

तातोडे प्रकरणात ’सेटलमेंट’ची चर्चा
नागपूर,ता. २४ मार्च २०२२ : देशातील सुपरडूपर हिट ‘शोले’या चित्रपटात वयोवृद्ध चरित्र अभिनेते ए.के.हंगल यांच्या तोंडी एक संवाद होता ‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’हा संवाद त्या काळी खूप लोकप्रिय झाला होता,हाच संवाद आता महाराष्ट्राच्या उपराजधानीत देखील वारंवार ऐकू पडत आहे मात्र या वेळी विषय हा चित्रपटाशी संबंधित नसून राजकारणाशी जुळलेला आहे. ॲड.सतीश उके यांनी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या पत्नीच्या सख्ख्या मावस भावाला,सूरत तातोडे यांना ३१ जानेवारी २०२२ रोजी प्रचार-प्रसार माध्यमांसमोर आणले .तातोडे यांनी त्या पत्र परिषदेत बावणकुळे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली.पुढे त्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवण्यातच आला नाही आणि सगळं काही एकाएक ’शांत ’झालं त्यामुळे नागपूरच्या वर्तुळात या शांततेमागे ‘अर्थकारण’ जोडल्या जात असून या प्रकरणाशी संबंधित विभूतींमध्ये ‘हिस्सेवाटणी’झाल्यानेच प्रकरण शांत झाले असल्याची चर्चा रंगली. नागपूरच्या माध्यम जगतात व आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्या जिवनात एवढं मोठं वादळ येऊन व दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील ’इतना सन्नाटा’पसरला असल्याने उपराजधानीत चर्चेला ऊत आला आहे.
या प्रकरणात १५ कोटींचा व्यवहार झाला असल्याचे बोलले जात आहे.याबाबत ॲड.उके यांच्याशी संपर्क साधला असता ही सर्व अफवाह असल्याचे ते म्हणाले. तातोडे यांनी तक्रारीचे रुपांतर एफआयआरमध्ये का केले नाही?यावर बोलताना ही लढाई त्यांनाच लढायची आहे त्यांनी वकील करावा व येणा-या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावे असे उके यांनी सांगितले.या प्रकरणात १५ कोटींचा व्यवहार झाला असल्याची बाब ही अफवाह आहे कारण तीनच दिवसांपूर्वी तातोडे यांच्या पत्नीने मला फोन करुन सांगितले की सूरज तातोडे हे कोराडीच्या घरातून जुना कूलर घेऊन आले कारण मुलांना खूप गर्मी होत आहे.तातोडे यांचे घर बावणकुलेंच्या घरालाच लागून असल्याने मी तातोडेला बजावले देखील होते की हे असे धाडस का केले?असे ॲड.उके यांनी सांगितले.या संदर्भात तातोडे यांच्याशी किवा त्यांच्या पत्नीशी संपर्क होऊ शकतो का?अशी विचारणा उके यांना केली असता,तातोडे यांनी अनेक कारणांनी आपला मोबाइल फोन बंद ठेवला असल्याचे व ते सर्व संभाषण पत्नीच्या मोबाईलवरुनच करीत असल्याचे उके म्हणाले.तातोडे यांच्या पत्नीचा संपर्क क्रमांक मात्र मिळू शकला नाही.
एकीकडे राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहे.तर उर्जामंत्री नितीन राऊत यांचे पूत्र कुणाल राऊत यांनी मकोकाच्या फरार आरोपीला दिलेला राजाश्रय या विरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार देखील त्यांनी दाखल केली होती.या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नसल्याने धोटे यांनी त्यांच्या वकीलाच्या माध्यमातून सदर पोलिस ठाण्यातील अधिका-यांना नोटीस बजावली.या नोटीसला देखील पोलिसांकडून उत्तर मिळाले नसल्याने आता धोटे यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केला आहे. तातोडे प्रकरणात मात्र एकीकडे राजकीय धुरिणांवर अतिशय गंभीर आरोप करने,त्यांच्या विरोधात पत्र परिषदा घेणे,पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करने या नंतर ‘गप्प’ बसने,ही बाब संशयाला खतपाणी देणारी असल्यानेच तातोडे यांच्या प्रकरणात चर्चेचे हे गु-हाळ नागपूरात रंगले आहे. ॲड.उके यांनी या आरोपांचे खंडण करीत नाहक बदनामी करणा-यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा दम दिला.

