फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमउपमुख्यमंत्र्यांच्या शहरात तरुणीवर जीवघेणा हल्ला!

उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात तरुणीवर जीवघेणा हल्ला!

Advertisements


भाजपच्या पदाधिका-यावर गुन्हा दाखल

तरुणीवरच केला ३५४ चा खोटा गुन्हा दाखल!

तरुणीवर हल्ला याचा अर्थ माझ्यावरचा हल्ला:ज्वाला धोटे यांची चेतावनी

अट्रासिटीच्या आरोपीला सहज जामीन: पोलिसांनीच टांगले कायदे धनदांडग्यांच्या वेशीवर!

तरुणीवरील खोटे गुन्हे रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार:ॲड.विलास राऊत

जात कोणतीही असो स्त्री रक्षणासाठी लढा देणार:भदंत हर्षबोधी

नागपूर,ता. २४ नोव्हेंबर : संजना मेश्राम नामक अवघ्या २५ वर्षीय तरुणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असणा-या नागपूरात २० नोव्हेंबर २०२२ रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली,तिच्या चेह-यासह डोळे व संपूर्ण अंगावर र्मिची पाऊडर फासण्यात आली तसेच धारदार चाकूने तिच्या कपाळावर व हातावर वार करण्यात आले.महत्वाचे म्हणजे या तरुणीने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी अजय पाटील यांच्या विरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती,ती तक्रार मागे घेण्यासाठी तिला पोलिस निरीक्षका समोरच अजय पाटील यांनी धमकावल्याचा आरोप करीत, त्यांच्याच सांगण्यावरुन माझ्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप संजना हिने आज पत्रकार भवन येथे आयोजित पत्र परिषदेत केला.राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहमंत्रालयाचा देखील कार्यभार आहे,त्यांच्याच शहरात एका दलित तरुणीला त्यांच्याच पक्षाच्या एका पदाधिका-याकडून अश्‍याप्रकाच्या जीवघेण्या छळवणूकीला सामोरे जाण्याची वेळ आल्यामुळे सर्वत्र चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे.

कामठी येथील रहीवासी संजना मेश्राम ही औषध विक्रीचा म्हणजे एल.एल.एमचा व्यवसाय करते.सुरेंद्र पोलकोंडवार नामक इसमाला तिने आठ महिन्यांपूर्वी मुलांची उंची वाढवण्यासाठी ऑर्गनिक औषध विकली होती.मध्यस्थी विपिन नायडू याच्यामुळे तिने हा उधारीचा व्यवहार पोलकोंडवारसाेबत केला होता.दोन महिन्यांनंतर पैसे घेऊन जा असे तिला सांगण्यात आले होते मात्र आठ महिने उलटून देखील तिला औषधांच्या रकमेचे भुगतान पोलकोंडवार यांनी केले नाही.परिणामी ती वारंवार त्यांच्या घरी पैसे घेण्यास जात होती.

१७ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता संजना पोलकोंडवार यांच्या घरी गेली असता आधी तर एक तास तिला बसवून ठेवण्यात आले यानंतर पोलकोंडवार व त्यांच्या कुटूंबियांनसोबत तिचा बराच शाब्दिक वाद झाला.पोलकोंडवार यांनी जोपर्यंत माझ्या पत्नी व मुलांच्या पाया पडून माफी मागणार नाहीस तोपर्यंत तुला पैस मिळणार नसल्याचे ठणकावले.

अनेक चकरा मारुन देखील संजना हिला तिच्या औषधांचे पैसे मिळाले नव्हते उलट कामठी ते नागपूरपर्यंत येण्या जाण्यात तिचा पेट्रोलवर बराच खर्च होत होता त्यामुळे तिने पोलकोंडवार यांच्या मुलांच्या व पत्नीच्या,पैसे मिळतील या आशेने पाया देखील पडल्या मात्र पैसे देण्याचे सौजन्य व माणुसकी पोलकोंडवार यांनी दाखवली नाही.

