

सक्तीच्या रजेनंतर उचके मनपात पुन्हा रुजू!
अकरा वर्षांपासून ‘प्रभारी’ पदावरच अति महत्वाच्या अग्निशमन विभागाचा डोलारा कार्यरत: अकरा वर्षांपासून
मनपाला उचकेंशिवाय ‘योग्य’अधिकारी मिळालाच नाही!
उचकेंवर भ्रष्टाचाराचेही आरोप:उंच इमारतींच्या महसूलीचा डेटाच उपलब्ध नाही
नागपूर,ता.४ जानेवरी २०२३: महानगरपालिकेचे बहूचर्चित अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांचा जामीन अर्ज राजनांदगाव सत्र न्यायालयाने फेटाळला,या विरोधात उचके यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली असून उद्या यावर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.५० वर्षीय उचके यांच्या विरुद्ध त्यांच्याच नात्यातील २४ वर्षीय तरुणीने व्हॉट्स ॲपवर अश्लील संभाषण,चॅट्स व व्हिडीयोज पाठवून मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप केला आहे.
राजेंद्र उचके यांनी तरुणीसोबत वेळोवेळी केलेले संभाषण,व्हॉट्स ॲप चॅट्स,स्वत:चे अश्लील व्हिडीयो पाठवणे या सर्व बाबींचे पुरावे, पेन ड्राईव्हमध्ये न्यायालयाच्या समक्ष ठेवण्यात आले.विशेष म्हणजे नागपूर येथील सदर ठाण्यात फिर्यादी तरुणी व तिच्या पतीविरुद्ध एक कोटीच्या खंडणीच्या आरोपात ९ जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपानंतर नागपूरच्या वर्तुळात भूकंप आला होता.शासकीय अधिकारी असणा-या व्यक्तीला एक कोटीची खंडणी मागणे ही सामान्य बाब नव्हती.मात्र,यानंतर या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली.नात्यातील तरुणीचे लग्न झाल्यानंतर उचके हे तरुणीला अश्लील मॅसेज पाठवित होते,एवढंच नव्हे तर स्वत:चे अश्लील व्हिडीयो देखील त्यांनी तरुणीला पाठवले व शारीरिक संबंधाची मागणी केली,त्यांची मागणी पूर्ण न केल्यास व इतर कोणाला ही बाब सांगितल्यास तरुणीला कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी उचके यांनी दिली.मी उच्च पदावरील शासकीय अधिकारी असल्याने माझी उठबस फार मोठ्या व रुसुखदार लोकांसोबत असल्याने व माझे कोणीही काहीही करु शकत नसल्याची धमकी देणारे व्हॉट्स ॲप चॅट्स देखील तरुणीने पेन ड्राईव्हमध्ये न्यायालयाच्या समक्ष ठेवले.
उचके यांचे घनिष्ठ संबंध पोलिस विभागातील काही वरिष्ठ अधिका-यांशी असल्याची बाब देखील समोर आली असून, याच ‘मधुर’ संबंधांचा वापर त्यांनी तरुणीच्या पतीविरुद्ध एक कोटीच्या खंडणी वसूली प्रकरणी केला असल्याची देखील चर्चा आहे.उचके यांच्या वकीलाने देखील तरुणी व तिच्या पतीविरुद्ध गुन्हे अन्वेषन शाखेद्वारे केलेल्या कारवाईचा उल्लेख करुन ,उचके यांचा जामीन मागितला होता. पतीला अटक झाल्यामुळेच राजनांदगाव येथे तरुणीने उचकेंविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली असल्याचे न्यायालयाला सांगितले.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.तरुणीनेच ३५ लाखांची मागणी उचके यांना केली मात्र एवढी मोठी रक्कम एक साथ देऊ शकणार नसल्याचे उचके यांनी तरुणीला सांगितल्याने उचके यांच्याकडून खंडणी वसूल न झाल्याने लैंगिक शोषणाचा हा बनाव करण्यात आला असल्याचा दावा उचके यांच्या वकीलांनी न्यायालयात केला.
मात्र,तरुणीने उचके यांना कामूक संभाषण करुन आपल्या प्रेम जाळ्यात ओढले असल्याचा आरोप केला जात असला तरी, त्याच वेळी आरोपी एवढ्या मोठ्या जबाबदार शासकीय पदावर असताना याविरुद्ध आक्षेप का नाही घेतला?हा प्रकार रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न का नाही केले?उलट आरोपीने स्वयं अतिशय अश्लील संभाषणांचे चॅट्स केलेत जे कोणत्याही शासकीय पदावरील अधिका-याकडून अपेक्षीत नाही,असे न्यायालयाने सांगितले.
आरोपीने फिर्यादींविरुद्ध जरी एक कोटीची खंडणी मागण्याच्या आरोपाखाली कलम ३८४ अन्वये गुन्हा नोंदवला असला, तरी आरोपी उचके यांनी शासकीय अधिकारी असताना तरुणी त्याच्यासोबत अश्लील संभाषण करीत होती,हे स्वत: स्वीकारले असल्याने,त्यांच्यावरील लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याची साक्ष देत,त्यांना जामीन न देण्यासाठी हीच बाब पात्र ठरवते,असे ही निरीक्षण तृतीय अपर सत्र न्यायाधीश सिद्धार्थ अग्रवाल यांनी नोंदवले.
