
(मुक्तवेध)

९७ वर्षीय इमरोझच्या त्यागाचे पर्व विलीन
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२७ डिसेंबर २०२३: इमरोझ ही एक कीवंदती आहे,र्निरव्याज प्रेम या भावनेची समर्पणाची,,त्यागाची,मैत्रीची,आदराची,काळजीची.अमृता-इमरोझ यांचं परस्पर नातं हे आदराचं होतं.नुकतेच ९७ व्या वर्षी इमरोझ यांनी इहलोक त्यागले आणि अनेकांनी अमृता-इमरोझ यांच्याच प्रेमाच्या भरभरुन कथा प्रसूत केल्या मात्र,गीतकार साहीर लृधियानवीसाठी असलेल्या प्रेमाच्या अतृप्तेच्या वेदना, अमृता यांनी एकमेव मित्र इमरोझ यांच्याशीच वाटून घेतल्या होत्या,इमरोझ यांच्या मनात मात्र अमृताविषयी ‘पारलौकिक’ प्रेम भावना होती,ही गोष्ट अलहिदा.
प्रेम या अलौकिक भावनेचं अधिपत्य कुण्या एकासाठीच असतं किवा वाटेकरी कोणीतरी एकच व्यक्ती असतो,एकाच वेळी एकाच काळात दोन पुरुषांवर कोणत्याही स्त्रीचं प्रेम जडत नसतं,पुरुषासाठी मात्र हे सहज शक्य असलं तरी,अमृता यांनी साहीरवरचं आपलं प्रेम हे कधीही जगापासून लपवलं नाही,साहीरनेही कधीही तिचं प्रेम नाकारलं नाही मात्र…स्वीकारलं ही नाही!याचेच प्रतिबिंब साहीरच्या अनेक अजरामर गीतांमध्येही झळकले.
अमृता फक्त एक देह नव्हती तर एक जिवंत अशी वेदना होती.आयुष्याच्या जोडीदारापासून मिळालेले रक्ताळलेले घाव,मुलांच्या प्रति जवाबदारीने भारलेली एक प्रेमळ आई,पदोपदी ठेचकाळणारे अनुभव मनाच्या उतुंग भरारी पलीकडे अवकाशात झेप घेणारी प्रतिभेची धनी, अमृता यांच्या कविता या जिवंत वेदनेचा प्रकल्भ प्रवासच होता.
‘दिवस उजाडताना आम्ही भेटलो
कागदाच्या फाटल्या तुकड्यांसारखे
त्याचा हात मी हातात घेतला
त्याने मला मिठीत घेतलं
मग पुन:सेंसरसारखे
आम्ही दोघं हसलो
तो कागदाचा तुकडा आम्ही थंड टेबलावर ठेवला
आणि संबंध कविताच खोडून टाकली….’

हा होता व्यासंग अमृता यांच्या घायाळ शब्दांचा.अमृताच्या आयुष्याचे धुमसते निखारे काळानेच जणू पेटवले होते,त्या चटक्यांनी जणू त्यांच्या बोटावर फोड आले होते,त्यांची औद्धत्य आणि कल्पकता ही वर्णनातीत होती.‘साहित्य अकादमी पुरस्कार ’मिळवणारी पहीली महिला मानकरी!साहित्य जगतातला सर्वोच्च मानाचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’त्यांनी मिळवला.‘पद्मश्री’,पद्मभूषण’,देश विदेशातील अनेक मानाच्या पुरस्काराची धनी,सहा विद्यापीठांनी डी.लिट.पदवी देऊन सन्मान प्राप्त करणारी अमृता,‘आवाज ए पंजाब’ची ही मानकरी झाली.‘सहस्त्रकाची कवियित्री’म्हणून गौरवलेल्या अमृता यांचे खासगी आयुष्य मात्र धगधगता निखाराच होता.
अमृता आणि इमरोझच्या नात्याचे वर्णन करावयाचे झाल्यास,अमृताच्या घराचा जिना देखील इमरोझच्या चित्रांनी सजवलेला होता.इमरोझच्या प्रत्येक चित्रात फक्त आणि फक्त अमृता होती.इमरोझचं प्रत्येक चित्र हे वेगळं होतं आणि प्रत्येक चित्रात अमृताचं दर्शन घडत होतं.अमृता, इमरोझने जशी कल्पिली,जशी आकळली तशीत त्यांनी साकारली.शरीर आणि आत्मा,कल्पना आणि वास्तव यांचा सुरेख मेळ म्हणजे इमरोझचं अमृताप्रतिचा प्रेमभाव होता.
इमरोझबद्दल अमृता लिहतात ’चंद्राच्या छायेतून रात्रीच्या वेळी इमरोझ माझ्या स्वप्नात आला..एक दिवस त्याला कोणी तरी घरी घेऊन आलं,तो एक मुंबईचा चित्रकार होता आणि फार सुंदर चित्र काढायचा,मला तो अगदी अबोल वाटला,काही बोलायलाच तो तयार नसायचा,तरीही त्याचं बोलणं मला जाणवायचं…’इमराेझ अमृताला ‘माजा’म्हणज असे.एका इटालियन कादंबरीची नायिका ’माजा’होती…!
