
(अतिथीस्तंभ)

नितीन रोंघे
२०१६ ची निवडणूक ही महत्त्वपूर्ण यासाठी सुद्धा होती की संबंध जगाला ही अपेक्षा होती की एक महिला अमेरिकेच्या इतिहासात पहील्यांदा अध्यक्ष होऊ शकते अणि ते सुद्धा एका कृष्णवर्णीय अध्यक्षानंतर.
२०१६ ची निवडणूक हि अमेरिकेत सर्वार्थाने खूप चर्चेची ठरली. अनेक अडथळे पार करून डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षीय निवडणुकीचे रिपब्लिकन उमेदवार झाले.
त्यांचा प्रचार गती घेत असताना निवडणूकीच्या एका महिना अगोदर ७ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांचा एक व्हीडयो लीक करण्यात आला ज्यात ट्रम्प हे ‘मी कसा कुठल्याही महिलेला आपल्या जाळ्यात ओढू शकतो’ हे बोलताना दिसले. यामुळे ट्रम्प काही काळ निराश झाले परंतु परत आपल्या चमूसोबत ‘परत लढू या’ ही घोषणा त्यांनी केली.
यामुळे क्लिंटन यांचा कंपू आनंदी झाला. परंतु त्यांचा हा आनंद अल्पजीवी ठरला. त्याच काळात ‘विकिलिक्स’ ने क्लिंटन यांचे निवडणूक प्रमुख जॉन पोदेस्ता ह्यांचे ई-मेल लीक केले. या ईमल्सद्वारे त्यांच्या आतल्या गोटातील जळफळाट, तणाव, अंतर्गत रणनीती आणि क्लिंटन यांच्या वैयक्तिक इमेल्स या सर्व भानगडी उघड झाल्या.
या आधीच्या सर्व अध्यक्षीय निवडणुका ह्या निश्चित अश्या ध्येय धोरणांवर लढवण्यात आल्या होत्या आणि अमेरिकेतील जुन्या जाणत्या लोकांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले कि २०१६ ची निवडणूक ही वैयक्तिक उमेदवारांवर लढली गेली होती.
कदाचित या निवडणुकीत पहिल्यांदा असे बघायला मिळाले कि उमेदवाराच्या स्वतः च्या पक्षातील लोकं आपल्या अध्यक्षीय उमेदवाराचे खंडन करू पाहत होते ! जॉर्ज बुश, जॉन कसिच सारख्या मातब्बर रिपब्लिकन नेत्यांनी आपण ट्रम्पचा प्रचार ही करणार नाही आणि वोट तर मुळीच देणार नाही असे जाहीर केले होते. तसे पाहता ट्रम्पची बाजू त्या निवडणुकीत फारच कमकुवत होती. त्यामानाने हिलरी यांचा प्रचार हा अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुरु होता. त्यांचे पती व पूर्व राष्ट्राध्यक्ष् बिल क्लिंटन यांचा निवडणूकीचा अनुभव, चांगले सल्लागार आणि बाराक ओबामा, इतर रिपब्लिकन नेते व जवळपास ४० हॉलिवूड स्टार्स यांनी त्यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी होकार दिला होता.
त्या मानाने ट्रम्प यांच्यामागे स्वतःचा करिष्मा, आर्थिक पाठबळ आणि प्रचंड संपत्तीधारक उद्योगपती हे बिरुद सोडलं तर विशेष काही राजकीय पाठबळ नव्हतं. डोनाल्ड ट्रम्प हे कधीच रिपब्लिकन पक्षाचे खास समर्थक नव्हते. आपल्या व्यवसायासाठी पक्षाचा वापर करायचा व त्या बदल्यात आर्थिक पाठबळ द्यायचं एवढाच त्यांचा रिपब्लिकन पक्षाशी संबंध. पण प्राईमरीज मध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त मत घेऊन आपली दावेदारी पक्की केली. ह्यामुळे निवडणुकीच्या आधीच रिपब्लिकन पक्षात उभी फूट पडली आहे असे चित्र निर्माण झाले होते. निवडणूक प्रचारात आपली चमू फार लहान आणि सुटसुटीत ठेवली. स्थानिक संस्था किंवा उपलब्ध माहिती वर जास्त भिस्त न ठेवता स्वतःच व्यक्तिमत्व व आपले दिलखेचक वाक्ये यांच्यावरच आपण तारुण जाऊ हा विश्वास त्यांना अगदी सुरुवातीपासून होता. प्रारंभी कुठल्याही रिपब्लिकन नेत्याने, गव्हर्नर सेनेटर किंवा व्यावसायिकाने त्यांच्या उमेदवारीला गम्भीरतेने घेतले नाही.