पाया पडत असताना पोलकोंडवार यांनी संजना हिची लायकी काढली व जातीचा उल्लेख करन अश्‍लील शिवीगाळ केली.एवढंच नव्हे तर त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा देखील मानहानिकारक उल्लेख केला!तुझ्या आंबेडकराने आमच्यासाठी केलेच काय आहे?‘चल निकल यहा से,ज्यादा फडफड करेगी तो पोलिस कमिश्‍नर को बुलाके अंदर करवा दूंगा’,अश्‍या शब्दात तिला दम दिला.

बाबासाहेबांचा उल्लेख करताच, मी पोलकोंडवारांची हिंमत काढली तर त्यांनी माझ्या चेह-यावर बुक्क्यांनी मारण्यास सुरवात केल्याचा आरोप संजना यांनी पत्र परिषदेत केला.माझा गळा धरुन माझ्या वक्षस्थळाला धक्का देत घराबाहेर काढले,एवढेच नव्हे तर त्यांच्या पत्नी व दोन्ही मुलींनी माझे केस धरुन ठेवले होते,असे संजना यांनी सांगितले.त्यांच्या घरासमोर चार-पाच लोक जमा झाले होते,त्यांच्या समोर देखील पोलकोंडवार यांनी जात काढत अश्‍लील शिविगाळ केल्याचे संजना हिने सांगितले.

आत्मसन्माला बसलेल्या या ठेचमुळे संजना हिने सरळ सदर पोलिस ठाणे गाठले.पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचा-यांनी सुरेंद्र पोलकोंडवार यांचे घर गाठत,महिलेवर हात कसा उचलला अशी विचारणा केली.१७ तारखेच्या रात्री ९.४४ मिनिटांवर संजना हिने सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली मात्र त्यावेळी मारहाणीमुळे तिचा एक कान बंद होता व एका डोळ्याला देखील गंभीर दुखापत झाली होती,तरी देखील सदर पोलिस ठाण्यात तिच्या तक्रारीची गांर्भीयाने नोंद घेण्यात आली नाही.आधी चौकशी करु मग एफआयआर दाखल करु,असे संजनाला सांगण्यात आले.

उद्या आपल्या हाताने अर्ज लिहून आण असे सांगत मला पिटाळून लावण्यात आले.दुस-या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुन्हा सदर पोलिस ठाण्यात पिडीत तरुणी गेली असता दुपारी २ वाजेपर्यंत पिडीत तरुणीला बसवून ठेवण्यात आले.यानंतरही जिद्दीने तक्रार दाखल करण्यासाठी पिडीता रात्रीपर्यंत सदर पोलिस ठाण्यात बसून राहीली.ज्या सुनीता उमीनवाडे या महिला पोलिस अधिका-यांकडे तिची तक्रार केली आहे त्या बाहेर गेल्या असल्याचे कारण तिला सांगण्यात आले.यानंतर त्या महिला पोलिस अधि-यांनी पोलकोंडवार यांना फोन लावला असता त्यांनी सांगितले ते आता येऊ शकणार नाहीत उद्या येईल.

दुस-या दिवशी पुन्हा १२ वाजता पिडीतेला येण्यास सांगण्यात आले.पुन्हा दुपारी ३ पर्यंत पिडीतेला बसवून ठेवण्यात आले.विचारणा केली असता पिडीतेचे केस पेपर पीआय चौधरी यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले व ते बाहेर गेले असल्याचे त्यांनी सांगितले.पीआय चौधरी हे सायंकाळी ७.४५ वाजता पोलिस ठाण्यात आले.कलम १९ अन्वये पोलकोंडवार यांच्यावर काय कारवाई करणार आहात?अशी विचारणा चौधरी यांना केली असता तुझ्या प्रमाणे पोलकोंडवारांसाठी देखील कलम १९ असल्याचे उपरोधिक उत्तर चौधरी यांनी दिले.याच वेळी पोलकोंडवार व त्यांच्या पत्नी चौधरी यांच्या कक्षात गेले.