इमरोझ आणि अमृता जवळजवळ ४० वर्ष एकत्रित राहीले.इमरोझने अमृताला व्यापलेलं होतं.ते अमृताची चित्रे काढत असत,ते अमृता यांच्या घराच्या खिडक्या रंगवित असत,ते अमृताच्या पुस्तकांसाठी चित्रं काढत असत,ते दोघांच्या पुस्तकांसाठी मांडण्या तयार करीत असत,ते अमृताच्या दिव्याच्या शेडवर कविता लिहत असत आणि एखाद्या वृक्षाच्या रुपात अमृताच्या नावाचं सुलेखन करीत असत.त्यांनी काढलेलं झाडाचं एक भव्य चित्र अमृता यांच्या झोपायच्या खोलीजवळच्या खोलीत लावलेलं होतं आणि इमरोझ हे अमृताच्या कवितांचाच जणू एक भाग झाले होते.अमृता यांच्या ’आदि धरम’कवितेतले शब्द आहेत-
‘तुझ्या अस्तित्वात जेव्हा मी गुरफटून घेतलं मला
आपली शरीरंसुद्धा परस्परांच्या ध्यासात गुंतली
आपले अवयव एकत्र गुंफले गले
हारातल्या फुलासारखे
आत्म्याच्या वेदीवर वाहिलेल्या नैवेद्यासारखे…
आपल्या ओठातून ओघळणारी आपली नावं
बनली एक पवित्र सूक्त…’

या दोघांचीही परस्परांमधील आत्मिक समरसता,परस्परांच्या सहवासात फूलून येणं,खरोखरंच एखादं पवित्र सूक्त प्रत्यक्ष ऐकत असल्यासारखंच होतं.
जगाची पर्वा न करता अमृता या आपल्याला हवं तसं आयुष्य जगल्या.स्वत:च्या हिमतीवर बेभानपणे जीवनाची वाटचाल करण्याची शक्ती आणि कुवत त्यांच्यापाशी होती.अमृता यांची तृप्तता आणि इमरोझ यांची परिपूर्तता ही पारलौकिक होती….!
वेदनेविषयीचं अमृता यांचं लिखाण अचंबित करणारं होतं.वेदनेबरोबरचं त्यांचं नातं गहिरं आणि परिपक्व होतं,आपल्या एका कवितेत अमृता लिहते ’जेव्हा जेव्हा,जेथे जेथे धरणी कंपित झाली..एक दीर्घ उसासा माझ्या उरातून निसटला…’.आपल्या सामर्थ्यशाली लेखणीने आपल्या काळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाहांना वेगळी दिशा दाखवणारी अमृता या अभिव्यक्तीचं सशक्त ‘विद्यापीठच’ होत्या.
एका ठिकाणी प्रेमाविषयीचं आपलं मत व्यक्त करताना अमृता म्हणतात ‘प्रेमाच्या दोन जाती आहेत.एक प्रेम आभाळासारखं असतं,तर दुसरं डोक्यावरचं छपरासारखं असतं’.साहिर लृधियानवी त्यांच्यासाठी ‘आभाळासारखे’होते.बाईला दोन्ही हवं असतं.‘प्रसंगी छप्परच आभाळ हाेतं’असंही त्यांनी पुढे म्हणाल्या.योगायोग आणि परिस्थितीने त्यांना छप्पराची निवड करायला लावली.आभाळ फार फार दूर होतं.प्रेम ही त्यांची निकड होती,त्यांना चेतवणारी,जाग आणणारी शक्ती होती.
अमृता यांच्या एका पुस्तकात इमरोझ यांच्याविषयीचा एक प्रसंग आहे.अमृता यांनी एकदा इमरोझ यांना सल्ला दिला ‘तू तरुण आहेस,आता तू आयुष्यात स्थिर व्हायला पाहिजेस.तू तुझ्या मार्गाने जा.माझ्याबद्दल म्हणशील तर मी फार जगेन,असं मला वाटत नाही’.इमरोझ यावर म्हणाले ‘तुझ्याशिवाय जगणं म्हणजे मरणंच!मला एवढ्यात मरायचं नाही’.
एक दिवस पुन्हा विषण्ण मन:स्थितीत अमृता म्हणाल्या,‘तू एकदा बाहेर जाऊन प्रथम जग बघून घे.परत आल्यावरसुद्धा तुला माझ्याबरोबरच रहावंसं वाटलं,तर तू सांगशील ते मी ऐकायला तयार आहे.‘इमराेझनी त्यांच्या छोट्याशा खोलीत तीन फे-या मारल्या आणि म्हणाले,‘बघ,झालं माझं जग पाहून!’.