आपण मेक्सिको आणि अमेरिकेदरम्यान भिंत बांधू व बेकायदेशीररित्या आलेल्या परकीयांना परत पाठवू ही गोष्ट बऱ्याच रिपब्लिक नेत्यांना पटली.
निवडणुकीच्या साधारण दोन आठवड्याआधी वॉशिंग्टन येथे पोहोचल्यावर सर्वत्र डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे पारडे जड आहे हेच चित्र सर्वत्र दिसत होते.
मागच्या आणि यावेळच्या निवडणुकीत फरक हा बघायला मिळाला कि दोन्ही उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध फार खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. २०१२च्या निवडणुकीत ओबामा आणि रोमनी या दोघांच्याही प्रचारात टीव्ही ऍड व एकंदर निवडणुकीत एक भारदस्तपणा होता. दोघांचाही प्रचार हा अर्थव्यवस्था, अमेरिकेतील नोकऱ्या, संरक्षण इत्यादी मुद्द्याभोवती फिरत होता. परंतु यावेळी प्रचार इतका हीन पातळीवर गेला होता कि निवडणुकीच्या काळात तुम्ही लहान मुलांसोबत बसून टीव्ही सुद्धा बघू शकत नव्हता इतका या निवडणुकीत प्रचार खालच्या पातळीवर पोहोचला होता.
दोनी उमेदवाराबद्दल अमेरिकेतील सामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी होती व सामान्य जनता दोघांबद्दलही विशेष काही खुश नव्हती.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओबामांची २०१२ पासूनची दुसरी कारकीर्द सुरु झाल्याबरोबर डेमोक्रॅटिक पक्षात तरी हिलरी यांचे नाव इतर उमेदवारापेक्षा बरेच आघाडीवर होते. हिलरी यांच्याबद्दलही डेमोक्रॅटिक पक्षात खूप काही उत्सुकता नव्हती पण सिनेटर परराष्ट्रीयमंत्री माजी राष्ट्राध्यक्षाची पत्नी व एक स्त्री ह्या गोष्टीमुळे त्यांची बाजू नक्कीच उजवी होती. यावेळेस पहिल्यांदा असे बघायला मिळाले कि राष्ट्रपती पदावर असताना ओबामाने हिलरींना पूर्ण पाठिंबा दाखविला व त्यांच्यासाठी प्रचारसुद्धा केला. इतकेच काय पण त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनीसुद्धा हिलरीसाठी प्रचार केला. हिलरी निवडून आल्या तर त्या अमेरिकेच्या पहिला महिला राष्ट्राध्यक्ष होतील व भविष्यात मिशेल ओबामांना सुद्धा राष्ट्रपती पदी आरूढ होता होईल ही चर्चा सर्वत्र होती. याचसोबत वयाच्या फक्त ५५व्या वर्षी निवृत्त होणारे बाराक ओबामा याना सुप्रीम कोर्टाचे जज बनवण्यात येईल अशी चर्चा होती.
परंतु हिलरी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले . अवैध पैसे रोखीद्वारे काही लोकांना देऊन त्यांच्या द्वारे देणगी स्वरूपात पैसे घेतले अशे खूप आरोप त्यांच्यावर झाले . यात प्रामुख्याने मूळ भारतीय वंशाच्या न्यूयॉर्क येथील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिक आणि UPA काळात मोठा तिकडमबाज आणि नुकतेच निधन पावलेल्या एका भारतीय समाजवादी नेत्याचं नाव सुद्धा आलं . एका अध्यक्षीय डीबेट मध्ये ट्रम्प त्यांनी हिलरी यांना तुम्ही भ्रष्टाचारी असून , निवडून आल्यास फार मोठा भ्रष्टाचार कराल असे सर्वांसमोर म्हटले. याच बरोबर त्यांनी मोनिका लेविन्स्की प्रकरणात त्यांच्या पती चा केलेला बचाव हा सुद्धा निवडणुकीत एक मुद्दा झाला .
