फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजएक मुद्दत से मेरी माँ सोयी नही राशीद ...

एक मुद्दत से मेरी माँ सोयी नही राशीद …

Advertisements

अटलबहादूर सिंग आणि फाळणीच्या जीवघेण्या वेदना

तीर्थराज कापगाते यांच्या शब्दात….

रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभानिमित्त संवाद साधण्यासाठी श्री. अटलबहादूर सिंग यांच्याशी मनमोकळा संवाद झाला. शतदीक्षांत स्मरणिकेच्या त्या मुलाखती दरम्यान झालेल्या भेटीतील वृद्धत्वाच्या उंबरठ्यावरही मनाने तरुण आणि ताजेतवाने असणारे श्री.अटल बहादूरजी कायम स्मरणांत राहिले.

उर्दू शायरांच्या जिंदादिल शेरोशायरीत जीवनाची संध्याकाळ कुठल्याही तक्रारीशिवाय अतिशय रसिकतेने भोगणार्‍या अटलबहादूरजींचे ते वृद्ध तरीही देखणे रूप आजही डोळ्यांपुढे जस्सेच्या तस्से उभे आहे.

विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी जीवनसाधना पुरस्काराने विभूषित अटल बहादूरजींच्या आयुष्याचा प्रदीर्घ कालखंड नागपूर विद्यापीठाशी जोडला आहे. विद्यापीठाच्या वाढ-विकासाच्या अनेकानेक घटनांचे ते साक्षीदार आहेत. विद्यापीठ म्हणजे ऐन तारुण्यात संस्कार करणारी, जाणत्या वयात आयुष्याला आयाम देणारी आईच असे सांगत अटलबहादूरजी विद्यापीठाबदल भरभरुन बोलत होते.

फाळणीनंतर त्यांचा शीख समाज नागपुरात निर्वासित म्हणून स्थानांतरित झाला. लाहोरवरुन अमृतसर , दिल्ली, बनारस असा प्रवास करत १९४९ ला ते नागपुरात आले. पुढे येथील सार्वजनिक जीवनाशी ते एकरूप झाले. मराठी मातीत ते रुजले , वाढले आणि बहरले सुद्धा. विद्यापीठ आणि नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणावर सुमारे पंचवीस-तीस वर्षे हुकूमत गाजविणारे आणि दोनदा महापौरपद भूषविणारे अटल बहादूरजी येथील सांस्कृतिक जीवनाशी एकरुप होत राहिले. विदर्भातील विविध सामाजिक प्रश्नांशी झुंजत राहिले. क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये सतत अग्रेसर राहिले.

हे पण वाचा…

माजी महापौर सरदार अटल बहादूर सिंग यांचे निधन

निमित्त मुलाखतीचे पण अख्खा दिवस आम्ही सारखे बोलत राहिलो. दुपारचे जेवण एकत्र घेतल्यावर पुन्हा बोलणे सुरु झाले. गुडघ्याच्या दुखण्याने अधू असल्याने आपल्या ग्रंथसंग्रहातील एकेक पुस्तक ते मला काढायला लावायचे. पुस्तकावरुन मायेने हात फिरवणारे , आपण गांधी -आंबेडकरांचे वारस कसे आहोत हे समजावताना उचंबळून येणारे , लहान मुलाप्रमाणे हसणारे , उल्हासणारे ,अस्खलित मराठीमध्ये बोलणारे श्री. अटलबहादूरजी आयुष्याच्या अंतिम पर्वातही विजेत्या योद्ध्यासारखे भासत होते.

आमच्या गप्पांमध्ये सामील होत भूतकाळही वर्तमानाच्या शेजारी येऊन उभा राहिला. अटल बहादूरजीं सांगत होते. त्यांचे मूळ घराणे लाहोरचे. त्यांच्या आजोबांना शेर-ए-पंजाब पदवीने गौरविले होते.

त्या बोलण्यात बालपणातील फाळणीचा भयावह कालखंडाची आठवण निघाली,आणि त्या आगडोंबात रिफ्यूजी कॅम्पमध्ये आजारी आईच्या मांडीवर डोके ठेवून घालवलेली , धास्तावलेली अख्खी रात्र त्यांनी माझ्यापुढे उभी केली. त्यावेळी त्यांनी ऐकवलेला तो शेर आजही त्यांच्या देहबोलीसहित स्मरतो आहे …

एक मुद्दत से मेरी मा सोयी नही राशिद
मैंने एकबार कहा था , मुझे डर लगता है …’

त्यांच्या डोळ्यांतून अश्रू घळघळताना माझेही डोळे ओलसर झाले होते…!

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या