अमृता आणि इमरोझ एकत्र राहायला लागले,त्याच्या आधी एक दिवस अमृता यांनी एका ज्योतिषाला रोखठोक विचारलं होतं ‘आम्ही दोघे एकत्र येऊ शकू का?’ज्योतिषाने हातावरच्या काही रेषा पाहिल्या,काही तरी गणितं मांडली आणि म्हणाले,‘फार तर अडीच तास तुमचं एकत्रपण टिकेल’.‘असं होऊच शकत नाही’अमृता रागाने उसळून म्हणाल्या.ज्योतिषाने पुन:एकदा आपण मांडलेल्या गणितांकडे पाहिलं आणि लगेच म्हणाले‘अडीच तास नाही,तर कदाचित अडीच महिने टिकेल,कदाचित अडीच वर्ष ही…!’अडीच या आकड्याचाच प्रश्न आहे न?मग अडीच आयुष्य असं का म्हणायचं नाही?माझं अर्ध आयुष्य तर संपलेलंच आहे,अजून दोन आयुष्य शिल्लक आहेत’असा तर्क अमृता यांनी दिला.अर्थात भावनेचं तर्कशास्त्र ज्योतिषाला समजणे शक्यच नव्हते.आपला मार्ग हा पुनश्च कष्टाचा,अडचणींचा आहे हे त्यांना उमगलं.
त्यांच्या भावविश्वात स्वर्गातली ईडनची बाग फुलत होती पण प्रत्यक्षात त्यांचा प्रवास काट्याकुट्यांतूनच चालत होता.त्या ज्योतिषाचं भविष्य सपशेल चुकलं होतं.एकमेकांच्या सहवासात तब्बल ४० वर्ष त्यांनी घालवली होती.वीस वर्ष सलग अमृता यांना दर दुस-या वा तिस-या रात्री एक स्वप्न पडत असे.त्या स्वप्नात त्यांना दाट झाडीत, नदीकाठी एक दुमजली घर दिसायचं.खिडकीजवळ एक माणूस कॅन्व्हासवर चित्र काढत उभा असायचा.वीस वर्ष त्या हे स्वप्न पाहत होत्या.त्या माणसाचा चेहरा मात्र अमृता यांना कधीच दिसला नाही.दिसायची ती फक्त पाठ अथवा एक बाजू.पर…इमरोझला प्रथम पाहिलं त्याच क्षणी हाच तो स्वप्नातला माणूस,हे त्यांनी ओळखलं होतं….त्यानंतर कधीच त्यांना ते स्वप्न दिसलं नाही.विधिलिखित म्हणतात हे हेच असावं…!
‘आज मी एक जग विकून टाकलं
आणि विकत घेतलं एक जग,विश्वासाचं
मी पाखंडीपणा केला
मी स्वप्नांचा पट विणला
त्याचाच वारभर तुकडा काढून
माझ्या आयुष्याला चोळी शिवली.’
अमृता विवाहित असूनही अशा दुस-याच एका पुरुषाबरोबर राहील्या.ज्याचं त्यांच्यावर प्रेम होतं.अमृता आणि इमरोझ दोघांनाही कुठल्याही प्रकारच्या सामाजिक शिक्कामोर्तबाची गरजच वाटली नाही.दोघांनीही ती गोष्ट निग्रहाने नाकारली. इमरोझ त्यांच्या नात्याविषयी ठामपणे सांगत असत ‘ज्या जोडप्यांना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते,त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते.आम्ही आमची मनं पूर्णपणे जाणतो आहोत,मग समाजाची लुडबुड हवीच कशाला?आमच्या या नात्यात समाजाला कोणतेही स्थान नाही.आम्ही एकमेकांशी वचनबद्ध आहोत,याची समाजा पुढे कबुली द्यायचीच कशाला?तुम्ही एकमेकाला बांधील असो वा नसो,कुठल्याच बाबतीत समाज तुम्हाला काहीच मदत करु शकत नाही.स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागायची तयारी नसेल अथवा स्वत:च्या करणीची जबाबदारी घ्यायची तयारी नसेल,तेव्हाच समाजाने आपल्या वतीने काही निर्णय घ्यावा अथवा निर्णयावर शिक्कामोर्तब करावं,अशी आपली अपेक्षा असते.जे निर्णय आपले आपण घेत असतो,ते चुकीचे ठरले,तरी त्याचं खापर आपण दुस-या कोणावर फोडता कामा नये,खरं तर अशा वेळी आपल्याला समाजाची गरज वाटते ,एक आधार म्हणून,म्हणजेच आपल्या सोयीसाठी..अमृता आणि मी…आम्हाला दोघांनाही अशा सोयीची गरज नव्हती..!