हिलरींकडे एक जमेची बाजू होती कि डेमोक्रॅटिक हा एक तळागाळातला पक्ष समजला जातो आणि त्यांचे कार्यकर्ते हे निवडणुकीच्या दिवशी आपले मतदार बाहेर काढण्यात पटाईत समजल्या जातात.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या सार्वजनिक आयुष्यात कधीही पूर्णपणे रिपब्लिकन पक्षात सक्रिय नव्हते. आपल्या व्यवसायासाठी हवा तेव्हा पक्षाचा उपयोग करून घ्यायचा व ब्रज वेळी नामानिराळे राहायचा हा त्यांचा खाक्या. परंतु या तुलनेत अगदी गेल्यावर्षी पर्यंत ट्रम्प हे अध्यक्षीय निवडणुकीत कुठेही चर्चेत नव्हते. परंतु उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत प्रायमरीज व त्यानंतर अध्यक्षीय निवडणुकीत जी बाजी मारली त्याने सर्वच चकित झाले.
शिकागो येथे ट्रम्प यांचे मोठे हॉटेल व टॉवर आहे. इतके मोठे हॉटेल व टॉवर बनविल्यामुळे त्या भागात शिकागो महानगर पालिकेने ऑनररी ट्रम्प प्लाझा असे नाव दिले होते. परंतु जसे ट्रम्प यांनी हिलरीविरुद्ध प्रचारात गरळ ओकनं सुरु शिकागोच्या महापौरांनी ऑनररी ट्रम्प प्लाझा हे नाव काढून टाकले.
इतकेच काय पण विविध राज्यातील बरेचश्या रिपब्लिकन नेत्यांनी त्यांच्या प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले. ओहायो राज्यातील गव्हर्नर व रिपब्लिकन पक्षातर्फे शर्यतीत असलेले अध्यक्ष पदाचे उमेदवार जॉन कसिच यांनी तशी घोषनासुद्धा करून टाकली त्यामुळे ट्रम्प यांनी आपला प्रचार हा ‘एकला चालो रे’ याच धर्तीवर चालवला.
पण हिलरी यांच्यासोबत डेमोक्रॅटिक पक्ष पूर्ण ताकदीने उभा होता व त्यांचे पती माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, राष्ट्रपती बाराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा ह्या पूर्ण ताकदीनिशी प्रचार करीत होत्या. याचसोबत त्यांच्या प्रचारात हॉलिवूडचे डझनभर सितारे त्यांच्या प्रचारात उतरले होते.
जरी हा मुकाबला बरोबरीचा दिसत होता व ट्रम्पबद्दल एक अत्यंत नकारात्मक प्रतिमा जगभर तयार झाली होती तरी ट्रम्प यांनी आपला प्रचार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण अमेरिकेत राबविला. अगदी निवडणूकीच्या आदल्या संध्याकाळी हिलरी ह्या ट्रम्प पेक्षा दोन ते तीन गुणांनी आघाडीवर आहेत हा सर्वांचा कयास होता. याउलट रिपब्लिकन याबाबतीत बरेच मागे होते.
मी ओहायोमध्ये असताना अनेक वरिष्ठ डेमोक्रॅट व रिपब्लिकन नेत्याशी चर्चा करण्याचा योग आला तेव्हा या सर्वानी ह्या निवडणुकीत घसरलेल्या प्रचाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मागील सर्व अध्यक्षीय निवडणुकीनंतर पराभूत व विजयी उमेदवार हे कमीत कमी जनतेसमोर तरी आमचे संबंध चांगले झाले आहे असे दाखवितात. पण ह्या निवडणुकीनंतर निवडून येणारा उमेदवार पराभूत उमेदवारावर किती फौजदारी गुन्हे दाखल करेल याचीच चर्चा जास्त होती. सहसा हवाई राजकीय मतदान संपल्यानंतर सर्वत्र निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात होते. सहसा दुसरा उमेदवार जर पुढे असेल आणि निवडून येत असेल तर पराभूत होणार उमेदवार त्याला फोन कॉल करून शुभेच्छा देतो. याबाबतही अमेरिकेतील मतदारांना शंका होती. हिलरी हरल्यानंतर जितकं आश्चर्य डेमोक्रॅट्सला वाटलं त्यापेक्षा जास्त आश्चर्य रिपब्लिकन्सना ट्रम्प यांच्या निवडीवर वाटलं!