चौधरी यांनी पिडीतेचे सात हजार पाचशे रुपये देण्यास पोलकोंडवार यांना सांगितले मात्र ज्या प्रकारे मला मारहाण करण्यात आली,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख अनादराने करण्यात आला,त्या विरोधात माझी तक्रार दाखल करण्याची विनंती पिडीतेने पीआय चौधरी यांना केली.यावर अजय पाटील यांनी पीआय समोरच पिडीतेला धमक्या दिल्या.सात हजार तर नाही मिळणार तीन हजार रुपये घे आणि निघून जा,मात्र माझ्या परिश्रमाचे संपूर्ण सात हजार ६७७ रुपये मी घेणार असल्याचे सांगून याशिवाय माझ्यासोबत जो मानवतेला न शोभणारा व्यवहार झाला त्या विरोधात न्याय मागणारच असे उत्तर अजय पाटील यांना पिडीतेने दिले.

यावर अजय पाटील यांनी मला चौधरी समोरच‘तुला तर मी बाहेर बघून घेईल’ अशी धमकी देत निघून गेले.एवढंच नव्हे तर पीआय विनोद चौधरी हे आरोपीलाच आपल्या नावाची नेमप्लेट तयार करुन देण्याची ऑर्डर देत असल्याचा आरोप पिडीतेने केला.

पोलिस ठाण्यात आपल्याला भारताची एक नागरिक म्हणून न्याय मिळणार नसल्याचे बघून अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्याशी संपर्क साधला असल्याचे पिडीतेने सांगितले.घटनेच्या चौथ्या दिवशी ज्वाला धोटे यांच्या पुढाकाराने आरोपींवर अट्रासिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला.रात्री १०.३० पासून तर पहाटे ४.३० पर्यंत माझे बयाण नोंदवण्यात आले व मला माझ्या तक्रारीची एक प्रत देण्यात आली.

माझ्या या आत्मसन्मानाच्या लढ्यात मला न्यायाची अपेक्षा आहे,असे संजना यांनी पत्र परिषदेत सांगितले.

हा दलित तरुणीवरचा हल्ला नसून तो ज्वाला धोटे वरचाच हल्ला:ज्वाला धोटे(अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा)
या संपूर्ण प्रकरणात पहील्या दिवसांपासून मी जातीने लक्ष घातले आहे.सदर पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींवर अट्रासिटी,विनयभंग,जीवे मारण्याची धमकी,अश्‍लील शिवीगाळ असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत.परंतू दर्दूेवाची बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाशी निगडीत भाजपचे पदाधिकारी तसेच अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात वावरणारे अजय पाटील यांचं अगदी पहील्या दिवसापासून नाव या गुन्ह्यात गुरफटलं असून त्यांच्यावर पिडीतेने गंभीर आरोप केले आहेत.

अजय पाटील यांच्याशी माझे कौटूंबिक संबंध आहेत परंतू चुकीच्या कृत्याचे समर्थन मला करता येणार नाही.माझ्या कुटूंबातील व्यक्ती जरी अश्‍या रितीने चुकला असता तर मी त्याच्याही विरोधात अश्‍याच रितीने उभी राहीली असती.सदर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकासमोरच अजय पाटील यांनी पिडीत तरुणीला धमकी दिली होती.आपल्या तक्रारीत या तरुणीने अगदी पहिल्या दिवसापासून अजय पाटीलचे नाव घेतले आहे.

मात्र या तरुणीवर २० नोव्हेंबरला प्राणघातक हल्ला करण्यात आला.तो हल्ला इतका भंयकर होता की या तरुणीला बेशुद्ध अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करावे लागले.या घटनेविरुद्ध रात्री दोन वाजता जरीपटका पोलिस ठाण्यात संबंधित अज्ञात मारेक-यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.आपल्या बयाणात या तरुणीने स्पष्टपणे तिच्यावरील हल्ल्यासाठी भाजप पदाधिकारी अजय पाटील यांचे नाव घेतले असून,त्या तीन तरुणांनी तिच्यावर हल्ला केला त्यावेळी त्यांच्या संभाषणातून अजय पाटील व नायडू यांचे नाव समोर आल्याचे या तरुणीने म्हणने आहे.