अमृता त्यांच्या नात्याविषयी म्हणत असत‘एक सामाजिक नियम मोडून एक वाईट उदाहरण आम्ही समाजा पुढे ठेवलं असं आम्हाला वाटत नाही उलट आम्ही दोघांनी हे प्रेमाचं बंध अधिक घट्ट केले आहेत.तन,मन,करणी,वचन या सा-यांद्वारे आम्ही एकमेकांशी अत्यंत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहीलो आहोत.इतर जोडप्यांना इतंक जमलं असेलच,असं नाही.प्रत्येक समस्येशी आम्ही एकत्रपणे सामना केला आणि अत्यंत सच्चेपणाने आमच्यातलं नातं जपलं,जोपासलं.खरं तर समाजा पुढे आम्ही एक अत्यंत ठाशीव,परिणामकारक उदाहरण ठेवलंय.समाजाला आम्ही बळकटच केलंय.आम्ही काय म्हणून या गोष्टीची लाज वाटून घ्यावी?उलट,आमच्याबद्दल चुकीचा समज करुन घेतल्याबद्दल समाजालाच लाज वाटायला हवी…!
लेखिका म्हणून अमृता यांना खूप विरोध सहन करावा लागला.त्यांची मुक्त,मोकळी-ढाकळी लेखनशैली आणि त्यांची जगावेगळी जीवनशैली,दोन्ही लोकांना न पटण्यासारख्या,पचण्यासारख्या होत्या.नव-यापासून वेगळं होतानासुद्धा सत्याला धिटाईने त्या समोर गेल्या.माणसाकडे सत्याला समोरं जाण्याचं धैर्य असायला पाहिजे,असं त्यांचे म्हणनं होतं.
एका प्रख्यात हिंदी लेखकाने त्यांना विचारलं ’तुमच्या सर्व कादंब-यांच्या नायिका सत्याच्या शोधात घर सोडून निघाल्या,हे समाजाला घातक ठरणार नाही का?अमृता यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं ‘चुकीच्या सामाजिक मुल्यांमुळे घरं मोडली असतील,तर सत्याच्या आग्रहासाठी आणखीही घरांची मोडतोड झाली पाहिजे….’
अमृता इमरोझला म्हणत असे,तिला साहिर मिळाला असता तर इमरोझशी तिची गाठच पडली नसती.यावर इमरोझ त्यांना म्हणत असे,मी तुला नक्कीच मिळवली असती,अगदी साहिरच्या घरातूनसुद्धा तुला ओढून आणली असती.एकदा इमरोझ मुंबईला जाण्यासाठी निघाले असता अमृता यांनी साहिर यांना देण्यासाठी इमरोझ यांच्याकडे एक पुस्तक दिले.अमृता साहिरवर किती प्रेम करते,साहिरविषयी तिला काय वाटतं हे इमरोझ यांना माहिती होतं.पण,मी अमृतावर किती प्रेम करतो,तिच्याविषयी मला काय वाटतं हे देखील मला माहिती होतं.साहिर अमृताचं स्फूर्तिस्थान होतं,अमृता यांचं साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेलं ‘सुनहरे’हे पुस्तक त्यांनी साहिरसाठीच लिहलं होतं आणि ते त्यांनी उघडपणे बोलून ही दाखवलं होतं.तरी देखील इमरोझ यांचं अमृता यांच्या आयुष्यात स्थान काय?असा प्रश्न इमरोझ यांना केला असता ’साहिरबरोबरचं तिचं आयुष्य हा आभास होता,पण माझ्याबरोबरचं तिचं आयुष्य हे वास्तव आहे.साहिरने तिला अस्वस्थता दिली पण मी तिला समाधान दिले….!’

अमृता यांच्या ‘इक सी अनिता’,दिल्ली दियॉ गलियाँ’ आणि ‘आखरी खत’यामध्ये साहिर अगदी स्पष्टपणे दिसतो.त्यांच्या ‘अन्नदाता’ आणि ‘इंतजार’या कवितांमधून त्यांच्या यातनांची कल्पना येते.या कवितांमधून त्यांचे नव-याशी कसे संबंध होते याची कल्पना येते.त्या लिहतात
‘रात्र अर्धी सरलेली आहे
अर्धी उरलेली आहे
मी बसले आहे एका छत्राखाली
जे तुझ्या पित्याने,पित्याच्या पित्याने उभारलं आहे
मिणमिणत्या मेणबत्तीच्या प्रकाशात
वाट पाहते आहे तुझ्या लटपटत्या पायांची
दारुच्या घृणास्पद वासाची
तुझ्या श्वासातल्या..
मी,हो,मी
मी,तुझ्या होणा-या बाळाची आई..!’
अमृता यांच्या नव-याची त्यांना घटस्फोट देण्याची मुळीच तयारी नव्हती मात्र,जेव्हा दुसरी स्त्री त्याच्या जीवनात आली तेव्हा ते घटस्फोट देण्यास तयार झाले.अमृता यांच्या मनात नव-याविषयी कधीही आकस नव्हता.अखेरच्या काळात जेव्हा ते एकटे आणि आजारी होते तेव्हा,त्यांना स्वत:च्या घरी अमृता यांनी आणले आणि जातीने त्यांची शुश्रृषा केली.त्यांच्या अखेरच्या दिवसात त्यांना आधार ही दिला.अमृता यांच्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेेतला…!