२०१२ आणि २०१६ ह्या दोन निवडणुकीमध्ये एक फरक नक्की जाणवला कि अमेरिकी जनता ही या निवडणुकीत पूर्ण संभ्रमात होती किवां तिला या निवडणुकीत आपल्या मनाचा थांगपत्ता कोणालाही लागू द्यायचा नव्हता. कुणीही उघडपणे किंवा चर्चेत एखाद्या उमेदवाराची बाजू घेत नसत. या निवडणुकी अजून एक फरक बघायला मिळाला कि सहसा एखाद्या व्यक्तीला कुठल्याही उमेदवाराला समर्थन द्यायचे असल्यास त्या उमेदवाराच्या नावाचे यार्ड साइन आपल्या घराबाहेर लावून किंवा आपल्या गादीवर स्टिकर लावून तो मोकळा होतो. पण वॉशिंग्टन, पेनसिल्व्हेनिया, शिकागो, ओहायो न्यूयॉर्क या प्रमुख स्थळी याबाबत काहीही दिसले नाही. ‘यार्ड साइन स्टिकर रिस्ट बँड’ द्वारे निवडणुकीसाठी पैसे उभे करण्यात येतात.
अमेरिका जशी जगातील सर्वात जुनी आणि प्रगल्भ लोकशाही समजली जाते तशी तिथली निवडणूकसुद्धा फार वेगळ्या पद्धतीने लढल्या जाते. आपल्या सर्वांचे जगाचे लक्ष हे केवळ अध्यक्षीय निवडणुकीकडे असते परंतु या निवडणुकीसोबतच इतरही अनेक गोष्टीबाबत जनतेचा कौल घेतला जातो. विविध जिल्ह्यांमधून स्टेट रेप्रेसेंटेटिव्ह, ऍटर्नी सिनेटर जज यासोबत राज्यातील घटनेत कुठले बदल केले जावे, कर्मचाऱ्यांना रजा किती दिली जावी, बंदूक विकायच्या आधी विकत घेणाऱ्याची पार्श्वभूमी तपासणे, पासून ते अगदी गर्भपाताचे वय काय असावे इत्यादी गोष्टीसाठी लोकांचा कौल घेतला जातो.
भारतीय मूळ असलेले अमेरिकेतील नागरिक मतदारांचे महत्व आता अमेरिकेत वाढलेले आहे. मला बघून धक्का बसला कि शिकागो येथील सर्व सरकारी मतदानाच्या छपाईत इंग्रजी, स्पॅनिश, पोलिश व चायनीज सहित सर्वत्र हिंदीतसुद्धा माहिती होती. इतकेच काय पण मतदार यादीतसुद्धा माहिती ही हिंदीत दिली होती!शिकागो बोर्ड ऑफ इलेक्शन मध्ये हिंदी मतदारांसाठी ‘शोभना जोहरी वर्मा’ ह्या दक्षिण आशियायी मतदारांसाठी डायरेक्टर लेव्हलच्या अधिकारी होत्या.
काय होती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची करणे?
१) अमेरिकी अस्मितेला हात घातला. ( Lets Make America Great Again)
२) अवैध इमिग्रंटस्चा विषय
३) अमेरिकेत उद्योगांना पुनर्जीवित करण्याचे आश्वासन
४) नॉन कमिटेड / इंडिपेंडंट / फ्लोटिंग वोटर्स – १५ ते २० टक्के
५) जेम्स कोमी यांचे इमेल्स
६) हिलरी या स्वतःच्या विजयाबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स होत्या व त्यांनी स्विंग स्टेट्सकडे विशेष लक्ष दिले नाही. – पेनसिल्व्हेनिया – न्यू हॅम्पशायर – मिशिगन – ओहायो – फ्लोरिडा – नॉर्थ कॅरोलिना – विस्कॉनसन.
अमेरिकी अध्यक्ष निवडणुकीत आपले लक्ष हे केवळ अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीकडे असत. परंतु गेल्या २ शतकामध्ये अमेरिकेने आपल्या अध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षांसोबत अनेक लोक उपयोगी मुद्द्यांना मतपत्रिकेद्वारे लोकांचे मनोगत जाणल्या जात आहे.
जसे कि गेल्या निवडणुकीत बघायला मिळाले कि अमेरिकेतील एकूण ५० राज्यांपैकी २८ राज्यांनी गांजा (मारिजुआना) उत्पादित करायची व विकण्याची परवानगी पास केली. गर्भपाताचे कायदेशीर वय किती असावे? बंदूक विकण्याआधी विकत घेण्याऱ्यांची आधी चारित्र्य तपासणी व्हावी.बफेलो ते कानडा अजून एक पूल बनवावा कि नाही?तोट्यात असलेल्या शाळा बंद कराव्या का? न्यू जर्सी येथे नवीन कॅसिनो सुरु करावे अथवा नाही ?
