फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजई - लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडेल: नितीन गडकरी

ई – लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडेल: नितीन गडकरी

Advertisements

नागपूर महानगरपालिकेद्वारा निर्मित ई – लायब्ररीचे भूमीपूजन

नागपूर,ता. १४ : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यामातून बजेरियासारख्या भागात तयार होणाऱ्या या ई -लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकाराने लाल शाळेत ई लायब्ररीचे निर्माण होणार आहे. त्याच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आय़ुक्त अझीझ शेख प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, बजेरियासारख्या भागात ई लायब्ररी निर्माण करणे ही खरंच अभिनंदनीय बाब आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून भविष्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. या लायब्ररीतून भविष्यात उत्कृष्ट दर्जाचे इंजिनिअर, वैज्ञानिक, डॉक्टर तयार होतील, असा मला विश्वास आहे. नागपूरचा विकास हा केवळ रस्ते, उद्याने यापुरता मर्यादित नाही तर नागपूरचा विकास हा चौफेर व्हायला हवा. त्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा या सर्व क्षेत्रातील विकास आवश्यक आहे. या वाचनालयामध्ये दिव्यांगांनाही महत्व देण्यात येणार आहे. दिव्यांगाना आवश्यक त्या सोयीसुविधा यामध्ये अंतर्भूत असणार आहेत, ही प्रशंसनीय बाब आहे. या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करावा, असे ते म्हणाले. शहरातील तरुणांबाबत बोलताना ते म्हणाले, तरुणांच्या शारिरिक विकासासाठी शहरात १५० मैदानांचे निर्माण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मैदाने तयार झाल्यावर खेळाडूंनीही शहराच नाव उंच करावे, असेही ते म्हणाले.

बजेरिया भागात उद्यान तयार करण्यासाठी त्यांनी खासदार निधीतून निधी देण्याची घोषणा यावेळी केली. या उद्यानासाठी आमदार सुधाकर देशमुख यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार विकास कुंभारे यांनीही यासाठी निधी मंजूर केलेला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी ई – लायब्ररी तयार करण्यामागील पार्श्वभूमी आणि सविस्तर माहिती दिली. ग्रंथालयाची इमारत ‘ग्रीन’ राहणार असून या लायब्ररीला आयआयटी खरगपूरशी जोडण्यात आलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी पूर्ण सहकार्य मिळेल. या लायब्ररीमध्ये ब्रेल लिपी असणाऱ्या संगणकाचा समावेश करण्यात आलेला आहे.

ब्रिटीश ई- लायब्ररीच्या आधारावर या लायब्ररीची संकल्पना तयार करण्यात आलेली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या लायब्ररीला देण्यात येणार आहे. अत्याधुनिक सोयीने उपयुक्त ही लायब्ररी भविष्यात विद्यार्थ्यांना फायदेशीर व दिशादर्शक ठरणार आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे निर्माण केलेल्या या ई – लायब्रऱीचा खर्च पाच कोटी इतका आहे. ही लायब्ररी तीन मजली असून तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पहिल्या मजल्यावर १२५ विद्यार्थी बसू शकेल इतका प्रशस्त वातानुकूलित हॉल आहे. त्याच्या बाजूस विद्यार्थ्याना आपले सामान ठेवण्यासाठी कक्ष असणार आहे. याच मजल्यावर लायब्ररीचे व्यवस्थापन कार्यालयदेखील असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर २५ संगणक ठेवण्यात आलेली असून २५ विद्यार्थी एकत्रित अभ्यास करू शकेल, अशी लायब्ररीची रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये पाच पाच विद्यार्थी गट चर्चा करण्यासाठी तीन स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पॉवर पाईंट प्रेजेंटेशन तयार करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेला आहे. याशिवाय एक स्वतंत्र स्वयंपाकघर असणार आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करता येईल. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असणार आहे. दुसऱ्या मजल्याप्रमाणे तिसऱ्या मजल्यावरही अशीच व्यवस्था केवळ विद्यार्थींनीसाठी असणार आहे.

तिसऱ्या मजल्याच्यावर सौर उर्जेचे पॅनल राहणार आहे. या संपूर्ण इमारतीसाठी लागणारी उर्जा या सौर उर्जेच्या माध्यामातून तयार होणार आहे. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसोबत आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांनाही या अत्याधुनिक व वातानुकूलित लायब्ररीचा फायदा व्हावा, याकरिता या लायब्ररीचे शुल्क अगदी नाममात्र ठेवण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेता यावा आणि भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी या लायब्रऱीतून घडावे हा ई लायब्रऱी सुरू करण्याचा प्रमुख उद्देश असणार आहे. या लायब्ररीसाठी ६ मार्च रोजी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच कोटीच्या निधीला मंजुरी दिली होती. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेशदेखील देण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे डिझायन सुप्रसिद्ध वास्तुविशारद प्रशांत सातपुते यांनी तयार केले असून त्यांचा या भूमिपूजनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा प्रकल्प नागपूर महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता उल्हास देबडवार, मनोज तालेवार यांच्या नेतृत्वात उपअभियंता रवि बुंदाडे, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र दुधे, स्थापत्य सहायक सुनील दुमाने यांच्या निरिक्षणात तयार करण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या