इमरोझ अमृता यांना आणखी एका नावाने हाक मारीत असे ती म्हणजे ‘बरकते’.बरकत म्हजणे समृद्धी.अमृता हीर आहे आणि फकीर ही.तखत हजारे म्हणजे प्रेमिकांचं निवासस्थान,हा तिचा धर्म आणि प्रेम ही तिची जीवनशैली…तिची जात बैरागिणीची आणि वृत्ती आमिराची,एका हाताने जे कमवित होती,दुस-याह हाताने दान देत असे.
अमृता आणि इमरोझ दोघेही तसे सारखे पण दोघांच्याही अभिरुचीत आणि वृत्तीत फार फरक होता.दोघेही नेहमीच घरीच आपापल्या खोल्यांमध्ये राहत असत.अमृता त्यांच्या खोलीत लिहत असत,तर इमरोझ त्यांच्या खोलीत चित्र काढत असे.दरवाजे उघडेच असायचे.एकमेकाच्या असण्याचा सुगंध दरवळत असे पण कोणाची कुठे ढवळाढवळ नसे.
अमृता आणि इमरोझ हे ‘नागमणि’नावाचं मासिक काढत असे.त्या मासिकात एका वाचकाने इमरोझ यांना एक प्रश्न विचारला होता,त्याचे उत्तर इमरोझ यांनी ‘पुरुष बाईबरोबर झोपायला शिकला,पण तिच्याबरोबर जागा व्हायला शिकला नाही’असे दिले.त्या वाचकाचा प्रश्न होता ‘स्त्री-पुरुष संबंध इतके गुंतागुंतीचे का?पंजाबच्या ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या इमरोझच्या दृष्टिने ‘प्रेम प्रेयसीच्या भूमीत चांगलं रुजावं लागतं,तरच ते वाढतं,बहरतं’. इमरोझ यांचं मत होतं ‘आपल्यापैकी बरीच माणसं ही प्रेमातून जन्माला आलेली नसतात..आपला जन्म जर औदासिन्य,इच्छा,राग,वासना,मत्सर,द्वेष यांच्या पोटी झाला असेल तर,आपण प्रेम कसं करणार?प्रेम करण्यासाठी आपला जन्मसुद्धा प्रेमातूनच व्हायला हवा असतो… !’

अमृता जन्माने शिख तरी देखील त्यांचे केस कापलेले होते.त्या सिगारेट ओढत असत,अधूनमधून मद्य घ्यालाही आवडत होतं.त्या सर्वांवर वरताण म्हणजे आपल्यापेक्षा वयाने लहान,पण ज्याच्यावर प्रेम आहे,अशा पुरुषाबरोबर लग्न न करता रहात होत्या.यामुळे ‘आवाज एक पंजाब’च्या मानकरी असून देखील त्यांना पंजाब सोडावा लागला होता.ज्यांचा काडीमात्र ही अमृता यांच्या आयुष्याशी संबंध नव्हता त्यांचा त्रास त्यांनी सहन केला.त्यांची पुस्तके विकली जात होती,वाचक त्यांच्यावर भरभरुन प्रेम करीत होते पण त्यांचे लेखन,त्यांच्या कथा-कादंब-यांचा विषय,त्यांनी स्वत:साठी निवडलेली जीवनशैली त्यांच्या समकालीनांना कधीच पचली नाही.त्या काळात पंजाबमधील एकजात सा-या वृत्तपत्रांनी आणि मासिकांनी त्यांच्या पुस्तकांची आणि जीवनशैलीची विचक्षणाच केली होती.त्यांच्या लिखाणावर बंदी ही घालण्यात आली होती.त्यांच्या ‘कलंकित’नावाविरुद्ध अनेक मुके-बोलके निषेध नोंदवले गेले होते.पण,इमरोझने सतत त्यांच्याबरोबर राहून या सा-याला धैर्याने तोंड दिले होते.सर्व कठीण प्रसंगात ते ठामपणे अमृता यांच्यासोबत उभे राहीले.इमरोझबरोबर अमृता यांना कायम सुरक्षीत वाटत असे.
इमरोझबद्दल त्या लिहतात‘तुझ्यासाठी मी ‘परिपूर्ण’‘’हा शब्द वापरणार नाही,कारण त्या शब्दासरशी माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण होते,जिला अधिक काही जोडता येत नाही आणि जिच्यातून काही काढून घेता येत नाही,अशी एखादी थंड,घट्ट वस्तू डोळ्यांपुढे येते…तुझ्याशी तर कुणीही सहज बोलू शकतो..जणू काही माझा श्वासच तुझ्याकडून येतो…आज इथे परदेशात बसून मी तुला लिहते आहे.मनात येतं,आज १५ तारीख.आजचा दिवस हा आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन.या दिवसाला काही व्यक्तिमत्व द्यायचं झालं,तर तुझंच नाव घेईन.तूच माझा १५ ऑगस्ट आहेस,कारण तुझ्यामुळेच जिला मुक्ति मिळाली,ती मीच आहे..’