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उचके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून उद्या यावर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे उचके यांना गेल्या वर्षी हे प्रकरण समोर आल्यानंतर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले होते.मात्र उचके यांना नुकतेच पुन्हा कामावर रुजू करुन घेण्यात आले आहे.सत्र न्यायालयाने जामीन नाकारला असून उचकेंविरुद्ध एफआयआर देखील नोंवण्यात आली आहे,तरी देखील उचके यांची मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी त्याच पदावर पुन्हा नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नायडू यांनी उचके यांच्या भ्रष्ट काराभाराविषयी अनेक प्रकरण उजेडात आणली असून अश्या अधिका-यामुळे मनपाची प्रतिमा संपूर्ण राज्यात मलिन होत असल्याचे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री,नगरविकास मंत्री तसेच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना देखील लिहले आहे.उचके यांच्या या संपूर्ण भ्रष्ट कारभारात मनपाचेच काही अति.आयुक्त लिप्त असल्याचे व त्यांचा भ्रष्ट कारभार उचके यांच्या मार्फत उघडकीस येऊ नये यासाठी उचकेंना पुन्हा पदावर रुजू करुन घेण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
शासनाच्याच २०१५ च्या अध्यादेशाप्रमाणे शहरातील २४ फूटांच्या वर असणा-या इमारतींकडून महसूल गोळा करण्याचे काम अग्निशमन विभागाच्या प्रमुखावर सोपविण्यात आले आहे.मात्र,उचके यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात मनपाच्या हक्काचा हा महसूल बुडविण्यात आला असल्याचा आरोप देखील केला जात आहे.एकीकडे मनपाजवळ सर्वसामान्य नागपूरकरांच्या मूलभूत सोयींसाठी पैसा उपलब्ध नाही,दुसरीकडे मनपाचे काही अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभारातून आर्थिक लृट करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
विशेष म्हणजे,उचके हे गेल्या अकरा वर्षांपासून मनपाच्या अग्निशमन विभागात ‘प्रभारी’पदावर कार्यरत आहे.उचके यांच्याकडे मुख्य अग्निशम अधिकारी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता नसल्यानेच त्यांना ‘प्रभारी’म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे,मात्र गेल्या अकरा वर्षांपासून मनपाला पात्र व योग्य अधिकारी सापडलाच नाही का?की फक्त उचके यांना संरक्षण देऊन त्यांच्यामार्फत ’मलाई’खाण्याचा गोरखधंदा सुरु राहावा,या हेतूने हे पद अद्याप भरण्यात आले नाही?असा सवाल आता विचारला जात आहे.
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माननीय न्यायालयात पेन ड्राईव्हमध्ये जे पुरावे सोपविण्यात आले त्यात मनपा मुख्यालयातील उचके यांच्या कक्षातच अश्लील चाळे करतानाचे चलचित्रण असल्याची बाब समोर आली आहे.उचके यांच्या अधीन काही महिला कर्मचारी कार्यरत आहेत,अशा वेळी त्या कोणत्या मानसिकतेत काम करीत असाव्या?त्यांच्या सुरक्षेचे काय?शासकीय ईमारतीत अश्या प्रकारचे गैरकृत्य कितपत समर्थनीय आहे?हा देखील सवाल आता विचारला जात आहे.
चोवीस तास पोलिस कस्टडीत नसल्याने उचके कामावर रुजू:राम जोशी(अति.आयुक्त.नागपूर मनपा)

कायद्याप्रमाणे उचके यांना अटक होऊन चोवीस तासांची पोलिस कस्टडी मिळाली नसल्याने त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्यात आले आहे.फक्त एफआयआर दाखल झाला किवा जामीन मिळाला नाही या आधारावर शासकीय अधिका-यांना निलंबित केल्या जात नाही.मुख्य अग्निशमन अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी माझ्याच काळात मी दोन ते तीन पत्र शासनाला पाठवली आहेत मात्र अद्याप शासनाने याची दखल न घेतल्याने गेल्या अकरा वर्षांपासून उचके हे प्रभारी पद सांभाळत आहेत.शहरातील उंच इमारातीतून मनपाला महसूल मिळत आहे,या आरोपात तथ्य नाही.




आमचे चॅनल subscribe करा
