
सी-२० च्या संरक्षक पदी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सहभागाने अनेकांची नाराजी
नोव्हेंबरमध्येच थांबवली या जागतिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी:प्रसिद्धीमध्येही गुप्तता!
निविदा न काढता ठराविकांना संधी ही लोकशाहीची थट्टाच:सोशल मिडीयावर स्वयंसेवी संस्थांचा उघड संताप
केंद्र व राज्यात सरकार असल्याने शासकीय विभाग प्रबोधिनीच्या दावणीला!स्वयंसेवी संस्थांचा आरोप
नागपूर,ता. ३ मोर्च २०२३ :शहरात २१ आणि २२ मार्च रोजी जी-२० अंतर्गत सी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, या परिषदेची जय्यत तयारी शासनस्तरावर सुरु आहे मात्र आज अचानकपणे एवढ्या महत्वपूर्ण परिषदेच्या सी-२० सचिवालय संरक्षक पदी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबईचे उपाध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती झाली असल्याचे व ते पत्र परिषद घेत असल्याचे कळताच, शहरातील अनेक प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळेच त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उपाध्यक्षांची नियुक्ती एवढ्या प्रतिष्ठित व जबाबदार पदासाठी केली असल्याचे व उपराजधानीत एवढ्या दशकांपासून सार्वजनिक क्षेत्रात काम करणा-या इतर स्वयंसेवी संस्थाना डावलले असल्याचा आराेप आता केला जात आहे.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सी-२० च्या आढावा बैठकीत आज डॉ.सहस्त्रबुद्धे सहभागी झाले होते.२१ मार्च रोजी फूटाळा येथे या परदेशी पाहूणे मंडळीसाठी फाऊंटन शो चे आयोजन करण्यात आले असून तेलंगखेडी उद्यानात परिषदेचे पाहूणे व-हाडी जेवणाचा आस्वाद घेणार आहेत.
इतर सर्व उपक्रमांची जंत्री बघता, भाजपचा जणू हा खासगी कार्यक्रम असल्याची टिका बुद्धीजीवींमध्ये उमटली आहे.
२२ मार्चला दिवसभर नागरी परिषदेच्या चर्चासत्र, परिसंवादानंतर सायंकाळी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण माहितीसह पाहुण्यांसमोर करण्यात येणार आहे. नियोजनात कुठलीही त्रुटी राहु नये यासाठी तयारीचा आढावा दहा मार्च रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. आज बैठकीदरम्यान भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तथा सी-२० सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनीही सिव्हिल २० परिषदेच्या आयोजनामागील भूमिका व संभाव्य नियोजन याविषयीची माहिती उपस्थितांना दिली.
हेच नियोजन उपराजधानीतील संस्थांमार्फत राज्य सरकारला साधता येऊ शकले नसते का?कोणत्याही खासगी संस्थेला कमी लेखणे असा आमचा हेतू नसून ‘डावलल्याची’भावना तीव्र असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
इतर राष्ट्रांमध्ये या परिषदेचे आयोजन पार पडत असताना वेगवेगळे फोरम या उपक्रमाशी जुळलेले होते.त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी ‘सचिवालय’ म्हणून तेथील सरकारने खासगी दरबारातील माणसाची नियुक्ती केली नसल्याची टिका केली जात आहे.
या जागतिक दर्जाच्या परिषदेचे चिन्ह देखील भाजपने स्वत:च्या ‘कमळ’या निवडणूक चिन्हामध्ये बंदिस्त केले आहे,जे नैतिकतेला धरुन नाही अशी टिका प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही केली होती.त्यात आता केंद्राच्याच पावलांवर पाऊल टाकत राज्याच्या उपराजधानीत पार पडणा-या एवढ्या महत्वाच्या उपक्रमाला देखील संपूर्ण ’भाजपामय’करण्यासाठीच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष यांच्या हातात संपूर्ण धुरा साेपविण्यात आली असल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्ष पदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असून याच संस्थेच्या उपाध्यक्षांच्या हातात संपूर्ण धुरा सोपविण्यात आल्याने उपराजधानीतील काही प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याच खासगी संस्थेच्या उपाध्यक्षांच्या हातात उपराजधानीतील संपूर्ण सी-२० ची धुरा सोपविण्याचे फार पूर्वीच ठरले असल्यानेच, नोव्हेंबरमध्येच इतरांना यात सहभागी होण्याची संधी थांबविण्यात आली होती.अनेकांना फार उशिरा या उपक्रमाबाबत कळल्याने त्यांना आपले नाव या उपक्रमासाठी योग्य फोरमवर नोंदवता आले नसल्याची तक्रार देखील मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर उमटली आहे.