अमृताला आपल्या आधाराची गरज आहे,हे इमरोझना माहिती होतं.म्हणूनच प्रेमाचं एक मोठं,आनंदी कारंजं होऊन ते तिच्यावर वर्षाव करत होते आणि आपल्याला हळूवार सांभाळणा-या त्या धारांचा आनंद अमृता मनसोक्त घेत होत्या.
इमरोझनी एकदा एक मोठा बोलका प्रसंग सांगितला होता.‘एकदा आम्ही आमच्या गाडीने प्रवास करत होतो.मध्य प्रदेश ओलांडून महाराष्ट्राच्या सीमेवर आलो.महाराष्ट्रात त्या वेळी दारुबंदी होती.आमच्याकडे दारु किवा अन्य मादक पदार्थ आहेत का,हे तपासण्यासाठी आमची गाडी अडवली आणि आमच्यापाशी तसं काही नाही,याची खात्री करुन घेऊन आम्हाला सोडून दिलं.पण,एकमेकांबरोबर असण्याची नशा आम्हाला पुरेशी होती,हे त्यांना माहिती नव्हतं,आमची नशा ते उतरवू शकणार होते?
अमृता एकदा इमरोझला म्हणाल्या,आपलं काही बरेवाईट झालं,तर इमरोझनी दुस-या कोणाला तरी जवळ करावं,इमरोझ काही वेळ गप्प झाले,मग म्हणाले‘मला तू कोण समजतेस?पार्शी…?गिधाडाकडून लचके तोडून घ्यायाला…?माझ्या आधी मरायचा तुला अधिकारच नाही..आपण दोघांनी एकत्र जायची वेळ येईपर्यंत तू सावकाश चालशील..असं वचन दे मला…!
अमृता यांची प्रकृती ढासळत चालली होती,त्या आपल्या आपण चालू वा उठून बसू शकत नव्हत्या.अंथरुणातच कुशीवर वळायचं तरी इमरोझ त्यांची सुश्रृषा करत.हे सर्व ते अत्यंत प्रेमाने व आनंदाने करीत असत.जणू काही एखाद्या लहान बाळाचं संगोपन करीत असल्यासारखं…!
इमरोझनी कधीही अमृतावरच्या आपल्या प्रेमाचा उच्चार केला नाही.अमृतानेही कधी इमरोझवरचं आपलं प्रेम शब्दांनी बोलून दाखवलं नाही.तरीही लोकांनी त्यांच्या मैत्रीचा उपमर्द केला.इमरोझबरोबरच्या आयुष्यात मला मिळालेलं सुख हे मोठं सत्य आहे,त्याच्या तुलनेत मला भोगावं लागलेलं दु:ख हे लहान सत्य आहे,अशी कबुली अमृता देत असत.एकदा एखाद्याने आपल्या आयुष्याचा मार्ग निवडल्यावर समाजाच्या अनुमतीचा अथवा हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही,असं इमरोझचं म्हणणं होतं.त्या मार्गावरचं अडखळणं हा त्या पावलांचा आणि त्या मार्गाचाही अवमान आहे,असे ते म्हणत.
गमतीने ते दोघे स्वत:ला देवाच्या लग्नातले पाहूणे समजायचे आणि तशा त-हेने त्यांनी आपलं आयुष्य उपभोगलं.मात्र,दोघांनीही एकमेकांच्या वाढीसाठी पुरेसा वेळ आणि अवकाश दिला.
अमृता एकाकीपणेच लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या.त्या दहा वर्षांच्या असतानाच त्यांची आई वारली,त्यामुळे त्यांचं बालपण हरवलं.त्यांचे वडील लेखक होते.ते रात्री लिहीत बसायचे आणि दिवसा झोपायचे.त्यांच्या भोवती सर्वत्र असायची ती पुस्तकेच.अमृता या स्वत:ला एक पुस्तकच समजू लागल्या,को-या पानांचं पुस्तक.म्हणून त्यांनी त्याच पानावर लिहायला सुरवात केली.त्यांच्या वडीलांनी त्यांचे गुण ओळखले आणि त्या गुणांची जोपासना केली.त्यांना यमक,वृतं शिकवली.ईश्वरभक्तीची गीतं लिहण्यासाठी आणि मानवाची दु:खं कथन करण्यासाठी त्यांनी अमृताला प्रेरीत केले.त्या मीराबाई व्हाव्यात,अशी वडीलांची इच्छा होती,पण त्यांना ते जमलं नाही.त्यांनी राजन नावाच्या एका काल्पनिक मित्राची प्रतिमा तयार केली होती.चंद्राच्या सावलीतून त्यांनी त्याला शोधून काढलं होतं आणि रात्ररात्र त्या त्याच्याकडे पाहच बसायच्या.राजनला उद्देशून अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी एका ओळीची प्रेमकविता लिहली होती.अमृताच्या शर्टच्या खिशात ती वडीलांना सापडली पण,घाबरुन आपण ती लिहली नसल्याचं वडीलांना त्यांनी सांगितलं.