(छायाचित्र: कुणाल राऊत प्रकरणी ज्वाला धोटे यांनी पाठवलेली कायदेशीर नोटीस)
३१ जानेवरी २०२२ रोजी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन बावणकुळे यांच्या विरोधात तातोडे यांनी अतिशय गंभीर आरोप केले होते. यानंतर ८ फेब्रुवरी २०२२ रोजी तातोडे यांनी नवा व्हिडीयो व्हायरल केला.यामध्ये तातोडे यांनी बावणकुळे यांच्यावर ‘बाया’व ’हवाला’चा आणखी एक खळबळजनक आरोप केला होता,बावणकुळे यांच्या एकंदरित कारभाराची संपूर्ण ‘मोडस ऑपरेंडी’कशी होती याची चांगलीच ‘पोलखोल’केली होती.. उर्जा खात्यातील मंत्री असताना शासकीय नोकरीची वयोमर्यादा ओलांडलेल्या किती महिलांना बावणकुळे यांनी उर्जा खात्यात नोकरीवर लाऊन दिल्या,याचा पाढाच तातोडे यांनी वाचला. इतवारीच्या एका साडी स्टोरमधूल साडीच्या बॉक्समध्ये एक कोटींची रक्कम हवालातून प्राप्त केल्याचे तातोडे व्हिडीयोमध्ये सांगत होते.रामदासपेठच्या घरातच बावणकुळेंसाठी पाच कोटींची रक्कम घेतली.चंद्रपूरातील दारुबंदीत ही बावणकुळेंनी आपले स्वत:चे उखळ कसे पांढरे केले,उर्जा मंत्री पदावर असताना कोट्यावधीची माया जमा केली.’गोपाल सावरकरच्या नावासारखीच अनेक स्वीय सहायकांच्या नावे घेतलेली बेनामी संपत्ती,पॉवर प्लान्टमध्ये बावणकुळे यांच्या मार्फत लागणा-या अनेकांचे पगार कंत्राटदारच कसे देतात हा खुलासा थक्क करणारा होतो.
बावणकुळे यांच्या काेराडी तसेच मुंबईच्या बंगल्यावर एसजी इन्फ्रा,केकेसी,सरस्वती कन्ट्रकशन इ.कंपन्यांकडून कोट्यावधीचा निधी पोहोचवला असून आपल्या समाेरच विविध कंत्राटदारांकडून १०० कोटी रुपये घेण्यात आल्याचा खळबळजनक आरोप तातोडे यांनी आपल्या ३१ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्र परिषदेत केला होता. काेराडी येथील बंगल्यावरील संपूर्ण हिशेब मी सांभाळत होतो,कोणाकडून किती रक्कम घ्यायची आहे, कोणाला किती रक्कम पोहोचवायची हा संपूर्ण हिशेब बावणकुळेंनी विश्वासाने माझ्यावर सोपवला होता. मात्र एका कंत्राटदाराकडून बावणकुळे यांनी साढे सात कोटींची रक्कम घ्यायची आहे असे सांगितले असता त्या कंत्राटदाराने वेळोवेळी कधी एक कोटी,कधी तीस लाख अशी रक्कम माझ्याकडे आणून दिली.एकदा त्याने दिलेल्या एक कोटीमधून तीस लाखांची रक्कम बावणकुळे यांच्या सांगण्यातून कोणाला तरी मी दिली मात्र यानंतर त्याची डायरीमध्ये नोंद करण्यास विसरलो,जेव्हा बावणकुळे यांनी त्या तीस लाखांचा हिशेब मागितला तेव्हा मला कोणाला ते तीस लाख रुपये दिले हे नाव न लिहल्यामुळे वेळेवर आठवले नाही,परिणामी बावणकुळे व त्यांच्या पत्नीने,मुलाने,मुलीने माझ्यावर आरोप-प्रत्यारोप सुरु केले,मी गेल्या अठरा वर्षांपासून बावणकुळे यांचा विश्वासू आणि जवळचा नातेवाईक आहे,एवढ्या वर्षात कधीही एका ही पैशांचा गैरव्यवहार करण्याचा माझ्यावर डाग नाही,त्यामुळे बावणकुळे यांनी मी त्यांचा पैसा खालल्याचा आरोप करताच माझा रक्तदाब वाढला व मला अर्धांगवायूचा झटका आला.अश्या परिस्थितीत माझ्यावर रोबो उपचार करण्या ऐवजी माझीच संपूर्ण संपत्ती त्यांनी माझ्या स्वाक्ष-या घेऊन त्यांनी पत्नी ज्योती,मुलगा संकेत,मुलगी पायल व आपल्या स्वीय सहायकांच्या नावे करुन घेतली असल्याचा खळबळजनक आरोप सूरज तातोडे यांनी केला होता.याप्रसंगी मंचावर ॲड.सतीश उके व निखिल रोकडे उपस्थित होते.
उर्जा खात्यात नोकरी लाऊन अनेक महिलांचा ‘उद्धार करणा-या बावणकुळे यांची मजल चक्क ‘मेट्रो’पर्यंत गेली व मेट्रोमध्ये देखील त्यांनी एका ‘खास’महिलेला नोकरीवर लावले असल्याचा आरोप तातोडे यांनी केला होता.अर्थात बावणकुळे हे उर्जा मंत्री असताना एकूण किती वयाच्या व किती महिलांना ही शासकीय नोकरी मिळाली,माहितीच्या अधिकारात याची माहिती घेण्याचे आव्हान देखील तातोडे याने केले होते. तातोडे यांच्या पत्नीने देखील त्यांच्या पतीला वेडा ठरविण्याच्या प्रयत्नावर चांगलीच आगपाखड केली होती व बावणकुळे यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.
थोडक्यात तातोडे यांनी माजी उर्जामंत्री व विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर ‘बाया,हवाला,कमिशनखोरी व भ्रष्टाचारा’बाबत अतिशय गंभीर आरोप केले होते.
दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील आता हे प्रकरण अचानक कसे शांत झाले व ‘सर्वच पातळीवर सन्नाटा पसरला’याबाबत म्हणूनच चर्चेला उत आलं आहे.




आमचे चॅनल subscribe करा
