शिवरायांच्या पुतळा परिसरात जी विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्याचे उद् घाटन करण्यासाठी हा परिसर भगव्या रंगाने भरुन गेला असतानाच, अचानक ही दंगल घडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
या घटनेवर विरोधी पक्षाने चांगलेच तोंडसुख घेतले असून, दंगलखोरांना शांततेचा संदेश देण्या ऐवजी राजकारणाची पोळी शेकल्याची टिका समाज माध्यमात उमटली आहे.मुंबईतील सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दंगलीच्या पार्श्वभूमीवर तातडीने वरिष्ठांसोबत बैठक घेतली असून उद्या विधीमंडळात ते या घटनेवर निवेदन सादर करणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे,मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नागपूरकरांनी शांतता बाळगावी: गडकरी यांचे आवाहन
नागपूरः नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावेत, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज sattadheesh official youyube चॅनलवर बघू शकता)
……………………
Advertisements

Advertisements

Advertisements