जर तरुणीच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर पोलिसांनी याची चौकशी करावी. सर्वोच्च न्यायालयाचेच आदेश आहे की कोणत्याही तरुणीने तक्रार केली तर सर्वात आधी ती तक्रार दाखल करुन घ्या व नंतर चौकशी करा मात्र,या तरुणीच्या बाबतीत सदर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक चौधरी यांची वर्तवणूक आधीपासूनच बेजबाबदारपणाची आहे.चौधरी यांची अजनी पोलिस ठाण्यातून अश्‍याच कारणांसाठी सदर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती,या ठिकाणी देखील त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करण्यात कोणतीही कुचराई ठेवली नाही.

ज्या तरुणीने अट्रासिटी,विनयभंग,प्राणघातक हल्ला यासारखे गंभीर आरोप ज्या सदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले,तिच्या डोळ्यात,नाकात,कानात मिर्चीची पूड चोळली जाते,चाकूने हल्ला केला जातो,धमक्या दिल्या जातात,अश्‍या गंभीर तक्रारीची नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कितपत दखल घेतली?हाच गंभीर प्रश्‍न आहे.

याही पेक्षा या गुन्ह्यात सहभागी जी व्यक्ती आहे ती भाजप पक्षाशी संबंधित आहे आणि भाजपचेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत.फडणवीस यांच्याकडून आम्हाला अनेक अपेक्षा आहेत,या तरुणीला देखील न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.अजय पाटील हे फक्त भाजपचे पदाधिकारी नसून भाजपच्या नगरसेविका प्रगती पाटील यांचे यजमान देखील आहेत.

या तरुणीची स्पष्ट मागणी आहे की माझ्या आरोपात तथ्य नसेल तर त्या तारखेचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात यावे ज्यात अजय पाटील हे पीआय चौधरी यांच्या समोरच तिला धमकावित असल्याचे स्पष्ट दिसून पडतील.महत्वाचे म्हणजे एखादी पिडीत तरुणी एखाद्या पोलिस ठाण्यात ,झालेल्या अन्यायाविरोधात तक्रार दाखल करण्यास गेली असता पोलिस हे आरोपींनाच पोलिस ठाण्यात बोलवताच कसे?आरोपी पोंलकोंडवार व भाजप पदाधिकारी अजय पाटील तिथे पोहोचलेच कसे?पोलिसांसमोरच पिडीतेला धमकावताच कसे?

सर्वात महत्वाचे म्हणजे या पिडीतेच्या लढ्यात मी अगदी पहील्या दिवसापासून सहभागी असताना, माझे नाव या घटनेशी संबंधित असतानाही या तरुणीवर जीवघेणा हल्ला होतो!हा हल्ला त्या दलित तरुणीवर नसून तो माझ्यावरच झाला असल्याचे मी समजते.त्यामुळेच त्या तीन अज्ञात मारेक-यांना अटक झाल्याशिवाय व त्यांना सुपारी देणा-यांना शिक्षा झाल्याशिवाय ही ज्वाला धोटे शांत बसणार नाही.

कोणत्याही जातीच्या महिलेच्या आत्मसन्मानासाठी लढा दिलाच असता: भदंत हर्षबोधी
या दलित तरुणीने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तातडीने दखल घ्यावी.त्यांच्याकडेच गृहमंत्री पद असल्यामुळे त्यांच्यावरच या तरुणीला न्याय देण्याची जबाबदारी आहे.या दलित तरुणीसोबत जे घडले ते अत्यंत दूर्देवी आहे.अश्‍या प्रकारे कोणत्याही जाती,धर्माच्या तरुणीला मारहाण,शिवीगाळ,विनयभंग,जीवे मारण्याचा प्रयत्न हे निषेधार्ह्यच असून या तरुणी ऐवजी इतर कोणत्याही धर्माची,जातीची तरुणी असती व तिच्यासोबत असा दूर्देवी प्रकार घडला असता तर तिच्यासाठी देखील मी तिच्या पाठीशी उभा राहलो असतो.या तरुणीने ज्या पोलिस निरीक्षक चौधरींच्या विरोधात गंभीर आरोप केले आहे,त्या आरोपांची चौकशी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी करावी.महत्वाचे म्हणजे अट्रासिटीच्या गुन्ह्यात आरोपींना तातडीने जामीन मिळालाच कसा?आम्हाला या घटनेचे राजकारण करायचे नाही मात्र या तरुणीला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