वडीलांनी त्यांना एक चापट मारली,कविता लिहल्याबद्दल नव्हे…खोटं बोलल्याबद्दल.अमृता म्हणतात,माझ्या कवितेलासुद्धा माझं खोटं बोलणं आवडलं नाही.म्हणून आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ती न लाजता उफाळून आली..!कुठलीही बंधनं अमृताना आवडत नव्हती.आपल्याबद्दल कोण काय बोलतो,याची तिने पर्वा केली नाही.तिची जीवनशैली,तिचं भावनेच्या भरात सारासार विचार न करता वाहूण जाणं,तिचा प्रामाणिकपणा आणि निर्भय वृत्ती,तिचे कापलेले केस,तिचं पँट घालून फिरणं,धूम्रपाण,मद्यपान करणं या सर्वांमुळे आयुष्यभर तिच्याभोवतालच्या मंडळीमध्ये वादंग माजत राहीले.बाईलाही मन असतं,हे ज्यांना कळले नाही अशा पुरुषांनी कडाडून त्यांच्यावर टिका केल्या.
इमरोझच्या खोलीमध्ये साहिरचं नाव अत्यंत सुंदर पद्धतीने सुलेखित करुन लवलेलं होतं.इमरोझने सांगितले की,अमृता कागदावर लिहीत नसते तेव्हाही तिच्या तर्जनीने ती कुठे तरी काही तरी शब्द लिहीतच असते.बहुधा नावच…कोणाचंही नाव,अगदी स्वत:चं सुद्धा.कशावरही हे लिहिणं चालतं.तिच्या गुडघ्यापासून माझ्या खांद्यापर्यंत..स्वत:च्या खोलीच्याच काय,इतर भिंतीवरसुद्धा.कुठेही..अगदी पुढल्या पिढीपर्यंत म्हटलंस तरी हरकत नाही.तिची ही सवय इतकी जबरदस्त आहे की,झाडापानांवरच काय,सुगंधावरसुद्धा तिचं ते बोट फिरत असावं..!
इमरोझनी सांगितले की,सुरवातीला आम्ही स्कूटरवरुन जायचो,अशीच एकदा माझ्यामागे बसली असता,तिने तर्जनीने माझ्या पाठीवर लिहिलं,‘साहिर!’ती त्याच्यावर किती प्रेम करते,हे मला कळून चुकलं..त्यामुळेच…ज्या कुणावर अमृताचं प्रेम आहे त्याला…आमच्या घरात..आमच्या अंत:करणात निश्चितच स्थान आहे…!’
‘आओ कोई ख्वाब बुने’या साहिरच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ इमरोझनी तयार केलं होतं.अमृताचं साहिरबरोबरचं नातं मुग्ध,अबोल होतं.ते होतं केवळ दोन मनांचं नातं..!त्यांच्यात शारीरिक बंध नव्हता.साहिर त्यांना दैवतासमान होते.त्या उंच माणसाच्या लांब सावलीच्या आधाराने अमृता चालत होत्या,तृष्टपुष्ट होत होत्या.
१४ वर्ष या सावलीच्या आधाराने त्या चालत होत्या.दोघांमधला संवादु शब्दाविण होता.ते यायचे…आपल्या कविता त्यांना द्यायचे आणि निघून जायचे.कधी अमृताच्या घराजवळच्या पानाच्या ठेल्यापर्यंत यायचे,सोडा,पान,सिगारेट काही तरी घ्यायचे,अमृताच्या खिडकीकडे एक नजर टाकायचे आणि निघून जायचे..खरं तर साहिर त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच होते,तरीही त्यांच्यासाठी ते एक तारा होते,सतत असणारा…दिसणारा तरीही..दूरचा…….!
अमृतानी स्वत: एकदा सांगितले होते,साहिर त्यांच्या घरी यायचे,खूर्चीत बसायचे,एकामागून एक सिगरेटी ओढायचे थोटकं ॲशट्रेमध्ये टाकायचे आणि निघून जायचे.ते गेल्यावर अमृता तीच थोटकं एकेक करुन ओढायच्या.या नादिष्टपणातूनच त्यांना धूम्रपानाची सवय लागली.