मूळात याची कोणतीही जाहीर प्रसिद्धीच करण्यात आली नाही,संपूर्ण तयारी ही या खासगी संस्थेतर्फे फार आधीच करण्यात आली असून, आज पत्र परिषदेत फक्त त्या सर्व उपक्रमाची ’औपचारिक’ घोषणा करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
सर्वात महत्वाचा मुद्दा हा फंडिंगचा आहे.कोट्यावधी रुपये केंद्राकडून या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले असून,नियमानुसार विभागीय आयुक्तांच्या देखरेखेखाली हा उपक्रम पार पडत असतो.मात्र सर्व शासकीय विभाग धाब्यावर बसवून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारख्या खासगी संस्थेच्या हाती एवढा महत्वपूर्ण उपक्रम,उपक्रमांमधील रुपरेषा,अंमलबजावणीची धूरा सोपविण्यात आल्यानेच उपराजधानीत स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांमध्ये तीव्र रोष उमटला आहे.
शहरातील महानगरपालिका फक्त नाग नाल्यांना टिन शेडनी झाकण्यापलीकडे व त्या टिनांचे अस्थायी सुशोभिकरणापलीकडे कोणताही सहभाग या एवढ्या महत्वपूर्ण परिषदेत करीत नसल्यावर नेटीझन्सनी चांगलेच ओरखडे उमटवले आहे.
सरकारकडे जी-२० अंतर्गत होत असलेल्या सी-२० या जागतिक परिषदेची रुपरेषा सहा महिन्यांपूर्वीच आली असताना ज्या शहरात ती कार्यान्वित होणार आहे त्याची जबाबदारी मुंबईतील एका खासगी संस्थेच्या उपाध्यक्षांवर सोपविल्या गेली असल्याने आता २० ते २२ मार्च दरम्यान पार पडणारी ही परिषद ‘जागतिक’ स्तरावरील असली तरी ती सर्वस्वी ‘भाजप पुरस्कृत’ अशीच असणार आहे,अशी बोचरी टिका देखील समाज माध्यमावर उमटली आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही मुंबईत काम करणारी एक स्वायत्त प्रशिक्षण व संशोधन संस्था आहे.प्रशिक्षण,प्रबोधन आणि संशोधन ही कार्यत्रयी घेऊन प्रबोधिनी गेल्या चार दशकांपासून काम करीत आहे.प्रशिक्षण हा प्रबोधिनीच्या कार्याचा मुख्य गाभा आहे.प्रबोधिनीने आतापर्यंत प्रशिक्षणाचे ९०० वर्ग,चर्चासत्र,परिसंवाद,अभ्यास मंडळासारखे प्रबोधनाचे ५५० आणि संशोधन व सर्वेक्षणाचे सुमारे ९० उपक्रम हाती घेतले आहे.निश्चितच एवढ्या महत्वाच्या जागतिक परिषदेच्या यशस्वीतेसाठी राज्य सरकारने एवढी मोठी जबाबदारी या अनुभवी संस्थेकडे सोपवली असावी मात्र,रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था भाजपचीच राजकीय संस्था असल्याचा ठपका गेल्या अनेक दशकांपासून चर्चिला जात आहे,त्यामुळेच आता राज्याच्या उपराजधानीत सी-२० च्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठीची धुरा याच संस्थेच्या उपाध्यक्षांच्या हातात सोपविली गेली असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच उपराजधानीतील विभागीय आयुक्तालय,जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग व गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर महानगरपालिकेसारख्या शासकीय विभागांच्या कार्यशैलीवर विश्वास नाही का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आजच्या बैठकीत त्यामुळेच एका खासगी संस्थेचे उपाध्यक्ष विभागीय आयुक्तांच्या ‘समकक्ष’बसून सूचना करीत असल्यानेच अनेकांच्या भूवया उंचावल्या.
उपमुख्यमंत्र्यांना एवढा महत्वाचा उपक्रम एका खासगी संस्थेच्याच हाती द्यायचे होते तर सर्वांनाच बोलावून विचारलं का नाही?छोट्या छोट्या गोष्टींसाठी टेंडर काढणा-यांना एवढे महत्वाचे गणित जमले नाही?किमान आपण एका खासगी संस्थेकडे जागतिक दर्जाच्या परिषदेची जबाबदारी सोपवित आहोत यासाठी तरी कोणती बैठक बोलावली का?ठराव पारित केला का?’हम करे सो कायदा’हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाहूण्यांच्या बाबतीत कसा काय लागू होऊ शकतो?फडणवीस हे उद् घाटक म्हणून तर गडकरी हे समारोपीय भाषणासाठी येणार आहेत किमान नागपूरच्या यशात तुरा रोवू शकेल असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियोजन तरी केले आहे का? असा ही सवाल समाज माध्यमांवर विचारला जात आहे.
………………….




आमचे चॅनल subscribe करा