पिडीतेवरील खोटे आरोप न्यायालयातून रद्द करु:ॲड.विलास राऊत
मी स्वत: वकील असल्याने सत्र न्यायालयातील अनेक प्रकरणात मी साक्षीदारांना कसे फितूर करतात हे जवळून बघितले आहे.या प्रकरणात तर पोलिस निरीक्षक पदावरील व्यक्तीवरच गंभीर आरोप करण्यात आले आहे.जिथे पोलिसच आरोपीच्या पिंज-यात आहेत तिथे साक्षीदारांच्या बयाण पलटण्यावर काय बोलावे?हायकोर्ट,विधान भवनसारखा एवढा संवेदनशील भाग ज्या सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो त्या पोलिस ठाण्याच्या पीआयवरच एवढे गंभीर आरोप लागतात तेव्हा या प्रकरणाचं गांर्भीर्य आणखीनच वाढतं.अजय पाटील याच्या दबावाखाली पिडीत तरुणीवरच ३२३ कलम दाखल करण्यात आले.घरात घूसून जीवे मारण्याची धमकी ही तरुण पिडीता कशी देऊ शकते?यावर कोणाचा तरी विश्‍वास बसेल का?ज्यांच्यावर अट्रासिटीची कलम दाखल आहे तेच पिडीतेवर कलम ५०४ व ५०६ दाखल करतात?अट्रासिटीचा तपास कायद्याप्रमाणे एसीपी,डीएसपी,एसपी,डीव्हायएसपी दर्जाचे पोलिस अधिकारीच करु शकतात मात्र सर्वाधिक केसेसमध्ये पोलिस कर्मचारीच हा तपास करताना आढळतात,हे वरचे अधिकारी फक्त त्यावर स्वाक्षरी करण्याचे काम करीत असतात.स्पॉटवर काय घडलं,याची कल्पना देखील त्यांना नसते.त्यांच्या अश्‍या कारभारामुळे एवढी महत्वपूर्ण केस कमजोर होते व आरोपींना सहज जामीन मिळतो.

आरोपी व तक्रारदारांचे जात प्रमाणपत्र हे सर्वात महत्वाचे कागदपत्रे जोडणे या गुन्ह्यात बंधनकारक असताना देखील, हेतुपुरस्सर आरोपींचे जात प्रमाणपत्र जोडले जात नाहीत व आरोपी मोकाट सुटतो.या प्रकरणात देखील आरोपीच्या बायकोनेच पिडीतेविरोधात ५०६ कलम अन्वये गुन्हे दाखल केलेत.पिडीता घरात घुसली,मारहाण केली,जीवे मारण्याची धमकी दिली.न्याय तर सोडाच तिच्याच विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत.पीआय चौधरींने देखील कोणतीही शहनिशा न करता पिडीतेच्या विरोधातच खोटे गुन्हे दाखल करण्यात तत्परता दाखवली,यामुळेच त्यांचे आरोपींसोबतचे साटेलोटे स्पष्ट होतात.त्यांनी ख-या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्रात ‘बेटी बचाआे,बेटी पढाओ‘चा नारा सार्थकी केला!आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनीच काय तो मॅसेज द्यावा.पिडीतेवरील खोटे आरोप रद्द करण्यात यावे,आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी व अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कलम ३०७ लावण्यात यावी यासाठी लवकरच पोलिस आयुक्तांनाही निवेदन देणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या