प्रेमाच्या नात्याविषयी अमृता लिहतात ‘कोणी कोणात विरघळून वगैरे जात नाही विलीन होत नाही.दोनही व्यक्ती वेगळ्या असतात.त्या वेगळेपणामुळेच दोघांनाही एकमेकाचं प्रेम ओळखता येतं,एकमेकावर प्रेम करता येतं.दुस-यामध्ये विलीन झाल्यावर तुम्ही प्रेम कोणावर करणार?अमृताच्या मनातली प्रेमिकाची प्रतिमा अतिशय ठाशीव आणि उत्कट आहे,त्या लिहतात:
चादर फटयाँ मै टाकियॉ लावाँ
अम्बर फटे क्या सीना?
खाविंद मरे होर करां मै
आशिक मरे किन्हा जीना?
(चादर फाटली तर मी टाके घालीन,आकाश फाटले तर कसं शिवू? नवरा मेला तर दुसर करीन,प्रियकर मेला तर कशी जगू?)
एका साहित्यिक कार्यक्रमात कोणा लेखकाने इमरोझ हा ‘ठेवलेला माणूस’असा शेरा मारला…!१९५० मध्ये जेव्हा इमरोझ आणि अमृताची भेट झाली,तेव्हा इमरोझची कमाई अमृतापेक्षा बारापट होती…!इमरोझवर कोणतीही कौटूंबिक जवाबदारी नव्हती,याउलट इमृता विवाहित होत्या आणि त्यांना दोन मुलं होती.लेखिका म्हणून अमृताचं स्थान निश्चित व्हायचं होतं तर इमरोझ चित्रकार म्हणून ख्यातकीर्त होते.्बुद्धिमान,सुस्वरुप,सर्व विषय ज्ञात असलेल्या इमरोझचं स्वत:चं असं काही स्थान होतं,स्वत:ची ओळख होती.अशा माणसाला ‘ठेवलेला’म्हटलं जावं,हे खरंच दूर्देवी होतं.
४० वर्षाहून अधिक काळाच्या त्यांच्या सहजीवनात इमरोझनी स्वत:साठी अमृताचा एक पैसाही कधी वापरला नाही.लोक म्हणत असत ‘सारी जिंदगी अमृता को पंखा करते ही गुजार दी’यावर इमरोझ यांचे उत्तर होतं ‘वो नही जानते की पंखा करते करते हवा मुझे भी तो आयी…’
अमृता यांची प्रकृती अतिशय खालावली असताना त्यांनी इमरोझवर एक कविता लिहली होती:
मै तैनु फेर मिलांगी
कित्थे,किस तरां,पता नहाी
शायद तेरी तख्याल दी चिनाग बण के
तेरे केन्व्हास ते उतरांगी
जाँ खौरे तेरे केन्व्हान्स दे उत्ते
इक रहस्यमयी लकीर बण के
खामोश तैनु तकदी रवांगी
जाँ खौरे सूरज दी लौ बाण के
तेरे रांगां विच घुलांगी
तैनु फेर मिलांगी
आजार बळावल्यावर अमृता रुग्णालयात होत्या.मात्र,वियोगाच्या वेदना इमरोझ यांना जाणवल्याच नाही.कसला वियोग?ते सांगायचे.किथे जाऊगी अमृता?अैने अैथे ही हरणा है,मेरे कोल,मेरे दूआले,हमेशा.चाळीस वर्ष आम्ही एकत्र राहीलो आहोत,कोण तिला माझ्यापासून दूर ने कणार आहे?मृत्यूलासुद्धा ते शक्य नाही.गेल्या चाळीस वर्षातल्या तिच्या आठवणी आहेत माझ्यापाशी.आणखीही असतील मला..न आठवणा-या..!कोण तिला माझ्यापासून दूर नेऊ शकणार आहे?
३१ ऑक्टोबरचा दिवस….संध्याकाळी जगाला कळले…इमरोझची ‘माजा’गेली….!
शेवटी शेवटी अमृता यांनी बोलणंही बंद केलं होतं.त्या नुसत्या पहात असायच्या.नुसत्या नजरेनीच इमरोझला सांगायच्या,आणि इमरोझ सर्व काही त्यांना हवं तसं करायचे.इमरोझ नेहमी म्हणायचे,की तिचा चेहरा आणि सारे अवयव आपल्याशी बोलतात,पण अमृताच्या आवाजाला ते मुकले होते…!

इमराेझनेही अमृतावर एक कविता लिहली होती:
कल राती सपने विच
इक औरत देखी
जिनू मैं पहले कदी नही सी वेख्यिा
पर मिलदे ही लग्या
इस बोलदे नैन नक्श वाली नू
पहले वी कित्ते देख्या होयासी
फूल मोया पर महक ना मोयी
(फूल काेमेजलं पण सुगंध नाही कामेजला,सुगंध ओठातून दरवळला,काल अश्रूंतून आज,आठवणीतून उद्या निसर्ग असाच निर्लोप असतो,फूल कोमजलं पण सुगंध नाही कोमेजला)
…………………………………….
(साभार- अमृता इमरोझ एक प्रेमकहाणी)




आमचे चॅनल subscribe करा