अशा विषयांवर मतपत्रिकेद्वारे लोकांचे मत जाणले जाते.
कॅलिफोर्निया राज्यात एक अजब प्रकार पाहायला मिळाला तेथे सार्वमत घेण्यात आलं कि लैंगिक चित्रपट किंवा विडिओ मध्ये कंडोमचा वापर compulsory करावा आणि संबंधित निर्मात्याने त्या चित्रपट / व्हिडिओतील कलाकारांचे लसीकरन करावे आणि वैद्यकीय तपासणी करावी. कारण माहिती नाही पण हे विधेयक फेटाळल्या गेलं.
२०१६ मतदानाचे विश्लेषण-
२०१६ च्या निवडणुकीत काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या
-झालेल्या एकूण निवडणुकीत जिथे ४१% पुरुषांनी हिलरी यांना पाठींबा दिला व ट्रम्प यांना ५३% पुरुषांनी पसंती दिली.
-तसेच ५४% महिलांनी हिलरी याना पाठिंबा दिला व ४२% महिलांनी ट्रम्प याना पसंती दिली.
– अमेरिकेतील ३७% श्वेत (गोऱ्या) मतदारांनी हिलरी ला पाठिंबा दिला तिथेच ५८% श्वेत मतदारांनी आपली पसंती ट्रम्प ला दिली.
– आफ्रिकन अमेरिकन (काळे) हे भक्कमपणे ८८% मतांसह हिलरींच्या मागे उभे राहिले आणि फक्त ८% मतदारांनी ट्रम्प ला पसंती दिली.
– हिस्पॅनिक (स्पॅनिश बोलणारे) व आशियायी मतदार ह्यांनी ६५% मते हिलरी ला दिली व केवळ २९% मतदारांनी ट्रम्प ला पसंती दिली.
– जिथे केवळ हायस्कूलला गेलेले, व थोडे फार कॉलेजला गेलेल्या व पदवीधर मतदारांनी हिलरीला पसंती दिली तिथं पदव्युत्तर मतदारांनी ट्रम्पला भरभरून पाठिंबा दिला.
– पण या निवडणुकीत एक गोष्ट लक्षात आली कि १८ ते ४० हा वयोगट जेथे हिलरींच्या मागे ठामपणे उभा होता तिथे चाळीशी पुढचा मतदाराचा कल हा बहुमताने ट्रम्पच्या बाजूने होता.
– बहुतांश महानगर हिलरी यांच्यामागे ठामपणे उभे होते तर उपनगरे, लहान शहरे, ग्रामीण भाग हे ट्रम्प च्या बाजूने होते.
How is Kamala Harris Important –
कमला हॅरिस
मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरिस याना सोबत घेऊन (रनिंग मेट) जो बिडेन यांनी एक चांगली खेळी खेळली .
कमला हॅरिस ह्या भारतीय माता आणि कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकन वडील (जमैकन) यांचे अपत्य.
संपूर्ण कॅलिफोर्नियात त्या आशियाई अमेरिकन म्हणून ओळखल्या जातात.
कमला हॅरिस ह्यांना संपूर्ण मीडिया नेहमी कृष्णवर्णीयच म्हणतात.
५५ इलेक्टोरल वोट्स असलेल्या कॅलिफोर्निया राज्यातील त्या एक महत्वाच्या नेत्या आहेत.
जसे भारतीय पंतप्रधान पदाचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो तसाच अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा मार्ग हा बऱ्याच अंशी कॅलिफोर्निया राज्यावर निर्भर असतो.
कमला हॅरिस यांनी सिनेट मध्ये ट्रम्प यांना जी टक्कर दिली ती अमेरिकन जनतेला भावली होती.
७७ वर्षीय जो बिडन यांनी ५५ वर्षीय कमल हॅरिस यांना सोबत घेऊन नवीन पिढीशी एक सेतू बांधल्याची चर्चा आहे.
_________________________
[लेखकांनी २०१२ व २०१६ साली अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचे अमेरिकेत जाऊन निरीक्षण केले आहे]




आमचे चॅनल subscribe करा
